Home | Maharashtra | Western Maharashtra | Kolhapur | sangali urvi patil climb hampta pass

सांगलीच्या 11 वर्षीय उर्वी पाटीलने 14 हजार फुटांवरील हमता पास केले सर

प्रतिनिधी, | Update - Jun 12, 2019, 09:41 AM IST

हिमालयात माेहीम फत्ते,  मागील वर्षीही केली हाेती विक्रमाची नाेंद

 • sangali urvi patil climb hampta pass

  नवी दिल्ली - कधी पाऊस, तर कधी बर्फवृष्टी, कडाडणाऱ्या विजा आणि घोंगावणारा वारा अशा प्रतिकूल परिस्थितीत मूळच्या सांगलीच्या व सध्या गोव्यात राहणाऱ्या उर्वी अनिल पाटील या ११ वर्षांच्या मुलीने हिमालयातील पीरपंजाल रेंजमधील १४,४०० फूट उंचीवरील हमता पास सर केला. एवढ्या लहान वयात हे यश मिळवणारी ती पहिली महाराष्ट्रीय कन्या ठरली. मागील वर्षी उर्वीने अवघड असा सरपास ट्रेक पूर्ण करत एका विक्रमाची नाेंद नावावर केली हाेती.


  दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्रात आलेल्या उर्वीने आपल्या विक्रमाविषयी माहिती दिली. ती म्हणाली, ‘आमच्या हमता ट्रेकची सुरुवात हिमाचल प्रदेशातील रुमसू बेस कँपवरून ३ जूनपासून झाली. पहिले दोन दिवस वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी छोटे-छोटे ट्रेक केले. पुढे ५ जूनपासून प्रत्यक्ष ट्रेकला सुरुवात झाली. रुमसू हा ६,१०० फुटांवरचा बेस कँप असून पुढे चिक्का (८,१०० फूट), जुआरु (९,८०० फूट) आणि बालुका गेरा (१२,००० फूट) असे कॅम्प करत १४,४०० फुटांवरील हमता पास सर केला. दिवसाला ७ ते ८ तासांचा डोंगर- दऱ्या आाणि बर्फातील हा प्रवास सलग पाच दिवसांत पूर्ण करताना शारीरिक व मानसिक क्षमतेचा कस लागला, असा अनुभव उर्वीने सांगितला.


  बर्फामधून आठ तासांचा प्रवास
  हमता पास हा कुलू आणि स्पिती व्हॅलीला जोडणारा जुना मार्ग आहे. मार्गावरून तिबेटियन लोकांची ये-जा होते. या मार्गाला सिल्क मार्ग म्हणूनही ओळखले जाते. या ट्रेकिंगमध्ये बालुका गेरा ते रतनथळी व्हाया हमता पास हा ट्रेक सर्वाधिक अवघड होता. बालुका गेरा ते प्रत्यक्ष पासपर्यंत ८ तासांचा प्रवास पूर्णतः बर्फामधील असून सुमारे २,४०० फूट प्रत्यक्ष चढाईचे होते. शिवाय १० हजार फुटांनंतर ऑक्सिजनचे प्रमाणही कमी होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत सुरुवातीला पाऊस आणि बर्फवृष्टी असल्याने ट्रेक पूर्ण करताना दमछाक होत होती. पण, तरीही उर्वीने हा अवघड पास सर केलाच.


  वाळूत चालण्याचा सराव, याेगातून तंदुरुस्ती
  साधारणपणे अशा प्रकारचे ट्रेक ६ वर्षांच्या युवक -युवतींसाठी असतात. मात्र, उर्वीने वयाच्या १० व्या वर्षी अवघड सरपास सर केला होता. त्यामुळे यावर्षी कैलास रथ या अॅडव्हान्स ग्रुपने तिला या माेहिमेत सहभागी करून घेतले. हमता पास हा अवघड ट्रेक असल्याने मला मानसिक व शारीरिक तंदुरुस्त राहणे गरजेचे होते. यासाठी आहार, व्यायाम व योगा यावर लक्ष केंद्रित केले. सकाळी दोन तास समुद्र किनारपट्टीवरील वाळूत चालायचे व अर्धा तास योगा व जिम करायची. सीफूड व सुकामेवा आहारात घेत असे. हा प्रवास अत्यंत कडाक्याच्या थंडीत असल्याने अनेक लेअरचे कपडे, गॉगल, ट्रेकिंग बूट, स्टिकही खरेदी केली त्याचा मला या प्रवासात खूप फायदा झाल्याचे उर्वीने सांगितले. या ट्रेकसाठी आइस गाइड सुभाष राणा आणि मुंबईच्या केतन पटेल यांनी तिला मदत केली.


  आता ध्येय एव्हरेस्ट कॅम्प
  अवघड सरपाससह हमता पास सर केल्याने माझ्यातील आत्मविश्वास दुणावला आहे. जगातील सर्वात अवघड एव्हरेस्ट
  शिखर सर करण्याच्या दिशेने वाटचालीतील हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल व पुढील वर्षी पिन पार्वती आणि एव्हरेस्ट बेस कॅम्प करण्याचे आपले ध्येय असल्याचे उर्वी सांगते.

Trending