आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्र संवेदनांचं!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यक्तिचित्रासारखी एखादी कविता आपण वाचतो तेव्हा, शेवटानंतर एक प्रारंभ आपसूक मनात जागा होत असतो. मनानंच आपण त्यात नानाविध रंग भरत जातो आणि अचानक एखादी जैविक नातं सांगणारी कलाकृती वाचण्या-पाहण्यात येते. चित्र झटकन पूर्ण होतं. आपल्या शेजारी उभं असणाऱ्यानं, न बोलता सहज आपलं चित्र पूर्ण केलंय, त्याच्या-आपल्या न कळत; असं वाटून जातं. ज्येष्ठ कथालेखक-नाटककार जयंत पवारांचं ‘अधांतर’ हे नाटक असंच संवेदनांचं मैत्र जुळवून आणतं...


त्याच रात्री आम्ही पाचांनी
एकमेकांस बिलगुनी
आईची मायाच समजून
घेतली चादर ओढून
आधीचे नव्हतेच काही
आता आईदेखील नाही
अश्रूंना घालीत अडसर
जागत होतो रात्रभर
झालो पुरते कलंदर...
कविवर्य नारायण सुर्वे यांच्या ‘माझी आई’ कवितेच्या या शेवटच्या ओळींनी माझ्या मनात एक चित्र निर्माण केलं होतं. ‘ही’ सुर्वेंच्या ‘आई’ची सखी आहे, असं वाटणारं ते चित्र होतं. पण कवितेच्या चौकटीत ते मावत नव्हतं, कारण ती त्या पाचांचीच आई राहिली नव्हती. ती एका मोठ्या समुदायाची आई झाली होती. त्यांच्या साऱ्या चुका, अपराध पोटात घेणारी, पोटाला भाकरी देतानाच तुमच्यातलं सत्त्व जागवणारी. निराधाराला आपलं मानून आपल्या ताटातला घास देणारी. त्याला पोटाशी घेण्याची शिकवण देणारी. कृतघ्नांना शब्दांचे फटकारे देत, वेळप्रसंगी मृत्युदंड देईन, असं ठणकावून सांगणारी. आपल्या पुरुषाचंही ‘आई’पण करणारी. सर्वांचं कठोर मूल्यांकन करणारी.  गॉर्कीच्या ‘आई’शी नातं सांगणारी, तिच्याशी हितगुज करू शकेल, असा दु:खभोग बघितलेली. ती आहे, धीराई! अशी आई मला भेटली, माझ्या भाषेतच-अचानक, जयंत पवार यांच्या ‘अधांतर’ या नाटकामध्ये!

 

या आईचा मोठा मुलगा बाबा साहित्य क्षेत्रात नाव काढण्याचे स्वप्न बघणारा, पण आपल्या सर्जनशीलतेची टिमकी वाजवत नाकर्तेपणाची पळवाट शोधणाराही. ‘मी माझं स्वातंत्र्य  मासिक पगाराच्या मोबदल्यात विकायला, नाही काढलेलं’ असं त्याचं पोट भरणाऱ्या आपल्या आईलाच सुनावणारा, असा.
त्याचं लिहिणं, तो भोगत असलेल्या वास्तवापासून विलग झालेलं. त्याचा लहान भाऊ मोहन नोकरी गमावल्यावर क्रिकेटच्या खेळात आयुष्य शोधणारा. आपले स्वत्व आणि पळवाटही त्यातच शोधणारा; पण आपल्या माणसांबद्दल पोटात खोल माया असणारा. त्यापेक्षा लहान नरू गुन्हेगारी जगतात ‘भाई’च्या कारवायांमध्ये सामील झालेला. आपण ‘हे’ करू शकतो, अशी गुर्मी असणारा, पण आई-बापाबद्दल कृतज्ञता बाळगणारा. ‘तुझ्या जावयाला माज. बोल्लो लीडरगिरी सोड, भाई धा हजारात शेटलमेंट करत होता...पण यांना चरबी लय. फुडारी बनायचा रेहमान किडा’ असं आईमार्फत भावोजी-बहिणीला सुनावणारा. या तिघा भावांची बहीण मंजू विवाहापूर्वीच्या शारीरिक संबंधातून गर्भपात झालेली आणि दुसरपणात राणे या कामगार नेत्याशी लग्न झालेली. सुमारे सहा महिन्यांपासून गिरणीत संप चालू असल्यानं, राणेही उत्पन्नाच्या बाबतीत बेकार. ‘कामगार थोर असतो... कामगार भिकारचोट असतो’ असा अंतर्विरोध पचवूनही ‘...मी हरणार नाय... मंजू, तुझ्यासाठी मी आकाशातले तारे तोडून आणीन... सोन्याच्या हाराने उघडा गळा झाकून टाकीन.’ असं म्हणणारे. म्हणजे, या घरात कमावणारी मुख्य आईच. लोकांसाठी जेवणाचे डबे करून-लोकांचं शिवणकाम करून देणारी, तिच्याशिवाय एका कंपनीत काम करून महिना हजार रुपये मिळवणारी एक मंजू. ‘का मला पोट पाडायला लावलंत? राह्यले असते मी मुलाला घेऊन... माझ्या सगळ्या स्वप्नांचा लगदा करून पाडून टाकलात?’ असा प्रश्न उन्मळून आईला विचारणारी आणि ‘भाई’च्या आशीर्वादानं जमेल ते सगळे धंदे-मारामाऱ्या करत मिळतील तसे घरी पैसे पाठवणारा नरू. राणे नेतृत्व करत असलेला कामगारांचा संप फोडण्याच्या कामगिरीवरही भाईचा माणूस म्हणूनही नरू सूत्र सांभाळतो. याशिवाय मोहनमध्ये ‘विशेष’ रस दाखवणाऱ्या चाळीतील सावर्डेकर मामी, बाबाचा लेखक-पत्रकार मित्र सतीश आणि नरूचा ‘पंटर’ बटर या पात्रांसह हे नाटक चांगले (वेल-मेड-प्ले) झालंच असतं; पण ते ‘मोठं’ नाटक झालं, ते व्यक्तिविशिष्टता जपूनही, या पात्रांना मिळालेल्या सार्वत्रिकतेमुळे. या उपर  नाटकाचा काळ हा एक स्थित्यंतर-काल आहे, हे लक्षात घेतलं की अनेक स्थित्यंतर-कालखंडात हे नाटक, त्याच्या समकालीन आवृत्त्यांसह आपण बघू शकतो. जगण्याच्या संघर्षात इथे परस्परसंबंधांचा, मानव्याचा बळी जातोय. कुटुंब विखरून जात असताना ‘आई’मध्ये त्या साऱ्याला जोडू पाहणारं एकात्म-तत्त्व देहरूप झालं आहे. बटरशी तिचं वागणं तिचं विस्तारित मातृरूप दर्शवतं, जे साऱ्या वंचितांना कवटाळतं. त्याच्यासाठी तिनं आपला मुलगा बाबा याच्याशी घातलेला वाद, ही व्यापक अर्थाने बुद्धिवादाचा झेंडा मिरवत मानवतेशी फारकत घेणाऱ्या कोरडेपणाची झाडाझडती ठरते. बटरबद्दल आई आणि बाबामधला हा संवाद पाहा.
बाबा: तुम्ही एंटरटेन का करता अशा पोरांना?
आई: का?त्याच्या अंगाला काय घाण चिकटली व्हती?
बाबा: त्याच्या डोळ्यातली चिपाडं बघितलीस? मारे उपदेश करत होतीस... उंडारत फिरू नकोस. जशी  काय तुझ्या उपदेशानं ज्युवेनाइल डेलिक्वन्सी नष्ट होणाराय! तुम्ही अशा वागण्यानं एक प्रकारे उत्तेजन देता गुन्हेगारांना.
आई: ...काय गुन्ना केला रे, त्यांनी? बापानं घरातून हाकलून दिल्यान. बिचाऱ्याशी चार मायेचे शब्द बोलायला नको? आणि गुन्ने काय कोण स्वतःहून करत नाय.

बाबा आणि आई यांच्या अशा संवादांतून नाटकभर पुस्तकी शहाणपण आणि जीवनातून उमलेली शहाणीव यात संघर्षाच्या पातळीवर आंतरक्रिया घडत राहते. आपली सामाजिक-सांस्कृतिक धारणा यातून तासली जाते. नाटकाचं समतोल तत्त्व या दोन व्यक्तिरेखांनी तोलून धरलं आहे. हे नाटक संवादातून तिथल्या कुटुंबाबाहेर असलेल्या महा-व्यवस्थेचा संकेत देतं आणि कुटुंबातली साधीसुधी वाटणारी माणसं एकदम विश्वव्यवहारातील व्यापक भूमिका घेतल्यासारख्या काही काळ उजळून जातात. जसं बापाच्या मृत्यूनंतर त्याच्या विम्याच्या पैशातून मोहनला नोकरी मिळवायची असते, तर बाबाला आपलं पुस्तक प्रकाशित करायचं असतं. मोहनने बाबाला विचारलेला प्रश्न ‘पुस्तक महत्त्वाचे की माझी नोकरी?’ हा केवळ त्या कुटुंबापुरता-त्या समुदायापुरता राहत नाही, तो महाकाय होऊन आपल्याला घेरून टाकतो. जिथं हा प्रश्न थेट जगण्याशीच निगडित आहे; तिथं बाबाच्या लाडक्या सार्त्रनं ‘नॉशिया’ या त्या कादंबरीच्या संदर्भात दिलेलं उत्तर स्पष्ट आहे. कादंबरीपेक्षा जगणं महत्त्वाचं. एका मरणोन्मुख बालकापुढे ‘नॉशिया’ क्षुल्लक आहे, असं सार्त्रनं म्हटलं आहे. बाबाचे व्यक्तिमत्त्व कृतीच्या दृष्टीने पोकळ असलं तरी त्याचा प्रतिध्वनी नाटक मोठ्या अवकाशात घेऊन जाण्यासाठी साहाय्यभूत ठरतो.

 

‘तू करतोयस ना आमच्या सगळ्यांच्या वाटचा इचार गांभीरपणानं तेवढा पुरे.’ या आईच्या वाक्यात एक काउंटरपॉइंटही आहे आणि जीवनाच्या संदर्भात एकूण साहित्य-कलेची मर्यादा, याचा संकेतही. ‘सहावं बोट’ हा संदर्भही या अन्वयार्थाला सखोलता प्रदान करतो.  
गरिबीपायी आई-पोरीमध्ये आर्थिक जबाबदारी उचलण्याबाबत वाद होऊन मुलगी मंजू आईवर नाराज होते, त्यावर आई म्हणतेः चुकले बाय, परत अवाक्षर नाय काढणार. त्यांना (जावयाला) तुम्ही मोप संप करा... उपोषण करा, पण एकदाची मिल सुरू झाली की शिदा कामावर जा. परत बावटे हालवत फिरू नका. हे येवढा पाणी ओत मोरीत. ‘येवढा पाणी ओत मोरीत.’ यात सारं साचलेलं वाहून जाणं-स्वच्छ होणं याचा संकेत आहे.
नरूच्या आईशी बोलताना एका प्रसंगात म्हणतोः ‘भडव्यांना मस्ती आली.  एकदाच काय तो ‘अबीर गुलाल’करून टाकतो. ‘अबीर गुलाल’ या शब्दाच्या वापरानं नाटककार या घराची, मूळ सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि त्याची घडून आलेली भयंकर पडझड एका क्षणात उभा करतो. भक्तिमार्ग ते टोळीयुद्ध! - हे स्खलन व्यक्ती-कुटुंबापुरतं राहत नाही, समाजदर्शन घडवतं!
 मोठा आशय सांगणारी साधी वाक्यं हेही, या नाटकाचं एक बलस्थान. जसं-
उलट नजर कमी झाली की, आठव मोठी/आई,  नरू, देवासारखा नको निदान माणसासारखा वाग/आई. माणूस कमावता नसला म्हणजे जगायला नालायक/मोहन, तू कादंबरी लिवायची येवजलीयस त्यानं जीव द्यायचा येवजलीयस/आई, (जणू अण्णांशी बोलतेय) म्हणायचात माझे तीन लेक म्हंजे, तीन बंदे रुपये हायत... त्या बंद्या रुपयांची चिल्लर झाली/आई.
नाटकाच्या शेवटच्या प्रसंगात नरूनं केलेल्या मारहाणीमुळे वाण्याच्या मुलाचा मृत्यू होतो.
‘मंजू जोराचा हंबरडा फोडून हात जमिनीवर आपटते. बांगड्या फुटतात. बाबा सर्द झाल्यासारखा मागे फिरतो. मोहन प्रचंड हादरलाय... आई मटकन खाली बसते, पूर्णपणे खचून गेलेली... गॅलरीत बसलेला राणे एकदाच हंबरतो, ‘मंजू’...
आई  सावकाश उठते. माचिस आणते. नरूचा रक्ताने माखलेला शर्ट समोर ठेवते. शर्ट भुरूभुरू जळतो आहे. आई त्या ज्वाळांकडे एकटक बघत असतानाच- पडदा.’
मंजूचं बांगड्या फोडणं, तिचं आणि वाण्याच्या पोराचं नातं निदान तिच्या बाजूने फक्त शारीरिक नव्हतं, हे सूचित करतं. तिचा नवरा राणेचं ‘मंजू’ ...असं ‘हंबरणं’ अजूनही तिच्यातच तो जीवनाधार शोधतो आहे, हे ध्वनित करतं.
आई खचलेली असली तरी ती एकटीच कृती करू शकणारी आहे. नरूचा रक्ताने माखलेला शर्ट जाळणं, यातही नव्या आरंभाचा संकेत आहे. ‘अधांतर’ तोलण्याची तिची भूमिका अजून संपलेली नाही... ‘जाळून टाक तो शर्ट...’ ही बाबाची सूचना आईनं  ऐकणं, म्हणजे कृतीच्या बाजूनं बुद्धीसह उभी राहणं आहे का? हा प्रश्न नव्या स्थित्यंतराचे नाटक जन्माला घालेल, कदाचित!

 

arvikarsanjay@gmail.com

लेखकाचा संपर्क : ८२७५८२००४४


 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...