Magazine / सावधान... माउंट एव्हरेस्टवरही ‘ट्रॅफिक जाम’ होतोय!

एव्हरेस्ट सर करणाऱ्यांची संख्या अचानक वाढू लागल्याने ट्रॅफिक जामची समस्या उद्भवू लागली असून या मोसमात तब्बल ११ गिर्यारोहकांना आपले प्राण गमावावे लागले आहेत

संतोष काळे

Jul 14,2019 12:10:00 AM IST

जगातील सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट फत्ते करण्यासारखा दुसरा कोणताच मोठा आनंद गिर्यारोहकांसाठी नाही. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या आनंदावर विरजण पडायला सुरुवात झाली आहे. एव्हरेस्ट सर करणाऱ्यांची संख्या अचानक वाढू लागल्याने ट्रॅफिक जामची समस्या उद्भवू लागली असून या मोसमात तब्बल ११ गिर्यारोहकांना आपले प्राण गमावावे लागले आहेत... आणि हीच नेमकी चिंतेची बाब आहे.

"एव्हरेस्टच्या डेथ झोनमध्ये जवळपास ३०० गिर्यारोहक रांगेत एव्हरेस्टवर चढण्या-उतरण्याची प्रतीक्षा करत आहेत' अशा मजकुरासह गिर्यारोहक निर्मल पुर्जाने गेल्या महिन्यात सोशल मीडियावर एक छायाचित्र अपलोड केले... त्याच कालावधीत एकापाठोपाठ एक अशा तब्बल ११ गिर्यारोहकांचा एव्हरेस्टवर मृत्यू झाला आणि आणि सबंध जगभरात खळबळ उडाली. एव्हरेस्ट सर करताना जे मृत्युमुखी पडले त्यापैकी सात गिर्यारोहक हे भारतीय होते. "माऊंट एव्हरेस्टवर ट्रॅफिक जाम' असा हॅशटॅग सुरू झाला आणि अनेक खऱ्या-खोट्या कहाण्या बाहेर पडायला लागल्या... कोणीतरी म्हणायला लागले की, बाजूला पडलेल्या गिर्यारोहकाच्या प्रेताला ओलांडून एव्हरेस्टवरून खाली उतरावे लागले तर नेपाळ सरकारच या दुर्घटनेला कारणीभूत आहे अशीही प्रतिक्रिया उमटायला लागल्या.
मे महिना हा एव्हरेस्ट सर करण्याचा मुख्य हंगाम. दरवर्षीप्रमाणे या माेसमातही जगभरातून ३०० पेक्षा जास्त गिर्याराेहक एव्हरेस्ट शिखर गाठण्याच्या जिद्दीने अाले हाेते. १९ ते २९ मे या कालावधीत "वेदर विंडाे अाेपन' (गिर्याराेहणासाठी अनुकूल कालावधी) असल्याने सर्व गिर्याराेहकांनी प्रस्ताराेहणाला सुरुवात केली. प्रस्ताराेहणााची माेहीम सुरू असतानाच साऊथ काेल बाजूकडील हिलरी स्टेप भागात गिर्याराेहकांची अचानक गर्दी झाली. शिखर चढणाऱ्या अाणि उतरणाऱ्या गिर्याराेहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्या पाठाेपाठ ११ गिर्याराेहकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्याही अाल्याने जगभरातील गिर्याराेहक हबकून गेले.


एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी दोन मार्ग आहेत. त्यातील पहिला तिबेटच्या दिशेने येणारा सुलभ असा उत्तर मार्ग आणि दुसरा नेपाळच्या सोलखुम्बू भागातून जाणारा पारंपारिक दक्षिण मार्ग. नेपाळच्या दिशेने येणारा मार्ग चढाईच्या दृष्टीने कठीण असला तरी बहुतांश युरोपिय आणि भारतीय गिर्यारोहकांसाठी तोच पसंतीचा मार्ग आहे. तिबेटकडून येणाऱ्या मार्गाच्या तुलनेत या मार्गावर मार्गदर्शन करणारे शेरपा आणि अन्य सुविधा सहज उपलब्ध होतात आणि सगळ्यात मुख्य म्हणजे एव्हरेस्ट गिर्यारोहणासाठी नेपाळ सरकार कडून परवानगी मिळणे सहज सोपे जाते. वास्तविक एव्हरेस्ट मोहिमेला जाण्यासाठी विशिष्ट परवाना दिला जातो आणि त्याची संख्याही कमी असते. या वर्षीच्या हंगामासाठी नेपाळ सरकारने एकूण ३८१ परवाने दिले हाेते. एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करण्यासाठी चीनच्या दिशेनेही अनेक गिर्याराेहक तयार होते तर काही साऊथ काेलच्या दिशेने एव्हरेस्ट चढण्यासाठी सज्ज हाेते. त्यामुळे हिलरी स्टेप भागात एकाच ठिकाणी ३०० पेक्षा जास्त गिर्याराेहक जमले. हिलरी स्टेप हा साऊथ काेल बाजूचा गिर्याराेहकांचा परंपरागत मार्ग अाहे. एव्हरेस्ट शिखरावर जाण्यासाठी असलेल्या या एकमेव अशा अत्यंत चिंचाेळ्या मार्गावरून एकावेळी एकच गिर्याराेहक चढाई करू शकताे किंवा उतरू शकताे. नेमके याच ठिकाणी ३०० पेक्षा जास्त गिर्यराेहक अडकून पडले. चढण्यासाठी किंवा उतरण्यासाठी या पर्यटकांना बराच काळ प्रतीक्षा करावी लागली. ८००० मीटर उंची पार केल्यानंतर गिर्याराेहकाने एक प्रकारे डेथ झाेनमध्ये प्रवेश केलेला असताे. या भागात प्राणवायूचे प्रमाण अतिशय कमी असते. गिर्याराेहकांकडे असलेला प्राणवायू फक्त दहा तासांपर्यंत पुरताे. अाठ हजार मीटरपर्यंत तुमचे शरीर तुम्हाला साथ देते. पण त्याहीपेक्षा जास्त उंचीवर गेल्यानंतर शरीर अाणि मेंदू यांचा संपर्क तुटताे. तुम्हाला जिवंत रहायचे असेल तर सारखे चालत रहावे लागते. हिलरी स्टेपवर अडकलेल्या गिर्याराेहकांच्याबाबतीत नेमके तेच झाले. चढण्या-उतरण्यासाठी बराच काळ त्यांना प्रतीक्षा करावी लागली. परिणामी त्यांच्याकडचा प्राणवायूचा साठा संपत अाला अाणि हवामानाचा सामना करण्यात ते अपयशी ठरले. या संदर्भात एव्हरेस्ट सर केलेल्या काही गिर्यारोहकांशी संवाद साधला असता ट्राफिक जॅम आणि परवान्यांच्या जास्त संख्येमुळे गिर्यारोहकांचा मृत्य झाल्याचा मुद्दा त्यांनी खोदून काढला.


पुण्याचे अभियंते राहुल इनामदार याच मे महिन्यात एव्हरेस्टवर प्रस्तारोहण करून आले. इनामदार म्हणाले की, या घटनेबद्दल चुकीचे संदेश जात आहेत. यावर्षी मात्र फॅनी वादळामुळे गिर्यारोहकांना पाच दिवस कोठेच हलता आले नाही आणि सगळे तंबू वाऱ्याने उडून गेले होते. या वर्षी १५ ते १७ मे अशी तीन दिवस वेदर विंडो खुली होती. १८ ते २० मे कालावधीत खूप वारे वाहत होते. २२ते २४ मे पुन्हा विंडो खुली झाली. त्यामुळे प्रस्तारोहणासाठी फक्त ५ ते ६ दिवसांचा कालावधी मिळाला. शिखर चढण्यासाठी सगळे एकाच वेळेला निघाल्यामुळे गिर्यारोहकांच्या रांगा लागल्या. हिलरी स्टेपचा भाग खूपच निमुळता असून शिखर चढण्यासाठी व उतरण्यासाठी तो एकच मार्ग आहे. त्यामुळे ट्राफिक जॅम होणे नॉर्मल गोष्ट आहे.त्यातच कोणीतरी कोणत्याही परिणामांचा विचार न करता फोटो काढला. गर्दी झाल्यावर त्या ठिकाणी प्रतीक्षा करताना बऱ्याच जणांची ऊर्जा संपली आणि त्याची प्रकृती नकारात्मक झाली. फॅनी वादळ आले नसते तर गिर्यारोहकांना जास्त वेळ मिळाला असता.


गेल्या वर्षी एव्हरेस्ट सर करणाऱ्या अाैरंगाबादच्या तरुण गिर्याराेहक मनिषा वाघमारे म्हणाल्या की, एव्हरेस्टवर गर्दी ही नवीन गाेष्ट नाही. २०१७, २०१८ अाणि या वर्षीही तेवढीच गर्दी अाहे. अपघात हाेण्यासाठी वेगवेगळी कारणे अाहेत. त्यातील मुख्य कारण म्हणजे प्राणवायूची कमतरता. ट्रॅफिक जॅम झाल्यावर अर्धा ते पाऊण तास जरी वर थांबायला लागले तर शरीर काम करत नाही, ते एक्झाॅस्ट व्हायला लागते. जिवंत रहायचे असेल तर शरीराची हालचाल करणे, टाळ्या वाजवणे, हातपाय हलवणे यासारख्या गाेष्टी कराव्या लागतात. व्यावसायिक गिर्यराेहकांना अशा अाणीबाणीच्या स्थितीत काय करावे लागते याची माहिती असते. त्यामुळे हिलरी स्टेपवरच्या व्यावसायिक गिर्याराेहकांनी त्या केल्याही असतील. महत्वाची गाेष्ट म्हणजे एव्हरेस्ट सर करण्यामध्ये हाैशानवशा गिर्यराेहकांची संख्या वाढत चालली अाहे. यंदा एव्हरेस्टला गेलेल्या एकूण गिर्याराेेहकांमध्ये ५७ टक्के व्यवसायिक गिर्यारोहक होते बाकीचे ४३ टक्के गिर्यारोहक नवखे होते. यातील बरेचसे गिर्यारोहक बेसिक ऍडव्हान्स कोर्स करतात आणि सरावासाठी हिमालयाची कोणतीच मोहिम न करता थेट एव्हरेस्टला गवसणी घालायला येतात हिच चिंतेची बाब आहे.


एव्हरेस्टकडे आकर्षित होणाऱ्यांच्या संख्येतील प्रचंड वाढीमुळे या मोहिमांना 'मागणी तसा पुरवठा' हे व्यापारातील तत्त्व लागू झालेले आहे. यात अनेकांचे आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत. त्यामुळेच एव्हरेस्ट आरोहण हा आता केवळ अनुभवी व प्रशिक्षित गिर्यारोहकांचा साहसी खेळ राहिला नसून, एव्हरेस्ट शिखर चढाई हे एव्हरेस्ट टुरिझमचा भाग झाले आहे.

लेखकाचा संपर्क - ९५९४९९९४५०

X
COMMENT