आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधकांच्या एकजुटीच्या वज्रमुठीला छेद देत संजय जाधवांनी राखला बालेकिल्ला!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - उमेदवारी जाहीर होण्यापासून स्वकीयांनीच निर्माण केलेली प्रतिकूल परिस्थिती, जिल्हाभरातील विरोधक नेतेमंडळींनी बांधलेली एकीची वज्रमूठ व वैयक्तिक नाराजीलाही एकाकी झुंजीने छेद देत  मागील ३० वर्षांपासूनचा शिवसेनेचा बालेकिल्ला शाबूत राखण्यात खा. संजय जाधवांना यश आले. मोदी लाटेवर स्वार होताना वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या दीड लाखांवरील लक्षवेधक मतांमुळे संजय जाधवांना तारले.  परिणामी गतवेळच्या तुलनेत ७५ हजारांचे कमी मताधिक्य मिळवत जाधव दुसऱ्यांदा लोकसभेत पोहाेचले. शिवसेनेच्या या यशामुळे आगामी काळातील जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता दुणावली आहे. 


या वेळी परभणी लोकसभेची निवडणूक अत्यंत अटीतटीची व चुरशीची ठरली. राष्ट्रवादीने स्थापनेपासूनच १९९९ पासून या मतदारसंघात पराभवास तोंड दिलेले आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादीसमोर उमेदवार निवडीचा प्रश्न होता. स्थानिक स्वराज्य संस्थेवर वर्चस्व व चार आमदार असलेल्या राष्ट्रवादीने या वेळी या सर्वांना आगामी विधानसभेच्या उमेदवारीबद्दल गर्भित इशारे देत पक्षाने उमेदवारी दिलेल्या राजेश विटेकरांच्या प्रचार कामाला जोमाने लावले. माजी मंत्री राजेश टोपे, जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी, आ.विजय भांबळे, आ. डाॅ.मधुसूदन केंद्रे या राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींसह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री सुरेश वरपुडकर, माजी आ.सुरेश देशमुख, माजी.खा. तुकाराम रेंगे पाटील, माजी आ.सुरेश जेथलिया या काँग्रेसच्या नेतेमंडळींनीही जोमाने यंत्रणा राबवली. श्री विटेकरांनीही मोठी मेहनत घेत प्रचार यंत्रणा राबवली. त्याचवेळी खा.संजय जाधव यांच्या कार्यावर कडाडून टीका करताना वैयक्तिक खालच्या पातळीवरील आरोपही केले. काँग्रेसजनांच्या या एकजुटीचा परिणाम चांगला दिसूनही आला. सहा पैकी पाथरी या होमवर विटेकरांना २३ हजारांची तर परभणीत तब्बल २९ हजारांची लीड मिळाली. अन्य चार मतदारसंघातही विटेकरांनी अत्यंत चुरशीची लढत दिली. त्यामुळे विजया समीप जाणाऱ्या विटेकरांच्या वारुला वंचित बहुजन आघाडीने अपेक्षेपेक्षा मोठी मते मिळवत ब्रेक देण्यात महत्वाची भूमिका बजावली. 


जाधव यांच्या उमेदवारीपासूनच अनेक प्रश्न निर्माण केले गेले.  वखा.जाधवांना वैयक्तिक नाराजी व पक्षांतर्गत गटबाजीलाही तोंड देण्याची वेळ आली.  आ.डाॅ.राहुल पाटील यांच्याशी  राजकीय हाडवैरामुळे उद्धव ठाकरेंनी गेल्या पाच वर्षांत दोन वेळा दोघांना साखर भरवून वाद मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याप्रमाणे प्रचारात आ.डाॅ.पाटील हे सर्वच ठिकाणी होते परंतु त्यांच्या समर्थकांनी निवडणुकीपासून दूरच राहणे पसंत केले. 

 

रामप्रसाद, मेघना बाेर्डीकरांचीही मिळाली साथ
भाजप नेते रामप्रसाद बोर्डीकर, मेघना बोर्डीकर यांनी जिंतूरमधून अपेक्षेप्रमाणे २१ हजारांचे मताधिक्य शिवसेनेला मिळवून दिले. महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अभय चाटे यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जाधवांना मोठी साथ दिली. घनसावंगी मतदारसंघातून हिकमत उढाण यांनीही तब्बल २४ हजार हजारांचे मताधिक्य मिळवून दिले. जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे यांच्या परतूरमधूनही  जाधवांना १९ हजारांचे मताधिक्य मिळाले. 

बातम्या आणखी आहेत...