आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'त्यांच्या' आठवणीने संगमनेरकर पुन्हा एकदा गहिवरले...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर- हैदराबादेत झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी आराेपींना तेथील न्यायालयाने सोमवारी शिक्षा ठोठावल्याचे वृत्त बुधवारी संगमनेर येथे आले. दोघांना झालेली फाशी आणि एकाला झालेल्या जन्मठेपेच्या शिक्षेमुळे अकरा वर्षांपूर्वी बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर निर्माण झालेला थरार आणि अंगावर शहारे आणणाऱ्या 'त्या' सातजणांच्या आठवणींने संगमनेरकर पुन्हा एकदा गहिवरले. येथील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असणाऱ्या त्या सर्व प्राण गमावलेल्या निरपराध विद्यार्थ्यांचे चलचित्रच डोळ्यासमोर काही काळ उभे राहिले. 


शैक्षणिकदृष्ट्या देशात पाचव्या क्रमांकावर असलेल्या संगमनेरमधील अमृतवाहिनी शेती व शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामधील ४५ विद्यार्थ्यांची सहल हैदराबादला गेली होती. आैद्योगिक भेटी दिल्यानंतर सायंकाळी प्रसिध्द अशा लुंबिनी पार्कमध्ये 'लेझर शो' बघण्यासाठी ते गेले. त्याचदरम्यान या पार्कमध्ये मोठा बॉम्बस्फाेट झाला. पाठोपाठ गोकूळ चाट भांडार येथेही स्फाेट झाला. या स्फोटांमध्ये ४२ निरपराधांचा मृत्यू झाला, तर ५४ जण गंभीर जखमी झाले. मृतात अमृतवाहिनीतील सात भावी अभियंत्यांचा समावेश होता. यापैकी दोघे बिहारमधील, तर अन्य महाराष्ट्रातील होते. 


हैदराबाद प्रशासनाने काही आरोपींना ताब्यात घेतले होते. इंडियन मुजाहिद्दिन या अतिरेकी संघटनेशी संबंधित असलेल्या चार जणांविरोधात एनआयएच्या विशेष न्यायालयात खटला चालवला गेला. न्यायालयाने दोघांना फाशीची, तर एकाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. निकालाची ही माहिती संगमनेर शहरामध्ये येताच अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रशासन आणि विद्यार्थी त्या दु:खद आठवणींनी गहिवरले. 


यांचा झाला होता मृत्यू 
लुंबिनी पार्कमध्ये लेझर शोदरम्यान झालेल्या बॉम्बस्फाेटात अमृतवाहिनी आभियांत्रिकीतील सुजीतकुमार झा व सौरभ कुमार (दोघे बिहार), किरण चौधरी (कल्याण), सचिन भवर (संगमनेर), रुपेश भोर (जुन्नर), मिलिंद मांडगे (पारनेर) व इर्शाद अहमद अब्दुल गनी (मुंबई) या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. सचिन भवर या जोर्वे येथील आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. न्यायालयाच्या निकालाबद्दल त्याच्या वडिलांनी समाधान व्यक्त करत सर्वांनाच फाशीची शिक्षा व्हायला हवी होती, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. 

 

आमच्यासाठी ही घटनाच दुर्दैवी 
असा प्रसंग कोणाच्याही जीवनात घडू नये. बॉम्बस्फाेटाच्या त्या घटनेत लेझर शो बघण्यासाठी गेलेले आमच्या महाविद्यालयातील सात भावी अभियंते आम्ही गमावले. न्यायालयाने आरोपींना शिक्षा दिली असली, तरी आमच्यासाठी ही सर्वात दुर्दैवी घटना आहे.'' एम. ए. व्यंकटेश, प्राचार्य, अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, संगमनेर. 

बातम्या आणखी आहेत...