आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिवर्तनाची पहाट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहुजन समाजातील महिलांना साहित्यात व्यक्त होण्याचे व्यासपीठ मिळावे या हेतूने लातूर जिल्ह्यातील मुरूड येथे नुकतंच मराठवाडा बहुजन साहित्य संमेलन आयोजिण्यात आलं होतं, त्याविषयी...


भा रतात स्त्रियांना शिक्षणाची कवाडे उघडी करून महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी स्त्रीमुक्तीचा पाया रचला. छत्रपती शाहू महाराजांनी महिला आणि दलितांना आरक्षण देऊन या वंचित समाजाला प्रवाहात येण्याची एक संधी दिली, तर स्वतंत्र भारताची घटना लिहिताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे अधिकार देऊन समस्त महिलांना सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय अशा सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून मुक्त केले आहे. मात्र, अजूनही साहित्यात महिलांचा म्हणावा तसा सहभाग दिसत नाही. हाच धागा पकडून बहुजन समाजातील महिलांना साहित्यात व्यक्त होण्याचे व्यासपीठ मिळावे या हेतूने लातूर जिल्ह्यातील मुरूड येथे नुकतंच एकदिवसीय पहिलं मराठवाडा बहुजन साहित्य संमेलन आयोजिण्यात आलं होतं.


बहुजन समाजातील महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी संमेलन आयोजित करावे, असे संमेलनाध्यक्ष अनिता जावळे या शिक्षिकेला वाटले. एक दिवस मैत्रिणींमध्ये चर्चा सुरू होती. विषय होता गावात विविध जयंतीनिमित्त तरुण मंडळी निधी जमवतात व ती साजरी करतात. यालाच एक वेगळं वळण देऊन मोठ्या धर्तीवर एखादे संमेलन घेता येईल का, अशी चर्चा या महिला व तरुणांमध्ये झाली व यातूनच राज्यातील पहिल्या बहुजन महिला साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली गेली. बावीस मैत्रिणींनी एकत्र येऊन आयोजित केलेले मराठवाडा बहुजन महिला साहित्य संमेलन घेण्यामागचा उद्देश होता महिलांना स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून वाव देणं, बहुजन महिलांनी वाचतं आणि लिहितं व्हावं, इतिहासाच्या पानावर महिलांचं साहित्य सशक्त दर्जेदारपणे पोहोचवणं, महिलांमध्ये साहित्यविषयक अभिरुची निर्माण व्हावी, यासोबतच मनोरंजनातून ज्ञानप्रबोधन करणं.

संमेलनाची सुरुवात सकाळी ग्रंथदिंडीने, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवाद करून झाली. यामध्ये जि.प.प्रा.शा बोरगाव काळे येथील विद्यार्थी चमूच्या लेझीम पथकाने मुरूडकरांचे लक्ष वेधले. ग्रंथदिंडीची सांगता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली.
अनिता जावळे म्हणाल्या की, शिक्षित होणे आणि साक्षर होणे यात जमीन-अस्मानाचा फरक आहे, हे सतत मला जाणवत होतं. शिकण्यातदेखील सृजनता असायला हवी आणि साहित्यात सृजनता असायला हवी. साहित्याची आवड सर्वांनाच असते. जेव्हा मी साहित्याचा विचार करू लागले तेव्हा साहित्य क्षेत्रात बहुजन साहित्यातील महिलांचं योगदान खूपच कमी असल्याचं जाणवलं. बोटावर मोजता येईल एवढीच नावे घेता येतील - ऊर्मिला पवार, प्रज्ञा पवार, लता ऐवळे, ज्योती म्हापसेकर, वृंदा प्र.नि. अशी माेजकी नावं. हे संशोधन करण्यासारखेच आहे. महिलांचं साहित्य पुरुषांच्या तोडीस तोड असायलाच हवं. महिलांच जगणं, त्यांच्या समस्या महिलांनीच मांडायला हव्यात. ते प्रभावी ठरू शकेल. महिला किती प्रमाणात स्वतंत्र झाली आहे? अनेक समस्यांचे भांडार आहे तिच्यासमोर. लहान वयात अजूनही मुलींची लग्नं होत आहेत. ग्रामीण भागातील शिक्षणाचे प्रमाण कमीच आढळते आहे. आणि बहुजन महिलांचे तर काय हाल ते सांगायला नको.
संमेलनाध्यक्ष प्रा. रेखा मेश्राम म्हणाल्या की, अगदी पाचवीत शिकत असलेल्या मुलींची लग्नं ठरतात. बालविवाह आजच्या एकविसाव्या शतकात सुशिक्षित समाजाला भेडसावणारी बाब आहे. याला तोंड देण्यासाठी समाज प्रबोधनाची नितांत आवश्यकता आहे. या संमेलनातून नक्कीच या विषयाला दिशा देणारे काम उभे राहील. आपण वाचतो लिहितो, पण साहित्यात माहिलांचे योगदान किती, हा प्रश्न संशोधनाचा आहे. डॉ. बाबासाहेबांच्या विचारातील महिला एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असणारी आहे. बाबासाहेबांना वाचायला हवं, तेव्हा कळेल की, बाबासाहेबाचे विचार संपूर्ण मानव जातीच्या हिताचे आहेत.
पहिल्या सत्रात साहित्य क्षेत्रातील बहुजन महिला योगदान व डॉ. बाबासाहेबांच्या विचारातील आधुनिक महिला या विषयावर परिसंवाद होता. यात प्रा. रेखा मेश्राम, अनिता कांबळे (रायगड), अॅॕड. भारती रोकडे (उस्मानाबाद), प्रा. मीनाक्षी पाटील /काळे (बिदर, कर्नाटक) सहभागी झाल्या. यात मेश्राम यांनी साहित्यातील महिलांच्या स्थानाविषयी विचार मांडले. दलित साहित्य महाराष्ट्रात निश्चितच वेगळ्या उंचीवर आहे. दलित समाजातील महिलांनी अधिकाधिक समोर येऊन आपले अनुभव शब्दरूपात मांडणे गरजेचे आहे. सामाजिक उतरंडीत सर्वच क्षेत्रांत दलित महिलांची कुंचबणा होत आलेली आहे.याला वाचा फोडून पुस्तकरूपाने व्यक्त होण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या. अनिता कांबळे म्हणाल्या की, आकाराने अतिशय लहान असलेली चिमणी प्रचंड मोठा विचार घेऊन पुढे जात आहे. हाच विचार घेऊन महिलांनी आपापल्या क्षेत्रात उंच भरारी घेणे अपेक्षित आहे. आधुनिक काळातील मुलींनी वंचित समाजातील महिलांच्या समस्या अभ्यासून त्या प्रस्थापित समाजव्यवस्थेसमोर मांडण्याची जबाबदारी घ्यावी, जेणेकरून एक परिवर्तनवादी चळवळ उभी राहील.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील आधुनिक महिला या विषयावर बोलताना अॅड. रोकडे म्हणाल्या, "शास्त्र सांगतं की, उपाशी राहून मेंदू कामच करू शकत नाही, त्यामुळे महिलांनी कशाला करायला हवे उपवास. पार्लरमध्ये न जाता शाहू-फुले-आंबेडकर विचारांची पुस्तके खरेदी करा, तेव्हा त्यांंचा विचार आपणास कळणार आहे. महिला दोन्ही कुळांचा उद्धार करते तर कायद्याने पती आणि वडील वारसा हक्क बाबासाहेबांच्या कायद्याने दिला आहे. महिलांना भलेही दागिने व वारस हक्क न मिळो, पण एक तरी पदवी नक्की मिळवायला हवी. स्वतंत्र व्यक्ती म्हणून महिलांनी समोर यायला हवं.
दुसऱ्या परिसंवादात प्रा. मीनाक्षी पाटील यांनी हिंदू कोड बिलाच्या संदर्भात सखोल माहिती सांगितली. डॉ. आंबेडकरांनी भारतीय स्त्रियांवर अनेक उपकार करून ठेवले आहेत. परंतु आजसुद्धा प्रसारमाध्यमे आणि स्त्रीवादी लेखक / लेखिका सोयीस्कररीत्या बाबासाहेबांच्या या एकहाती लढ्याबद्दल लिहीत नाहीत. बाबासाहेबांना एक "राष्ट्रनिर्माते’ म्हणून न मानता फक्त दलित नेता असे भारतीय समाजावर कायमचे बिंबवण्याचे हे षड््यंत्र आहे. भारतीय स्त्रियांच्या जीवनात क्रांतिकारी बदल आणू पाहणाऱ्या हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्याची म्हणावी तशी दखल आपल्या भगिनीवर्गाने घेतलेली नाही, असे त्या म्हणाल्या.
तिसऱ्या परिसंवादात लातूरच्या वृषाली पाटील स्त्री-पुरुष समानता यावर बोलताना म्हणाल्या की, आज समाजात स्त्री-पुरुष समानता रुजवणे गरजेचे आहे. सातत्याने महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार बघता सामाजिक दांभिकता वाढलेली आहे. यासाठी महिलांनी समोर येऊन व्यक्त होणे गरजेचे आहे.
यानंतर कविकट्टा झाला. यामध्ये भारती रोकडे, बालाजी इंगळे, विमल मुदाळे, संध्याराणी कोल्हे, अनिता कांबळे, शाहिन शिकलकर, विशाल अंधारे, विमल मुदाळे, मीनाक्षी पाटील, रेजा पायाळ यांनी कविता सादर केल्या. वारंवार महिलांवर जे अन्याय व अत्याचार केले गेले त्याची जाणीव शब्दांमधून होत होती.
उदाहरणार्थ क्रांती दिलीप ढगे यांची ही कविता.
भेदभाव
जन्माला घालावं एवढंच एक मागणं; पटतं का तुम्हाला तरी तुमचं असलं वागणं?
मुलगा झाला म्हणून आनंदाने नाचणं अन् मुलगी झाली म्हणून नशिबाला कोसणं.
मुलगा म्हणजे दिवा वंशाचा, मुलगी म्हणजे विचार पैशांचा.
माझं जे जे काही ते सर्व मुलाचं, अन् मुलगी म्हणजे जणू ओझं खांद्यावरचं!
मुलासाठी असतं काॅलेज आणि स्कूल, मुलींसाठी फक्त चूल आणि मूल.
मुलासाठी करता उभी मोटारसायकल दारी, आणि मुलींना म्हणता तू बस घरी.
जन्माला घालावं एवढंच एक मागणं; पटतं का तुम्हाला तरी तुमचं असलं वागणं??
मुलगा मोठा होतो आॅफिसात जातो, तोच एक दिवस तुम्हाला वृद्धाश्रमात नेतो.
ज्याच्यासाठी करता तुम्ही रक्ताचे पाणी, मौल्यवान असतात त्याला फक्त नाणी!
आई-वडील मुलांसाठी मनामध्येच झुरतात, मुलं मात्र आयुष्याचा खेळ हरतात.
म्हणूनच तर म्हणते-
एकदा तरी जन्माला घालून तिला बघा! देणार नाही कधीच तुम्हाला ती दगा.
आपल्या अगोदर ती, तुमचा विचार करेल 
तुम्हाला जिंकवण्यासाठी अख्खा जगाशीही लढेल!
असते तीही तुमचीच, तिला आपलं म्हणा
उद्धार करेल कुळाचा, तीच एक दिवस पुन्हा.
जन्माला घालावं एवढंच एक मागणं; 
पटतं का तुम्हाला तरी, तुमचं असलं तरीही.

 

santoshmusle1515@gmail.com
 

बातम्या आणखी आहेत...