आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय राऊत यांचा 'खुलासा' - केंद्रातील सत्ताही सोडू, त्यात असे काय पंचपक्वान्न आहे? शिळी भाकरी तर आहे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिव्य मराठीचे राज्य संपादक संजय आवटे आणि शिवसेना खासदार संजय राउत - Divya Marathi
दिव्य मराठीचे राज्य संपादक संजय आवटे आणि शिवसेना खासदार संजय राउत

मुंबई : गेल्या अर्ध्या शतकात विरोधक आम्ही कमी पाहिले नाहीत. पण, आजवर कधीच कोणी कोणाला खतम करण्याची भाषा केली नाही. यांना' शिवसेनेला खतम करायचे आहे. शिवसेनेलाच काय, यांना विरोधकांसोबत मित्रांना संपवायचे आहे. स्वतःच्या पक्षातील एकेकाला खतम करायचे आहे. राजकारणाची भाषा उन्मत्त करणाऱ्या अशा उपटसुंभांचा माज उतरवण्याची हीच ती वेळ आहे, अशा शब्दांत शिवसेना खासदार आणि सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्ला चढवला. दिव्य मराठी'ला दिलेल्या खास मुलाखतीत ते बोलत होते.


पण, तुमची तर युती आहे,' असे विचारल्यावर राऊत ताडकन म्हणाले, कसली युती? यांनी आम्हाला जागावाटपात कमी जागा दिल्याच, पण २५ जागा अशा दिल्या की जिथे विजयाची शक्यताही नाही. इतर ठिकाणच्या ३२ जागा यांनी आमच्या पाडल्या. याला युती म्हणतात? त्यामुळे त्यांचा शब्द ते विसरले असतील, तरी आम्ही त्यावर ठाम आहोत. सत्तेत समान वाटा द्या!'


संजय राऊत सध्या चर्चेत आहेत. माध्यमांसाठी आता संजय राऊत' हेच बीट झाले आहे. राऊत यांच्याशी त्यांच्या सामना'च्या केबिनमध्येच गप्पा होणे महत्त्वाचे होते. गेली तीन दशके तिथे बसून राऊत शिवसेनेची अनेक सूत्रे हलवत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेदेखील या खोलीत बसून अनेक महत्त्वाचे निर्णय घेत होते. त्याच केबिनमध्ये ही मुलाखत सुरू होत असतानाच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई राऊतांना भेटून जाताना दिसले. निरोप' घेऊन ते आल्याचे दिसत होते. तो निरोप काय, हे दोघांनीही गुलदस्त्यात ठेवले. मग एकेक प्रश्न सुरू झाला आणि पत्रकार ते प्रभावशाली राजकीय नेता असा प्रवास करणाऱ्या संजय राऊत यांच्याशी गप्पा रंगल्या.

दिव्य मराठी प्रश्न - पण, तुमची तर युती आहे! ती मोडणार का? 
संजय राऊत - कसली युती? यांनी आमच्या ३२ जागा पाडल्या!
देवेंद्र फडणवीसांना व्यक्तिगत विरोध नाही, त्यांनी उद्याच उपमुख्यमंत्री व्हावे!
यांच्याच पक्षातील लोकांना 'हे' नकोत, तर इतरांचे काय?... इतरांना खतम करण्याचे राजकारण ज्यांचे असते, तेही संपतात!

प्रश्न : सत्तेतही वाटा घ्यायचा आणि विरोधही करायचा, अशी शिवसेनेची अप्पलपोटी भूमिका आहे, असे म्हणतात.
राऊत : १९९५ मध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, तेव्हाही सामनामधून टीका करतच होतो. एन्रॉनला विरोधच होता. जोशींना पायउतार व्हावे लागले तेव्हा टाइम्स ऑफ इंडियात जोशी यांच्या पायउतार होण्याच्या कारणांमध्ये सामनाने विरोधात भूमिका घेतल्याने (सामना वेंट अगेन्स्ट देम)', हे पहिले कारण होते. त्यांच्या अनेक निर्णयांवर आम्ही टीका केली. बाळासाहेबांनी अनेकदा त्यांना फटकारे मारले. मातोश्रीवरून झाडाझडतीही घेतली.. आम्ही लपवून ठेवले नाही.

प्रश्न : आज शरद पवार यांच्याबरोबर जी बैठक झाली त्यात काय झाले?
खासदार संजय राऊत : ते तर आमच्यासोबत आहेतच ना. आमचे जाॅइंट व्हेंचर आहे.

प्रश्न : तुमची सत्तेसाठी त्यांच्यासाेबत जाण्याची तयारी अाहे का?
राऊत : का नसावी? महाराष्ट्रात शरद पवार हा महत्त्वाचा फॅक्टर आहे. त्यांच्याशिवाय राज्याच्या राजकारणात काहीही होऊ शकत नाही. आम्हाला विराेधी बाकावर बसण्याचा काैल मिळाल्याचे पवार सांगत आहेत, बराेबरच आहे. मागील वेळेस आम्हालाही मँडेट नव्हते तरी आम्ही सत्तेत सहभागी झालोच ना. विधानसभेत समविचारीच एकत्र यायला पाहिजेत असे नाही. राष्ट्रपती राजवटीएेवजी किमान समान कार्यक्रमाच्या सहमतीवरही वेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र येऊ शकतात.

प्रश्न : मुख्यमंत्रिपदाची मागणी ही सत्तेत बार्गेनिंग करण्याचे कारण आहे?
राऊत : मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षे दाेन्ही पक्षांना मिळावे. अमित शहांनीच तसे ठरवले हाेते, भाजपचे आता तेवढेच करावे, एवढंच.

प्रश्न : परंतु तेव्हा युतीत जे ठरले हाेते ते तुम्हीही कधीच जाहीर केले नाही?
राऊत : त्याची गरजच नव्हती. फिफ्टी-फिफ्टी ठरल्याचे देवेंद्र फडणवीस यांनीच म्हटले होते. त्यात मुख्यमंत्रिपदही येते. मग तुम्ही अचानक पलटी का मारता? अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात काय ठरले हे तुम्हाला माहीत नव्हते तर तुम्ही उद्धव ठाकरे यांना विचारून स्पष्ट करून घ्यायचे होते.

प्रश्न : मग तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन करणार का?
राऊत : आम्ही असे कधीच म्हटलेले नाही. फक्त बहुमत सिद्ध करू शकताे, असे सांगितले. या क्षणी सगळ्यांसाठीच सर्व पर्याय खुले आहेत. अनेक ठिकाणी मूळ विचाराचे आमदार नाहीत. त्यांना आमदारकी टिकवायची आहे. सत्ताधारी पक्षाकडे पैशांच्या थैल्या आहेत, त्यामुळे इतरांचेच आमदार फुटतात असे नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचे अन‌् शिवसेनेचेही आमदार फुटणार नाहीत. दबाव, आमिषे असताना सात आमदार आमच्याकडे आले. त्यामुळे भाजपचे आमदारही फुटू शकतात. निम्म्या जागा देण्याचे ठरले हाेते, मात्र त्यांनी सांगितले की आता बाहेरून बरेच लोक घेतले आहेत, त्यांचे पुनर्वसन करायचे आहे, त्यामुळे मदत करा. उद्धवजींनी ते मान्य केले. तडजोड केली. आता आमचीही अडचण आहे, ती त्यांनी समजून घ्यावी.

प्रश्न : बंडखोरीमुळे भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांचे नुकसान झाले का?
राऊत : आमचे ३२ उमेदवार अधिकृतरीत्या पाडण्यात आले. जळगावात प्रत्येक मतदारसंघात बंडखोर उभे केले. भाजपचे किती पडले ते ठाऊक नाही. युतीच्या जागावाटपात आम्हाला मिळालेल्या जागांपैकी २५ ठिकाणी आमचे उमेदवार निवडून येणे शक्यच नव्हते.

प्रश्न : देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी तुमचे काही आक्षेप आहेत का?
राऊत : असे काही नाही. उद्या जर आमचा मुख्यमंत्री झाला अन‌् फडणवीस उपमुख्यमंत्री झाले तर आमची काय हरकत असेल?

प्रश्न : भाजपचे नेते मित्रपक्ष शिवसेनेचीच काेंडी करतेय असे वाटते का?
राऊत : ते तर हाेतच आहे. यापूर्वी काँग्रेस वा राष्ट्रवादीने शिवसेनेचे संपूर्ण खच्चीकरण करण्याचे प्रयत्न केले, मात्र संपवण्याचे राजकारण केले नाही. मराठी माणसाचा आवाज बुलंद करणारी शिवसेना राहावी असे या दाेन्ही पक्षांना वाटत हाेते.

प्रश्न : मग भाजप असा प्रयत्न करतेय?
राऊत : हाेय. कारण जोपर्यंत शिवसेना संपत नाही तोपर्यंत भाजपला महाराष्ट्रावर ताबा मिळवता येणार नाही. हिंदुत्वाच्या मतांचा शिवसेना मोठा वाटेकरी आहे. राष्ट्रीय, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना काय करते याच्यावर देशाची भूमिका ठरत असते. कदाचित त्यांना याची अडचण वाटत असेल.

प्रश्न : २०१४ मध्येच काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सत्तास्थापनेची तुम्हाला अाॅफर हाेती, असे आदित्य ठाकरेंनी 'दिव्य मराठी'च्या मुलाखतीत सांगितले हाेते?
राऊत : तेव्हा आकडे नीट जमत नव्हते. १४५ चे बहुमत आहे आणि आम्ही तिन्ही पक्षांचे संख्याबळ १४६ च होत होते. भाजपला फार ताकदीने जागा मिळाल्या होत्या. तेव्हा सगळ्यांची फरफट झाली होती.

प्रश्न : या वेळी युतीत लढल्याने नैतिकतेचा मुद्दा वा पेच जाणवत आहे का?
राऊत : आम्ही भावनिकदृष्ट्या अडकलेले आहोत. मात्र अटलजींच्या काळात जेवढे ठामपणे म्हणत होतो तसे या नेतृत्वाबद्दल ठामपणे सांगू शकत नाही. तेव्हा खरोखर हिंदुत्वाचा विचार होता आणि हिंदुत्वाच्या विचाराने भारलेले वातावरण होते. आज तसे नाही. तेव्हा शिवसेनेला संपवायचा विचार कोणी करीत नव्हते. बाबरी प्रकरणानंतर शिवसेनेची लाट असताना उत्तर प्रदेशमध्ये आम्ही ६० उमेदवार उभे केले होते. आमचे १६-१७ खासदार नक्कीच आले असते. मात्र वाजपेयींनी बाळासाहेब ठाकरे यांना फोन करुन हिंदू मतांमध्ये फूट नकाे म्हणून माघार घेण्यास सांगितले, ठाकरेंनी लगेचच मागे घेतले होते.

प्रश्न : गेल्या पाच वर्षांत सरकारच्या कामाचे मूल्यमापन कसे कराल?
राऊत : महाराष्ट्र घडवण्याचे महान काम झाले असे मी म्हणणार नाही. महाराष्ट्र अगोदरच घडलेला आहे. त्यासाठी प्रत्येकच मुख्यमंत्र्यांनी याेगदान दिले आहे. १९९५ मध्ये युती सरकारच्या काळात मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे झाला. चांगल्या रस्त्यांचे जाळे निर्माण झाले. कृष्णा-खोरे असा प्रकल्प झाला. पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले. झुणका-भाकर केंद्र सुरू केले. मात्र गेल्या पाच वर्षांत असे कोणतेही भरीव काम झालेले नाही. फक्त एक समृद्धी महामार्गाचे काम सुरू झाले. मेट्रोचे प्रस्ताव काँग्रेसच्याच काळात आले होते. फेज १ फेजचे उद्घाटन मनमोहन सिंग यांनी केले होते. ब्रह्मपुत्रा नदीवरील पूल, जम्मूमधील भूमिगत मार्ग काँग्रेसच्या काळातले आहेत त्याचे श्रेय 'हे' (भाजप) घेत आहेत.

प्रश्न : मुख्यमंत्री म्हणतात, आम्ही काँग्रेसच्या काळापेक्षा जास्त कामे केली?
राऊत : त्या वेळची गरज असते तसे काम होते. बॅरिस्टर ए.आर. अंतुले यांच्या काळात, डाॅ. मनमोहन सिंग यांच्या काळातही शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली हाेतीच. या वेळी भाजप तयार नव्हते, मात्र उद्धव ठाकरे यांनी हट्ट धरला. कॅबिनेटमध्येही गदारोळ झाला होता. प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने कामे करीत असतो त्यामुळे एखाद्या व्यक्तीने त्याचे श्रेय घेऊ नये.

प्रश्न : अनेक युवा आमदार निवडून आलेत, तरुण नेत्यांबद्दल काय सांगाल?
राऊत : आता ज्युनियर्सनी तयार व्हायला पाहिजे. आदित्य ठाकरे, रोहित पवार, धीरज देशमुख, डी.वाय. पाटील यांचे नातू यांच्याकडून राज्यातील लोकांच्या बऱ्याच अपेक्षा आहेत. राजकीय कुटुंबातील असले तरी त्यांनी गेल्या काही वर्षांपासून काम केले आहे. रोहितने बारामती सोडून बाहेर मतदारसंघ बांधला. शेती, कृषी, सहकार यात काम केलेले आहे. आदित्य यांनी पर्यावरणापासून शिक्षणापर्यंत अनेक विषयांवर काम केले आहे. अशा नव्या चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे. यशोमती ठाकूर आहेत. मी अशी नावे घेतो त्यांनी काम केले आहे. अजित पवार, दिलीप वळसे पाटील, शरद पवार यांना संधी मिळाली, तेव्हा त्यांनीही आपापल्या परीने काम करून दाखवलेच हाेते.

प्रश्न : नव्या सरकारपुढे काय आव्हान असेल?
राऊत : पाच वर्षांत काय केले याचे प्रगतिपुस्तक समोर ठेवले आहे. कालखंड पुढे गेला की वाया गेला त्याचा अभ्यास सरकारने केला पाहिजे.

प्रश्न : राज्यात पुन्हा निवडणुका घेण्याची भीती दाखवली जातेय...
राऊत : त्याचा कोणत्याही आमदारावर परिणाम होणार नाही. ही दिल्लीची ६० आमदारांची विधानसभा नाही. गोव्यात ४० आमदार असतानाही पुन्हा निवडणूक का घेतली नाही? तेथे काँग्रेसला घेऊन राज्य चालवलेच ना. तुम्ही काय सांगता आम्हाला?

प्रश्न : शिवसेनेची ताकद काय?
राऊत : बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यातील प्रत्येक गावात शिवसेेनेची ताकद उभारली. शिवसेना केडर बेस्ड पक्ष आहे. स्वार्थाचा विचार रुजवला नाही. पक्ष टिकला पाहिजे ही भावना आहे. नवीन पिढीला आम्ही संधी देतो. हा पक्ष श्रद्धेवर चालतो. देवळातील दगडी मूर्तीत देव आहे की नाही माहीत नाही, पण श्रद्धा आहे, तशीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांबद्दलही आजच्या पिढीतही श्रद्धा आहे.

प्रश्न : आदित्य ठाकरे शिवसेनेची नवी ओळख तयार करू पाहतायत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल ?
राऊत : काळानुसार विषय आणि विचार बदलतात. आता मराठी माणूस पुढे गेला आहे, तेव्हा तो वडापाव विकत होता म्हणून तो लढत होता. त्याला आपल्या भावनांची जाणीव आहे. फक्त दुकानांवरचे बोर्ड काढण्यापुरता आमचा विचार नाही. आम्ही पुढे गेलो आहोत.

प्रश्न : २०१४ ला पवारांनी भाजपला मदत केली. मग त्याच पवारांसाेबत तुम्ही आता का जात आहात? केंद्रातील सत्ता सोडावी लागेल.
संजय राऊत : केंद्रातील सत्ताही सोडू. त्यात असे काय पंचपक्वान आहे? शिळी भाकरी तर आहे. राममंदिराच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल तो सगळ्यांना मान्य करावा लागेल. शिवसेनेचे राममंदिराबाबतचे काम सगळ्यांना ठाऊक आहे. अनेक राष्ट्रीय विषयांवर केंद्राला आम्ही मदत केली आहे. ३७० कलमाबाबत आम्ही मदत केली आहे.

बातम्या आणखी आहेत...