Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | sanjiv pimprikar's article on Challenge the Mafia Government

प्रासंगिक: माफियांचे सरकारला आव्हान

संजीव पिंपरकर | Update - Nov 08, 2018, 06:44 AM IST

तेलंगणा व छत्तीसगडमध्ये मोकळीक असल्याने तेथूनही दारू मोठ्या प्रमाणात येते.

 • sanjiv pimprikar's article on Challenge the Mafia Government

  दारूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या माफियाच्या ट्रकने चंद्रपूर जिल्ह्यात पोलिस उपनिरीक्षकाला चिरडून मारले. विदर्भातील तीन जिल्ह्यांत दारूबंदी आहे. वर्धा, गडचिरोलीपाठोपाठ चंद्रपुरात एप्रिल २०१५ पासून दारूबंदीला सुरुवात झाली. बेकायदेशीर दारू व्यवसायातील विविध प्रकारचे वाढते गुन्हे हा चंद्रपूर जिल्ह्याला नवीन प्रकार नाही. कारण बंदी सुरू झाल्यापासून दारू माफियांचा दारू उद्योग वरचेवर फोफावतच आहे. तो इतका जबरदस्त वाढलाय की, ते आता कोणालाच बधत नाहीत. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये दारूबंदी नसलेल्या विदर्भातील अन्य जिल्ह्यांतून दारू येते. शिवाय मध्य प्रदेश, तेलंगणा व छत्तीसगडमध्ये मोकळीक असल्याने तेथूनही दारू मोठ्या प्रमाणात येते. कोट्यवधींची दारू रोज येते.

  बंदी काळातही मागणी आणि कमाई जास्त तिथे दारू पोहोचवली जातेच. टंचाईमुळे तिची किंमतही वाढते. चंद्रपूरसारख्या कामगार वस्ती मोठ्या प्रमाणावर असलेल्या जिल्ह्यात दारू पिल्याने मृत्यूच्या घटना वाढत आहेत. त्यातूनच महिलांचे दारूविरोधी आंदोलन सुरू झाले. माफिया लोकांचे हे जाळे एवढे संघटित व ताकदवान झाले आहे की, त्याला रोखणे पोलिसांना कठीण झाले आहे. त्यांची ही मग्रुरी एवढी जबरदस्त आहे की, हिंसक आक्रमकपणामुळे कोणत्याही थराला जाण्याची गुर्मी त्यांच्यात आली आहे. पोलिस यंत्रणेचे, प्रशासनाचे छुपे पाठबळ असल्याशिवाय गोष्टी या थराला जात नाहीत.

  विशेष म्हणजे पोलिस यंत्रणेचे पाठबळही आता छुपे राहिले नाही. उपनिरीक्षक छत्रपती चिडे यांना दारू माफियांच्या वाहनाने चिरडल्याची घटना संतापजनकच आहे. अशा धोकादायक माफियांवर कारवाई करण्यासाठी अपुरी कुमक घेऊन न जाता पोलिसांनी देखील पूर्ण तयारीनिशी जायला हवे हाेते. दोन नंबरच्या धंद्यांना लपून-छपून संरक्षण देतानाही पूर्वी पोलिस विचार करायचे. पण दारूबंदी असलेल्या विदर्भातल्या तीन जिल्ह्यात तसेही होईना. दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात माल पाेहोचवताना माफिया आणि पोलिस यांची हातमिळवणी होते. थोड्या फार पैशासाठी प्रकरण एवढ्या थराला जाते की, यंत्रणेतीलच काही लोक माल बंदी असलेल्या जिल्ह्यात पोहोचवण्याचा धोका उचलतात. रामटेक पोलिस ठाण्याचा एक कर्मचारीच त्याच्या वाहनातून दारू घेऊन जाताना पकडला गेला होता.

  तर दुसरीकडे वरोरा येथील एका पोलिस कर्मचाऱ्याच्या घरातूनच दारूच्या बाटल्या जप्त केल्या गेल्या. तन-मन-धन एवढे जुळत असतील तर या माफिया लोकांचे धाडस वाढले नाही तरच नवल. माफिया लोकांवर खरी कारवाई तर सहसा कोणी करतच नाही. कारवाई केल्याचे खरे नाटक मात्र नक्की होते. ही गोष्टही आता न्यायालयाच्या लक्षात येऊ लागली आहे. नुकतेच चंद्रपूर जिल्ह्यातल्या एका खटल्यात न्यायाधीशांनी तीन पोलिस कर्मचाऱ्यांना तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा दिली. बेकायदेशीर दारू संदर्भातील प्रकरण व्यवस्थित न हाताळल्याचा आरोप त्यांच्यावर होता. प्रतिबंधात्मक कायद्यानुसार जबर शिक्षा झाल्याची उदाहरणे जवळजवळ नाहीतच. थोडी फार शिक्षा झालीच तर तिही तिसऱ्या-चौथ्या स्तरावरच्या माणसावर होते. मूळ माफिया दूरच असतो.


  माझे कोण काही वाकडे करू शकत नाही, अशी भावना रुजल्यामुळेच माफिया लोकांचे घातक आक्रमण फोफावले आहे. कोणाच्याही गळ्याला सुरा लावायला मागे पुढे पाहणार नाहीत. मग ते माफिया बेकायदेशीर दारू व्यवसायातील असोत किंवा बेकायदा वाळू उचल क्षेत्रातील असोत. यांना कोणाचीही भीतीच राहिलेली नाही. वाळू माफिया तर तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यावरही ट्रक घालायला कचरत नाहीत. वाळूला सोन्याची किंमत आली आहे. अगदी गाढवावरून ती वाहून नेली तरी त्याचे पैसे होतात. रोजचे कोटीत पैसे होतात. बेकायदेशीर दारू आणि वाळू व्यवसायातून निर्माण होणाऱ्या या बेसुमार पैशांतूनच या माफिया लोकांची ताकद एवढी वाढली आहे की, ती कशी चिरडून काढायची याचा विचार सरकारने केला तर ठीक. उद्या वेळ हाताबाहेर गेल्यानंतर टोकाची पावले काय उचलायची? याचा विचार सरकार करत बसेल. छोट्या-मोठ्या कारवाईतून होणार काहीच नाही. बेकायदेशीर उद्योगातून जो बेसुमार पैसा आणि अनियंत्रित संपत्ती, स्थावर या माफियांनी गोळा केली आहे, त्यावरच घाला घातला पाहिजे.


  बड्या धेंडांवर कारवाई करणाऱ्या आर्थिक गुन्हेगारांचा मुकाबला करणाऱ्या अमलबजावणी संचालनालयाने त्यांच्यावर बडगा उचलला पाहिजे. त्यांच्या चौकशीचे झेंगट माफियांच्या मागे लागले पाहिजे. आयकर खाते किंवा बाकी कोणाच्या कारवाईची भीती त्यांना वाटणार नाही. ज्याच्यातून ताकद निर्माण होते तो पैसा जप्त झाल्याशिवाय हा महारोग संपणार नाही.

  - संजीव पिंपरकर

  निवासी संपादक, सोलापूर

Trending