आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अष्टसात्त्विक भावजागरणाने संजीवन समाधी सोहळा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धन्य इंद्रायणी, धन्य पिंपळाचा  पार धन्य ज्ञानेश्वर, पुण्यभूमी.. धन्य ऋषीश्वर, धन्य पांडुरंग मिळाले ते सांग अलंकापुरी...

पुणे : याचा प्रत्यय हजारो भाविकांनी सोमवारी श्रीक्षेत्र आळंदी येथे घेतला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा ७२४ वा संजीवन समाधी सोहळा अनुभवण्यासाठी अलंकापुरीत जमलेल्या भाविकांना अष्टसात्त्विक भावांचे जागरण झाल्याची अनुभूती मिळाली. माउलींच्या ओव्यांचे बोल ओठी खेळवत भाविकांनी माउलींचा जयजयकार करत आपला भक्तिभाव अर्पण केला.

श्रीक्षेत्र आळंदी येथे ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने प्रतिवर्षी कार्तिक वद्य चतुर्दशीला माउलींचा संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यात येतो. तसेच कार्तिकी यात्राही होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून या सोहळ्यासाठी हजारो भाविक आवर्जून उपस्थित राहतात. यंदाही २० नोव्हेंबरपासून कार्तिकी यात्रा आणि संजीवन समाधी सोहळा कार्यक्रमांची सुरुवात झाली. सोमवारी आळंदी येथील माउली मंदिरात समाधी सोहळ्याचे विशेष कीर्तन झाले. पहाटे तीनपासून अभिषेक, दुधारती, भाविकांच्या महापूजा, कीर्तनसेवा, महानैवेद्य, धुपारती, भजन आणि जागर असे उपक्रम क्रमवार पार पडले, अशी माहिती प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी दिली.

नामदास महाराज यांच्या निरूपणाने सारेच हेलावले…


माउलींच्या भेटीसाठी पंढरपूर येथून निघालेला पालखी सोहळा दिवेघाटमार्गे पुण्याकडे येत असताना झालेल्या अपघातात संत नामदेव महाराजांचे सतरावे वंशज सोपान महाराज नामदास यांचा मृत्यू झाला. मात्र कुटुंबावर शोककळा पसरली असूनही माउलींच्या सेवेत कुठलाही खंड पडू द्यायचा नाही, या भावनेने संजीवन समाधी सोहळ्याचे परंपरेचे कीर्तन भावार्थ महाराज नामदास यांनी केले आणि फड परंपरा सांभाळणे म्हणजे नेमके काय याची प्रचीती दिली. 'नामा म्हणे केशीराजा, केला नेम चालवी माझा...या ओळींचा साक्षात अनुभव त्यांनी दिला. 'नामा म्हणे आता, लोपला दिनकर..बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ...यावर त्यांनी निरूपण केले तेव्हा सारे हेलावून गेले.