आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असा बिघडला कार्यकर्ता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका वडापाववर पक्षासाठी, आपल्या साहेबांसाठी अहोरात्र राबणारा एकेकाळचा कार्यकर्ता, ते आजचा तंदुरी चिकनसोबत स्वतःचं रेटकार्ड बाळगणारा  कार्यकर्ता यातली तफावत कशी आकाराला आली, कोणत्या प्रकारच्या नेतृत्वाच्या सोबतीने ती घडली, घडवली गेली, याची एक ‘बिटविन द लाइन्स’ गोष्ट आमदार राम कदमांचं "पळवापळवी'चं प्रकरण उघड करतं...


मच्यासाठी काय पण...’ असा महानायकी सेवाभाव जागवत सत्ताधारी भाजपचे आमदार असलेल्या राम कदम यांनी मोठ्या आवेशात आपल्या "लाजाळू कार्यकर्त्यां'साठी गरज पडल्यास लग्नासाठी मुलगी पळवून आणण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे संतप्त टीका स्वयंवराला कदमांना तोंड द्यावं लागलं, जे योग्यच होतं. एखादी मुलगी तुम्हाला नकार देत असेल, तर मला सांगा, मी तिला तुमच्यासाठी पळवून आणीन, हे विधान समस्त स्त्रीजातीची अवहेलना करणारं आणि महिला आयोगानेही दखल घ्यावी असंच आहे. त्यामुळेच राम कदम या आमदार असलेल्या व्यक्तीच्या विधानानंतर जो स्त्रीवादी क्षोभ उसळला, तो या अशा पुरुषवर्चस्ववादी बेलगाम वृत्तीला आळा घालण्यासाठी, स्त्रीला असलेला नकाराचा अधिकार अधोरेखित करण्यासाठी आवश्यक असाच होता. मात्र, हे विधान आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपलं लक्ष वेधतं. तो मुद्दा आहे, कार्यकर्त्याची जडणघडण.
राम कदम यांच्या या विधानाने आज एकूणच कार्यकर्त्याची जडणघडण नेमकी कशी झाली आहे आणि होत आहे, हेच अधोरेखित केले आहे. आपल्यामागे कार्यकर्त्यांची फौज उभी करायला लोकप्रतिनिधींना नेमकं काय काय करावं लागतं किंवा ते काय काय करतात, करु शकतात, हेच या विधानातून सामोरं आलं आहे. एकेकाळच्या ध्येयप्रेरित, पक्षनिष्ठ, खऱ्याखुऱ्या सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या कार्यकर्त्याचं रूपांतर गावगुंडाच्या, स्थानिक दादाच्या आवृत्तीत कसं झालं, याची झलकही या विधानातून दिसते. एकेकाळचा एका वडापाववर पक्षासाठी, आपल्या साहेबांसाठी अहोरात्र राबणारा कार्यकर्ता, ते आजचा तंदुरी चिकनसोबत स्वतःचं रेटकार्ड बाळगणारा, पैसे घेऊन प्रचार करणारा कार्यकर्ता यातली तफावत कशी आकाराला आली, कोणत्या प्रकारच्या नेतृत्वाच्या सोबतीने ती घडली, घडवली गेली, याची एक ‘बिटविन द लाइन्स’ गोष्ट हे राम कदमांचं पळवापळवीचं उदाहरण सांगतं.
प्रातिनिधिक लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये पक्षीय कार्यकर्ता हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. राजकीय पक्ष हे कार्यकर्त्यांच्या बळावरच उभे असतात. कार्यकर्त्यांची ही फळी जितकी ताकदवान तितका राजकीय पक्ष अधिक सक्षम असतो. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते लोकसभेच्या निवडणुकांचं आव्हान पक्षांना कार्यकर्त्यांच्या बळावरच पेलावं लागतं. कार्यकर्ता जमिनीवर ठाम उभा असेल तरच निवडणुकांच्या निकालांचे आकडे मनाजोगे येतात. कार्यकर्ता हा स्थानिक पातळीवरचा पक्षाचा चेहरा असतो. असा हा कार्यकर्ता एकेकाळी अभ्यासवर्गांमधून, शिबिरांमधून, बौद्धिकांमधून घडवला जात होता. त्या काळात कार्यकर्ता हा स्थानिक नेत्याचा किंवा साहेबाचा नसून पक्षाचा असे. पक्षाच्या ध्येयधोरणाकडे आकर्षित होऊन राजकीय आणि सामाजिक कार्याची आवड असणारी व्यक्ती कार्यकर्ता बनत असे. काही वेळा पक्षाच्या अभ्यासू, तडफदार नेत्याच्या भाषणांमुळे, लेखनामुळे आकर्षित होऊनही व्यक्ती पक्षीय कार्यांकडे ओढली जात. कार्यकर्ता एखाद्या विशिष्ट नेत्याचा अनुयायी बनला, तरी त्याची बाह्य ओळख अमुक पक्षाचा कार्यकर्ता अशीच असे. या काळात कार्यकर्ता हा नेत्याची खासगी फौज बनलेला नव्हता. तो एखाद्या नेत्याचा अनुयायी असला, तरी त्या अनुनयाचं नातं वैचारिकतेशी तसंच व्यापक सामूहिक हितसंबंधांशी अधिक होतं. आज सत्तरीत असलेले अनेक सर्वपक्षीय कार्यकर्ते आपण आपापल्या पक्षीय नेत्याचं भाषण ऐकण्यासाठी स्वखर्चाने वेगवेगळ्या ठिकाणी कसे जात होतो, याच्या आठवणी सांगतात. कार्यकर्त्यांना नेण्याआणण्याची व्यवस्था करण्याचा आजचा काळ येण्याआधी कार्यकर्ता हा घटक  पक्षकार्यासाठी, आपल्या स्थानिक नेतृत्वासाठी खरोखरच चपला झिजवत असे, मोर्चांमध्ये घसा बसेपर्यंत घोषणा देत असे. अर्थात यावेळी नेतेही हशा आणि टाळ्या वसूल करणारे नकलाकार बनलेले नव्हते. 
स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीतील काँग्रेससह वेगवेगळ्या प्रवाहांमध्ये सामील होत स्वातंत्र्यासाठी प्रेरित झालेला कार्यकर्ता ते स्वातंत्र्योत्तर काळात विविध पक्षांच्या माध्यमातून देशाच्या जडणघडणीमध्ये सहभागी झालेला कार्यकर्ता प्रमुख राजकीय पक्षांचा वाढता भ्रष्ट व्यवहार आणि प्रादेशिक पक्षांची कानाखाली आवाज काढीनची खळखट्याक संस्कृती आल्यावर एका बाजारू वळणावर येऊन उभा राहिला. मात्र हेही तितकंच खरं की, लोकशाहीचा बाजार आधी नेत्यांनी, पक्षांनी मांडला, मग तो यथावकाश कार्यकर्त्यांपर्यंत येऊन पोहोचला. 
लोकशाहीमधला आकड्यांचा खेळ खेळायचा, तर कार्यकर्ता खुश असावा लागतो. हा खेळ खेळताना  नेत्याचं चारित्र्य बदललं, तसं कार्यकर्ता या घटकाचं चारित्र्यही बदललं. नेत्याने आपलंसं केलेलं टक्केवारीचं गणित कार्यकर्ताही मांडू लागला. एका निवडणुकीतल्या विजयात साहेबाच्या आर्थिक स्थितीचा कायापालट होत असेल,  तर त्याचा लाभ आपल्या घरातही आला पाहिजे, ही कार्यकर्त्याची अपेक्षा वाढीस लागली. बहुतेक सगळ्या प्रमुख पक्षांमध्ये वतनदारी, जहागिरीची पद्धत रूढ झाल्याने, एकेका नेत्याकडे एकेक भाग सोपवण्यात येऊ लागला. यातून प्रत्येक नेता आपली स्वतःची कार्यकर्त्यांची फौज निर्माण करू लागला. कार्यकर्त्याला राजी ठेवण्यासाठी विविध पातळ्यांवर पैशाचा पुरवठा होऊ लागला. कार्यकर्ता स्वतःही अर्थप्राप्तीचे विविध मार्ग शोधू लागला, त्या अनधिकृत मार्गांसाठी नेत्याचे संरक्षण मिळवू लागला. एकेक विभाग नेत्याला आंदण दिल्यावर कार्यकर्त्याला एकेक गल्ली द्यावी लागते. यातूनच जागोजागी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता उर्फ स्थानिक दादा हा प्रकार अस्तित्वात आला आहे. अर्थात प्रत्येक राजकीय कार्यकर्ता हा स्थानिक दादा नाही, आजही अनेक जण एका बांधिलकीतून आपापल्या पक्षाचं काम करत असतात. असे सर्वपक्षीय अपवाद असले, तरी आजचे सर्वसाधारण चित्र राजकीय पक्षाचा कार्यकर्ता अधिक स्थानिक दादा या समीकरणाला पुष्टी देणारे आहे.
चुकीच्या शैक्षणिक धोरणामुळे आणि देशातील विषम जातव्यवस्थेमुळे नववी -दहावीच्या टप्प्यावर होणारी शाळागळती, वाढती बेरोजगारी आदी कारणांमुळे शिक्षणबाह्य तरुणांची संख्या गेली काही वर्ष सातत्याने वाढत आहे. निवडणुकीच्या खेळात साम-दाम-दंड-भेद ही नीती वापरण्याची वृत्ती सत्ताप्राप्तीच्या स्पर्धेत उतरलेल्या बहुतेक सगळ्या पक्षांनी अवलंबलेली असल्याने स्थानिक पातळीवर राडा करण्याची क्षमता असलेल्या कार्यकर्ता नामक घटकाची मागणी वाढली आहे आणि बेकारांची वाढती संख्या इथे नेते आणि त्यांच्या पक्षांसाठी इष्टापत्ती बनली आहे. हा जागतिकीकरणोत्तर कार्यकर्ता आता सत्तेच्या वाऱ्याची दिशा पाहून आपल्या कार्याची दिशा बदलत असतो. या कार्यकर्त्याला खूश ठेवण्यासाठी नेत्यानाही विविध प्रलोभने दाखवावी लागतात. यातून कार्यकर्त्याच्या घरच्या लग्नापासून ते बारशांपर्यंत स्थानिक नेत्याची उपस्थिती आवश्यक ठरते. नेत्याची उपस्थिती कार्यकर्त्याची विभागातील वट वाढवत असल्याने या उपस्थितीचे फलक जागोजागी लागतात. या फलकांमध्ये नेत्याबरोबरच कार्यकर्त्यांचे चेहरेही झळकत असतात. कारण या कार्यकर्त्यांमधूनच नवा स्थानिक नेता तयार होत असतो. या स्थानिक पातळीवरच्या छोट्या छोट्या नेत्यांची पण एक साखळी असते. स्थानिक पातळीवरच्या मुख्य नेत्याचा कार्यकर्ता हा इतर कार्यकर्त्यांचा नेता असतो. त्यातूनच या छोट्या मोठ्या सगळ्याच नेत्यांच्या वाढदिवसांचे फलक विभागाची शोभा वाढवत असतात. कार्यकर्त्याला नेता बनण्याची घाई झालेली असते. ‘आता कसं, अमुक दादा म्हणतील तसं’, ‘बघतोस काय, मुजरा कर’, यासारख्या आशयाचे फलक आपल्या फोटोसह लागणं, ही या नेता बनण्याच्या प्रक्रियेची सुरुवात असते. एकीकडे ही सगळी प्रक्रिया वरकरणी लोकशाहीवादी वाटली, तरी तिचा आशय व्यक्तिनिष्ठा जोपासणारा आणि लोकशाहीतील नागरिकत्वाच्या मूल्यांना नाकारणारा असतो. 

 

आजचे बहुतेक राजकीय नेते, या अशा प्रक्रियेमधून घडत असल्याने आमदार, खासदार झाल्यावरही त्यांची  भाषा, विचारप्रक्रिया लोकशाही व्यवस्थेशी पूर्णतः विसंगत अशीच असते. अशातच लोकानुनयाची, समूहाच्या इच्छेला प्रबळ मानण्याची लागण प्रमुख राजकीय पक्षांना लागली आहे. या लोकानुनयाच्या बहुमतवादी राजकारणामुळे समाजातील उदारमतवादी, समतावादी अवकाश आक्रसत जातो, व्यक्तींचे मूलभूत हक्क नाकारले जातात आणि अंतिमतः लोकशाही व्यवस्था धोक्यात येते. एखाद्या स्त्रीला तिच्या मनाविरुद्ध पळवून आणण्याची सैल भाषा करणे, याचा अर्थ  तिचा व्यक्ती म्हणून असलेला नकाराचा घटनादत्त अधिकार नाकारणे असा आहे. व्यक्तीचा घटनादत्त अधिकार जेव्हा नाकारला जातो, तेव्हा व्यक्तीला हे असे मूलभूत मानवी हक्क देणारी लोकशाही व्यवस्थाही नाकारली जात असते. आज देशात व्यक्तींचे मूलभूत मानवी हक्क नाकारण्याची एक मालिकाच सुरू आहे. कोणी काय खावं, काय घालावं, काय वाचावं हे परस्पर काही समूह आणि त्यांचे ठेकेदार सांगत आहेत. या ठेकेदारीच्या मुळाशी राजकीय कार्यकर्त्याचे बिघडलेले, बिघडवलेले चारित्र्य आहे. चारित्र्याची ठेकेदारी घेतलेला पक्षही या बिघाडात आघाडीवर आहे, हेच या पळवापळवी प्रकरणाचे सार आहे.

- संध्या नरे-पवार

बातम्या आणखी आहेत...