संजय ताकतोडेच्या मृतदेहाचे / संजय ताकतोडेच्या मृतदेहाचे घाटीत 'इन कॅमेरा' विच्छेदन, नातलगांचा रास्ता रोको, साळगावला बस फोडली

प्रतिनिधी

Mar 07,2019 12:30:00 PM IST

केज/औरंगाबाद- मातंग समाजाला अनुसूचित जातीमध्ये लोकसंख्येप्रमाणे आरक्षण द्यावे या मागणीसाठी मंगळवारी बिंदुसरा प्रकल्पात उडी मारून आत्महत्या केलेल्या संजय ताकतोडे या तरुणाचे इन कॅमेरा शवविच्छेदन औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात करण्यात आले. दरम्यान, विच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात दिल्यावर बीड जिल्ह्यासह शहरातील मातंग समाजातील नेते व कार्यकर्त्यांनी घाटी रस्त्यावरील ज्युबिली पार्क येथे मृतदेह रस्त्यावर ठेवून रास्ता रोको केला.

नातेवाइक व समाजातील नेत्यांच्या मागणीनंतर बुधवारी सकाळी संजयचा मृतदेह जिल्हा रुग्णालयातून पोलिस बंदोबस्तात घाटी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला. मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे या मागणीसाठी संजय ताकतोडे याने बिंदुसरा तलावात जलसमाधी घेतल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी समोर आली होती. दरम्यान, आत्महत्येपूर्वी संजयने स्वत:च्या मोबाइलमध्ये व्हिडिओ तयार केला होता. यामध्ये त्याने आरक्षणासह विविध मागण्या सरकारकडे केल्या आहेत. दुपारनंतर घाटी रुग्णालयात इन कॅमेरा संजय ताकतोडेच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह नातलगांच्या स्वाधीन केला. नातलगांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर तो ज्युबिली पार्क चौकात आणून ठेवत रास्ता रोको केला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने जादा कुमक मागवून घेत आंदोलकांची समजूत घातल्यानंतर रुग्णवाहिकेने मृतदेह केजकडे रवाना करण्यात आला.

साळेगावला बसवर दगडफेक
संजय ताकतोडेच्या आत्महत्येच्या घटनेचे पडसाद साळेगाव येथे उमटले असून दुचाकीवरून आलेल्या युवकांनी कळंबकडे जात असलेल्या केज - कळंब बसवर दगडफेक करून पलायन केले. यात बसच्या समोरील काचेचा चुराडा झाला आहे. बुधवारी सायंकाळी चार वाजून पाच मिनिटांनी केजहून कळंबकडे जात असलेल्या बसवर (एम एच २० डी ९५२१ ) ही दगडफेक झाली. या दगडफेकीत बसमधील प्रवाशांना इजा झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. स्थानिक नागरिकांनी दगडफेकीमागे संजय ताकतोडे याने जलसमाधी घेऊन आत्महत्या केल्याची पार्श्वभूमीवर असल्याच्या माहितीस दुजोरा दिला आहे. घटनेची माहिती मिळताच केज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. याप्रकरणी केज पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. बस येथील बसस्थानकात आणून लावण्यात आली.

५० लाख भरपाईची मागणी
संजयच्या नातलगांना शासनाने ५० लाख रुपये भरपाई द्यावी, मातंग समाजाला एससी प्रवर्गातच उपप्रवर्ग करून लोकसंख्येच्या आधारे नोकरी द्यावी, संजयच्या कुटुंबातील एकास शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे, अशी मागणी या वेळी संजयचे नातलग आणि कार्यकर्त्यांनी रास्ता रोको दरम्यान केली.

X
COMMENT