आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रातील 'आनंद कुमार': पदरमोड करून हजारो विद्यार्थी घडवणारा ‘गरिबांचा शिक्षक’; ११ विद्यार्थी विदेशात कार्यरत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालन्यात माेफत काेचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणारे संताेष जाधव. - Divya Marathi
जालन्यात माेफत काेचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणारे संताेष जाधव.

जालना - गरीब मुलांना आयआयटीसाठी मोफत शिकवणी देणाऱ्या आनंदकुमार यांच्यावरील ‘सुपर थर्टी’ या चित्रपटाची सध्या देशभरात चर्चा आहे. आनंदकुमार यांंच्याप्रमाणेच जालन्यातील शिक्षक संतोष जाधव यांनीही हजारो मुलांना मोफत शिकवणी देऊन उच्चशिक्षित केले आहे. दोन वेळ पोटाची उपासमार असलेल्या विद्यार्थ्यांना तर त्यांनी आपल्या घरातच आश्रय दिला. गेल्या १९ वर्षांपासून त्यांचे हे कार्य सुरू असून सध्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांत त्यांचे विद्यार्थी उच्च पदावर, तर ११ विद्यार्थी विदेशात कार्यरत आहेत. जाधव यांची ‘गरिबांचे शिक्षक’ म्हणून ओळख आहे. मोदीखाना परिसरात राहणारे संतोष जाधव यांचे शिक्षण बीकॉमपर्यंत झाले. बालवयातच वडिलांचे छत्र हरवल्याने आईने धुणीभांडी करून शिकवले. घरात हातभार असावा या उद्देशाने पदवीच्या प्रथम वर्षात असतानाच त्यांनी घरातच शिकवणी सुरू केली. मात्र, अनेक विद्यार्थी शिकवणीसाठी पैसे नसल्याने क्लास सोडत असल्याचे त्यांना जाणवले. त्यामुळे त्यांना ते मोफतच शिकवू लागले. वर्षभरातच त्यांच्याकडे पहिली ते दहावीचे सुमारे ५००विद्यार्थी झाले. दोन वेळच्या जेवणाचीही व्यवस्था नसल्याने काही विद्यार्थी शाळा सोडून बालकामगार म्हणून काम करत असल्याचे पाहून त्यांनी अशा विद्यार्थ्यांना आपल्याच घरात आश्रय दिला. अशा प्रकारे दरवर्षी १० ते ११ विद्यार्थी त्यांच्याकडेच राहत, तर काहींची जेवणाची सोय केली. कोणत्याही परिस्थितीत या मुलांना शिकवायचेच असा त्यांनी निश्चय केल्याने अनेक अडचणी आल्या, परंतु त्यांनी आपला संकल्प सोडला नाही. २-३ वर्षांत तर एकाही विद्यार्थ्याकडून शुल्क आले नाही, परंतु त्यांनी कारखान्यात अर्धवेळ काम करून क्लास सुरू ठेवला. या प्रयत्नाला ५ वर्षांपासून चांगले फळ मिळत असून अनेक विद्यार्थ्यांना मोठ्या कंपन्यांत नोकरी मिळवली आहे. पुढे इंिजनिअरिंग केलेले अनेक विद्यार्थी विदेशात मोठ्या हुद्द्यावर आहेत. त्यांच्याकडे शिकलेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती पाहून अनेक श्रीमंत पालकांनी २५ ते ५० हजार रुपये शुल्क देण्याची तयारी दाखवत आपल्या मुलांची शिकवणी घेण्याची विनंती केली. मात्र जाधव यांनी त्यांना नम्रपणे नकार देत केवळ गरिबी हाच निकष असल्याचे नम्रपणे सांगितले. 

 

मी जे भाेगले त्याची जाणीव म्हणून हे कार्य
मी ज्या परिस्थितीतून आलो त्याची जाणीव ठेवून हे करताेय. या कामात आईने मोठी मदत केली. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना घरात ठेवता आले. आज ही मुले शिकून मोठी झाली आहेत व मोठ्या पदावर आहेत. ती मुलेही मला विसरली नाहीत. ते त्यांच्या आईवडिलांप्रमाणे माझी विचारपूस करतात, शिवाय मदतही करतात. आयुष्याकडून यापेक्षा आणखी काय अपेक्षा करायची?
- संतोष जाधव, शिक्षक

 

विद्यार्थ्यांकडूनही उतराई : मणक्याच्या अाजारावर उपचारासाठी ४ लाख खर्च
संतोष जाधव यांच्या ऋणाचे उतराई होण्यासाठी काही विद्यार्थी त्यांना अाता आर्थिक हातभार लावत आहेत.  जे विद्यार्थी जाधव यांच्या घरात राहूनच शिकले ते त्यांचा मुलांप्रमाणे सांभाळ करीत आहेत. गेल्या वर्षी जाधव यांना पाठीच्या मणक्याचा त्रास होता. हे दुखणे वाढल्याचे लक्षात येताच जवळपास चार लाख रुपये खर्च करून विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर उपचार केले.