आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक: वाढते आर्थिक गुन्हे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनेट व मोबाइलच्या स्मार्टफोन संचावर अॅपद्वारे ज्या काही नवनवीन तांत्रिक सुविधा उपलब्ध होत आहेत, बँकांची एटीएम यंत्रणा यांचा गैरवापर करून होणारे आर्थिक फसवणुकीचे गुन्हे कमालीच्या वाढत्या प्रमाणावर होत आहेत. या गुन्ह्यांमध्ये सर्वच स्तरांतील लोक लुटले जातात. तांत्रिक सुविधांच्या आधारे होणाऱ्या गुन्ह्यांव्यतिरिक्त अन्यही प्रकाराने पैशांची फसवणूक होते. सोलापुरात महाराष्ट्र बँकेमध्ये नुकताच १२ लाखांची फसवणूक झाली. मारुती मोटार्सची एजन्सी असलेल्या चव्हाण ऑॅटोमोबाइल्स यांच्याच बाबतीत हा प्रकार घडला.

 

बँकेतील फसवणुकीचे गुन्हे आतापर्यंत ज्या पद्धतीने होत होते त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने गुन्हेगारांनी तंत्रज्ञानाचा वापर करून पैसे लाटले. आरटीजीएसद्वारे पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात हस्तांतरित झाले. ते करताना गुन्हेगाराने मोबाइल संपर्काद्वारे पैसे हस्तांतरित करण्याची विनंती बँकेच्या अधिकाऱ्यांना केली. ट्रू कॉलरसारख्या अॅपद्वारे नंबर त्या खातेधारकाचाच असल्याची सूचना अधिकाऱ्याच्या मोबाइलवर आली होती.

 

त्यानंतर पैसे हस्तांतरित झालेही. एक फसवा व्यवहार यशस्वी झाला आहे, असे पाहून लगेच दुसऱ्या दिवशी त्या गुन्हेगाराने आणखीन एक पैसे हस्तांतरण करण्याची विनंती बँक अधिकाऱ्यांना केली. त्यानुसार पैसे इकडचे तिकडे गेलेही. पण नंतर कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यासाठी खातेदाराशी थेट संपर्क साधला असता फसवणूक झाल्याचे बँकेच्या व खातेदाराच्या लक्षात आले. बँकांमध्ये कुठल्याही प्रकारचे आर्थिक घोटाळे, चोरी, फसवणुकीचे गुन्हे झाले की त्याबाबतची फिर्याद पोलिसांकडे दाखल करण्यासाठी बराच उशीर बँकेकडून केला जातो, हा अनुभव आहे. चव्हाण मोटार्स संदर्भातील गुन्ह्याबाबतही असेच झाले. गुन्हा उघडकीस आल्यानंतर दहा दिवसांनी त्याची फिर्याद सोलापूर पोलिसांकडे दाखल झाली. 


महाराष्ट्र बँकेतील फसवणुकीच्या गुन्ह्यासंदर्भात तपासात काय निष्पन्न होते किंवा नाही, हे पुढे स्पष्ट होईलच. परंतु पैशाच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांचे साेलापुरातील प्रमाण वाढते आहे. फसवणुकीचे प्रकार अनेक आहेत. डेबिट कार्डावरील तपशील मागून ऑनलाइन व्यवहाराद्वारे पैसे लंपास केले  जातात. एसएमएसद्वारे वेगवेगळ्या योजनांचे आमिष दाखवून फसवले जाते. याशिवाय कमी कालावधीत जास्त पैशाचे आमिष दाखवून फसवणूक केल्या जाणाऱ्या पाॅन्झी स्कीमचे प्रमाणही सोलापुरात खूप आहे. जास्त पैशाच्या आमिषातून होणाऱ्या फसवणुकीला कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर बळी पडतो. मोठ्या व्याजाचे, ठेवींचा परतावा दामदुपटीने कमी कालावधीत करण्याचे आमिष दाखवून माया खूप गोळा केली जाते.

 

अशा योजना राबवणारे लोक परागंदा झाल्यावरच ठेवीदारांचे डोळे उघडतात. पोलिसांपर्यंत धाव घेतली जाते. परंतु त्यातून निष्पन्न फारसे होत नाही. अर्थात जास्त पैशाचे आमिष हे काही फक्त कष्टकऱ्यांनाच पडते असे नाही. तर फसवणूक झालेल्यांमध्ये डॉक्टर, प्राध्यापक, अभियंते अशी प्रतिष्ठित मंडळी आहेत. यातले फारच थोडे लोक पोलिसांपर्यंत पोहोचतात. फिर्यादी देतात. बाकीचे फसवणुकीतून गेलेले पैसे अक्कल खाती जमा करून टाकतात.

   
अशा गुन्ह्यांमध्ये फिर्याद दाखल करून घेण्यासाठी पोलिसांकडून एक तर टाळाटाळ होते. एकापेक्षा जास्त पोलिस ठाण्यांचा संबंध असेल तर गुन्हा दाखल करून घेण्यासाठी चालढकल केली जाते. एवढे सगळे होऊनही त्या फिर्यादीच्या नशिबाने गुन्हा दाखल झालाच तर त्याचा तपास पूर्ण होऊन खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा, पैशाची वसुली इथपर्यंत त्या तपासाची निष्पत्ती होणे ही अतिशय दुर्मीळ गोष्ट झाली आहे. सर्वच प्रकारच्या आर्थिक गुन्ह्यांच्या बाबतीत हा एक नेहमीचाच व सार्वत्रिक अनुभव झाला आहे. अशा गुन्ह्यांमधील फिर्यादी हा फसवणुकीमुळे पैसा गमावल्याने अगोदरच बेजार झालेला असतो. शिवाय सगळीकडे बोभाटा झाल्यानेही तो हैराण असतो. अशा स्थितीत पोलिस खात्याकडून होणाऱ्या तपासातील कुचराई विषयी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून गुन्ह्याची तड लावून घेण्यापर्यंत फिर्यादी थकून जातो. बहुतांश गुन्ह्यातील तपास हा त्यानंतर थांबतो. प्रकरण दप्तरी दाखल होते. तपास थांबण्याची दोन कारणे असू शकतात. संशयितांकडून स्वार्थ सिद्धीचे कारण असू शकते.

 

त्याचबरोबर आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी अावश्यक असलेले ज्ञान, माहिती व अभ्यास या गोष्टींचा अभाव संबंधित यंत्रणेतील लोकांकडे असणे, हेही त्याचे कारण असू शकते. बंदोबस्तावरील पोलिस त्याचा तपास करू शकत नाहीत.  अशा वाढत्या गुन्ह्यांनंतर आर्थिक गुन्हे विभाग शासनाने  निर्माण केला खरा. पण त्यातील कर्मचाऱ्यांना भक्कम प्रशिक्षण दिले पाहिजे. तपास करणाऱ्यांनाही त्याची आवड असली पाहिजे. तरच तपासातून काही निष्पन्न होऊ शकते. अन्यथा प्रकरणे दप्तरी दाखल होत राहतील.


संजीव पिंपरकर,निवासी संपादक, सोलापूर

बातम्या आणखी आहेत...