आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगली, काेल्हापूरला पुन्हा पुराचा धाेका; शेकडाे कुटुंबांचे स्थलांतर, पूर्व विदर्भात पावसाचा कहर सुरूच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली  - गेल्या महिन्यात पुरामुळे कोल्हापुरातील अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. यातून सावरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच काेल्हापूर व सांगलीवर पुन्हा पुराचे संकट घोंगावत आहे. शनिवारपासून पावसाचा जाेर वाढल्याने काेल्हापूर जिल्ह्यातील ६७ बंधारे पाण्याखाली आहेत. राधानगरी, कोयनामधून माेठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

काेल्हापूरच्या राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले असून, त्यातून ८५४० क्युसेक, कोयनेतून ७०४०४ क्युसेक, अलमट्टीमधून १८२००० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.  जिल्ह्यातील ६७ बंधारे पाण्याखाली आहेत. राधानगरी धरणात ८.३६ टीएमसी पाणीसाठा आहे. पंचगंगा नदीचे पाणी धोक्याच्या पातळीवर आहे. त्यामुळे संभाव्य पूरबाधित गावांमधील नागरिकांचे स्थलांतर करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.काेयनेतून ७० हजार क्युसेकचा विसर्ग  : कोयना धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून धरणातून ७० हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे. 

पूर्व विदर्भात पावसाचा कहर सुरूच
नागपूर - हवामान विभागाचा अतिवृष्टीच्या इशारा पूर्व विदर्भातील अनेक ठिकाणी खरा ठरला. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपुरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. शनिवारी रात्रीपासून भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस आहे. वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. गोसीखुर्द धरणाचे ३३ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. जिल्ह्यातील पवनी व लाखांदूर तालुक्यात अतिवृष्टी झाली असून अनेक ठिकाणी नाल्यावरून पाणी वाहत असल्यामुळे मार्ग बंद आहे. भंडारा तालुक्यातील चांदोरी या गावाला तालुक्याशी जोडणाऱ्या नाल्यावरून पाणी वाहत असल्यामुळे या गावाचा संपर्क तुटला आहे. रविवारी सकाळी नाल्यावरील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एक बोलेरो पिकअप व्हॅन वाहून गेली. मात्र, सुदैवाने चालकाने उडी घेत जीव वाचवला. पवनी व लाखांदूर तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. गोंदीयातील सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणात पाण्याचा दाब वाढत असल्यामुळे धरणाचे ६ दरवाजे १ फूट उंचीवर सुरू होते.

बातम्या आणखी आहेत...