आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशेचा पाऊसधारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण भूतकाळात जगतो. आपण भविष्यकाळातही जगतो. पण वर्तमानाचा एक क्षण कधी आपल्याला ओंजळीत घेता येत नाही. त्या एका क्षणातलं सौंदर्य आपल्याला टिपता येत नाही. मनाची ही कुंठितावस्था दूर करणारा जादुई समतोल ही अमोल आणि चित्रा पालेकरांची कलाकृती साधते... 


प्रौढवयीन रघुनाथ राय आपल्या पत्नीमागे मोठ्या प्रेमानं वाढवलेल्या बिन्नी या तीसवर्षीय अविवाहित मुलीबरोबर  घराबाहेरच्या मोकळ्या भागात  फेरफटका मारायला निघाले आहेत. 
मनभावनांना कवितेचं रूप देत बिन्नी म्हणतेय -
पापा प्यारे पापा, सच्चे पापा, अच्छे पापा, तुमको यकीन है, मुझको यकीन है ... नही मुझमें ऐसी कोई कमी है, फिर क्यू है, ऐसा लगता कुछ खाली खाली है... जिंदगी के पर्चे तो अच्छे गये है, पर ये तो सवाल बिलकुल अब भी नये है... कहाँ से मै लाऊं इनके जबाब पापा... मिलती कहाँ ऐसी किताब पापा... पापा तुमने मुझको इन्सान बनाया, मगर ना तुमने ये जहाँ बनाया ... कहते है सब, मुझमे कुछ तो कमी है, इन्सान तो है बिन्नी औरत नही है  
 (आता कवितेला गाण्याचं रूप देत)
पापा ओ पापा, अब तुमही बता दो, औरत बनू कैसे  ये तुमही सिखा दो... 
पारंपरिक चौकटीबाहेरची बिन्नी, एकाच वेळी बाबांना प्रश्न विचारणारी ‘लहानगी’ आणि स्त्रीत्वाशी निगडित प्रश्नांनी मोठी झालेली आहे. त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पुन्हा आपल्या आपल्या बाबांकडेच आली आहे. कारण हा प्रश्न, आता स्वप्न-वास्तवाच्या संयोगभूमीवरून आलेल्या ‘धृष्टद्युम्न पद्मनाभ प्रजापति निलकंठ धुमकेतू बारिशकर’ने (पाऊस आणणारा-रेनमेकर) वेगळ्या उद्देशासाठी, उपस्थित केला आहे. हा बारिशकर बहुरूपी आहे.
हा मेरे दोस्त... वही बारिश  जो आसमान से आती है, बुंदो में गाती है, पहाडों से फिसलती है, नदीयो में चलती है, नहरों में मचलती है... मोड पर संभलती है, फिर आगे निकलती है , वही बारिश...
- अशी पावसाची नानाविध रूपं रेखाटत ‘अवतरणारा’ हा बारिशकर कधी रूपकाच्या पायऱ्या ओलांडून जगण्याच्या-रोजगाराच्या-व्यवसायाच्या मैदानात उतरतोय. नव्हे जादुई वास्तवाचे देहरूप असणारा हा बारिशकर बिन्नीच्या अंतरंगात आशेच्या पाऊसधारांना धरूनच उतरला आहे. तिच्या मनातल्या अनुच्चारित प्रश्नांना त्याने उद््गार दिला आहे. म्हणून बिन्नी आपल्याला घडवणाऱ्या हातांकडे - स्वतःच्या बाबांकडे, त्याच्या उत्तरांसाठी आली आहे...
बिन्नीच्या आधी बारिशकरनं अठरा वर्षांच्या उंबरठ्यावर असलेला, मोठ्या भावाच्या दबावानं आत्मविश्वास हरवून बसलेला  तिचा भाऊ बीम (जणू कोवळा प्रकाशकिरण) याला मोहिनी घातली आहे. आपण उत्तम ड्रम वाजवू शकतो, असा आत्मविश्वास त्याला  बारिशकरनं दिला आहे. पाऊस आणण्याच्या माझ्या मोहिमेत ‘तू माझा उजवा हात’ या बारिशकरच्या उद््गारात त्याला आपल्या ‘खास’ असण्याची, जीवन-प्रयोजनाची चाहुल लागली आहे.
एकीकडे, ‘कसल्याच (चांगल्या) गोष्टींवर विश्वास नसणाऱ्या तुझ्या मोठ्या भावासारखी तू आहेस’ असं सांगून बारिशकर, कडवट-एककल्ली दृष्टिकोनाच्या छुप्या प्रभावापासून बिन्नीला विलग करतो आहे. स्वतःतल्या आंतरिक सौंदर्याकडे, ‘स्व’त्वाला अंतर्बाह्य सुंदर करून टाकणाऱ्या संवादी साक्षात्काराकडे नेतो आहे. ‘तू एक स्त्री आहेस याच्यावर तर विश्वास ठेऊ शकतेस... कोणतीही स्त्री ‘साधारंण -मामुली-सिधीसाधी’ असूच शकत नाही.प्रत्येक स्त्री सुंदरच असते, आपल्याला तऱ्हेनं; पण सुंदरच असते... बिन्नी आरसा भिंतीवर वा हातात नसतो ...इथं (हृदयात )असतो... तूच स्वतःचा आरसा हो... आणि स्वतःच्या आत पहा. निडर होऊन पहा. तुला तिथे एक सुंदर स्त्री दिसेल... खूप सुंदर स्त्री आणि मग तुला तो भेटेल ‘तो’ ज्याचे डोळे तुझ्यासाठी आरसा होतील आणि तुला म्हणेल तू किती सुंदर आहेस बिन्नी!’ या बारिशकरच्या शब्दांनी  बिन्नी धुंद होत ‘नहीं...नहीं’, म्हणत त्या आंतरिक सौंदर्याच्या साक्षात होण्याच्या क्षणात न्हाऊन निघते आहे. तिनं धैर्यानं उच्चारलेल्या ‘मै सुंदर हूं’ या उद््गाराचं-प्रतिध्वनीचं गाणं जणू तिच्या साथीनं सारा आसमंत गातोय...
बारिशकर तिला प्रथमच स्पर्श करतो आणि जणू सारी सौंदर्य-संवेदना तिच्या पेरतो.
ती गाते ः तारोंने कहा फुलोंने सुना बदरीनें कहाँ चंदा ने सुना ...मै सुंदर हूं
तृप्तीने झरू लागलेले डोळे ती बंद करून घेते.
बारिशकर ः बिन्नी आंखे खोलो... बस एक बार मेरे आंखो में देखो... और बताओ क्या दिख रहा है तुम्हे...
बिन्नी ः  ज्यो मै देख रही हूं यकीन नही होता... इतनी सुंदर... क्या ये मै हूं? सच में?
बारिशकर... इस लम्हें मे दुनिया की सबसे खूबसुरत औरत तुम हो. 
आणि आता आनंदविभोर होऊन दोघांचेही एकमेकांसह लयदार नृत्य.
अमोल पालेकरांचं नवी चित्रपटभाषा घडवणारं दिग्दर्शन, भास्कर चंदावरकरांचं अवघ्या भावसृष्टीला कवेत घेणारे संगीत, चित्रा पालेकरांची  मर्म-भाष्य वाटावी अशी संहिता-संवाद आणि कमलेश पांडे यांच्या आशयघन गान-कविता यातून साकारलेल्या आणि अनिता कंवर - नाना पाटेकर यांनी साक्षात जगलेल्या या दृकश्राव्य रुपेरी कवितेचं नाव आहे, ‘थोडासा रूमानी हो जाय’.
सारा शहर परेशान है कि बिन्नी बिन्नी क्यू है
पेड काट-काट शहर नंगा हो गया सुअर और गाय के नाम पर दंगा हो गया...
इस शहर को सच हजम नही होता इसलिए वो अफवाए उगलता
जहाँ महात्मा गांधी रोड पे बिकती शराब है
वहाँ सिर्फ मेरे बिन्नी के वजह से इस शहर का हाज्मा खराब है?
कवितेतला प्रातिनिधिक काळ आणि आणि वास्तवातला कथानक काळ एकाच शब्दानं जोडण्याची किमया दिग्दर्शकाने इथं साधली आहे. बिन्नीच्या वडिलांचे काव्यात्म संवाद - ‘...मेरी बेटी है, कमीज नही’ या वाक्यांशी संपत असतानाच बिन्नी बाहेरून घरात येते आणि ‘मै अभी कमीज बदलके आती हूं’ असं म्हणते. अशी दृश्यं एकमेकांशेजारी ठेवून साधलेला अर्थगर्भ मेळ - काव्यात्मकता आणि वास्तव या, साऱ्या जीवनाला स्पर्श करणाऱ्या मोठ्या समीपन्यासाचा संकेत देतो.
बिन्नी राहते, त्या शहरातला जिल्हाधिकारी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिलेला, बिन्नीच्या मते पुन्हा कोणीतरी ‘नाजुकशी, छुईमुई’ हवी असणारा आहे. त्याला बिन्नीचे वेगळेपण माहीत आहे पण मोठेपण कळायचे आहे. ...असे शहर पावसाची वाट बघत आहे. पाच हजार रूपयात ‘सस्ती सुंदर टिकाऊ बारिश’ ४८ तासांत आणून देण्याचे आश्वासन देणारा बारिशकर बिन्नीकडेच थांबला आहे. कारण ‘हात पर हात रखना’ आणि ‘धीरज रखना’ यातला फरक समजणारे, आपल्या मुलांना निवडीचे स्वातंत्र्य देणारे बाबा तिथे आहेत. घराच्या छतावरून आकाशात पक्ष्यासारखा झेपावण्याची आकांक्षा बाळगणारा बीम तिथे आहे आणि ‘कठोर सत्य’ जगत असतानाही स्वप्ने पाहू शकण्याची सुप्त-क्षमता असणारी बिन्नी तिथे आहे.
बिन्नीला तिच्यातील आत्मिक सौंदर्याचा साक्षात्कार घडल्यानंतर बारिशकर स्वतःचा कबुलीजबाब तिच्याकडे देतो. प्रस्थापित व्यवस्थेनं बारिशकर ‘फसवणूक करणारा-गुन्हेगार’ वगैरे असल्याची शक्यता सूचित केली असते. ‘अंतर्बाह्य बदललेली बिन्नी’ जिल्हाधिकारी जे.डी.ला ही आता वेगळी वाटते आहे. धूमकेतूसारख्या अचानक उद््भवणाऱ्या बारिशकरला पोलीस शोधताहेत हे स्पष्ट झाल्यावर बिन्नी त्याला, इथून निघून जा, असे सांगण्यासाठी रात्रभर जिथं आत्म-प्रत्ययाचा आनंदसोहळा अनुभवला तिथे जाऊ लागते आणि तिच्या पाठोपाठ घरातले इतर आणि आता जेडीही...
 ‘तुम चलोगी मेरे साथ?’ या बारिशकरच्या प्रश्नाला बिन्नीचे उत्तर आहे. ‘जाओ मेरे पगले आझाद रहो.’ बिन्नी स्वप्नाची शक्ती अनुभवलेली पण वास्तवात जगणारी, तर बारिशकर जादुई वास्तवातला-स्वप्नातला.
अखेर बारिशकर निघतोय...
जेडी बिन्नीला हाक मारतोय ‘मत जा’...त्याला कळलंय. बिन्नी-बारिशकरचं नातं समजलंय. ती त्याच्याबरोबर जाऊ शकते. हेही उमगलंय. वास्तवातल्या जेडीनं तिला ‘हाक’ दिल्यावर, बिन्नीसाठी तो ‘जय’ झाला...  आता खरोखरच पाऊस सुरू झालाय... पहिला थेंब बिन्नीच्या अंगावर पडलाय... मृदगंधाने  सारी सृष्टी नादावलीय...
 बारिशकर सांगतोय ः ...आज तुम्हे मै एक राजकी बात बताता हूं... मै और कही नही यही रहता हूं दिलो में रहता हूं... उम्मीदों मे बसता हूं..
  त्याच्याकडून हे सूत्र घेऊन आता सारे जण गाताहेत कोसळत्या जलधारांत -
   मुश्किल है जीना उम्मीद के बिना ...थोडेसे सपने सजाए...
   ...थोडासा रूमानी हो जाएं...

- संजय आर्वीकर
arvikarsanjay@gmail.com
संपर्क : ८२७५८२००४४

 

बातम्या आणखी आहेत...