आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रति-व्यासाचा शोध-संकेत?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिथकं माणसाच्या जगण्याला आधार देतात. पण केवळ आधार देतात? की भ्रमाची कधीही न हटणारी काजळी चढवतात? व्यासांच्या महाभारताने भारतीयांचं अवघं भावविश्व व्यापलं, पण त्यालाही मिथकांची जोड दिली गेली. वर्ग-वर्ग श्रेष्ठत्वाच्या अहंगंडातून?


लोकसंस्कृतीतून आलेल्या या स्त्रिया महाभारताला ‘धर्मयुद्ध’ म्हणणाऱ्यांना हे फक्त ‘लालसेचं युद्ध’ असं प्रत्युत्तर देतात. सुभद्रा आणि या सख्या यांची मनं जुळल्यावर साधं कोडं सोडवण्याच्या खेळातून लोकसंस्कृतीतून झिरपणाऱ्या शहाणपणाचं दर्शन घडवलं जातं...

 

माझे आजोळ भोपाळचे. शाळेत जायला लागलो, तेव्हापासून उन्हाळ्याच्या सुटीची वाट बघताना  भोपाळच  दिसायचे. थोरल्या मित्रासारखा मामा, भोपाळला पोचल्या-पोचल्या भरपेट आलू-बोंडे खाऊ घालणारी - मला बुद्धिबळ शिकवणारी माझी मोठी आई-आईची आई, सेवानिवृत्तीनंतर पुन्हा नोकरी करत असणारे आणि त्याही वयात मला बोलिंग केल्याशिवाय घरात न जाणारे आणि रात्रीच्या वेळी मला रामायण-महाभारतातील गोष्टी सांगणारे माझे आजोबा. आम्ही सारे त्यांना भाऊ म्हणायचो... अख्खा दिवस मामा, मोठी आई-भाऊंमध्ये विभागलेला असायचा पण मन सर्वात जास्त गुंतलेले असायचे ‘काल’ आणि ‘आज’ला जोडणाऱ्या महाभारतातील गोष्टींमध्ये. रामायणापेक्षा माझा ओढा महाभारताकडे होता.


गच्चीवर थंडगार झालेल्या अंथरूणात लोळत गोष्ट ऐकायला बंदी नसतानाही, माझ्या शरीराच्या हालचाली भाऊंच्या महाभारत-कथनाने नियंत्रित केलेल्या असायच्या. कधी-कधी मी नकळत उभा राहायचो... खूप वेळ. मग मोठी आई म्हणायची, अरे, बसून ऐक... आणि भाऊंना सांगायची, ‘अब-इंटर्व्हल - पोरांना खरबूज-टरबूज खायचं आहे.’


...मग गोष्ट पुन्हा सुरू व्हायची - भाऊ दिव्यदृष्टी असल्यासारखे ती प्रसंग-मालिका सांगत.
‘...युद्धाचा सोळावा दिवस उजाडला. दानशूर कर्ण यमुनेच्या तिरावर गेला. त्यांने अंघोळ केली आणि हात जोडून सूर्याची उपासना सुरू केली, युद्ध सुरू होण्याला अजून अवधी होता.म्हणून युद्ध थांबवण्याचा शेवटचा प्रयत्न करून पाहण्याकरता राजमाता कुंती सरितेच्या तिरावर गेली.
कर्ण म्हणाला ः राजमाते! हा राधेचा मुलगा तुला वंदन करत आहे...
कुंती म्हणाली ः तुझ्याजवळ भिक्षा मागण्याकरता, ज्यांने आपली निसर्गदत्त कुंडलं कापून दिली... बाळ, कर्णा तू माझा मुलगा आहेस...
कर्ण म्हणाला ः खोटं, पूर्ण खोटं. पांडवांच्या रक्षणाकरता तू एक बनावट गोष्ट तयार करत आहेस.
कुंती म्हणाली ः  बाळ, कर्णा मी तुझी अपराधी आहे! तू पांडवांच्या पक्षाला येणार ना?
कर्ण म्हणाला ः आई, मी वाटेल ते पातक करीन, पण कृतघ्नपणा करणार नाही... मी तुला वचन देतो की धर्म, भीम, नकुल, सहदेव या चारही भावंडांच्या जिवाला अपाय करणार नाही... कर्तव्य म्हणून मला अर्जुनाशी युद्ध करावंच लागेल... आई! अर्जुन किंवा कर्ण यापैकी एक रणांगणावर पतन पावेल. काही झालं तरी तुझे पाच पुत्र शिल्लक राहतील.’
पुढे कधीतरी मोठ्यांच्या गप्पांमध्ये कळलं की, महर्षी व्यासांनी महाभारत लिहिलंय.  माझ्या मनात प्रश्न उमटला. ‘आपले भाऊ व्यासांचे कोण? अशी गोष्ट सांगणाऱ्यांचे कोण? खूप वर्ष हा प्रश्न मनात घेऊन पुस्तकांचा प्रवास करत राहिलो. एकदा लेखक विलास सारंग यांची एक गोष्ट वाचत होतो - ‘ब्रम्हदेवाचं पाचवं मस्तक’. कथेच्या अगदी आरंभाच्या ओळी व्यासांशी संबंधित होत्या, ‘व्यासमुनी हे पट्टीचे गोष्टी सांगणारे. गोष्टी सांगण्याचा त्यांना भारी नाद. मी एकटाच त्यांच्या पायाशी बसलो...’ मग संधी मिळाली, तेव्हा सारंगांना या कथेबद्दल आणि व्यासांबद्दल विचारलं, ते उत्तरले ‘(कथेत) व्यासांच्या म्हणण्याशी अस्तित्वलक्षी लेखकांच्या दृष्टिकोनाचा सांधा थोडा जुळवला आहे आणि कथालेखकांचा मूळ पुरूष म्हणून तुम्ही व्यासाला मानलं पाहिजे.’ मग अनेक रूपांत महाभारत वाचलं. माझ्या आजोबांच्या कथनाशी, त्र्यंबक गणेश बापट यांच्या ‘श्री महाभारत कथां’शी सर्वात जवळंच नातं होतं. त्यातलंच ‘महाभारत’ ते  कथारूपानं सांगायचे. 
सारंगांच्या कथेत व्यासमुनी म्हणतात, ‘गोष्टी काय झोप येण्यासाठी सांगतात. झोप उडवण्याऱ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत' आमच्या संवादसत्रात, सारंग त्याला जोडूनच सांगतात, ‘झोप येण्यासाठी गोष्टी सांगणं, हे इंग्रजीतून आपल्याकडे आलं.’
लहानपणी मी महाभारताच्या गोष्टी ऐकायचो, तेव्हा स्वप्नंही मला त्याचीच पडत. मात्र सारंग म्हणतात, तशा झोप उडवणाऱ्या गोष्टी - महाभारताच्या कथानकाशी निगडित मला, महाश्वेतादेवींनी सांगितल्या. महाभारताबरोबरचा काही वर्षे थबकलेला प्रवास त्यांच्या  ‘कुरूक्षेत्रानंतर...’ या अनुवादित कथासंग्रहानंतर पुन्हा सुरू झाला. (अनुवाद : वर्षा काळे, मूळ पुस्तक : ‘आ॑फ्टर कुरूक्षेत्र’ सीगल प्रकाशन) अनुवादिकेने आपल्या मनोगतात  महाश्वेतादेवी आणि या कथांबद्दल मर्मदृष्टी देणारं विवेचन सादर केलं आहे. यातल्या  पहिल्या कथेचं शीर्षक आहे, ‘पंचकन्या’. या शीर्षकातच एक ‘काऊंटरपॉइंट आहे. भारतीय संस्कृतीच्या प्रस्थापित कथन-परंपरेत अहिल्या, तारा, कुंती, मंदोदरी आणि द्रौपदी या पंचकन्या मानल्या जातात. या पंचकन्या आहेत, शेतकरी कुटुंबातल्या - गोधुमी, गोमती, यमुना, वितस्ता आणि विपाशा. ही सारी नद्यांची नावं आहेत, त्यातून लोकसंस्कृतीचा वाहता प्रवाह कथा-शरीरात खेळवला जातो. या पंचकन्यांना महाभारतातील अभिमन्यूची विधवा पत्नी उत्तरेच्या सेविका/दासी म्हणून, राजघराण्यातील अंतःपुराची प्रमुख दासी मंद्रजा त्यांना आणू इच्छिते. ही मंद्रजा कुरूजंगल क्षेत्रातील आणि या तरूण विधवा स्त्रियाही तिथल्याच. त्यांचे पती मूळचे शेतकरी पण बोलावणं आलं की, युद्धावरही जाणारे. ते ही  महाभारत युद्धात मारले गेलेले. मुख्य दासी मंद्रजा त्यांना उत्तरेसाठी ‘चला’ म्हणते, तेव्हा ‘दासी म्हणून काम करणं, दासी म्हणून जगणं आम्हाला मान्य नाही,असं बाणेदार  उत्तर त्या देतात. ‘तुम्ही उत्तरेच्या सख्यांसारख्या रहा...’ या उद्गाराला मात्र सकारात्मक प्रतिसाद देतात. लोकसंस्कृतीतून आलेल्या या स्त्रिया महाभारताला ‘धर्मयुद्ध’ म्हणणाऱ्यांना हे फक्त ‘लालसेचं युद्ध’ असं प्रत्युत्तर देतात. सुभद्रा आणि या सख्या यांची मनं जुळल्यावर साधं कोडं सोडवण्याच्या खेळातून लोकसंस्कृतीतून झिरपणाऱ्या शहाणपणाचं दर्शन घडवलं जातं.
उदा. पायाविना पळतं
कानाविना ऐकतं
नेत्रांविना पाहतं
सांगा पाहू काय असतं? असं त्या उत्तरेला विचारतात.
मुख्यत्वे राजवाड्यातच जखडून पडलेली उत्तरा ‘नाही मला नाही येत’ असं म्हणताच त्या पंचकन्या उत्तरतात, ‘माणसाचं मन! ते कुठंही जाऊ शकतं. सर्व ऐकू शकतं आणि त्याला काहीही कळू शकतं.’
वीस-बावीस पृष्ठाच्या या कथेत अभिजन आणि लोक-संस्कृतीचा संवाद,संघर्ष काही वेळी एकमेकांना भेदून जाणं , हे सारं अनुभवास येतं. दोन एकमेकांना भेदणाऱ्या वर्तुळासारखे इथे कृतीचे संवाद-क्षेत्र निर्माण होते. ‘त्या पंचकन्या जणू एकच व्यक्ती असल्यासारखा विचार करतात’ या सारख्या वाक्यांमधून महाश्वेतादेवी मानवातील संभाव्य एकात्मतेचे सूचन करतात.कथा उलगडत असताना, काही अशी वाक्ये त्या पेरून जातात, की शाश्वत सत्याचा प्रकाश तिथे चमकून जातो. जसं- एकदा अभिमन्यूनी तिला (उत्तराला) सांगितलं होतं, की वाहत्या नदीच्या पृष्ठाखाली अजून एक सुप्त प्रवाह असतो. एक जबरदस्त अंतःस्त्रोत जो आदिम आणि रानटी असतो. नाहीतर अवाढव्य हत्तीलाही नदी त्याचे पाय खेचून कशी काय वाहून नेऊ शकते?
या संग्रहातील दुसरी कथा ‘कुंती आणि निषादीन’ संस्कृतीबाबत अनेक प्रश्न निर्माण करते. लाक्षागृहात कौरव पांडवांना भस्मसात करणार होते, पण मोठ्या शिताफीनं-बुद्धिचातुर्यानं तिथून सुटका करून घेतानाच, तिथे सापडलेले एक वृद्धा आणि पाच मुलगे यांचे मृत देह कुणाचे होते? याचा शोध घेणं आपल्या मनातही येत नाही. या प्रस्थापितांच्या - अभिजनांच्या निद्रा-रूपाला ही कथा विजेचा-धक्का देऊन जागे करते. लग्नापूर्वीचं मूल म्हणून, कर्णाचा त्याग केला, त्यामुळेच तो ‘सुतपुत्र’ ठरला - हे पातक आपल्या हातून घडलं, अशी भावना वानप्रस्थाश्रमातील कुंती बाळगते. 
या कथेतील निषादीन आणि कुंती याच्यातील संवाद, हा तथाकथित नागरी संस्कृती/राजवृत्त आणि वन-संस्कृती/जनवृत्त यांच्यातील संवाद आहे. निषादीन आणि कुंती यांच्या वाक्ये वाचली की, दोन संस्कृती एकमेकांशी देहरूपाने बोलताहेत असं भान येतं.
- जसं 
‘निषादीन, हे काय चाललंय, तुला काय हवंय?’
‘ तू तुझ्या सर्वात मोठ्या पातकाची कबुली दिलीसच नाही.’ 
‘मी दिली. तुला माझी भाषा कळते, तू ऐकलंस.’
‘नाही कुंती. मी ज्या पापाबद्दल बोलते, जे तू राजवृत्तात असताना आणि तुझा पुत्र राजा नसताना केलं आहेस.’
‘मी कर्णाबद्दलही बोलले’.
‘राजवृत्तातली लोकं आणि लोकवृत्तातली लोकांची मूल्यं वेगळी आहेत… जर तरूण निषादीन मुलगी स्वेच्छेने प्रेमात पडून गर्भवती राहिली तर आम्ही ते नातं विवाहानं साजरं करतो... निसर्गाचा नियम. निसर्गाला अपव्ययाचा तिटकारा आहे.आम्ही जीवनाचा सन्मान करतो. स्त्री-पुरूष एकत्र येऊन जीव निर्माण करतात. पण तू ते समजू शकणार नाहीस.’ 
‘... माझ्या कबुलीला काहीच अर्थ नाही?’
तुझ्यासाठी तो असेलही, आमच्यासाठी नाही. जनवृत्तातल्या लोकांमध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी निरपराध लोकांना उपद्रव देणं किंवा त्यांचा संहार करणं हे सर्वात मोठं अक्षम्य पातक आहे... तू लाक्षागृहात  राहिली होती ते आठवलं.’
‘ते सगळं दुर्योधनाचं कपट...’
‘...ते स्थान राखरांगोळी करण्यात येणार आहे हे ज्ञात असूनही तू... तुला तुमच्या सहा जणांचा जाळून मृत्यु झाल्याचा आभासी पुरावा तयार करायचा होता...(लाक्षागृहात) ...इतकं मद्य पाजलं गेलं, त्या निषादीन माता आणि तिच्या पाच पुत्रांना, की ते  तिथंच शुद्ध हरपून निजले आणि तरीही तू तुझ्या भुयारी मार्गाने पसार झालीस. हो ना?... ती निषादीन माझी सासू होती... वन्य जमातीतल्या सहा निष्पाप जिवांना स्वतःच्या स्वार्थासाठी जाळून मारल्याचं पाप तुला आठवतही नव्हतं.’
आपल्या कबुलीजबाबाच्या अगदी निकट आलेली कुंती विचारते. ‘निषादीन, मला क्षमा करणं शक्यच नाही का?.’
निषादीन वनात वणवा पेटल्याचा संकेत देते, आणि सांगतेः तीन अंध, अशक्त दुर्बल व्यक्ती यातून सुटून (वणव्याबाहेर) जाऊ शकणार नाहीत.’ निषादीनच्या वाणीस पुन्हा भाष्याचे तेज चढते, ‘एक जन्मजात अंध, एकाने स्वतःहून स्वीकारलेले अंधत्व आणि तू, सर्वात जास्त अंध. तू निष्पापांची हत्या करून विसरणारी!...
अग्नि त्याचं काम करेल. नंतर पाऊस या ज्वाळा विझवेल. होरपळलेली भूमी पुन्हा हिरवी होईल.’
कथेच्या शेवटी, महाश्वेतादेवींमधील कथनकर्ती दोन संस्कृतीमधील साम्यभेदाला उद््गार देत सांगतेः कुंतीनंही मृत्युचं स्वागत केलं. वणव्याच्या ज्वालांमध्ये जिवंत जळताना, ती त्या मृत निषादिनीकडून क्षमायाचनेची प्रार्थना करेल का? राजवृत्तात निष्पापांच्या हत्येसाठी क्षमायाचना करतात का? ‘कुंतीला ते माहीत नव्हतं...’ या शेवटच्या ओळीत महाश्वेतादेवींनी जेत्यांची ‘आखूड’ संस्कृती-रेषा अधेरेखित केली आहे.
तिसरी कथा सौवालीची म्हणजे, ज्याला महाभारतात आपण युयुत्सू नावाने ओळखतो, त्याची आई सौवाली-हिला केंद्रस्थानी ठेऊन संस्कृतीचे स्वयंप्रज्ञेने केलेलं पुनर्कथन. गांधारीच्या बाळंतपणात धृतराष्ट्राच्या सेवेत सौवाली होती. त्या दोघांचा पुत्र म्हणजे  हा युयत्सू. या कथेत त्याला सौवाल्य संबोधलं जातं. ही कथा समांतरपणे कर्ण आणि विदूरांची जीवन-कहाणी आपल्या मनात जागी करते आणि या दोघांपेक्षाही त्याचे जीवन अधिक ठणका देणारे-दुर्लक्षित आहे. सारे शंभरही गांधारी-पुत्र मारले गेल्याने, या दासी-पुत्राला धृतराष्ट्राच्या तर्पणासाठी बोलवले जाते. जितका काळ सत्ताधाऱ्यांनी तिला आपल्या लहान मुलासोबत राहू दिलं, तितकाच काळ ती आपल्या मुलाबरोबर राहू शकली. कौरवांनी दासीपुत्र हिणवलं म्हणून यानं युद्धात पांडवांची बाजू घेतली, असं स्पष्टीकरण तो  देतो पण नंतर, जेते किती गर्विष्ठ-उद्दाम वागत होते, याचीही त्याला जाणीव आहे. सौवाली कथेच्या शेवटी प्रश्न उपस्थित करते. ‘कसला मृत्यु? कसले अंत्यसंस्कार?... धृतराष्ट्र माझा कोण होता? ...माझ्या पुत्राचा पिता आणि माझ्या मुलानं त्यांचं कर्तव्य पूर्ण केलंय... मी केवळ दासी आहे... राजप्रसादात अनेक दासी येतात आणि जातात... मुलं जन्माला घालतात... मी आता लाडू, खीर, तुपाने माखलेली भाकरी आणि सोनेरी मध अशी मेजवानी करणार आहे. पोटभर जेवल्यावर माझ्या मुलाला जवळ घेऊन शांत झोपणार आहे.’ धृतराष्ट्राला धुत्कारण्यात-मुलाला आवर्जून ‘सौवाल्य’ म्हणण्यात हा एवढा अर्थ भरला आहे.
कथेच्या शेवटी महाश्वेतादेवी एक सहज वाटावे असे पण संस्कृतीला पाळण्यात टाकून, झोका दुसऱ्या टोकाला जाईल, असे सौवालीच्या स्वराने माखलेले वाक्य लिहितातः कृष्णद्वैपायन व्यास या संहारक युद्धाबद्दल लिहिणार आहेत... सौवालीचा त्यात कुठे उल्लेखही यायला नको...
मला कळत नाहीय की -
* आता ‘मी’ आजोबांना महाभारताच्या नव्या गोष्टी सांगण्याची वेळ झाली आहे?
* की व्यासाचा मूळ रचनेवर इतरांनी किती शेंदूर फासलाय?
* की हा महाश्वेतादेवींनी दिलेला प्रति-व्यासाचा शोध-संकेत आहे?            

    

लेखकाचा संपर्क : ८२७५८२००४४
 

बातम्या आणखी आहेत...