आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निव्‍वळ लज्‍जास्‍पद!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्माइतक्याच धर्मसंस्थादेखील पवित्र मानल्या जातात. त्यावर वर्चस्व असलेले संतमहंत, मुल्ला-मौलवी, पाद्री सारेच पवित्र ठरवले जातात. त्याचमुळे बाललैंगिक शोषणाच्या घटना उघडकीस येतात, तेव्हा धर्माच्या कह्यात गेेलेला समाज मौनात जातो. हे मौनात जाणंच विकृतीला खतपाणी घालणारं ठरतं...

 

शासकीय वसतिगृहै असोत किंवा धर्मसंस्थांनी चालवलेल्या निवासी शाळा असोत, यांपैकी कोणतीच जागा बालकांसाठी, अठरा वर्षांखालील मुलामुलींसाठी सुरक्षित असू नये, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे, बालकांच्या लैंगिक शोषणाच्या घटनांनी आपल्या भावना वगैरे अजिबात दुखावत नाहीत. एरवी, धार्मिक संस्था, पंथ, धार्मिक गुरू, संतमहंत, मौलवी, फादर, भिक्खू यांची नावं बाल लैंगिक शोषणाशी जोडली जातात, तेव्हा आपली ‘संवेदनशील’ मनं अजिबात उसळून उठत नाहीत. नपेक्षा एरवी स्वतःला देशभक्त, राष्ट्रवादी म्हणवणारी मंडळी, त्या त्या धर्मपंथांची निष्ठावान अनुयायी  मंडळी बाल लैंगिक शोषणाच्या मुद्द्यावर मौन धारण करताना दिसतात.

 

शासकीय आणि धार्मिक यंत्रणांकडून होणाऱ्या बाल लैंगिक शोषणाच्या घटनांइतकीच समाजाची ही अनास्थाही भयावह आहे. गेले काही दिवस शासनाकडून चालवल्या जाणाऱ्या आश्रमशाळा, आधारगृह यांच्या बरोबरीनेच धार्मिक संस्थांशी जोडलेल्या शाळा, केंद्रे यांची नावंही बाल लैंगिक शोषणाच्या संदर्भातील बातम्यांमधून येत आहेत. यातलं अगदी अलीकडचं  उदाहरण बिहारमधील बोधगया येथील बौद्ध भिक्खूंनी चालवलेल्या निवासी शाळेसंदर्भातील आहे. ६ ते १२ या वयोगटातील आसाममधील १५ मुलं या निवासी शाळा आणि ध्यान केंद्र असलेल्या ठिकाणी शिक्षण घेत होती. या केंद्राला भेट देणाऱ्या एका भिक्खूला या ठिकाणी होणाऱ्या गैरप्रकारांची कल्पना आली. त्याने मुलांच्या पालकांना फोन करुन माहिती दिली. पालकांनी तातडीने बोधगयेला येऊन आपल्या मुलांना ताब्यात घेतले व पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी भिक्खू - संघप्रिय सुजोय याला अटक केली आहे. त्याआधी जुलै महिन्यात पुणे इथल्या मदरशामध्ये लैंगिक शोषण होत असल्याचा आरोप झाला. बिहारमधून या मदरशात आणण्यात आलेल्या मुलांनी हा आरोप केला. पोलिसांनी आरोपी मौलाना रहीम याला अटक केली आहे. पोलिसांनी या मदरशातील ३६ मुलांची सुटका केली असून, त्यांचं इतरत्र पुनर्वसन करण्यात येत आहे. एप्रिल २०१८ मध्ये चेन्नई इथल्या चूलैमेडूमधील मंदिराच्या पुजाऱ्यावर चार वर्षांच्या बालिकेचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप बालिकेच्या कुटुंबीयांनी केला. आरोपी पुजारी उदयकुमार याला पोलिसांनी अटक केली आहे. संत म्हणून प्रसिद्ध असलेले, भक्त-अनुयायी यांची मोठी संख्या असलेले आसाराम बापू यांच्यावरही बाल लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. या सगळ्यांना पोस्को (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस अॅक्ट) या कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. बाल लैंगिक शोषणासंदर्भात वेगवेगळ्या कॅथलिक चर्चेसवरही आतापर्यंत अनेकदा आरोप झाले आहेत. हे आरोप सिद्धही झाले आहेत.

 

खरं तर बाल लैंगिक शोषणाच्या घटना सगळीकडेच घडत असतात. घर, शाळा तसंच इतर सार्वजनिक ठिकाणं या गुन्ह्यापासून मुक्त नाहीत. बाह्यतः सभ्य वाटणाऱ्या, असणाऱ्या अनेक प्रौढ व्यक्ती यात दोषी आढळतात. पण धर्मसंस्थांशी संबंधित व्यक्तींकडून होणारे अत्याचार हे तर अधिक घृणास्पद आहेत. मुलांच्या भावविश्वावर त्याचा अधिक सखोल परिणाम होतो.
धर्म कोणताही असो त्या त्या धर्मातील अनुयायी मंडळी आपापल्या धर्मातील अधिकारी व्यक्ती यांच्याकडे केवळ आदरानेच नाही, तर श्रद्धेने पाहत असतात. संतमहंत, गुरू, भिक्खू, मौलाना, फादर या व्यक्तींकडे एक आध्यात्मिक शक्ती वास करून आहे, अलौकिकत्वाचा स्पर्श त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला झालेला आहे, अशी अनुयायांची श्रद्धा असते. पालक अत्यंत श्रद्धेने आपापली मुलं धर्मसंस्थांमध्ये पाठवत असतात. त्यामुळेच आपापल्या धर्माच्या श्रद्धेय व्यक्तीवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले, की सगळ्यात आधी त्या त्या धर्मातील भक्तांची प्रतिक्रिया ही नकारात्मक असते. कोणीतरी आपल्या धर्माला, आपल्या श्रद्धेय व्यक्तीला बदनाम करण्यासाठी हे सारे कुभांड रचत आहे, असाच त्यांचा आरोप असतो. फार कमीजण या साऱ्या प्रकाराकडे सुजाण नागरिकांच्या भूमिकेतून पाहत त्याच्याविरोधात आवाज उठवतात.गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे, ही धाडसी भूमिका घेतात. खुद्द धर्मसंस्थांची भूमिकाही सारं काही नाकारण्याची असते, संबंधित गुन्हेगार व्यक्तीला पाठीशी घालण्याची असते, किंवा सोयीस्कर मौन धारण करण्याची असते.

 

काही चर्चमधील धर्मगुरूंवर जेव्हा बाल लैंगिक शोषणाचे आरोप उघडपणे होऊ लागले, त्याची जाहीर चर्चा होऊ लागली, तेव्हा सुरुवातीला चर्च यंत्रणेची भूमिकाही हे असे नाकारण्याकडे होती. पण पाश्चात्त्य देशात अंध भक्तांपेक्षा, श्रद्धावान अनुयायांपेक्षा घटनात्मक मूल्यांवर विश्वास असणाऱ्या सुजाण नागरिकांची संख्या अधिक असल्याने या प्रकरणांची सतत जाहीर चर्चा होत राहिली, सातत्याने प्रश्न विचारले गेले, त्यावर पुस्तकं लिहिली गेली, वेगवेगळे माहितीपट, चित्रपट काढले गेले. ‘द पेपर’, ‘जजमेंट’, ‘कार्डिनल’ यांसारख्या चित्रपटांमधून हा विषय सातत्याने मांडण्यात आला. २०१६ चा ऑस्कर पुरस्कार मिळवणारा ‘स्पॉटलाइट’ हा चित्रपटही स्थानिक चर्चमधील बाल लैंगिक शोषण या विषयावरच काढण्यात आला आहे. एका धर्मगुरूकडून होणाऱ्या गुन्ह्याचा शोध घेताना या पत्रकारांना या गुन्ह्याची व्याप्ती अधिक मोठी असल्याचं लक्षात येतं आणि अधिक शोध घेतल्यावर त्यांना लहान मुलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या तब्बल ८६ धर्मगुरूंची माहिती मिळते. या अशा चित्रपटांमुळे आमच्या धर्माची बदनामी होत आहे, त्यामुळे या चित्रपटांवर बंदी घाला, अशी अंध भक्तिवादी व कट्टरतावादी भूमिका तिथे कोणी घेतली नाही. याउलट, धर्माची तात्त्विक व आध्यात्मिक मूल्ये वेगळी आणि धर्मसंस्था व तिची यंत्रणा तसेच ती यंत्रणा सांभाळणाऱ्या व्यक्ती, धर्मगुरू या बाबी वेगळ्या याचं भान राखलं गेलं. यंत्रणा सांभाळणाऱ्या व्यक्तींकडून काही गुन्हे घडले असतील तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे, अशी भूमिका समाजातल्या मोठ्या समूहाने घेतली व सातत्याने घेतली.

 

यंत्रणा शासकीय असो वा धार्मिक असो, तिला योग्य मार्गावर ठेवायचे असेल तर त्यासाठी सुजाण नागरिकत्वाचा रेटा त्यामागे असावा लागतो. मूलभूत मानवी मूल्यांसमोर, घटनादत्त हक्कांसमोर कोणत्याही धर्माची यंत्रणा व त्यातील पुजारी व्यक्ती, तथाकथित संतमहंत, धर्मगुरु हे गौण असतात याचं लोकशाहीवादी भान असावं लागतं. आपल्या  धर्मभावनांविषयी, आपल्या श्रद्धेविषयीही सजग असावं लागतं. ‘तुम्ही दुसऱ्या धर्मातील धर्मगुरुंनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या घटनांबद्दल का बोलत नाही?’, असला बालीश व आत्मघातकी युक्तिवाद न करता, आपल्या धर्मातील जी घाण समोर आली आहे, त्याला शक्य त्या मार्गाने विरोध करणं, त्याचा निषेध नोंदवणं आवश्यक आहे, हे उमगण्याइतकी बुद्धिनिष्ठा व सद्सद्विवेकबुद्धी अंगी असावी लागते. तेव्हाच ‘स्पॉटलाइट’सारखा चित्रपट काढला जातो. जाणकारांकडून त्याला ऑस्करही दिलं जातं. समाजात जेव्हा अशी घुसळण होते, तेव्हा त्याची दखल खुद्द धर्मसंस्थेच्या प्रमुखाला, पोप यांनाही घ्यावी लागते.

 

‘बाल लैंगिक शोषणाच्या घटनांमुळे चर्चवर जो कलंक लागला आहे, त्यासाठी मी देवाकडे क्षमेची याचना करतो,’ अशी क्षमायाचना कॅथलिक धर्मसंस्थेचे प्रमुख धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी अलीकडेच २६ ऑगस्टला आयर्लंड येथे केली. पोप यांच्या दोन दिवसांच्या भेटीच्या वेळी आयर्लंडमध्ये बाल लैंगिक शोषणाविरोधात विविध संस्थासमूहांनी ‘स्टँड फाॅर ट्रूथ’ अशा घोषणा देत रॅली काढली आणि शोषणाला बळी पडलेल्या मुलांना न्याय मिळावा, गुन्हेगारांना शिक्षा मिळावी, अशी मागणीही केली. बळींच्या बाजूने उभ्या राहिलेल्या या ४५,००० समर्थकांसमोर बोलताना पोपनी ख्रिश्चन धर्मगुरूंकडून झालेले लैंगिक शोषण ही उघडी जखम असल्याचे सांगत देवाच्या क्षमेची याचना केली. तसेच, या घृणास्पद कृत्यांविरोधात योग्य वेळी कारवाई न झाल्यामुळेच या गुन्ह्यांविरोधातला रोष वाढला आहे, कॅथलिक समुदायासाठी ही एक वेदनेची व शरमेची बाब राहील, असेही सांगितले. या भेटीमध्ये पोपनी बाल लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या आठ व्यक्तींची भेटही घेतली. या वेळी आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनीही धर्मगुरूंकडून झालेल्या बाल लैंगिक शोषणाच्या घटना या कॅथलिक ख्रिश्चन धर्मावरील तसेच राज्यसंस्था आणि संपूर्ण आयरिश सोसायटी यांच्यावरील कलंक आहेत, अशी भूमिका घेत बळींना न्याय मिळवून देण्याची मागणी पोप यांच्याकडे केली. जनमताच्या रेट्यामुळेच हे शक्य झाले हे लक्षात घ्यायला हवे. धर्मगुरू, पुजारी, संतमहंत, भिक्खू, मौलाना ही धर्मवलयाच्या परिघात वावरणारी मंडळीही अखेरीस माणसंच आहेत, स्खलनशील आहेत; त्यामुळेच त्यांच्याकडूनही चुका होऊ शकतात, गुन्हा घडू शकतो हे भान बाळगून पालकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करणं आवश्यक आहे. जिथे जिथे धर्मसंस्था आणि मुलं यांचा संपर्क येतो तिथे तिथे राज्यसंस्थेनेही धर्माचा प्रभाव झुगारून सतर्क असणं गरजेचं आहे.

 

sandhyanarepawar@gmail.com

बातम्या आणखी आहेत...