आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकीमुळे दुस-याला त्रास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही घटना लगेच विसरल्या जातात; काही कायमच्या स्मरणात राहतात. मी खेड्यात वावरलेली, शाळा फक्त सातवीपर्यंतच होती. पुढच्या शिक्षणासाठी आम्ही 5 भावंडे अमरावतीला शिक्षणासाठी गेलो. शाळा नवीन, शहरही नवे होते. सर्वच अनोळखी. आपली कामे आपणच करायची. घरची जबाबदारी काय असते हे तेव्हा कळले. 2/4 दिवसांची सुटी असली की, आम्ही गावाकडे येत होतो. दुस-या दिवशी सगळेजण शेतात जात असू. त्या वेळी मी बारावीला होते. दिवाळीची सुटी होती. शेतात बोरं, चिंचा, हरभरा, हुरडा आम्हाला खुणावत होता. तेव्हा मी भावंडासोबत दगड मारून चिंच, बोरं पाडण्याचा आनंद घेत होते. चिंचेच्या झाडावर एक मधमाशाचे पोळं होते. नेमका माझा दगड त्या पोळाला लागला. मधमाशा उठल्या.
आम्ही मुलं धावत सुटलो. परंतु आमच्या शेजारच्या शेतातले दामूकाका फिरत फिरत नेमके त्या चिंचेच्या झाडाजवळ आले. मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. ते एकदम घाबरले. माझ्या चुकीचा त्रास दामूकाकांना झाला. दामूकाकांना मधमाशा डंख मारत होत्या. त्यांना होणारा त्रास आम्ही लांबूनच पाहत होतो. मी व इतर भाऊ घरी पळत आलो. शेतापासून घर पाच मिनिटाच्या अंतरावर होते. बाबांना सगळं खरं सांगितले. त्यांनी काठीला कापडं बांधून त्याचा टेंभा केला. त्यावर रॉकेल ओतले. सोबत आगपेटी घेतली आणि शेताकडे निघाले. टेंभ्याच्या आगीने मधमाशा पळून गेल्या. बाबांनी दामूकाकाच्या अंगावर घोंगडी टाकून दवाखान्यात नेले. भीतभीतच मी दवाखान्यात गेले. काकांची माफी मागितली. काका म्हणाले, तू जाणूनबुजून काही केलेले नाही. पण चुकीने तो दगड मधाच्या पोळ्यास लागला आणि अनर्थ घडला. तुला आता समजून चुकले. अशी चूक आता तुझ्या हातून कधी घडणार नाही. इतक्या वेदनेतही त्यांचे बोलणे ऐकून मी मनाशी निश्चयच केला की,यापुढे बेजबाबदारपणे कधीच वागणार नाही. आपल्या चुकीचा इतरांना त्रास व्हायला नको.