Home | Magazine | Rasik | saniya bhalerao's article on anant bhalerao

प्रिय अण्णा...!

सानिया भालेराव | Update - Nov 11, 2018, 06:31 AM IST

लाडके अण्णा नेमके कसे दिसतात... सांगताहेत सानिया भालेराव...

 • saniya bhalerao's article on anant bhalerao

  ज्येष्ठ संपादक, लेखक आणि स्वातंत्र्यसैनिक अनंत काशिनाथ भालेराव यांच्या जन्मशताब्दीला १४ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने अनंत भालेराव यांच्या पत्रकारितेवर, लेखनावर, त्यांच्या व्यासंगावर अनेकांगांनी चर्चा होत असताना त्यांच्या नातीला मात्र तिचे लाडके अण्णा नेमके कसे दिसतात... सांगताहेत सानिया भालेराव...

  ‘अनंतराव भालेराव’ यांची तू नात आहेस का? असं आजही जेव्हा काही लोकं मला विचारतात तेव्हा अण्णांची पुण्याई अजूनही आपल्या बरोबर आहे याची खात्री पटते. मी साधारण सात एक वर्षांची असताना अण्णा गेले. पण अगदी लहानपणापासून माझं बालपण हे अण्णा आणि त्यांच्या आठवणींच्या भोवती गुंफलं गेलं. म्हणजे जसं की, मी अगदी चार महिन्यांची असताना, एक दिवस औरंगाबादेत वीज नव्हती. कडक उन्हाळा, दुपारची वेळ. उष्मा खूप जास्त असल्याने कित्येक उपाय करूनही माझं रडणं थांबत नव्हतं. अण्णा अतिशय अस्वस्थ होते. व्हरांड्यात अखंड येरझाऱ्या घालून मग शेवटी त्यांनी इलेक्ट्रिसिटी बोर्डात फोन करून चीफ इंजिनिअरला सांगून चक्क वीजपुरवठा ताबडतोब चालू करवला.एरवी आपल्या नावाचा कुठेही वापर न करणाऱ्या अण्णांनी या चिंगुश्या पोरीसाठी मात्र असं करावं हे पाहून घरातले सगळेच अवाक् झाले होते आणि मग पुढेही अण्णांचा लाडोबा म्हणून मी कायम मिरवलं.

  अण्णांच्या खूप गंमतशीर आणि निरागस आठवणी आहेत माझ्यासोबत. अण्णा म्हणजे कोणी तरी मोठा माणूस असं मला कधीच वाटलं नाही. अण्णांकडे खूप लोकं येतात, अण्णा सतत त्यांच्याशी काहीबाही चर्चा करत असतात, अण्णा काही तरी लिहीत असतात, नाही तर वाचत असतात बस्स. इतकंच काय ते मला ठाऊक. तर एक दिवस असं अण्णांकडे काही लोक आले होते. सगळे बैठकीत बसले होते. काही दिवसांपूर्वी बाबांनी मला एक छानशी छोटी डायरी आणली होती आणि म्हणाले होते, अण्णांकडे खूप मोठी आणि विद्वान लोकं येतात त्यांची सही आणि संदेश तू घेत जा या वहीत. झालं... मला आठवलं ते. मग काय, आमची स्वारी थेट पोहोचली बैठकीत आणि सगळ्यांच्या समोर बुलंद आवाजात मी अण्णांना विचारलं, "अण्णा, हे सही घेण्यासारखे आहेत का?’ आणि हातात ती वही आणि पेन होताच माझ्या! क्षणभर एकदम शांतता..

  अण्णा मोठ्याने हसले आणि त्यांच्या बाजूला बसलेले आजोबा आणि इतर लोकसुद्धा. अण्णांनी मला प्रेमाने जवळ घेतलं आणि म्हणाले. अर्थात... मग त्या आजोबांनीसुद्धा... अनंतराव, नात हुशार आहे तुमची, असं माझ्या डोक्यावर हात ठेवत म्हटलं आणि सही व संदेश दिला. मी खोलीच्या बाहेर येऊन नाव वाचलं. मनात म्हटलं, चला, सही घेण्यासारखं आज किती तरी मिळालं. नाव होतं... मधु दंडवते!असाच एक किस्सा आहे मी दुसरीत असतानाचा. मी अनंत विद्या मंदिरमध्ये असताना वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता. टिळकांवर एक भाषण करायचं होतं. घरी येऊन सांगितल्यावर अण्णांनी एक छानसं भाषण लिहून दिलं. ते मी पाठ वगैरे करून म्हटलं पण मला बक्षीस मिळालं नाही. माझं मन खट्टू झालं होतं.

  घरी येऊन अण्णांनी विचारलं, "काय भोकऱ्या, कसं झालं भाषण?’ यावर मी रुसून म्हटलं "अण्णा, साधा नंबरसुद्धा आला नाही माझा. तुम्ही सतत लिहीतच असता तरीही साधं एक भाषण नीट लिहिता आलं नाही तुम्हाला!’ यावर अगदी मनापासून हसणारे अण्णा, त्यांचे ते बोलके डोळे आणि माझा तो वेडेपणा अगदी आजही लख्ख आठवतो!मला आठवतंय तेव्हापासून अण्णांनी मला खूप श्लोक, कविता शिकवल्या.त्यांची मित्र- मंडळी घरी आली की अण्णा मला हमखास काही ना काही म्हणायला लावायचे. ताकापुरतं रामायण तर मी असंख्य वेळा म्हणून दाखवलं असेल, पण तरीही अण्णा आणि त्यांचे मित्र रसाळ आजोबा, चपळगावकर आजोबा, भगवंतराव आजोबा, तु. शं. आजोबा, चारठाणकर आजोबा, बोरीकर आजोबा हे सगळे जणू काही पहिल्यांदाच ऐकत आहेत या आविर्भावात ऐकायचे.


  आदौ राम तपोवनादि गमनं, हत्वा मृगं कांचनं
  वैदेही हरणं, जटायु मरणं, सुग्रीव संभाषणं
  वाली निर्दलनं, समुद्र तरणं, लंकापुरी दाहनं
  पश्चाद्रावण-कुम्भकर्ण हननं, एतद्धि रामायणं


  हे अण्णांनी शिकवलेलं ताकापुरतं रामायण. मला या इवल्याशा श्लोकातून रामायणातले केवळ नऊ मुद्दे सांगून संपूर्ण रामायण अण्णा सांगून गेले. आज विचार केला तर वाटतं की कदाचित त्यांना आयुष्य किती लांबलचक आहे यापेक्षा त्यात ठळक गोष्टी कोणत्या हे उमजून जगण्याचं सार शोधून काढ असं तर मला सांगायचं नसेल ना? तो काळ वेगळा होता असं आता वाटतं. घराची आणि मनाची दारं तेव्हा सतत उघडी असायची. सिंकमध्ये साचलेल्या चहाच्या कपांचा डोंगर हे भरभराटीचं लक्षण मानलं जायचं. हा काळ तेव्हाचा होता!


  असंच एकदा मी सहा वर्षांची असताना आईबरोबर गुलमंडीला एका दुकानात गेले होते. आई पडदे बघत होती आणि मला खूप कंटाळा आला होता म्हणून मी तिचा हात सोडला आणि बाजूच्या दुकानात काय आहे हे पाहायला गेले. माझ्या आठवणीनुसार फक्त बाजूच्याच दुकानात होते आणि लगेचच परत फिरले, पण मला काही केल्या आई असलेलं दुकान सापडेना. वेळ संध्याकाळची होती. माझ्या हातात माझी एक बाहुली. मी आता रडवेली झाले. नुसती इकडे-तिकडे फिरत होते. घाबरून डोळ्यातून पाणी वाहायला लागलं होतं. रात्र होत आली. येणारे-जाणारे माझ्याकडे बघत होते. तेवढ्यात दोन माणसं आली, माझं नाव विचारलं आणि अण्णांचं नाव सांगताच मला जवळ घेऊन शांत करून, स्वतःच्या खांद्यावर बसवून घरी आणून सोडलं. इकडे घरी अण्णांनी तोवर सगळ्यांना फोनाफोनी करून बोलावून घेतलं होतं. मला दारात बघताच बोरीकर आजोबा म्हणाले, ‘आले फूड इन्स्पेक्टर घरी’ आणि सगळ्यांच्या जिवात जीव आला. त्या दोन जणांनी अण्णांना नमस्कार केला तेव्हा त्यांच्या आणि अण्णांच्या डोळ्यातले भाव आजतागायत मी विसरू शकले नाही.


  अशा शेकडो आठवणी अण्णांच्या असल्या तरी मागच्या महिन्यात बाबांकडे असलेल्या अण्णांच्या काही नोट्स वाचत असताना त्यांनी लिहिलेले काही उर्दू शेर, जिनांवरची टिपणं दिसली. त्यावरून हात फिरवताना जाणवलं की, अण्णांचा काही वर्षं जर अजून सहवास मिळाला असता तर त्यांच्याशी फैज, मीर यांच्याबद्दल छान गप्पा मारल्या असत्या, जिनांबद्दल जी मी पुस्तकं वाचली किंवा माझ्या आवडत्या मुराकामी, काफ्का या लेखकांबद्दल चर्चा करता आली असती. किती आणि काय काय शिकता आलं असतं. लहानपणी माझ्या नकळत जे काही अण्णा शिकवून गेले त्याचं मोल मात्र जसं जसं अनंत भालेराव हा माणूस काय होता हे उमजत गेलं तसं तसं वाढत गेलं. आपण कोणत्या घराण्यात जन्माला येणार हे आपण निवडतो का? काही वर्षांपूर्वी या प्रश्नाचं उत्तर शोधताना फार इंटरेस्टिंग रिसर्च हाती लागला होता.

  यावर खूप साऱ्या थिअरीज आहेत, पण मला असं वाटतं की आडनाव लावल्याने किंवा एखाद्या घराण्यात फक्त जन्मल्याने आपण त्या घराण्याचा किंवा त्या कुटुंबाचा एक भाग असतोच असं नाही. ते आडनाव किंवा ती विचारधारा सार्थकी लावली किंवा आपण ती वाट, ते विचार यांना अनुसरून वागलो तरच ते आडनाव लावण्यात किंवा वारसदार असं स्वतःला म्हणवून घेण्यात अर्थ असतो असं मला वाटतं. मग असं असल्यास लहान वयापर्यंत ठीक आहे, पण आज या घडीला अण्णांच्या विचारधारेवर, मूल्यांवर किती टक्के मी खरी उतरते यावर दरवर्षी मी विचार करते आणि त्यांची नात असं म्हणवून घेण्यास किंवा भालेराव हे अाडनाव लावण्यास मी सार्थ आहे का याचा विचार करते. विचाराअंती आणि भरपूर रेट्रोस्पेक्शनअंती एक वाचक म्हणून, एक माणूस म्हणून, त्यांच्या विचारांवर, कामावर, कर्तृत्वावर, साधेपणावर अमाप प्रेम करणारी व्यक्ती म्हणून शेकडो लोकांच्या गर्दीतली एक म्हणून राहायला जास्त आवडेल, असं मला वाटतं.


  आपले आजोबा म्हणून मनात अपार प्रेम असणं हे तर आलंच, पण एक पत्रकार म्हणून, लेखक म्हणून, स्वातंत्र्यसैनिक म्हणून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक माणूस म्हणून मला जो नितांत आदर, प्रेम जे अण्णांबद्दल मला वाटतं ते या सगळ्याच्या पलीकडचं आहे. वयाच्या सातव्या वर्षी अण्णांनी मला कुसुमाग्रजांची अखेरची कमाई ही कविता समजावून सांगितली होती. मला वाटतं माझ्या आयुष्यातल्या साक्षात्कार वगैरेच्या काही क्षणांपैकी हा एक क्षण. आपलं नावं खूप झालं, लोकप्रियता वाढली, आपण एका विशिष्ट मुक्काम स्थळी पोहोचलो तरीही आपले पाय जमिनीवर राहणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं. आणि हेच मला अण्णा तेव्हा या कवितेद्वारे सांगू पाहत होते. जिथे लोकं गांधींना विसरले तिथे आपलं काय असं अण्णा म्हणायचे, ते का आणि ते किती खरं होतं हेसुद्धा कालांतराने उमजत गेलं. त्यामुळे या लेखाचा शेवट त्या कवितेने जिच्यामुळे माझ्या आयुष्यातली कित्येक झापडं गळून पडली आणि नवीन कवाडं उघडली गेली.


  मध्यरात्र उलटल्यावर
  शहरातील पाच पुतळे
  एका चौथऱ्यावर बसले
  आणि टिपं गाळू लागले.
  जोतिबा म्हणाले, शेवटी मी झालो
  फक्त माळ्यांचा.
  शिवाजीराजे म्हणाले,
  मी फक्त मराठ्यांचा.
  आंबेडकर म्हणाले,
  मी फक्त बौद्धांचा.
  टिळक उद्गारले,
  मी तर फक्त
  चित्पावन ब्राह्मणांचा.
  गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला
  आणि ते म्हणाले,
  तरी तुम्ही भाग्यवान.
  एकेक जातजमात तरी
  तुमच्या पाठीशी आहे.
  माझ्या पाठीशी मात्र
  फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती!
  - कुसुमाग्रज

  - सानिया भालेराव

  saniya.bhalerao@gmail.com

Trending