आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जादुई खिडकी!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आधी येतं जगणं. मग स्फुरतो विचार. विचारातून जन्माला येतं तत्त्वज्ञान. तत्त्वज्ञानाच्या घुसळणीतून घडतं संभाषण-लेखन.  लेखकाचं जग असं आकारास येतं. पण त्या जगापर्यंत पोहोचणं असतं, कमालीचं अवघड. कारण, प्रत्येक टप्प्यावर असते एक बंद खिडकी. प्रज्ञावंत लेखक विलास सारंग त्यातली प्रत्येक खिडकी उघडून आपल्याला काफ्का, सार्त्र, बेकेट आणि काम्यू आदी थोर लेखकांच्या  वैचारिक समतोलाचं  दर्शन घडवणाऱ्या अद्भुत साहित्यविश्वात घेऊन जातात...

 

एकोणएेंशी-ऐंशीच्या आसपास अकरावी-बारावीत असताना लेखक विलास सारंगांचा मला शोध लागला. पण त्यांचं ‘सिसिफस आणि बेलाक्वा’ हे पुस्तक पहिल्यांदा कधी वाचलं ते आता आठवत नाही. खूप जवळच्या मैत्रीत जसा ओळखीचा प्रारंभ अचानक गळून पडतो तसंच- या आणि अशा काही पुस्तकांबद्दल माझं झालंय.

 

२००५ मध्ये मी प्रथम सारंगांना भेटलो. पुन्हा २००७ मध्ये आणखी एकत्र संवादयात्रा आम्ही केली. त्यातल्या एका प्रसंगी-‘सिसिफस आणि बेलाक्वा’ हे पुस्तक वाचताना एका प्रदीर्घ अभ्यास-प्रकल्पाची एका अर्थी  प्रि-अँम्बल आपण वाचतो आहोत, असं भान मला येत होतं - असं विधान मी केलं. त्यावर ते उत्तरतात, ‘मला अधिक चांगला लेखक होता यावं यासाठी मी ते लेखक वाचले होते.तुम्ही म्हणता तसं काही माझ्या डोक्यात नव्हतं. मला झेपलं नसतं ते असंही वाटतं... शिवाय पूर्ण समीक्षात्मक असं लिहिलं असतं, तर त्याची वाचकांशी नाळ जुळली नसती. ते पुस्तक लोकप्रिय वगैरे झालं असेल, तर परिचयात्मकता आणि समीक्षात्म दृष्टिकोन यांचा मेळ घातल्यामुळे’ असंही ते सूचित करतात. या दृष्टिकोनातही, अवतीभवतीच्या संस्कृती-अवकाशाचा अंदाज घेत, एक समतोल साधत ते आपले लेखन सिद्ध करतात, हे जाणवते.
‘फ्रांत्झ काफ्का ः संदिग्ध खुणांच्या विश्वात’ या लेखात, ते नुसत्या काफ्काच्या साहित्यकृतींचा वेध घेतात, असं नाही तर जागतिक वाङ््मयातील त्याची थोरवी मर्मदर्शी संदर्भांसह अधोरेखित करतात.


डब्लू.एच.ऑडन या इंग्रजी कवी-अभ्यासकाचे - ‘डांटे, शेक्सपिअर आणि ग्योथ्ये यांचे आपल्या कालखंडाशी  जे नाते होते, ते आपल्या काळात कोठल्या लेखकाचे आहे असा प्रश्न उद््भवला, तर प्रथम नाव येते ते काफ्काचे’ हे मत उद्धृत करून झटकन मोठ्या अवकाशात त्याचे ‘प्लेसिंग’ करतात. काफ्काच्या खरे तर अपूर्ण राहिलेल्या कादंबऱ्यांनी आधुनिक वाङ‌्मयाला एक वेगळीच दिशा दाखवली, हे सूचित करतानाच  ‘के’ या आडनावाच्या आद्याक्षराने निर्देश करण्याचा, वेगळाच अन्वयार्थ ते मांडतात. - ‘के. म्हणजे कोण काफ्का?...केनेडी, क्रुश्चेव्ह... कोकाटे हेही असू शकतात... आद्याक्षराने कथानायकाचा उल्लेख करून हेही सुचवले जाते की, या माणसाला संपूर्ण व्यक्तिमत्त्वच नाही; केवळ एका अक्षरापुरते, तुटपुंजे, रंगहीन व्यक्तित्व-आधुनिक माणसाचे प्रतिनिधित्व करणारे.’ ‘दी ट्रायल’मधील न्यायालय आणि ‘द कासल’मधील गढी ही अनेक दिशांना फाकलेली प्रतीके आहेत हे सांगून ‘द कासल’मधील लैंगिक, धर्मशास्त्रीय, ऐतिहासिक आणि वैद्यकीय अर्थच्छटांचा परामर्श घेत, ते स्वतःची मर्मदृष्टी देणारी निरीक्षणं मांडतात.


‘ज्याॅ पोल सार्त्र : समर्थनाच्या शोधात’ हा सारंगांचा लेख सार्त्रच्या तात्त्विक आणि सर्जनशील लेखनाबरोबरच त्याच्या बदलत जाणाऱ्या भूमिकांमधील बदलही टिपतो. सार्त्रच्या तात्त्विक पार्श्वभूमीमुळे त्याच्या कादंबऱ्यांची हानी न होता, उलट फायदाच झाला हे सांगतानाच, त्यातील अंतःप्रवाह ते सूचित करतात. या लेखात आलेली झोला, हार्डी, टॉलस्टॉय,बोदलेअर यांच्या बाबतची निरीक्षणं वा पुराणकथांचा त्याने नाटकात केलेला वापर, यातून त्या मूळ स्रोतांकडे जाण्याची ओढ आपल्याला लागते. व्यक्तिशः मला सार्त्रवरील या लेखानं प्रथम त्याच्या ‘ले मो’ (वर्डस्) या आत्मकथेकडे नेलं. त्याच्या वाचनानं आत्मकथांचा-आत्मपर लेखनाचा खास अभ्यास करावा, असा ध्यास मला लागला. साहित्यकृतीपेक्षा प्रत्यक्ष मानवी जीवनाला आणि कृतीला प्राधान्य देणारा सार्त्र, ज्याच्याकडे पुन्हापुन्हा वळावे, असा आव्हानात्मक लेखक-विचारवंत आहे, याचं भान मला आलं. आल्बेर काम्यूः ‘होय’ आणि ‘नाही’ हा लेखात प्रारंभीच, काम्यूच्या दृष्टीत(त्याची) अल्जिरियन भूमी विश्वाची छोटी आवृत्ती बनते, मानवी स्थितीचे प्रतीक ठरते, असे मार्मिक निरीक्षण सारंग मांडतात. काम्यूच्या जीवनदृष्टीचा वेध घेताना, ‘पारलौकिक स्वर्गाची ख्रिश्चन कल्पना अथवा मार्क्सवादाने देऊ केलेले भविष्यकालीन सौख्य यांच्या लालसेला बळी न पडता पुराणकालीन ग्रीकांप्रमाणे केवळ ‘इथे आणि आता’ जे सौख्य मानवाला लाभण्याजोगे आहे त्यावरच काम्यू संतुष्ट आहे’ हे त्यांचे निरीक्षण झटकन तीन जीवनप्रणाली आपल्या मनात जागवून काम्यूचे ग्रीक जीवनप्रणालीशी असलेले साधर्म्य सूचित करते.


 सार्त्रच्या ‘नॉशिया’चा नायक रोकँतो आणि काम्यूच्या ‘दि आऊटसायडर’मधील नायक मेसाँ यांची तुलना आणखी एक मोठा अर्थप्रवाह खुला करते. विश्व आणि स्वतःचे अस्तित्व यांची डोळस जाणीव बाळगून जीवन जगणारा ‘अॅब्सर्ड मानव’ रोकँतो आणि मेसाँ या दोघांमध्येही आहे, पण रोकँतोच्या मनात या जाणिवेसरशी ‘किळस’ भरून येते... याउलट... मेसाँ... अस्तित्वाचा तिरस्कार न करता त्याचा उपभोग घेणे, ही त्याच्या जीवनाची सांगता, हे त्यांचे निरीक्षण त्या दोघांच्याही लेखनाकडे आपल्याला खेचून नेते, किमान या दोन कादंबऱ्यांकडे तर नक्कीच! ‘काम्यूची वाङ्मयीन श्रेष्ठता होकारात्म मूल्यांचे पुनरुज्जीवन करण्यात आहे, असे नव्हे; या मूल्यांपर्यंत पोहोचण्यासाठी नकारात्म शक्तींशी दिलेला झगडा, यातून निर्माण होणारा ताण, यावर काम्यूची कला जगली’ या त्यांचा निष्कर्ष त्यांच्या विश्लेषणातील मर्मभेदकता अधोरेखित करतो. समीक्षक सारंगांमध्ये संश्लेषण - विश्लेषण यांचा संयोजन-कर्ता आहे.  ‘सॅम्युअल बेकेटः नाटककार - पोकळीतले शब्द’ या लेखात बेकेट आपले खाजगीपण  किती कसोशीने जपत, हे सूचित करून त्याच्या विलक्षण नाट्यसृष्टीचा सारंग अचूक वेध घेतात. विशेषतः ‘वेटिंग फॉर गोदो’ या त्याच्या जगप्रसिद्ध आणि नवी रंगभाषा घडवणाऱ्या नाटकाची मूलगामी चिकित्सा सारंग करतातच,शिवाय त्याच्या रेडिओ-नाट्याचे विश्लेषण करताना ‘एंबर्स’(विझते निखारे) या नाटकात मिसेस रूनी या पात्राच्या माध्यमातून ‘रेडिओ-नाट्याची प्रकृतीच आपली कैफियत मांडत आहे, हा सारंगांनी मांडलेला अन्वयार्थ अभ्यासाची एक वेगळीच दिशा सूचित करतो. शब्द आणि कृती या नाटककाराच्या दोन मूलभूत साधनांचा बेकेट एकमेकांविरुद्ध उपयोग करतो, हे त्यांचे मर्मग्राही निरीक्षण तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्राच्या अन्वेषण-क्षेत्रात उतरून त्याच्या नाटकांकडे बघावे, यासाठी उद्युक्त करते.


बेकेटच्या पात्रांच्या बोलण्यामध्ये असणारे ‘विराम-स्तब्धता’ रंगावकाश बोलका करतानाच, त्यामागच्या जीवनातील अपरिहार्यतेचा संकेत देतात. काफ्का, सार्त्र, काम्यू, बेकेट यांच्यापैकी बेकेटचा सारंगांच्या आध्यात्मिक भूमिकेवर जास्त प्रभाव आहे, असं मत कवी-कथाकार-समीक्षक दिलीप चित्रे यांनी व्यक्त केलं आहे. सारंग स्वतः आमच्या पहिल्या दीर्घ-संवादाच्या वेळी ‘सार्त्र आणि बेकेटःखुंटलेले मार्ग’ या लेखाच्या अनुषंगाने  मला सांगतात. ‘बेकेटशी माझी लव्ह-हेट रिलेशनशिप होती. सुरुवातीला मला बेकेटचं लिखाण खूप आवडलं, पण पुढे लक्षात आलं की अंतिमतः लेखकांसाठी बेकेट चांगला नाही... बेकेटच्या मार्गाने पुढे गेलं तर ...जवळजवळ काहीच पुढं लिहिता येणार नाही. काफ्का मात्र या सगळ्यांच्या वर आहे आणि एक म्हणजे तो काहीच फिलॉसॉफिकल भूमिका घेत नाही.’ सारंग पुढं सांगतात, ‘...लेखकानं कुठल्याही आयडियालॉजीचा पुरस्कार करण्याची गरज नाही-जर ती नसली तर तुम्ही अधिक चांगले लेखक होऊ शकता.’ या विधानाच्या प्रकाशात आपण सारंगांचेही लेखन तपासू शकतो. बंडखोरांचा अग्रणी काम्यूचा ‘सिसिफस’ आणि मूर्तिमंत आळसाचं प्रतीक असलेला बेकेटचा ‘बेलाक्वा’ या दोघांना मानवी जीवनाच्या दोन तऱ्हा म्हणून, संस्कृतीच्या इतिहासात रेखत असताना सारंग लिहितात... ‘या दोघांचेही प्राक्तन सारखे आहे... काम्यू, सार्त्र, काम्यू, बेकेट आणि काफ्का - या चारही लेखकांचे विश्व ‘कन्डेम्ड’ अर्थात टाकून दिलेल्या माणसाचे आहे... सार्त्र तर, माणसाला स्वातंत्र्याची शिक्षा देण्यात आली आहे, असे विरोधपर वर्णन करतो.’
सारंगांनी ‘सिसिफस आणि बेलाक्वा’ या पुस्तकाला प्रारंभी ‘खिडकी उघडण्याआधी’ अशा शीर्षकाचं निवेदन जोडलं आहे. पुस्तक वाचायला सुरुवात केल्यानंतर आपल्याला जागोजागी अशा अनेक खिडक्या दिसतात; ज्यातून आपण अनेक ज्ञानशाखांकडे तर जातोच पण डांटे, बोदलेअर, जॉईस, प्रूस्त, एस्किलस, झोला, टोमास मान, टॉलस्टॉय, डोस्टोव्हस्की, जोझफ कॉनरॉड या पूर्वीच माहीत असलेल्या लेखकांकडे पुन्हा वळतो-कारण आपल्या गवसली असते, ‘सिसिफस आणि बेलाक्वा’ या पुस्तकाच्या रूपात अनेक खिडक्या उघडणारी अनोखी खिडकी!


arvikarsanjay@gmail.com

लेखकाचा संपर्क : ८२७५८२००४४

बातम्या आणखी आहेत...