आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येस ! आय अॅम रिअली ब्यूटिफुल !

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सानिया भालेराव 

दुसऱ्यांची छायाचित्रं लाइक करतो आहोत, पण आतून ‘आपण का असे छान दिसत नाही?’ हा विचार आपल्या मनात येतो आहे.. हे आपण मान्य करत नाही. आपण मग उगाच डिनायल मोडमध्ये जातो आणि हळूहळू नकळत फोटो एडिटिंग अॅप वगैरेच्या विळख्यात अडकू लागतो.
आजकाल सोशल मीडियाचं लोण सर्वदूर पसरलेलं आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट सारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स शहरी, निमशहरी आणि काही अंशी ग्रामीण भागातल्या घरांमध्ये पोहोचले आहेत. मला काय वाटतं इथून सुरुवात झालेलं फेसबुक ‘मी कशी दिसते आहे वा दिसतो आहे’ इथवर येऊन पोहोचलं आहे. या सर्व माध्यमांची गंमत अशी की सुरुवातीला सहज म्हणून आपण त्यांचा वापर सुरू करतो, पण कोणाला आपल्या दिसण्याबद्दल काय वाटतं यावरून आपण स्वतःला जोखायला कधी सुरुवात करतो हेसुद्धा आपल्याला कळत नाही. युरोप, अमेरिका या ठिकाणी यासंदर्भात खूप संशोधन होत आहे. सिडनीमधील Macquarie विद्यापीठातील पोस्ट डॉक्टरल संशोधक Jasmine Fardouly यांना विद्यापीठात शिकणाऱ्या २२७ मुलींना घेऊन केलेल्या एका सर्वेक्षणात असं आढळलं की सोशल मीडियावरच्या स्वतःच्या फोटोची तुलना  या मुली त्यांच्या मैत्रिणींच्या किंवा ओळखीच्या स्त्रियांच्या आणि सेलिब्रिटीजच्या फोटोशी करतात आणि यातून स्वतःच्या दिसण्याबाबत त्यांच्या मानात नकारात्मक विचार येतात. तसंच त्यांनी केलेल्या संशोधनात असं दिसून आलं की १८ ते ३५ या वयोगटातल्या जवळपास ७० टक्के महिला स्वतःचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्याआधी तो एडिट करून त्यात मनासारखे बदल करून मग पोस्ट करतात. याच वयोगटातील पुरुषांचे प्रमाण ५० टक्के आहे हे त्यांना आढळलं. एअरब्रश यासारखे फोटो एडिटिंग अॅप वापरणाऱ्या लोकांचं प्रमाण आश्चर्यचकित करणारं आहे.आपल्याकडेसुद्धा साधारण याच धर्तीवर स्वतःच्या शारीरिक प्रतिमेबाबत असमाधान असणं दिसून येतंच. अगदी आपल्या आजूबाजूला पाहिलं तरी कोणताही फोटो फेसबुक किंवा सोशल मीडियावर पोस्ट करण्याआधी तो एडिट करणं, वेगवेगळी फिल्टर्स लावून फोटो काढणं हे आहेच.  सेल्फी काढण्याचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कित्येक जणांच्या मोबाइलमध्ये ब्यूटिफाय हे सेटिंग डिफॉल्ट मोडवर असतं. आपण जसं  आहोत तसं  दिसणं इतकं वाईट का असावं? ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर’ असं आपल्याकडे पाहून कोणी म्हटल्यास ते वावगं ठरेल का, याचा विचार आज आपण सगळ्यांनीच करणं गरजेचं आहे. आज मी जशी दिसते आहे त्यात बदल करून, म्हणजे त्वचेचा रंग गोरा करून, डोळे मोठे अथवा बारीक करून, अॅप्सद्वारे मेकअप करून फोटो एडिट करणं म्हणजे स्वतःच स्वतःशी केलेली प्रतारणा नाही का? स्त्रिया स्वतःच्या दिसण्याला जे अनन्यसाधारण महत्त्व देतात त्याची खरंच इतकी गरज आहे का, हेसुद्धा पडताळून पाहायला हवं. कोणी आपल्या फोटोला छान म्हणावं किंवा लाइक करावं यासाठी स्वतःला किती आणि कुठे प्रेशराइज करतो आहोत याच भान येणं हे आपल्या स्वतःसाठी आवश्यक आहे. 
होतं असं खूपदा.. आपल्या मित्र-मैत्रिणींचे छायाचित्र पाहून मी अशी का नाही दिसत किंवा माझ्यामध्ये का नाहीये अमुक एक गोष्ट असं वाटणं.. पण त्या वाटण्याचा न्यूनगंड तर होत नाही ना हे तपासून पाहायला हवं. दुसऱ्यांची छायाचित्रं लाइक करतो आहोत, पण आतून ‘आपण का असे छान दिसत नाही?’ हा विचार आपल्या मनात येतो आहे.. हे आपण मान्य करत नाही. आपण मग उगाच डिनायल मोडमध्ये जातो आणि हळूहळू नकळत फोटो एडिटिंग अॅप वगैरेच्या विळख्यात अडकत जातो. कोण कसं दिसतं यांवरून स्वतःबद्दल नकारात्मक बॉडी इमेज तयार करून मग कोणत्या न कोणत्या प्रकारे सुंदर दिसण्यासाठी स्वतःचाच सूड घेणं यापेक्षा वाईट काय असू शकतं? त्यामुळे सगळ्यात आधी तर मला असं वाटतंय का हे स्वतःच्या आत डोकावून बघायला हवं आणि असेल वाटत असं तर स्वतःला ‘ठीक आहे, हरकत नाही’ असं म्हणून आपल्यात काय चांगलं आहे याची आठवण करून द्यायला हवी. स्वतःच्या शरीराबाबत नकारात्मक विचार करत बसण्यापेक्षा आपण एक हेल्दी लाइफस्टाइल अंगीकारू शकलो, बाह्यरूपाकडे न बघता स्वतःच्या विचारांमध्ये सकारत्मकता आणू शकलो तर ते अधिक चांगलं होईल. 
आपला दृष्टिकोन बदलून, दिसण्यापेक्षा असण्यावर भर दिला, जसे आहोत तसे छान आहोत, असा विचार केला, निरोगी आरोग्यासाठी जीवनशैलीत बदल करून स्वतःवर प्रेम करायला शिकलो, तर कोण आपल्याला सुंदर म्हणतं आहे याने काहीही फरक पडणार नाही. सोशल मीडियावर राहूनही त्याचा स्वतःवर कोणताही परिणाम होऊ न देता मग स्वतःवर प्रेम करत आपण स्वतःसाठी जगू शकू.. खरं, आनंदी आणि आपल्या हक्काचं आयुष्य!

संपर्क- ८४०८८८६१२६

बातम्या आणखी आहेत...