Home | Magazine | Madhurima | Sanket Malati Bharati's translation of Shirshendu Mukhopadhyay's story

म्हणी वि. म्हणी

संकेत मालती | Update - Nov 06, 2018, 01:04 PM IST

ते मूळचे या भागातलेच होते पण मध्यंतरी 30 वर्षं बिहारात होते.

 • Sanket Malati Bharati's translation of Shirshendu Mukhopadhyay's story

  जोगेनबाबू आले तेव्हा बडोदाबाबू न्याहारीनंतर किराणामाल खरेदी करायला बाहेर पडतच होते. जोगेनबाबू फार चिंताग्रस्त दिसत होते. इतके चिंताग्रस्त की, त्यांचा चष्मा नाकाच्या अगदी टोकापर्यंत घसरला होता. त्यांच्या मिशा उदासपणे लटकत होत्या. त्यांनी शर्ट उलटा घातला होता.‘नमस्कार बडोदाबाबू, मला असं इतक्या सकाळी यावंच लागलं, कारण मी मोठ्या संकटात आहे.’ जोगेनबाबू या भागात नवे होते, म्हणजे अगदीच नवे नव्हते. ते मूळचे या भागातलेच होते पण मध्यंतरी ३० वर्षं बिहारात होते. नुकतेच ते कायमचे स्थायिक व्हायला परतले. ते बडोदाबाबूंचे शेजारी होते आणि एक सभ्य गृहस्थ होते.

  बडोदाबाबू या भागातले एक प्रतिष्ठित, अनुभवी व्यक्ती होते. सगळे त्यांचा सल्ला मागत. असे म्हटले जायचे की, एखाद्या व्यक्तीकडे निव्वळ एक नजर टाकूनच ते तिच्या मनात खोलवर दडलेले विचार जाणून घेऊ शकत. जोगेनबाबूंचे बोलणे ऐकून ते शांतपणे हसले आणि म्हणाले,
  ‘आज दूधवाला आला नाही वाटतं?’
  ‘नाही, आला होता.’
  ‘मग, मोलकरणीने नक्कीच दांडी मारली!’
  ‘नाही. तसेही नाही.’
  ‘अच्छा, तर मग शीतला पूजा समितीच्या पोरांनी १०० रुपयांची वर्गणी मागितली काय?’
  ‘नाही हो साहेब, मी त्यांची फक्त पाच रुपयांत बोळवण केली.’
  ‘अच्छा, तुमच्या बायकोची दाढ दुखतेय का?’
  ‘अजिबात नाही. तिला आताच मी ‘चालभाजा’(भाजलेले तांदूळ) चावताना पाहिलं. जरा वेगळीच समस्या आहे. खरं तर, मला विचारायचं होतं की, तुम्ही ती म्हण नक्कीच ऐकली असणार, ’मस्तवाल गाय असण्यापेक्षा रिकामा गोठा असणे बरे’? हे खरोखरच खरंय का? रिकामा गोठा असण्यापेक्षा मस्तवाल गाय असणे जास्त चांगले नाही का?’
  ‘समजून घ्या, काय कठीण आहे इथं? रिकामा गोठा असणे मस्तवाल गाय असण्यापेक्षा खरोखरच फार चांगले आहे. मस्तवाल गाय पाळण्याचे बरेच तोटे आहेत. ती शिंग मारू शकते, पळून जाऊ शकते, इतरांच्या कुंपणात शिरू शकते आणि दूध द्यायला नकार देऊ शकते. पण तुम्ही तर कधी गाय पाळली नाही, मग तुम्हाला इतकी काळजी कसली?’
  ‘बघा, मी खरं तर गायीबद्दल विचार न करता म्हणीबद्दल करतोय.

  काही दिवसांपूर्वीच, मी अजून एक म्हण ऐकली. ‘मामा नसण्यापेक्षा आंधळा मामा असणे बरे.’ आता मला सांगा, ही म्हणदेखील खरीच आहे का? की अशी हवी, ‘आंधळा मामा असण्यापेक्षा मामा नसणे बरे?’’

  ‘हे सोपंय. मामा नसण्यापेक्षा आंधळा किंवा लंगडा किंवा अगदी ठार वेडा मामा असणे कधीही चांगले; अखेर तो मामाच असेल, हो की नाही? आणि तुम्ही या मामाच्या घरी जाऊ शकता, आणि प्रेमाने मामा म्हणून हाक मारायला कुणीतरी एक व्यक्ती असतेच. इतरही काही फायदे असू शकतात, मी त्यांच्याबद्दल नंतरही विचार करू शकतो. पण हा विरोधाभास नाही का बडोदाबाबू? आधी आपण म्हणतो, ‘मस्तवाल गाय असण्यापेक्षा रिकामा गोठा बरा.’ नंतर आपण म्हणतो, ‘आंधळा मामा असणे मामा नसण्यापेक्षा बरे.’ जरा विचार करा, या दोन्ही म्हणींचे तात्पर्य अगदीच भिन्न नाहीत?’
  ‘हं, मी याबद्दल खरंतर विचारच केला नाही. नेमकं यासाठीच मी असा सकाळीच इकडे आलोय.’
  ‘अच्छा, पण मला सांगा जोगेनबाबू, तुम्ही सकाळी मामांचा आणि गाईंचा का विचार करत बसलात?’
  ‘माझे कनाईमामा आज पहाटे अचानक एक गाय घेऊन आले. ते म्हणाले, “तुझा गोठा रिकामा पाहून मला फार वाईट वाटत होते, तर मी तुझ्यासाठी ही गाय घेऊन आलो. मला फक्त ५००० रुपयांना पडली पण तू मला ५० रुपये कमी देऊ शकतोस. गाय फार उपयुक्त पशु आहे. घरी गाय नसणे काही चांगले नाही.” म्हणूनच मी तुम्हाला विचारावं म्हटलं. मामा नसणे आंधळा मामा असण्यापेक्षा बरे नाही का? की एक मस्तवाल गाय असणे रिकाम्या गोठ्यापेक्षा बरे आहे?’
  बडोदाबाबू कंटाळून म्हणाले, “गाय आणि मामांचा मुद्दा जरा किचकट आहे असं दिसतंय, मला यावर अधिक चिंतन करायला हवं.”

  पण जोगेनबाबू या उत्तराने समाधानी नव्हते. ‘लोकांची काय समस्या असते माहित्ये का बडोदाबाबू? ते विचार न करताच बोलून मोकळे होतात. आधी ते म्हणतात, आंधळा मामा असणे मामा नसण्यापेक्षा चांगले.” नंतर ते म्हणतात, मस्तवाल गाय असण्यापेक्षा गाय नसणे चांगले.” आधी ते म्हणतात असणे चांगले, नंतर ते म्हणतात नसणे चांगले. माझा अगदी गोंधळ उडालाय, यातले काय खरे मानावे?’

  बडोदाबाबूंनी थोडा विचार केला, नंतर म्हणाले, ‘म्हणीमध्ये आपण आंधळ्या मामांबद्दल बोलत आहोत. तिथे डोळे असलेल्या मामांचा उल्लेख नाहीये, पण आंधळ्या मामाचा उल्लेख नक्कीच केलाय. याचा अर्थ धडधाकट मामा असणे गरजेचे नाही, पण एखाद्याला एक आंधळा मामा नक्कीच असला पाहिजे. तुझा मामा आंधळा आहे?’

  ‘नक्कीच नाही. माझे कनाईमामा एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व आहेत, ते आंधळे नक्कीच नाहीत. ते कधी काळी पोलिस अधिकारी होते. त्यांची पोस्टिंग असेल त्या परिसरातले चोर-दरोडेखोर चळाचळा कापायचे. वैतागून ते अन्नपाणी सोडायचे, आपले दुःख जाहीर करायला मोर्चा काढायचे, त्यांना शिव्या द्यायला अगदी एक दिवसही ठरवला होता.’

  चोरी करणे अशक्य झाल्यामुळे, त्यांच्यातल्या काहींनी आत्महत्या केली होती. काहींनी नवा पेशा म्हणून समाजसेवा करायला सुरुवात केली, काहींनी रक्तदान केले आणि काहींनी वेळ घालवायला चित्रकला स्पर्धांचे आयोजनही केले. आजही कुणी त्यांच्या नजरेस नजर भिडवून बोलत नाही. त्यांच्या आदेशाचे त्वरित पालन केले जाते. लोक त्यांना प्रेमाने ‘अतिभयंकर कनाई दरोगा,’ म्हणतात.’
  ‘वाह! तुझा मामा धोकादायच वाटतो.’
  ‘आणि म्हणूनच मला जाणून घ्यायचंय की कनाईमामा असणे चांगले की मामाच नसणे चांगले?’
  ‘हं, योग्य प्रश्न नक्कीच आहे! मला वाटतं की वाईट, रागीट मामा असण्यापेक्षा मामा नसणे चांगलेच. मामा नाही, वांदा नाही.’
  ‘पण अजून एक समस्या आहे.’
  ‘आता परत काय?’
  ‘तुम्हाला माहित्ये, रामखिलावन, आमचा दूधवाला आज सकाळी दूध देताना माझ्या कानात काय कुजबुजला? तो म्हणाला, “साहेब, गाय विकत घेताना काळजी घ्या. तुमच्या मामाने आणलेली गाय आंधळी आहे. तिच्या दोन्ही डोळ्यांमध्ये मोतीबिंदू आहे, तुम्हाला नक्कीच फार त्रास देणार ही.”’
  ‘काय म्हणताय काय! आंधळी गाय!’
  ‘होय, आणि त्यामुळे मला जाणून घ्यायचंय की रिकाम्या गोठ्यापेक्षा आंधळी गाय असणे जास्त चांगले आहे का? तुमच्या माहितीत या विषयावर काही बोलले गेलेय का?’
  बडोदाबाबू गोंधळात पडले, “मस्तवाल गाईंबद्दल बरंच काही बोललं गेलंय पण आंधळ्या गाईंबद्दल काहीच नाही. पण, भल्या पहाटे तुमच्या या मस्तवाल मामा आणि आंधळ्या गाईंमुळे तुम्ही एक गुंतागुंतीचा प्रश्न निर्माण केलाय खरा!”
  ‘नक्कीच, पण अजून एक म्हण आहे, जिथे मामा आणि भाचा एकत्र येतात तिथे कोणतेही संकट फिरकत नाही. बरोबर?’
  ‘बरोबर आहे.’
  ‘तर?’
  ‘या म्हणी चुकीच्या नाहीत. माझे कित्येक मामा आहेत, शिबूमामा, चित्तूमामा, राममामा, रघूमामा, निरूमामा, जिष्णूमामा, ज्योतीमामा. पण त्यांच्यापैकी कुणीही मला पहाटे आंधळी गाय विकायचा प्रयत्न केला नाही. आणि त्यांच्यापैकी कुणीही रागीट किंवा पोलिस अधिकारी नाही. पण माझ्या लक्षात येतंय की, तुम्हीच साध्या गोष्टींमधून गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण करायचा प्रयत्न करताय.’
  “तुम्ही माझ्यावर का चिडताय बडोदाबाबू? मी असे काय प्रश्न उभे करतोय?” जोगेनबाबूंनी हताशपणे विचारले.
  ‘खरंच का? प्रश्न उभे करणे तुमची सवयच आहे. आपण मस्तवाल गाईंबद्दल आणि आंधळ्या मामांबद्दल ऐकले आहे. आता तुम्ही चर्चेत आंधळ्या गाई आणि मस्तवाल मामा आणल्यामुळे, इतका गुंता निर्माण केलाय की माझे डोके गरगरतेय. मला किराणा दुकानातून काय विकत आणायचे होते ते मी पूर्णपणे विसरलोय. माझ्या रागाचा पारा चढला की माझी भूक मरते आणि झोप उडते. परवा सकाळीच तुम्ही येऊन मला अचानक तिलक-कामोद आणि पिलू रागातील फरक स्पष्ट करायला सांगितलं होतंत. अशा प्रश्नांनी एखाद्या व्यक्तीचे काळजाचे ठोके चुकतील! अद्याप माझा संताप उतरलेला नाहीये आणि तुम्ही मस्तवाल मामा आणि आंधळ्या गाईंचे अधिकचे प्रश्न घेऊन आलात!’
  ‘शांत व्हा. तुम्ही शहाणे आहात, म्हणूनच लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्यापाशी येतात. परवाच किती सहजपणे तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले होते. तुम्ही म्हणाला होतात की पिलू आणि तिलक-कामोदमधील फरक हा भोपळा आणि भेंडीतील फरक आहे, किंवा चितळमासा आणि बोंबिलातला आहे किंवा अस्वल आणि गोरिल्ल्यातला आहे. म्हणाला होतात ना?’
  ‘हो, बरोबर.’
  ‘आणि तुम्ही हेदेखील सांगितलं होतं की, जर जगात पिलू हाच एकमेव राग असता, तर तिलक-कामोदची गरज पडणार नाही. जर माणसाला फक्त तिलक-कामोद ऐकून समाधान मिळणार नसेल, तर तो पिलू ऐकेल, बरोबर?’
  ‘मला वाटतं असं मी बोललो होतो खरा.’
  ‘आणि नंतर तुम्ही म्हणालात की जर पिलू हाच तिलक-कामोद असता तर पिलूमध्ये वेगळा असा ‘पिलूपणा’ नसता आणि जर तिलक-कामोद पिलू असता तर त्यानेसुद्धा त्याचा तिलक-कामोदपणा हरवला असता, बरोबर?’
  ‘कदाचित मी म्हणालो असेन’, बडोदाबाबू कंटाळले होते. तुमच्या स्पष्टीकरणामुळे ही गोष्ट एकदम लख्खपणे लक्षात आली आणि माझा तो पूर्ण दिवस झकास गेला. पिलू आणि तिलक-कामोद शांत झालेत, त्यांच्यात आता कसलाही वाद नाही आणि म्हणूनच मी तुमच्याकडे आलोय. माझी सध्याची परिस्थिती गृहीत धरता, तुम्हाला काय वाटते की, “मामा-भाचे एकत्र आले की कोणतेही संकट फिरकूही शकत नाही,” ही म्हण बरोबर आहे? काही लोक याच्या अगदी विरुद्ध म्हणतात.’
  ‘काय म्हणतात ते?’
  ‘ते म्हणतात, यम, जावई आणि भाचा कधीही तुमचे होत नाहीत.’
  ‘ते खरंच आहे, मान्य आहे मला.’
  ‘लोकांनी अशा अगदी विरुद्धार्थी गोष्टी म्हणायलाच हव्यात का? अशामुळे मामा-भाच्यांच्या प्रेमळ नात्यात शतकानुशतके विष कालवले जात आहे. आणि आपल्या देशाच्या सध्याच्या भयंकर परिस्थितीला हे असे जहरी संबंधच थेट जबाबदार नाहीत का? सगळीकडे आपण कायद्याची पायमल्ली करणे, चोऱ्यामाऱ्या आणि खोटारडेपणा बघतो, हे सगळे निश्चितच अशा गोंधळात पाडणाऱ्या म्हणींमुळेच घडत आहे. आणि हे सगळे प्राचीन काळापासून चाललंय.’
  ‘जोगेनबाबू, माझं डोकं गरगरतंय आणि मला घेरी आल्यासारखी वाटतीये.’
  ‘हो, मला थोड्या वेळापूर्वी अगदी असेच वाटत होते. कनाईमामा दूधपोह्यांची न्याहारी करत आहेत. लवकरच ते गाईकरिता दिलेले पैसे घेऊन निघून जातील. म्हणूनच मी तुमच्याकडे पळत आलोय. बडोदाबाबू, जर तुम्ही मला ५००० रुपये उसने देऊ शकलात, तर मी तुमच्या आजन्म ऋणी राहीन हो!’

  - संकेत मालती भरत, भंडारा

Trending