आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भक्तिमय वातावरणात अलंकापुरीत संजीवन समाधी सोहळ्याची सुरुवात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - राज्यभरातून दाखल होत असलेल्या भाविकांच्या गर्दीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याचे वातावरण भक्तिमय बनले आहे. पंढरपूरच्या पायी वारीचे जनक मानले जाणारे गुरू हैबतबाबा यांच्या पायरीच्या पूजनाने माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्याला शनिवारी प्रारंभ झाला. लक्षावधी वारकऱ्यांनी याप्रसंगी हैबतबाबांच्या पायरीचे दर्शन घेतले. संजीवन समाधी सोहळ्यासाठी अलंकापुरीत सुमारे साडेतीन लाख भक्तांचा मेळा जमला आहे. इंद्रायणीचा काठ माउलींच्या जयघोषाने दुमदुमले आहेत. 

 

पहाटे तीन वाजता पवमान अभिषेक आणि दुधारतीने संजीवन समाधी सोहळ्याच्या धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. पंढरीहून माउलींची दिंडीही येथे दाखल झाली. राज्यभरातून विविध संतांच्या दिंड्या आपल्या लवाजम्यासह माउलींच्या भेटीसाठी आळंदी येथे दाखल झाल्या आहेत, अशी माहिती संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदीचे प्रमुख विश्वस्त अॅड. विकास ढगे पाटील यांनी दिली. पहाटे पाच वाजल्यापासून भाविकांच्या महापूजा सुरू झाल्या आहेत. दुपारी महानैवेद्यानंतर वीणा मंडपात कीर्तनाचा जागर सुरू आहे. कार्तिकी यात्रेचा कालावधी ७ डिसेंबरपर्यंत (अमावास्येपर्यंत) आहे. यादरम्यान मुख्य मंदिरात तसेच अन्य ठिकाणी व आळंदी येथील मठांमध्ये वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दर्शनबारी उभारण्यात आल्याने दर्शनासाठी लोंढे न जमता शिस्तीत, रांगा लावून भाविक माउलींचे दर्शन घेत आहेत. 

 

डॉ. रामचंद्र देखणे निरूपण सादरकरणार 

कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने चैतन्य महाराज देगलूरकर यांची 'ज्ञान देव देतो' या विषयावरील प्रवचनांची मालिका आळंदी येथील अमृतनाथ स्वामी संस्थेत सकाळी साडेआठ ते दहा या वेळात आयोजिण्यात आली आहेत. तसेच सकल संत रचित गौळण गायनाचा 'अधरीधरुनी वेणू' हा विशेष कार्यक्रमही होणार आहे. रघुनाथ, शुभम आणि सुरंजन खंडाळकर हे सादरीकरण करणार असून, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे निरूपण करणार आहेत. दरम्यान, येणाऱ्या काही दिवसांत आळंदीत भाविकांची संख्या वाढण्याचा अंदाज मंदीर प्रशासनाने वर्तवला आहे. 

बातम्या आणखी आहेत...