आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक: लाचखोरी भारतात, उघड अमेरिकेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतातल्या वैद्यकीय सेवा वरचेवर महाग व सर्वसामान्यांना न परवडणाऱ्या होत असल्याची ओरड सर्वत्र अाहे. ही स्थिती का निर्माण होते आहे? त्याचे कर्ते करविते कोण? याच्या मुळाशी न जाता सरकार वरवरची पावले टाकते. कोणावर कारवाई करण्यास बिचकते. मग ते कोणते मोठे रुग्णालय किंवा कॉर्पोरेट संस्थांची रुग्णालये असो. अथवा भारतातल्या वैद्यकीय बाजारपेठेत औषधांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्या किंवा साहित्य-साधने (इम्प्लांट्स) निर्माण करणाऱ्या देशी-विदेशी कंपन्या असोत.

 

अशा कंपन्यांच्या बाबतीत सरकार मवाळ असले तरी अन्य देशांतल्या कडक नियमांमुळे त्यांचा गैरप्रकार, भयानक कारभार चव्हाट्यावर येतोय. असेच एक लाचखोरीचे प्रकरण अमेरिकेत उघडकीस आले आहे. स्ट्रायकर या मूळ अमेरिकेतल्या कंपनीची चार कार्यालये दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकातामध्ये आहेत. त्यांची भारतातील गेल्या वर्षातली उलाढाल सुमारे ३०० कोटींची आहे. हाडांच्या व्याधी दूर करणारे कमरेतले खुब्याचे, गुडघ्यांचे सांधे ही कंपनी बनवते. शिवाय पाठीचा कणा व मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या साहित्याचा (इम्प्लांट्स) पुरवठा ही कंपनी करते. स्ट्रायकर कंपनीच्या हिशेबाची तपासणी व लेखा परीक्षण अमेरिकेतल्या तारण  (सेक्युरिटीज) आणि विनिमय (एक्स्चेंज) कमिशनने केली.त्या लेखा परीक्षणात या कंपनीने भारत, चीन व कुवेत या देशांतील लाचलुचपत प्रतिबंधक संदर्भातील नियमांचे उल्लंघन केले असल्याचा निष्कर्ष काढला. स्ट्रायकरनेही त्याची कबुलीही दिली. अमेरिकेच्या कमिशनने त्यांना ५५ कोटी रुपयांचा दंड केला.   

 

स्ट्रायकरने अस्थिरोग संदर्भातील कृत्रिम सांधे विक्री करताना डॉक्टरांना आमिष दाखवणे, रुग्णालयाशी संशयास्पद व्यवहार केले, असा आक्षेप त्यांच्या विरुद्ध आहे. कंपनीने या संदर्भात डॉक्टरांना, मोठ्या व कॉर्पोरेट हॉस्पिटल्सना दिलेले पैसे, डॉक्टरांना दिलेली सल्ला फी, त्यांच्यासाठी आयोजित केलेल्या देशी-विदेशी सहलींचा खर्च हिशेबात दाखवला आहे.

 

त्यासंदर्भातले स्पष्टीकरण अमेरिकन कमिशनसमोर स्ट्रायकरला देता आले नाही. याशिवाय खर्चाच्या समर्थनार्थ पुरावा त्यांना देता आला नाही. भारत सरकार एकतर अशा कंपन्यांसदर्भात फारशी कारवाई करत नाही. केलीच तर जुजबी करते. खुद्द स्ट्रायकर कंपनीलादेखील २०१२ मध्ये गैरमार्गाने व बेकायदेशीररीत्या साहित्य पुरवठ्याच्या निविदा मिळवल्याबद्दल सरकारने तीन कोटी रुपयांचा दंड केला. पण यामध्ये गैरमार्गाने होणारी प्रचंड उलाढालीच्या तुलनेत होणारा दंड इतक्या किरकोळ रकमेचा असतो की, भरपाई करून कंपनी पुढच्या व्यवहाराला तयार हाेते.

 

अनियंत्रित किंवा नावाला नियंत्रित असलेल्या भारतीय वैद्यकीय बाजारपेठेत कंपन्या रुग्णालयांशी, डॉक्टरांशी संधान साधून साहित्य, औषधे विक्री करतात. ही अनेक वर्षांपासून लागलेली कीड आहे. भारतातल्या वैद्यकीय सेवा-सुविधा महाग होण्यामागचे ते एक प्रमुख कारण आहे. हृदय शस्त्रक्रियेसाठी लागणारे स्टेंट नियंत्रित दरात विकण्याचे बंधन सरकारने घातले आहे. त्याचाही काटेकोर अंमल होत नाही. देशी-विदेशीच्या नावाखाली किमतीचे घोळ घातले जातातच. शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य सुविधांच्या किमती या लाचखोरीमुळे जशा भरमसाठ वाढल्या आहेत, तीच अवस्था औषधांच्या किमतीबाबत आहे. श्रीमंत सोडले तर बहुतांश लोक यामुळे हैराण होतात. घरातल्या प्रिय व्यक्तीवर उपचार करताना घर उद््ध्वस्त होते. उपाय म्हणून सरकार योजना खूप सांगते. पण त्याचे लाभ गरजूंपर्यंत पाेहोचण्याचे प्रमाण गरजेपेक्षा खूपच कमी आहे. 


अस्थिरोगाच्या साहित्य विक्रीतील लाचखोरी उघडकीस आली ती अमेरिकेत भारतात नाही. खुब्याचे सदोष कृत्रिम सांधे विक्रीचे जॉन्सन अँड जॉन्सन या मूळ अमेरिकन कंपनीच्या विरोधातील प्रकरण २००५ पासून गाजते आहे. पण सरकारला त्या विरोधात अजूनही काही करता आलेले नाही. प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही रेंगाळते आहे. आणि दुसरीकडे मुंबईतल्या या कंपनीचे भारतातले व्यवहार बिनबोभाट चालूच आहेत. अमेरिकेत तयार केलेले खुब्याचे कृत्रिम सांधे त्यांनी भारतात विनापरवाना विकले. ते सदोष सांधे आहेत. त्यामुळे ज्या रुग्णांवर त्याचे रोपण झाले ते भयंकर त्रासाने बेजार झाले आहेत. दिल्लीतल्या अरुण गोयंका यांनी जनहित याचिका दाखल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने चौकशी समिती नेमली. कंपनी एवढा माज दाखवत आहे की, त्या समितीला  सांधे विकले किती? वगैरे तपशील देण्यास तयार नाही.

 

अशा कंपन्यांविरुद्ध सरकार कडक पावले उचलत नाही, त्यांचे परवाने रद्द होत नाहीत तोपर्यंत त्यांची मुजोरी अशीच चालू राहणार. आणि डॉक्टर, रुग्णालयांपर्यंत असलेल्या साखळीमुळे रुग्णांची परवड, हेळसांड अशीच होत राहणार. सरकारच्या डोळेझाक कार्यशैलीने गरीब बिचारी जनता कोणीही, कशीही हाका, अशी अवस्था सर्वसामान्य रुग्णांची झाली आहे.

 

संजीव पिंपरकर

निवासी संपादक, सोलापूर

बातम्या आणखी आहेत...