आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाजनांना (राजीनाम्याचा) आदेश हाच महाजनादेश!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विलासराव देशमुख यांना राज्याच्या मुख्यमंत्रिपदावरून का जावे लागले? आर. आर. आबांसारख्या नेत्याला गृहमंत्रिपदाची खुर्ची का सोडावी लागली? कारण एकच होते – असंवेदनशीलता. आजच्या मुख्यमंत्र्यांएवढीच लोकप्रियता या दोघांच्या वाट्याला आली होती. पण, जे लोक ‘जयजयकार’ करतात, त्यांच्या असंतोषाचा बांध फुटला, तर त्यात नेत्यांच्या खुर्च्याही वाहून जातात, हे महाराष्ट्राने पाहिले, ते २००८ मध्ये. विलासराव वा आबांचा अपराध काय होता?  २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर, दहशतवादी हल्ला जिथे झाला, तिथे रामगोपाल वर्माला हसतमुखाने फिरवून आणणाऱ्या विलासरावांच्या आणि ‘बडे बडे शहरों में ऐसे छोटे-मोटे हादसे होते रहते हंै’ अशी ‘लूज कमेंट’ देणाऱ्या आबांच्या विरोधात क्षोभ उसळला. तो जनक्षोभ कदाचित यथावकाश शांतही झाला असता. पण, काँग्रेस- राष्ट्रवादीने दोघांनाही हाकलले. (त्यानंतर लगेच झालेली निवडणूक त्यामुळेच काँग्रेसने जिंकली.) मुंबईवर हल्ला झालेला असताना, कपडे बदलण्यात मग्न असलेले शिवराज पाटील-चाकूरकर या एकाच कारणामुळे राजकारणातून हद्दपार झाले! विलासराव आणि आबांची संवेदनशून्यता काहीच वाटू नये, अशा निर्ढावलेपणाचा कळस गाठला आहे तो गिरीश महाजनांनी. ‘पूर पर्यटन’ करत असलेल्या महाजनांच्या चेहऱ्यावर बेदरकार हसू कसे उमटू शकते? निवडणुका जिंकण्यासाठी कमरेला बंदूक असण्याची गरज नसते, डोळ्यातले दोन थेंब अश्रू पुरेसे असतात, हे महाजनांना कोणी आणि कसे सांगावे? आजीच्या कुशीत विसावलेल्या लेकराला कृष्णामाईने आजीसह गिळून टाकले. त्या चित्राने जग हादरले. महापुराने लोकांचे संसार मोडून टाकले. कोणाचा बाप गेला, कोणाची लेक गेली. आभाळच फाटलं. सांगलीतले हुंदके तरीही कमी होत नाहीत. कृष्णेच्या पात्रात फक्त गहिवर आहे. आणि, आमचे जलसंपदा मंत्री सेल्फी काढताहेत. हसताहेत. हवाई पाहणी करताना टीव्हीच्या कॅमेऱ्याला सगळं टिपता येईल, अशी व्यवस्था करताहेत!  या महापुरात बाकी काय वाहून गेलं ते माहीत नाही, पण सरकार नावाच्या यंत्रणेवरचा विश्वास मात्र सगळ्यात आधी वाहून गेला. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ज्यांनी ‘अलर्ट’ दिला नाही आणि डोक्यावरून पाणी चालले तरीही जे प्रचारयात्रा करत होते, अशा सरकारला या प्रलयासाठी जबाबदार धरायचं की नाही? अजूनही अनेक ठिकाणी मदत पोहोचलेली नाही. हजारो लोक अद्यापही अडकलेले आहेत. त्यांच्यासाठी कोणी धावलेलं नाही. घर वाहून गेलं, दुकानं पाण्यात बुडाली. गुरंढोरं किती गेली याची तर गणतीच नाही. शेतीवाडी गेली. आणि, अजूनही प्रशासनाकडं बोटी नाहीत, त्यांचे फोन लागत नाहीत, माणसं मेल्याशिवाय मदत पोहोचत नाही.  पलूसची डॉ. साधना पवार, सांगलीचा अॅड. अमित शिंदे, कोल्हापूरचे गिरीश फोंडे, मिरजेतले गुलाम हुसेन बुजरूक, नियाज अत्तार, कृष्णात कोरे, संघसेन जगतकर, गीता हसूरकर, सीमा पाटील, शुभांगी रणखांबे अशी तरुण मंडळी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसताहेत. काही अधिकारीही करू पाहताहेत, पण त्यांच्याकडे पुरेशी साधनसामग्री नाही. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी असंख्य निकष सांगितले जाताहेत. करतेय काय यंत्रणा? सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख पक्षाच्या मीटिंगा घेत बसतात, सदाभाऊ खोत आपल्या खोतीत रमलेले असतात. चंद्रकांत पाटलांसारखा मंत्री या अस्मानीनंही धावायला लागत नाही. एरव्ही अंबाबाईला साकडं घालणारे ‘ठाकरेज्’ अशा वेळी मात्र उघडिपीची वाट बघत मातोश्रीच्या वळचणीला बसलेले असतात! सामान्य माणूस एकटा, एकाकी असतो. भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले हे प्राक्तन ज्यांच्या वाट्याला आलं आहे, त्यांचा संसार मोडून पडला असला तरी कणा मात्र अजूनही मोडला नाही. त्यांचं खरं दुर्दैव हे आहे की, पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणणारं नेतृत्वही त्यांना मिळालेलं नाही. ‘पूर पर्यटन’ करणाऱ्या संवेदनशून्य मंत्र्यांना घरी जाण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला नाही, तरी कदाचित दोनशेहून अधिक जागा या निवडणुकीत भाजप कमावेलही. पण, या जनतेच्या मनातली जागा मात्र सरकारने गमावलेली असेल. आणि, आज ना उद्या, लोकांच्या या संतापाचा कडेलोट तुम्हाला उघड्या डोळ्यांनी पाहावा लागेल.  कारण,  जनतेच्या पोटामध्ये  आग आहे, आग आहे जनतेच्या डोळ्यांमध्ये शंकरांचा राग आहे!

संजय आवटे,संपादक

बातम्या आणखी आहेत...