Home | Maharashtra | Mumbai | Sanjay Patil will won or New face with Manoj Kotak for north east Mumbai

ईशान्य मुंबईत संजय पाटलांना संधी की कोटक यांच्या रूपाने नवा चेहरा? मनसे-शिवसेनेच्या हाती उमेदवाराचे भवितव्य

अशोक अडसूळ | Update - Apr 24, 2019, 08:55 AM IST

प्रत्येक वेळी उमेदवार बदलून देण्याची या मतदारसंघाची परंपरा

 • Sanjay Patil will won or New face with Manoj Kotak for north east Mumbai

  मुंबई - उत्तर पूर्व लोकसभा (ईशान्य मुंबई) मतदारसंघात २७ उमेदवार रिंगणात असून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील आणि भाजपचे मनाेज कोटक यांच्यात थेट लढत होत आहे. मराठी, गुजराती, मुस्लीम, हिंदीभाषक मोठ्या संख्येने असलेल्या या मतदारसंघात यावेळी मनसेचा उमेदवार उभा नाही. परिणाम, येथे मराठी मतदार हाच निर्णायक फॅक्टर ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराला शिवसेना व मनसेचे मतदार कितपत साथ देतात, त्यावर महायुतीच्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून आहे.


  २००९ मध्ये राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील विजयी झाले होते. २०१४ मध्ये मोदी लाटेत येथून भाजपचे किरीट सोमय्या निवडून आले. यावेळी सोमय्या यांना शिवसैनिकांच्या रोषामुळे तिकीट दिलेले नाही. भाजपचे मुंबई महापालिकेतील गटनेते मनोज कोटक यावेळी महायुतीचे उमेदवार आहेत. दरवेळी उमेदवार बदली करणे, असा येथील मतदारांचा स्वभाव आहे. त्यामुळे हा मतदारसंघ कुणा एका पक्षाचा आजपर्यंत सवतासुभा झालेला नाही. सुब्रमण्यम स्वामी, गुरुदास कामत, प्रमोद महाजन असे नामवंत येथून निवडून गेलेले होते. मराठी मतदार यावेळी कुणाच्या पाठीशी राहील त्यावर येथील जनमताचा कौल अवलंबून आहे.

  २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. या अभूतपूर्व कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान युतीसमोर आहे.

  संजय दिना पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस

  व्यक्तिमत्त्व

  गाववाला (सन आॅफ साॅइल) अशी ओळख. आगरी असल्याने स्थानिकांशी जवळीक. भाऊ म्हणून मतदारसंघात लोकप्रिय.

  राजकीय प्रभाव
  या मतदारसंघात त्यांचा उत्तम जनसंपर्क आहे. २००४ आणि २००९ अशा दोन टर्म मतदारसंघाचे प्रतिनिधित्व.

  विजयाचे गणित
  किरीट सोमय्या यांचा प्रचारात सहभाग आहे. मात्र, शिवसैनिकांचा सोमय्या यांना विरोध. मनसेचे येथे दोन लाखांच्या आसपास पाठीराखे आहेत. ४०% मराठी मतदार. ‘मराठी कार्ड’ चालवून हॅट््ट्रिकसाठी प्रयत्नशील.

  उणिवा

  राष्ट्रवादीची संघटनात्मक बांधणी नाही. पाचपैकी एकही मतदारसंघ काँग्रेस, राष्ट्रवादीकडे नाही. गुजराती, मारवाडी, हिंदी भाषक मतदारांचा पाठिंबा नाही.

  एक्स फॅक्टर

  या मतदारसंघात ४० % मराठी मतदार आहेत. या वेळी मनसे उमेदवार नाही. राज ठाकरे भाजपच्या विरोधात. परिणामी ‘मराठी कार्ड’ चालले तर विजय निश्चित.

  मनोज कोटक, भाजप

  व्यक्तिमत्त्व

  तीन वेळा नगरसेवक म्हणून काम. ‘जमीन से जुड़ा’ कार्यकर्ता अशी ओळख. गुजराती असूनही मराठी चांगले बोलतात.

  राजकीय प्रभाव
  मुंबई मनपात भाजपचे गटनेता म्हणून काम. तीन टर्म नगरसेवक राहिल्याने कार्यकर्त्यांशी व्यापक संपर्क.

  विजयाचे गणित
  या लोकसभा मतदारसंघातील चार विधानसभा मतदारसंघ भाजपकडे, एक शिवसेनेकडे आणि एक समाजवादीकडे आहे. भाजप-शिवसेनेने एकदिलाने काम केल्यास खाते खोलण्याची कोटकांना संधी.

  उणिवा
  उशिरा तिकीट वाटपामुळे तयारीस अल्प वेळ. मतदारसंघ बांधलेला नाही. पहिली टर्म. मराठी, मुस्लिम, दलित मतदारांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता कमी.

  एक्स फॅक्टर

  १२ टक्के गुजराती- मारवाडी, १० टक्के हिंदी भाषक मतदार या मतदारसंघात आहेत. शिवसेनेने योग्य साथ दिली तर मराठी मतांचा टक्का मिळू शकतो.

Trending