आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- ‘सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडायचा बेत राज्यातल्या नेत्यांनी पूर्वीच पक्का केला होता. त्यासाठी इथे काँग्रेस कमजोर असल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या. नंतर राहुल गांधी यांच्याही गळी ही बाब पद्धतशीरपणे उतरवण्यात आली. यापुढे वसंतदादांच्या कुटुंबासाठी काँग्रेस शंभर टक्के संपली आहे,’ अशी संतप्त प्रतिक्रिया चार वेळा राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषवलेले वसंतदादा पाटील यांचे नातू व माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक प्रकाशबापू पाटील यांनी ‘दिव्य मराठी’कडे मांडली. ‘काहीही झाले तरी आपला लहान भाऊ विशाल हा अपक्ष म्हणून सांगली लोकसभा लढवणारच,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
आघाडीत सांगलीची जागा राजू शेट्टींच्या संघटनेला सोडल्याचे स्पष्ट झाल्यानंतर माजी खासदार प्रतीक पाटील यांनी थेट बंडखोरीचा पवित्रा घेत काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला. ते म्हणाले, ‘मी भाजपत जाणार नाही. जाऊ शकत नाही. तशी आपल्याला ऑफर नाही. माझ्या भाजप प्रवेशाच्या या वावड्या आहेत. मी निवडणूक लढवणार नाही. मात्र दादांच्या नावाने यापुढे समाजकार्य करत राहणार आहे.’
‘राजू शेट्टी यांना सांगली मतदारसंघ सोडल्यानंतर फोन आला होता. तुमच्या सहकार्याशिवाय स्वाभिमानी सांगलीची जागा जिंकू शकत नाही, तुमचे सहकार्य पाहिजे,’ असे ते म्हणाले. शेट्टी यांना हे कळते, मग काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांना का कळत नाही,’ असा सवालही प्रतीक पाटील यांनी उपस्थित केला. ‘राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी दादांचे (वसंतदादा पाटील) घराणे, दादांचे विचार, दादांचे नाव संपवण्याचे पद्धतशीर षड्यंत्र रचले आहे. यापुढे दादा हीच आमची काँग्रेस आहे. सांगलीत काँग्रेस संपेल, पण दादांचे घराणे संपणार नाही,’ असा इशारा त्यांनी राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांना दिला.
‘सांगली आणि नंदुरबार हे राज्यातले दोन जिल्हे काँग्रेसचे खरेखुरे गड आहेत. आजपर्यंत सांगलीची जागा काँग्रेसने कधीच गमावलेली नाही. २०१४ च्या मोदी वादळात पहिल्यांदा सांगलीची जागा आम्ही गमावली. मी खासदार म्हणून मतदारसंघात कुठेही कमी पडलेलाे नाही, मग सांगलीची जागा इतर पक्षांना काँग्रेस कशी काय सोडू शकते, असा सवालही प्रतीक पाटील यांनी विचारला.
राहुल गांधींना आजपर्यंत कधीच भेटलो नाही
‘काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना आजपर्यंत मी कधीच भेटलो नाही. केंद्रात मंत्री असताना त्यांना भेटण्याचा अनेकदा प्रयत्न केला, मात्र राहुलजींनी मला कधीच भेट दिली नाही. सांगली मतदारसंघ इतरांना सोडू नये यासाठी राहुलजींना संपर्क साधण्याचाही वारंवार प्रयत्न केला. मात्र ते उपलब्धच झाले नाहीत,’ असे सांगत इंदिरा-राजीवजींची काँग्रेस आज राहिलेली नाही,’ अशी त्यांनी खंत व्यक्त केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.