आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगलीत मदत वाटपावरून वाद; लुटीचाही संशय, जिल्हा प्रशासनाच्या मदत केंद्राद्वारेच मदतीचे वाटप करण्याच्या सूचना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सांगलीत चहुबाजूने साहित्य येऊ लागले असले तरी त्याच्या वितरणात सुसूत्रता नसल्याने वादाचे प्रसंगही घडू लागले आहेत. सांगली शहरात पूरग्रस्तांपर्यंत ही मदत पाेहाेचत असली तरी ग्रामीण भागापर्यंत पिण्याचे पाणीही पाेहाेचत नसल्याच्या तक्रारी बुरली, नागराळे, तादरवाडी येथील पूरग्रस्तांनी मांंडल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात उभारलेल्या मदत कक्षाद्वारेच साहित्याचे वितरण व्हावे, अशा सूचना असल्या तरी काही उत्साही कार्यकर्ते थेट धान्य व साहित्याची वाहने घेऊन पूरग्रस्तांपर्यंत जात आहेत. त्या वेळी साहित्य आेरबाडण्याचे, लुटीचे प्रकारही हाेत असल्याच्या तक्रारी आहेत.

काही साहित्याची तर दुकानांमध्ये विक्री हाेत असल्याचा आराेप भाजपचे नेते पृथ्वीराज देशमुख यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना केला. ‘माझी सर्व मदत करू इच्छिणाऱ्यांना विनंती आहे की, त्यांनी आणलेले साहित्य तहसीलदार किंवा प्रशासनाकडे जमा करावे,’ अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

मदत वाटपाची वाहने आल्यानंतर ते घेण्यासाठी पूरग्रस्तांची झुंबड उडत आहे. राज्याचे पशू व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी काही छावण्यांना रविवारी भेट दिली असता साहित्य वाटपात दुजाभाव हाेत असल्याच्या तक्रारी पूरग्रस्तांनी केल्या. ‘पुराचे राजकारण करू नका’ असे सल्ले सर्वच पक्षाचे नेते देत असले मदत वाटपात श्रेय घेण्याची चढाआेढ दिसून आली.
 

आता मदतीसाठी कागदपत्रांचा शाेध
पुराच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने तब्बल आठ दिवसांनी आपापल्या घरांकडे परतणाऱ्या नागरिकांचे काळीज संसाराचा चिखल बघून पुन्हा एकदा गलबलून जाताना दिसत होते. पै-पै जमवून उभारलेला संसार अनेकांचा पुराच्या दलदलीत वाहून गेला. पूरग्रस्तांसाठी शासनाने जाहीर केलेली मदत मिळवण्यासाठी किमान एक सरकारी ओळखपत्र अनिवार्य आहे. मात्र पुराच्या पाण्यामुळे अनेकांची घरातील कागदपत्रे वाहून गेली आहेत, तर काहींची भिजून चोथा झाली आहेत. त्यामुळे आता ही कागदपत्रे आणायची कुुठून अन‌् मदत मिळवायची कशी, असा प्रश्न पूरग्रस्तांना पडलेला आहे. भिलवडीचे मुरलीधर मसळे (६५) कमरेभर पाण्यातून गावात जाऊन ही कागदपत्रे घेऊन आले.  त्यांंना घरात भिजलेले रेशन कार्ड मिळाले, पण आधार कार्ड नाही सापडले. पतसंस्थेचे पासबुक सापडले, पण ते केवायसी केलेले नव्हते. मुरलीधर यांच्याप्रमाणे अनेक नागरिक व ग्रामस्थांची हीच व्यथा आहे. त्यामुळे आता पूर आेसरल्यानंतर नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी कागदपत्रे कशी गाेळा करावीत हा माेठा प्रश्न त्यांंच्यासमाेर उभा राहिला आहे.
 

मुख्यमंत्र्यांनी काढली अधिकाऱ्यांची खरडपट्टी
सांगली दाैऱ्यात पूरग्रस्तांनी संताप व्यक्त केल्यानंतर शनिवारी रात्री मुख्यमंत्र्यांनी पूरपरिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलेल्या जिल्हाधिकाऱ्यांपासून ते तहसीलदारांपर्यंत सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. ‘तुमच्या हलगर्जीपणामुळे हे अपरिमित नुकसान झाले आहे. विकासाच्या बाबतीत सांगली शहर २० ते २५ वर्षे मागे गेले आहे. त्यामुळे सरकारला मान खाली घालण्याची वेळ आली आहे,’ अशी नाराजीही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांकडे व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. सुमारे दहा दिवसांपूर्वी कृष्णेने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर तातडीने प्रशासन कार्यरत करणे हे जिल्हाधिकाऱ्यांचे काम हाेते, परंतु ते अधिकाऱ्यांवर विसंबून राहिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी संताप व्यक्त केला. आता अन्य पालिकांतील ४०० कर्मचारी सांगलीत नियुक्त करण्यात येणार आहेत. त्यांच्याकडून स्वच्छतेची घ्यावीत, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...