आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा थोर गांडुळांचा भोंदू जमाव आहे! (विशेष संपादकीय)

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झुंडीच्या हातात सूत्रे आली की विवेकाची हद्दपारी अटळ असते. सगळ्यांनी एका सुरात बोलावे, असा मग नियम होऊन जातो. वेगळा विचार मांडणारे तिथे गुन्हेगार ठरतात. अशा समाजात जे घडू शकते, तेच इथे घडलेले आहे.  


यवतमाळात होणाया ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यासाठी नयनतारा सहगल यांना निमंत्रण गेले, तेव्हाच आश्चर्य वाटले होते. नयनतारांची भूमिका सर्वज्ञात आहे. गेली अनेक वर्षे ती भूमिका त्या वेळोवेळी मांडत आल्या आहेत. अनेकांना आठवत असेल, काही महिन्यांपूर्वी एक फोटो ‘भक्त ब्रिगेड’नं ट्विट केला होता. ज्यात पं. नेहरू दोन महिलांसोबत हास्यविनोद करत आहेत आणि त्या फोटोखाली काहीतरी वाह्यात कॅप्शन होती. प्रत्यक्षात त्या दोन महिला होत्या- विजयालक्ष्मी पंडित व नयनतारा सहगल.विजयालक्ष्मी म्हणजे नेहरूंची प्रख्यात बहीण, तर नयनतारा या विजयालक्ष्मींच्या आणि महाराष्ट्रातील संस्कृतचे व्यासंगी विद्वान रणजित सीताराम पंडित यांच्या प्रतिभावंत कन्या. या नयनतारा कोणाच्या कोणी असल्या तरी इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीला विरोध करण्यात त्या आघाडीवर होत्या. त्यांची इंदिरा गांधींवर दोन पुस्तकेही आहेत. Indira Gandhi’s Emergence and Style हे १९७८ मधील, तर Indira Gandhi : Her Road to Power हे पुस्तक १९८२ मधील. या पुस्तकांतून त्यांनी इंदिरा गांधींच्या हुकूमशाही पद्धतीच्या कारभाराला जोरदार विरोध केला. नयनतारा यांच्याकडे इंदिरांनी आपल्या विरोधक म्हणूनच पाहिलं. (आणि तसा इंदिरास्टाइल त्रासही दिला.) काँग्रेस दीर्घकाळ सत्तेत असतानाही त्या सत्तेत नयनतारांचा जीव कधी रमला नाही. किंबहुना सत्तेच्या आसपासही त्या नव्हत्या. त्यांची आपली अशी ओळख ठळक आहे. इंग्रजीतील प्रख्यात साहित्यिक आणि विचारवंत म्हणून नयनतारा जगभरात विख्यात आहेत. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे, जो त्यांनी २०१५ मध्ये परत केला. या ‘पुरस्कार वापसी’नंतर त्या पुन्हा चर्चेत आल्या.  अशा ९१ वर्षांच्या ज्येष्ठ लेखिकेला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद््घाटक म्हणून बोलावले जाणे मराठी साहित्याच्या लौकिकात भर टाकणारेच ठरणार होते. अमिताभ बच्चनपासून ते गिरीश कर्नाड यांच्यापर्यंत अनेकांनी या संमेलनाचे उद््घाटन केले आहे. अशोक वाजपेयी, इंदिरा गोस्वामी, सुरेश दलाल, विष्णू खरे, सुरजित पातर, गुलजार अशी अनेक नावे सांगता येतील. अहमदनगरच्या संमेलनाचे उद््घाटक गिरीश कर्नाड होते. त्यांनी मराठीतून केलेलं भाषण अनेकांना आजही आठवत असेल. लेखकत्वाचा, माणूस म्हणून त्याच्या अस्तित्वाचा अर्थ आणि अभिव्यक्तीसाठी लेखकांनी केलेल्या लढ्यांचा आढावा त्यांनी या भाषणात घेतला होता. अशोक वाजपेयी तर भारतीयत्व हेच सूत्र घेऊन बोलले होते. त्यामुळे नयनतारा यांचे नाव म्हटले तर नैसर्गिक असे होते. मात्र, त्यानंतर ‘नयनतारा सहगल’ कोण आहेत, हे नीटपणे लक्षात येत गेले असावे. आणि मग निमंत्रणवापसीवर शिक्कामोर्तब झाले. हा निर्णय आयोजकांचा होता, असे सांगितले जात असले तरी कसे घडले असेल, हे सांगण्यासाठी अभ्यासकाची गरज नाही. मराठीप्रेम आणि शेतकरी अशा मुद्द्यांच्या आडून कोणी तिरंदाजी केली, हेही महाराष्ट्राला वेगळे सांगण्याची गरज नाही. नयनतारा आपली भूमिका ठामपणे मांडणार, हे ठरलेले होतेच. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नयनतारा असे काही बोलू लागल्या, तर निवडणूक वर्षात ते अधिकच अडचणीचे ठरणार होते. त्यांचे जे भाषण काल आमच्या हाती लागले आहे त्यावरून तेच अधोरेखित होत आहे. लोकशाही आणि अभिव्यक्तीचा संकोच, झुंडशाहीने घेतलेली लोकशाहीची जागा, ‘आयडिया ऑफ इंडिया’वर होत असलेला हल्ला, भारतीयत्वाचा आशय असे अनेक मुद्दे त्यांच्या त्या भाषणात स्वाभाविकपणे आले आहेत. आपण स्वातंत्र्यापासून दूर आलो आहोत का, असा प्रश्न लेखकाने विचारायला नको का?  


व्यवस्थेला प्रश्न विचारणे म्हणजे प्रचारकी भूमिका असेल, तर ज्ञानदेव-तुकारामांना साहित्यिक म्हणताच कामा नये. ‘त्या बड्या बंडवाल्यात ज्ञानेश्वर माने पहिला’, या न्यायाने आद्य बंडखोरीचे श्रेय ज्ञानेश्वरांकडे जाते. आता यापैकी कोणीच साहित्यिक नव्हते, असे आमचे विद्यापीठीय समीक्षक म्हणणार असतील तर मुद्दाच संपला. चंद्रभागेच्या वाळवंटी खेळ मांडणारे आमचे सगळे आद्य साहित्यिक ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ असेच तर म्हणत होते. तीच सर्वसमावेशकतेची भूमिका घेऊन आज कोणी उभे राहिले तर ते राजकारण कसे ठरते? आणि व्यापक अर्थाने ‘राजकारण’ ठरत असेल तर असे ‘राजकारण’ लेखकाने केलेच पाहिजे. सुनील खिलनानी म्हणतात त्याप्रमाणे, ‘भारतात राजकारण खूप आहे असे नाही. राजकारणामुळेच भारत आहे.’ भारत असे म्हणताना ही राजकीय प्रक्रिया नाकारून कसे चालेल? ज्ञानेश्वर-तुकारामांचा वारसा सांगायचा, पण त्यांचा कणा मात्र नाकारायचा. तिकडे पत्रकार म्हणूनही जांभेकर ते आगरकर, टिळक-आंबेडकर असा वारसा सांगायचा, पण तो वारसा जपणाया पत्रकारांचा आवाज दडपून टाकायचा, याला दांभिकतेशिवाय अन्य शब्द नाही. अर्थात, ही दांभिकता आपल्या साहित्य व्यवहाराचे व्यवच्छेदक वैशिष्ट्य आहे. त्यामुळे नयनतारांचे निमंत्रणच नाकारण्याची भूमिका आयोजकांनी घेणे हे क्लेशकारक असले तरी आश्चर्यकारक नाही.  


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आजवरचे स्वरूप पाहता तिथे यापेक्षा काही होणे अपेक्षित नाही. हे साहित्य संमेलन नाही, तर साहित्य विरुद्ध संमेलन अशी लढाई आहे. या संमेलनाचा साहित्याशी काही संबंध नाही. मूठभर लोकांच्या हितसंबंधी साखळीतून आणि सरकारी आधारातून उभे राहिलेले हे एक संधिसाधू व्यासपीठ मात्र आहे. आणि हे काही आजचे नाही. गेल्या १३५ वर्षांपासूनचे चित्र हेच आहे. तेव्हा हे ग्रंथकार संमेलन म्हणून भरत होते. त्या वेळी महात्मा फुले यांना या संमेलनाला बोलावले गेल्यावर त्यांनी उत्तरात लिहिले होते- ‘माझ्या घालमोड्या दादा, ज्या गृहस्थांकडून एकंदर सर्व मनुष्याच्या मानवी हक्कांविषयी वास्तविक विचार केला जाऊन ज्यांचे त्यांस ते हक्क त्यांच्याने खुशीनें व उघडपणें देववत नाहींत व चालू वर्तनावरून अनुमान केलें असतां पुढेंही देववणार नाहींत, तसल्या लोकांनी उपस्थित केलेल्या सभांनीं व त्यांनीं केलेल्या पुस्तकांतील भावार्थांशी आमच्या सभांचा व पुस्तकांचा मेळ मिळत नाहीं.’ फुले यांनी हे पत्र लिहिले त्याला एवढी वर्षे उलटून गेल्यावरही चित्र असेच असावे, हे मात्र धक्कादायक आहे.  

 

मराठी साहित्य आणि संस्कृती आज कोणत्या वळणावर आहे, याचे पुरावे दररोज मिळत आहेत. ज्यांना कधी आवाज नव्हता, अशांचे आवाज सर्वदूर ऐकू येत आहेत. पालावरून पानावर पोहोचणारा अशोक पवार अथवा तांड्याची वाट तुडवत आकाशाला गवसणी घालणारी स्वप्नं शब्दात पकडणारा वीरा राठोड हे आजचे आवाज आहेत. दगड फोडता फोडता, त्यातून नव्या जगाचं शिल्प साकारणारा नागराज मंजुळे किंवा आपल्या कुंचल्याने आभाळाची गोष्ट चितारणारा शशिकांत धोत्रे ही या बदलाची गोष्ट आहे. अशा परिवर्तनाच्या एवढ्या कथा आपल्या भोवताली आहेत आणि तरीही साहित्य व्यवहार असा आहे की जणू पाण्यावर तरंग नाही. अनेकदा तर हे नवे लाभार्थीही व्यवस्थेचे असे पार्टनर होतात की, वाटावे काही बदललेच नाही! महात्मा फुले यांच्या त्या पत्रानंतर जग एवढे बदलले, पण घालमोड्या दादांचे संमेलन मात्र तसेच राहिले, याचे कारण काय?  


उभा राहिला संमेलनांचा संसार, पण मोडून पडला कणा’, अशी स्थिती या साहित्य संमेलनांची झाली आहे. दरवर्षी साहित्य संमेलनाचा जल्लोष होतो. त्यातून बरीच पुस्तकंही विकली जातात. पण हा सारा खटाटोप होतो तो कोणासाठी? कधी कोणा शिक्षणसम्राटाच्या वळचणीला बसून साहित्यिक भोजनावळी झोडतात नि धनादेशाचे चेक मिळवण्यासाठी आजी- माजी संमेलनाध्यक्ष रांगेत उभे राहतात. कधी हे संमेलन म्हणजे एखाद्या राजकीय नेत्याची गौरव सभा असते, तर कधी कोणा उद्योजकानं दिलेली शाही पार्टी असते. नेत्यांनाही लाज वाटावी अशा संकुचित राजकारणाचा उच्च स्तर कधी हे संमेलन गाठतं, तर कधी परिसंवादात बोलायला जाऊच नये, असं शहाण्यासुरत्यांना वाटू लागतं. उद््घाटन सोहळ्याचा भपका प्रचंड, पण नेता खाली उतरल्याबरोबर अध्यक्षीय भाषण ऐकायलाही श्रोते नसतात. परिसंवादांत तर अनेकदा व्यासपीठावर जेवढे लोक असतील तेवढेही सभागृहात नसतात. तिथं साहित्यावर ना मूलभूत चर्चा ना आणखी काही. तरीही सरकारी अथवा धनदांडग्यांच्या बळावर दरवर्षी अशी संमेलने आयोजित केली जातात. राज यांनी लग्नपत्रिका कोणाकोणाला वाटल्या, याच्या रसभरीत बातम्या करणारी माध्यमंही मग उदंड कव्हरेज करतात. मराठीचे ढोल पिटले जातात आणि भाषेसाठी गळा काढला जातो. स्टेजवरच्या नेत्याची अथवा कव्हरेज देणाऱ्या संपादकांचीही नवी पिढी इंग्रजी शाळेत दाखल झाली असली तरीही मराठी शाळांचा जयजयकार होतो. हे असे दरवर्षी सुरू आहे.  


अशा संमेलनांपेक्षा इतरत्र होणारी छोटी-छोटी संमेलनं अधिक आश्वासक. विद्रोही साहित्य संमेलन दरवर्षी होतं. लोकांकडून निधी घेऊन, अन्नधान्य घेऊन लोकांच्याच बळावर ही संमेलनं होतात. त्याशिवायही अशी खूप संमेलनं महाराष्ट्रात होत असतात. सीमावर्ती भागात, कर्नाटकात होणारी साहित्य संमेलनं तर एखाद्या सणासारखी त्या-त्या गावात साजरी होतात. अवघं गाव नटलेलं असतं आणि तिथं साहित्याचा गजर होतो. येल्लूर, कारदगा अशा अनेक ठिकाणी होणारी संमेलनं सांगता येतील. लोक उभे राहतात आणि पदरमोड करून अशी संमेलनं साजरी करतात. ती संमेलनं साधी असतात. पण त्यांना चारित्र्य असते. भपका नसतो, पण अंगभूत ऊर्जा असते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला हे तेज कसं मिळेल? 


अशा संमेलनाला नयनतारांना निमंत्रण धाडले गेले हीच खरे म्हणजे मोठी चूक. मात्र, डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी हे महामंडळाचे अध्यक्ष झाल्यापासून अशा प्रकारची काही आगळीक करण्याचा प्रयत्न ते दरवर्षी करत असतात. गेल्या वर्षीच्या विदर्भ विभागीय संमेलनाचा अनुभव अनेकांना आहे. नितीन गडकरीच तिथे एवढे महत्त्वाचे ठरले की संमेलनाध्यक्ष आणि महामंडळ अध्यक्ष यांचे बापुडेपण बघणेच नशिबी उरले. अर्थात, तरीही डॉ. जोशींची आशा संपलेली नाही. नव्या दमाने नवी आगळीक करण्याचा प्रयत्न ते करत असतात. तशी आगळीक त्यांनी केली आणि नयनतारांना बोलावले. नयनतारांना बोलावले जाणे जेवढे अस्वाभाविक होते त्याहूनही स्वाभाविक होते ते निमंत्रण रद्द होणे! हा अवमान नयनतारांचा नाही. हा साहित्याचा अवमान आहे. लोकशाहीचे रूपांतर झुंडशाहीत करण्याची योजना आहे. आणि तरीही जे लेखक- कवी ब्र काढणार नाहीत, त्यांना त्यांचे हारतुरे, गजरे माळू द्या, आपण तरी भूमिका घेतली पाहिजे. मराठी भाषा आज जी काही आहे आणि हा देशही जो उभा आहे तो विचारवंत वा लेखकांच्या नव्हे, सर्वसामान्य माणसाच्या अधिष्ठानावर. त्यामुळे आपण भूमिका घेतली पाहिजे. विद्यापीठाला नाव सावित्रीबाईंचे दिले अथवा डाॅ. बाबासाहेबांचे नाव विद्यापीठाला मिळाले, पण त्यामुळे तो वारसा सांगणारे प्राध्यापक तिथे असतील असे मानणे भाबडेपणाचे आहे. आपल्या गलेलठ्ठ पगाराच्या ओझ्याने पाठीचा कणा मोडून गेलेले विद्यापीठीय साहित्यिक अशा वेळी कसा कच खातात ते आपण कमी वेळा पाहिलेले नाही. नेत्यांच्या दावणीला संमेलन बांधू नका म्हणून अरुण साधू सांगलीतील साहित्य संमेलनावर बहिष्कार घालत होते किंवा पिंपरी-चिंचवडच्या संमेलनात माजी अध्यक्षांना मिळालेला चेक नाकारत होते तेव्हा त्या दोन्ही संमेलनांचे अध्यक्ष विद्यापीठीय प्राध्यापक होते. जे त्या विरोधात ‘ब्र’ही उच्चारत नव्हते.  अशांना काय कळणार साहित्याचं खरं मोल?  

 

कविता लिहिली म्हणून तुकोबाची गाथा इंद्रायणीत बुडाली. ज्ञानदेवानं जिवंत समाधी घेतली. ‘शिवाजीचा पोवाडा’ लिहिणाया जोतिरावांवर हल्ला झाला, तर ‘शिवाजी कोण होता?’ हे सांगणाया कॉ. गोविंद पानसरेंचा खून झाला. वेगळा विचार मांडला म्हणून तर डॉ. नरेंद्र दाभोलकर, गौरी लंकेश यांची हत्या झाली. विचार किती मोलाचा आहे हे विचारांच्या मारेकयांना समजतं तेवढंही आपल्या ‘व्यावसायिक’ लेखकांना आणि विचारवंतांना कळत नाही. आपल्यासमोर अभिव्यक्तीचा खून होत असताना, वेगळा विचार मारला जात असताना, जे निरो यवतमाळच्या संमेलनात फिडेल वाजवणार आहेत त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा नाही. मात्र, निरोनं बोलावलेल्या या पार्टीचं निमंत्रण ज्यांना आहे, ते काय करणार याविषयी उत्सुकता आहे. हे चित्र बदलणं आपल्या हातात आहे. या थोर गांडुळांच्या भोंदू जमावाला आपण आज सांगूया, साध्याच माणसांचा एल्गार येत आहे. मूठभरांच्या हातात एकवटलेला हा साहित्य व्यवहार सर्वसामान्य माणसाच्या हातात आला पाहिजे. त्यासाठी जे काही प्रयत्न होतील, त्या प्रयत्नांसोबत ‘दिव्य मराठी’ आहे, हे सांगण्यासाठी हा खटाटोप.

 

(sanjay.awate@dbcorp.in)

 

बातम्या आणखी आहेत...