Egg / शाकाहारी अंड्यावरून राऊतांची ‘भुर्जी’

आयुष मंत्रालयाने काेंबडी आणि अंड्याला शाकाहारी म्हणून घाेषित करावे, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. मात्र शाकाहारीप्रेमींनी त्याला तीव्र विराेध केला...

दिव्य मराठी

Jul 17,2019 10:02:00 AM IST

आयुष मंत्रालयाने काेंबडी आणि अंड्याला शाकाहारी म्हणून घाेषित करावे, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. मात्र शाकाहारीप्रेमींनी त्याला तीव्र विराेध केला...


काेंबडी आधी की अंडे, हा पेच जसा सुटलेला नाही, तसाच काेंबडीचे अंडे शाकाहारी की मांसाहारी, हे काेडेही सुटलेले नाही. मात्र शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट राज्यसभेत या विषयाला वाचा फाेडून ‘अंडे आणि कोंबडीला शाकाहारीचा दर्जा द्या,’ अशी मागणी केली आहे. आयुर्वेदाच्या विषयावर सुरू असलेल्या चर्चेत अशी मागणी करणारे खा. संजय राऊत साेशल मीडियावर चांगलेच ट्राेल झालेेत. काही तज्ज्ञांच्या मते मात्र, अफलित अंडी शाकाहारीच असतात.


संजय राऊत काय म्हणाले ?
“मी एकदा नंदुरबारला गेलो होतो. काम आटोपल्यानंतर तिथल्या आदिवासी लोकांनी आम्हाला जेवायला दिलं. मी विचारलं, ‘हे काय आहे?’ तर ही कोंबडी आहे, असं त्यांनी मला सांगितलं. पण, मी आज कोंबडी खाणार नाही, असं मी त्यांना सांगितलं. त्यावर त्यांचं म्हणणं होतं की, ‘ही आयुर्वेदिक कोंबडी आहे. या कोंबडीला आम्ही अशा पद्धतीनं वाढवतो की, ती खाल्ल्यामुळे तुमचे सगळे आजार दूर होऊ शकतात. त्यामुळे आयुष मंत्रालयाने यावर रिसर्च करायला हवे.


हरियाणात चौधरी चरणसिंग अॅग्रिकल्चर इन्स्टिट्यूट आहे. तेथील काही लोक आले हाेते, त्यांनीही आयुर्वेदिक अंडे हा शब्दप्रयोग केला. मी त्यांना विचारलं की ‘अंडे आयुर्वेदिक कसे काय?’ तर त्यांनी सांगितले की आम्ही पोल्ट्रीतल्या कोंबड्यांना आयुर्वेदिक खाद्य देतो, ज्यामध्ये लवंग, मुसळी, तीळ अशा जिनसांचा समावेश आहे. हे खाणं खाल्ल्यानंतर कोंबड्या जी अंडी देतात ती शाकाहारी आणि आयुर्वेदिक असतात, असा त्यांचा दावा हाेता. ज्यांना प्रोटीन्सची गरज आहे आणि मांसाहार करायचा नाही असेही लोक ‘हे’ अंडे खाऊ शकतात, असा हरियाणातील लाेकांचा दावा हाेता. तरी या विषयावर संशाेधन करून आयुष मंत्रालयाने अंडे हे शाकाहारी आहे की मांसाहारी, हे प्रमाणित करायला हवे,’ अशी अपेक्षा खासदार राऊत यांनी व्यक्त केली हाेती.


सेल मेम्ब्रेनमुळे अंडे मांसाहारीच, त्यास शाकाहारी म्हणणे मूर्खपणा
-डॉ. कल्याण गंगवाल, अध्यक्ष, सर्व जीव मंगल प्रतिष्ठान, पुणे

अंड्यांना शाकाहारी म्हणून घोषित करण्याची मागणी हा मूर्खपणाचा कळस आहे. ज्या पेशीला सेल मेम्ब्रेन असते तो पदार्थ मांसाहारी असतो आणि ज्या पेशीला सेल वॉल असते तो शाकाहारी. अंड्याला सेल मेम्ब्रेन आहे, त्यामुळे ते मांसाहारीच आहे. दुसरा मुद्दा म्हणजे ते कोंबडीच्या पोटातून येते. प्रत्येक फलित वा अ-फलित अंड्यात जीव तयार हाेताे. अंड्याच्या कवचावर १५ हजार सूक्ष्म छिद्रे असतात. त्यातून आतील बलक श्वासोच्छ्वास करत असतो. अंडे इन्क्युबेटरमध्ये ठेवले असता ते ऑक्सिजन घेते, हे त्याच्या जिवंंतपणाचे लक्षण आहे. त्याची सोनोग्राफी काढली तर बलक कोंंबडीशी संवाद साधत असतो हे सिद्ध केले आहे. पूर्वी भाजीच्या टोपलीत अंड्यांची जाहिरात होती. आम्ही अँडव्हर्टायझिंग कौन्सिलकडे तक्रारी केल्या. त्यांंनीही अंडे मांसाहारीच असल्याचे मान्य केले होते. अंड्याला शाकाहारी ठरवण्यामागे निव्वळ आर्थिक नीती आहे. आम्ही शाकाहाराचे समर्थन करणाऱ्या सर्व संघटना याला एकत्रित विरोध करणार आहोत.


अंड्याचे सेवन हे शतप्रतिशत मांसाहार
रतनलाल सी. बाफना, शाकाहार प्रणेते, जळगाव

अंड्याची निर्मिती ही काेंबडीच्या गर्भाशयातून हाेत असते. ही प्रक्रिया एक प्रकारे प्रजननाचे एक अंग आहे. स्त्रियांप्रमाणेच काेंबडीलाही मासिक धर्म असताे. अंड्याचीही वाढ हाेत असते,म्हणून ते मांसाहरी. परंतु, काही स्वार्थी लाेकांनी अपप्रचार सुरू केला आहे. अंडे हे मांसाहारापेक्षा शाकाहाराच्या नावाने अधिक विकले जाते. यासाठीच अंडे हे शाकाहारी अशी जाहिरात केली जातेे. परंतु, अंडे हे शतप्रतिशत मांसाहारी आहे. कारण त्यातही प्राण आहे. त्यामुळे अंडे शाकाहारी सांगून त्याची विक्री करणे ही अंडे विक्रेत्यांची मार्केटिंगची चाल आहे.


शाकाहारी समजू शकता
प्रा. डॉ. अरुण जाधव, प्राणिशास्त्र विभाग, नागपूर विद्यापीठ

‘कोंबडीत जीव आहे, म्हणून ती मांसाहारीच. बाजारात मिळणारी अंडी फर्टिलाइझ झालेली नसतात. त्यात कुठलाही जीव तयार झालेला नसतो. त्यामुळे ते मांसाहारी नसते. त्यातील पिवळा बलक हा मेदाचा (फॅट्स) तर पांढरा भाग हा प्रोटीन्सचा स्रोत आहे. त्यामुळे डॉक्टर अंड्याचा पांढऱ्या भाग खाण्याचा सल्ला देतात. आपल्या संस्कृतीत मात्र अंडी मांसाहारी मानली जातात. त्यामुळे अंडी शाकाहारी की मांसाहारी ही बाब सर्वस्वी तुमच्या मानण्यावर अवलंबून आहे.

X