आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुस्तकांचे झाड बहरते...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनाची  कवाडं खुली होतात... मेंदूच्या बंद झडपा उघडतात... पुस्तकं तुमच्यात माणूसपणाचा अंश पेरत राहतात... कणाकणाने तुम्हाला माणूस म्हणून घडवत राहतात.... पुस्तकांशी असलेल्या आंतरिक नात्याचं, मैत्रीचं अगदी प्रणयाचंही हेच खरं कारण असतं. घरातलं हेच पुस्तकांचं बहरतं झाड हरघडी जगण्याची बिघडू पाहणारी लय सावरू पाहतं...

 

मी आठवी-नववीत असेल, तेव्हाची गोष्ट. शाळेत आम्हाला मास्तरांनी निबंध लिहायला सांगितला. विषय होता, ‘माझे ध्येय’. मला डॉक्टर, इंजिनिअर, वकील, शास्त्रज्ञ, सरकारी अधिकारी असं काहीही व्हायचं नव्हतं. मला मनापासून लेखक-अभ्यासक व्हायचं होतं. तेही विद्यापीठात शिकवणारा प्राध्यापक. गावाबाहेरच्या विद्यापीठ परिसरात, ज्याचं घर गर्द झाडीत लपलेलं आहे आणि घरात खच्चून भरलेली स्वतःची लायब्ररी. अशा कोणालाही मी त्यावेळी पाहिलं नव्हतं, पण मोठेपणाचा विचार, त्यापुढची स्वप्नं मनात यायची, तेव्हा हेच दृश्य अपरिहार्यपणे डोळ्यासमोर यायचं.


पुढे १९८० च्या आसपास नाटककार प्रा. महेश एलकुंचवार यांच्याशी ओळख झाली.एकदा त्यांच्या घरी गेलो. आत हॉलमध्ये गेल्यावर घराच्या भिंतींवर अनोखी चित्र, एका भिंतीवर-बैठ्या डायनिंग टेबलच्या मागच्या भिंतीवर गच्च भरलेली पुस्तकं, अवतीभवती, आतल्या खोल्यांमधल्या रॅकवर, टिपॉयवर, जागा असेल तिथं पुस्तकंच पुस्तकं, पण अस्ताव्यस्त पसरलेली नाहीत, नीट ठेवलेली, आपल्याला वाचण्यांचं आमंत्रण देणारी. मला शाळेत लिहिलेला निबंध आठवला - ‘माझे ध्येय’.

पुढे आमची ओळख वाढत गेली. मी त्यांना मौज, सत्यकथा, युगवाणी वगैरे अंक वाचायला मागायचो. एक दिवस ते मला म्हणाले. ‘हे सगळे अंक तू घेऊन जा. तुझ्याकडे ठेव, तू-तुझे मित्र वाचा आणि नंतर मला परत करा.’ मग ते अंक थोड्या काळासाठी माझ्या घरी वसतीला आले. पुढे काही वर्षांनंतर, १९९२ मध्ये मी औरंगाबादला बदलून गेल्यानंतर, या सर्व अंकांशिवाय इनॅक्ट, थिएटर आर्टस् या नियतकालिकांसह अनेक पुस्तकं माझ्या घरी नेहमीकरता वसतीला आली. माझ्या घरात आधीच असलेल्या पुस्तकांशी, हे नवे पाहुणे गप्पा मारताहेत, एकमेकांशेजारी बसलेत की गळ्यात पडताहेत, असंही मनात येऊन गेलं . 

 या पुस्तकं-मासिकांची पोती घेऊन ती खाजगी बसनं औरंगाबादला आणली, तेव्हा मी कोणी पुस्तक विक्रेता आहे, असं समजून ही सर्व पोती मला जकातनाक्यावर उघडावी लागली होती. ही जुनीच पुस्तकं माझ्या वैय्यक्तिक संग्रहासाठीच आहेत, याचा धक्का न ओसरलेल्या अवस्थेत,जकातनाक्यावरच्या लोकांनी मी शासकीय अधिकारी आहे, याची वारंवार खात्री करून घेत मला सोडलं होतं. माझ्या मनातलं मोठेपणाचं स्वप्न, मी एलकुंचवारांच्या रूपात किशोरावस्थेत बघितलेलं असल्यानंच, आपला वैयक्तिक संग्रह असण्याची भावना माझ्यात खोलवर रूजली असावी. पुढे बी.ए.ला असताना साहित्याबरोबरच मानसशास्त्र, तत्वज्ञान या विषयांची गोडी लागली. कथा-कवितांबरोबर मला इतरांच्या लेखनाबद्दल काय वाटलं, हेही लिहिलं. काही जण त्याला समीक्षा म्हणाले! समीक्षा म्हटल्यावर जबाबदारी वाढल्यासारखं वाटलं. मग समीक्षेच्या पुस्तकांव्यतिरिक्त संस्कृती-अभ्यास, दैवतशास्त्र, सौंदर्यशास्त्र, संप्रेषणशास्त्र, चित्रपटकला, संगीत, चित्रकला आणि आंतरविद्याशाखीय अभ्यासासाठी निगडित पुस्तकं घेण्याकडे कल झुकू लागला. यात जोहान हुईझुंगाचं ‘होमो लुडन्स’, जे.ए.हॅडफिल्डचं ‘ड्रीम्स अँड नाइटमेअर्स, आंद्रे तारकोव्हस्कीचं ‘स्कल्प्टिंग इन टाइम’ जॉन आयझोडचं ‘मिथ, माइंड अँड स्क्रिन’, मार्शिया एलिआदचं ‘मिथ्स, ड्रिम्स अँड मिस्ट्रिज’, जे.जी. फ्रेझरचं ‘गोल्डन बो’, लेव्ही स्त्रोसचं ‘मिथ अँड मिनिंग’, जोसे॑फ कॅम्बेलचं ‘प्रिमिटिव्ह  मायथॉलॉजी’, ‘क्रिएटिव्ह मायथॉलॉजी’, लॉरेन्सचं कुपेचं ‘मिथ’, युंगचं ‘मॉडर्न मॅन इन सर्च ऑफ अ सोल’, ‘मॅन अँड हिज सिम्बाँल्स’, पॉल लेव्हिटचं ‘स्ट्रक्चरल अ‍ॅप्रोच टू अ‍ॅनॅलिसिस ऑफ ड्रामा’, रूडाल्फ अर्नहाइमचं ‘फिल्म अ‍ॅज आर्ट’, आयझेनस्टाइनचं ‘फिल्म सेन्स’, अ‍ॅलन केनेडीचं ‘प्रोटियन सेल्फ’, नोम चॉम्स्कीचं ‘ऑन लॅग्वेज’, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींचं ‘डेव्हलपमेंट ऑफ इंडियन कल्चर-वेदाज् टु गांधी’ अशी बरीच पुस्तकं जमली.
 
वाचणाऱ्या माणसांचं पुस्तकांशी विलक्षण नातं असतं. ज्यांचा उल्लेख मी माझ्या मागील एका सदरात केला होता, त्या पुस्तकांना माणसांसारखं वागवणाऱ्या जेष्ठ कथा-कादंबरीकार कमल देसाई यांनी आपला वेचक ग्रंथसंग्रह माझ्या स्वाधीन केला, तेव्हा मला खूप सारी पारितोषिकं एकदम मिळाल्यासारखं वाटलं होतं. आता त्या गेल्यावर, मी त्या पुस्तकांना स्पर्श करतो, तेव्हा त्या पुस्तकांना झालेला त्यांचा स्पर्श, मला आशीर्वाद देतोय, असं वाटत राहतं. जेष्ठ विचारवंत वसंत पळशीकर यांचं ‘सत्याग्रही सॉक्रेटिसचं वीरमरण’ हे पुस्तक, त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात-कमलताईंना स्नेहपूर्वक भेट-वसंत पळशीकर / १९-१०-९६. असं लिहून दिलं होतं.  सॉक्रेटिस मला पूर्वीच अनेक पुस्तकांमधून भेटला होता, पण यात महात्मा गांधींशी पळशीकरांनी त्याचं, जे साधर्म्य दाखवलं  होतं, त्यातून गांधींबद्दलच्या माझ्याकडे असणाऱ्या अनेक पुस्तकांशी त्यांची नाळ जुळली. त्यातून आणखी एक गोष्ट झाली. गांधींबद्दलचे चित्रपट, ध्वनिपुस्तिका या साऱ्यांशी या पुस्तकांचे एक नवं नातं जुळलं. ही सारी माध्यमं एकमेकांशी हातात हात घालून माझ्याशी बोलू लागली, आपल्या मैत्रीबद्दल सांगू लागली. 

 १९९९ ते २०११ या काळात मी दीर्घ मुलाखतींच्या एका प्रकल्पावर काम करत होतो. २००७ मध्ये एलकुंचवार, कमल देसाई, ना.धों. महानोर यांच्याशी मी साधलेल्या प्रदीर्घ संवादांवरचं, आणि कवी अरूण कोलटकर यांच्याविषयी डॉ.सुधीर रसाळ, प्रा.रवींद्र किंबहुने आणि डॉ.प्रकाश देशपांडे-केजकर यांच्याशी झालेल्या संवादाचा अंतर्भाव असलेलं पुस्तक ‘नव्या अवकाशातील आनंदयात्रा’ या नावाने ‘पद्मगंधा’ प्रकाशनाने प्रकाशित केलं. या पुस्तकात या कलावंत-लेखकांच्या पुस्तकांशिवाय अनेक पुस्तकांबद्दलचाही संवाद आहे. एका अर्थी ते पुस्तकांविषयीचेही पुस्तक होतं. ज्येष्ठ समीक्षक प्रा.रा.ग. जाधव यांची त्याला प्रस्तावना आहे. प्रस्तावना लिहिण्याचाच काळात त्यांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया व्हायची होती. पण प्रा.जाधव यांनी आधी प्रस्तावना मग शस्त्रक्रिया, असा क्रम ठरवत, त्यांच्या ‘प्रज्ञेचा डोळा’ स्नेहार्द्रतेनं झरतो आहे, असं वाटावं अशी प्रस्तावना लिहिली. साहित्य-संमेलनाचे अध्यक्ष झाल्यावर प्रा.जाधव आपल्या सत्काराच्या निमित्ताने औरंगाबादला आल्यानंतर, डॉ.गंगाधर पानतावणे माझी त्यांच्याशी ओळख करून देऊ लागले. प्रत्यक्ष काही बोलण्याआधीच त्यांनी मला मिठीत घेतलं आणि प्रेमानं थोपटत म्हणाले, ‘अरे,याला मी खूप चांगला ओळखतो’. पहिल्यांदाच मला माझ्या उंचीचा राग आला; कारण मला अगदी लहानगा होऊन, त्यांच्या कुशीत शिरायचं होतं. 
या मुलाखतींपैकी कमल देसाई यांची पहिली मुलाखत २००३ मध्ये ‘पद्मगंधा दिवाळी’ अंकात आली, एकेकाळी कमलाताईंचे शिक्षक असणारे प्रा.म.वा. धोंड तो अंक घेऊन, कमलताईंचे बौद्धिक सहप्रवासी डॉ.रा.भा.पाटणकर यांच्याकडे गेलेत. मुलाखतीबद्दल या दोघांनीही पाठवलेली पत्रे त्या पुस्तकात प्रकाशित केली आहेतच, पण तोपर्यंत माझ्या घरातल्या पुस्तकांना,अनेक शाखा फुटल्या होत्या. कारण डॉ.पाटणकर माझे समीक्षेतले ‘हिरो’ होते आणि म.वा.धोंडांच्या पुस्तकांनी, रचनेच्या खोल तळाशी जाण्याची विजेरी मला दिली होती! याचबरोबर दिवंगत  प्रा.उत्तम क्षीरसागर आणि प्रा.रवींद्र किंबहुने यांच्याशी बोलताना हे दोघेही इतक्या ज्ञानशाखांमध्ये लीलया संचार करीत, की आपल्यासमोर एखाद्या साध्या रोपाचं, गर्द पर्णसंभार असलेल्या, अनेक शाखांच्या वृक्षात रूपांतर झालं आहे, असं वाटावं.

पुस्तकांविषयीच्या अनावर प्रेमानंच मला पुढे पुस्तकाविषयीच्या पुस्तकांकडे नेलं. त्यातही सतीश काळसेकरांचं ‘वाचणाऱ्यांची रोजनिशी’, महेश एलकुंचवारांचं ‘पश्चिमप्रभा’,काही अंशी त्याचं ‘मौनराग’ही, अरूण टिकेकरांचं ‘अक्षरनिष्ठांची मांदियाळी’, नितीन रिंढेंचं ‘लीळा पुस्तकांच्या’ आणि निखिलेश चित्रेंचं ‘आडवाटेची पुस्तकं’ यांनी मला अजून धरून ठेवलं आहे. यातील सारीच पुस्तकं काटेकोर अर्थाने पुस्तकाविषयीच्या पुस्तकं (बुक्स ऑन बुक्स) नाहीत पण त्यांनी माझ्या पुस्तकांच्या झाडावर नवनव्या पक्षांना आमंत्रित केलं. महेश एलकुंचवारांच्या ‘पश्चिमप्रभा’नं  मी ज्याँ निकोलस आर्थर रिम्बॉँ, आणि हेन्री मिलर, युजिन ओ’नील, चेकाव्ह, नाट्यदिग्दर्शक आणि ‘पुअर थिएटर’चा उद्गाता ग्रोटोव्हस्की यांच्याकडे खेचला गेलो.

सतीश काळसेकरांची ‘वाचणाऱ्यांची रोजनिशी’ अकादमिक चौकटीच्या बाहेरचा एक सांस्कृतिक नकाशा आपल्यासमोर उलगडते. ती वाचताना एखादा जिवलग मित्र, त्याच्या स्नेहाळ वाणीतून व्यक्तिशः आपल्यालाच हे सांगतो आहे, असं वाटत राहतं. ही डायरी एखाद्या कालयानासारखी आहे. ती वाचताना कोणत्याही काळात तुम्ही अवगाहन करू शकता. डोस्टोव्हस्की, काम्यू, काफ्का, स्टाईनबेक, पाब्लो नेरूदा, तसंच लीळाचरित्र, तुकारामाची गाथा, महात्मा गांधी, विनोबांची गीताई, धनंजयराव गाडगीळ यांचे अर्थशास्त्रीय निबंध या साऱ्यांकडे ही डायरी एकाचवेळी आपले लक्ष वेधते. ‘अक्षरनिष्ठांची मांदियाळी’ अरूण टिकेकरांचा ग्रंथशोध आणि वाचनबोध, याबद्दल सांगताना आपल्या वाचनाच्या कक्षा रंदावतात. नितीन रिंढे यांच्या ‘लीळा पुस्तकांच्या’ या शीर्षकातूनच आपल्याला हत्तीची दृष्टांतकथा आठवते. आणि जसजसे आपण पुस्तक वाचू लागतो; तसं माहिती आणि मर्मदृष्टी यांचं ज्ञानवर्धक सहअस्तित्व आपल्या संवेदनांमध्ये उतरत जातं.

पुस्तकांसाठी स्वतंत्र घर बांधणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर, डोळे अधू झाल्यावर ‘आता जगून काय उपयोग?’ असा शोक व्यक्त करणारे कृष्णराव अर्जुनराव केळुस्कर या पुस्तकात जसे भेटतात. तसंच, महान जर्मन लेखक वॉल्टर बेंजामिन याच्या ‘अनपॅकिंग ऑफ माय लायब्ररी’ या जगप्रसिद्ध भाषणाचा वेधही  त्यात आहे. स्टुअर्ड केली या अभ्यासकानं लिहिलेलं ‘द बुक ऑफ लॉस्ट बुक’ हे पुस्तक कसं लिहिलं, हे सांगतानाच वाचलेल्या पुस्तकांपेक्षा न वाचलेल्या पुस्तकांची यादी कशी मोठी होत जाते, याचाही ते उल्लेख करतात. ‘धिस इज नॉट द एंड ऑफ बुक’ या इटालियन कादंबरीकार-समीक्षक उंबर्तो एको आणि फ्रेंच पटकथाकार जि-क्लॉद कॅरिए यांच्यातील दीर्घ संवादाबद्दल, रिंढे यांच्या विवेचनामुळे आपण मूळ पुस्तक मिळवण्याची धडपड करू लागतो.

 निखिलेश चित्रे या तरूण लेखकाचा उल्लेख सतीश काळसेकर आणि नितीन रिंढे या दोघांच्याही पुस्तकात आहे. अगदी विपुल आणि वैविध्यपूर्ण वाचन करणाऱ्यालाही आपल्या वाचनाबद्दल, त्याबद्दलच्या स्वतःच्या आणि इतरांच्या मतांचा पुनर्विचार करायला लावेल, इतक्या आडवाटेच्या पुस्तकाबद्दल ते लिहितात.या पुस्तकांभोवती असलेलं अपरिचिततेचं आणि दुर्बोधतेचं कडं वितळवून टाकणाऱ्या लक्षणीय शैलीत, या पुस्तकांबद्दल सांगतानाच, अगदी अनोख्या जगात सहप्रवासी बनवून ते घेऊन जातात. पुस्तकाच्या प्रारंभी जोडलेल्या  त्यांच्या मनोगताचा अवकाशही पुरातन आणि आधुनिकोत्तर काळाला कवेत घेणारा आहे. वाचणाऱ्याचा अहंकार गळून पडेल आणि या आडेवरच्या पुस्तकांशी दोस्ती करावी, तरूण निखिलेशला ‘वाचन-गुरू’करावा, अशी भावना निर्माण करणारं हे पुस्तक आहे.
 
 थोर, चांगली आणि वेगळ्या वाटेची पुस्तकं तुम्हाला अभ्यासही करायला लावतात. "लॉर्ड ऑफ द फ्लाइज’नी मला अनेक ज्ञानशाखांची ओळख करून घे, असा लकडा माझ्यापाशी लावला, ‘वर्डस्’ या सार्त्रच्या आत्मचरित्रानं, या विसाव्या शतकातील प्रज्ञावंताचा अभ्यास करायला भाग पाडलं. ‘राशोमान’नी अन्य जपानी लेखकांकडे जाण्याची शिडी पुरवली. ‘तिरिछ’नं आजच्या भयप्रद वास्तवाशी थेट डोळा भिडवत काळाचा चेहरा दाखवला. ‘जनअरण्य’नं बेकारीत झोप उडवून सावध केलं. एकाच विखंडित व्यक्तिमत्वात १६ खंडित व्यक्तिमत्वे असणाऱ्या ‘सिबिल’च्या गोष्टीनं मानसशास्त्र-मानसोपचाराच्या खोल गुहेत उतरायला लावलं.
 
आपला ग्रंथसंग्रह समृद्ध होण्यासाठी जशी पुस्तकांची मदत होते, तशीच माणसांची मदत होते. अलीकडेच तत्वज्ञानाच्या प्रा.सुनीती देव यांनी सौंदर्यशास्त्राच्या पुस्तकांचा त्यांचा खजिना माझ्या हवाली केला. माझ्यासाठी प्रत्येक पुस्तक एखाद्या बीजासारखं-रोपट्यासारखं असतं.अंकुर रूजला की त्याचं झाड, वेल, सावली देणारा वृक्ष होणारच आणि या पुस्तकांना नवे मित्र-मैत्रिणी भेटले की, प्रत्येक वेळी त्यांना बहर येणार. असे पुस्तकांचे बहरते झाड जगण्याचा समतोल साधते, आपल्या जगण्यावर सावली धरते.

बहुतेक अशाच पुस्तकांबद्दल कवी प्रफुल्ल शिलेदार सांगतातः
...तेव्हा पुस्तकं
 फुलपाखरं होऊन
 उडत येतात

लेखकाच्या कवीच्या
बोटांवर
अलगद येऊन बसतात
टिपलेले पराग
त्याच्या लेखणीच्या शाईत 
सोडतात...                                  

 

बातम्या आणखी आहेत...