आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sanyogita Dhamdhere Write About 'expenses In Big Personalities Wedding'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खर्च आमचा, हा त्रास का तुमचा ?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक मन होतं बहिणाबाईचं. त्यांच्या काळाप्रमाणे किती वेळा हाकललं तरी तयार झालेल्या धान्याच्या लालसेने परत परत पिकावर येणाऱ्या ढोरासारखं येत होतं. आजही मनाचा स्वभाव काही बदलला नाही, मन चंचल आहे पण त्याच्या चंचलतेचा वेग आणि त्याला भुलवणारी आकर्षणं आता पाखरं आणि ढोराच्या उपमेच्या योजनेपलीकडे धावू लागलं आहे. आज ते असं एका परिघात तिथल्या तिथे चकरा मारत नाही, सैराट धावत असतं. त्याची आकर्षणंही आहेत चकचकीत, निमिषार्धात डोळे दिपवणारी, तरीही फिरून फिरून भुलवतील, खेचून घेतील अशी नाही. म्हणून आजचं मन आहे एका आलिशान वेगवान गाडीसारखं, भरधाव वेगाने चारी दिशांना धावणारं. तसंच मन हे हृदय आणि मेंदू यांच्याहून वेगळं पण हृदयाच्या जवळचं म्हणून लालचुटुक रंगाची फेरारी ही उपमा आजच्या मनाला चपखल आहे. एका श्रवणीय बंगाली गाण्यात ‘फेरारी मन’ ही कल्पना ऐकली त्या क्षणी मला  त्याची भुरळ पडली.

 

कोणत्याही क्षेत्राची ‘माहिती’ करून घ्यायला आभासी आणि प्रत्यक्ष जगात भटकायलाही आज नानाविध साधनं उपलब्ध आहेत. अगोचर मन सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या जाळ्यात कधी कुठे जाऊन अडकेल याचा नेम नसतो. मुक्त निवडस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती आणि मोफत सेवा या भुलाव्यात मन इथे जास्त रमतं. वेळ, पैसा असे काही निर्बंध इथे कुचकामी ठरतात. या मुक्त व्यासपीठाच्या भूलभुलैयात तुमची आवड असो नसो, जाणीवपूर्वक निवड न करताही प्रत्यक्ष जगणे आणि आभासी जग यात मार्केटप्रणित काही विषय सतत आपल्यावर आदळत असतात. त्यातला सध्याचा विषय आहे लग्न! लग्न म्हणजे नातेसंबंध नव्हे, विवाह वा लग्नविधि!

 

हो तेच ते. रणवीर-दीपिका यांची संजय लीला भन्साळी जोडीला साजेशी लग्नसोहळ्याची झकपक मालिका, प्रियांका-निक लग्नाचा दिमाखदार आंतरराष्ट्रीय इव्हेंट आणि अंबानी-पिरामल यांचा ‘वड्डे लोगों की वड्डी बाते’ प्रदर्शनीय लग्नसोहळा तर सायना-कश्यप या बॅडमिंटन जोडप्याचा बाकीच्या सोहळ्यांच्या तुलनेत राज्यस्तरीय सामना आणि सहा मुलांचे आईबाप असलेले ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोली यांची लग्नानंतरची अपरिहार्य पुढची गोष्ट म्हणजे घटस्फोट यांची जोरदार चर्चा चालू आहे. 

 

काही लोकांना अशी खर्चिक, बेतलेली लग्न करणाऱ्यांचा भारी राग आला आहे. देशात दुष्काळ असताना, शेतकरी आत्महत्या करत असताना संपत्तीचं असं बीभत्स प्रदर्शन करणं हा गुन्हा आहे असं वाटतंय. पण खरं तर ही खर्चिक वाटणारी ही ‘डेस्टिनेशन’लग्न कमी खर्चिक असतात असं या क्षेत्रातल्या व्यावासायिकांचं मत आहे. ज्या ठिकाणी म्हणजे इटली, जयपूर, उदयपूर, गोवा आदी ठिकाणी होणाऱ्या हॉटेलमध्ये जास्त लोकांची राहण्याची व्यवस्था होऊ शकत नाही म्हणून कमी लोकांना आमंत्रित केलं जातं. ‘दीपवीर’च्या इटलीच्या लग्नाला फक्त ३० लोक गेले होते म्हणे. ‘आमच्याकडे तर लग्नात एव्हढे लोक लग्नात रुसून बसतात!’ हा संदेश व्हॉटसअॅपवरून गरागर फिरला. 

 

अंबानी हे जगातले सर्वात श्रीमंत कुटुंब असल्याने त्यांचा तळागाळातल्या लोकांशी काहीही संपर्क नाही असं उगाचच काही लोकांना वाटत असतं. ते धादांत खोटं आहे. आज कोणत्याही वस्तीत, कार्पोरेट, सामजिक संस्थेतल्या लोकांच्या फोनमध्ये डोकावून पाहिलं तर अंबानीची लग्नपत्रिका, मुलीचा ब्लाउज, दागिने, जेवणाची पंगत, पंगतीचे वाढपी असं सगळं पाहायला मिळेल. एवढी पारदर्शकता असताना त्यांना ‘एलिट’ म्हणून हिणवणं बरं दिसतं का? त्या बिचाऱ्या दांपत्याने त्यांच्या एकूण संपत्तीच्या केवळ २ टक्के पैसे मुलीच्या लग्नावर खर्च केला आणि आपल्या राहत्या घरात मांडव घालून लग्न केलं तरी लोकांच्या पोटात दुखलं. आता आमीर, अमिताभला तुम्ही आम्ही पंगतीत वाढायला बोलावलं तर केवढ्यात पडलं असतं? त्यांनी अंबानींकडे हे काम फुकट केलं, किती पैसे वाचवले. त्यांनी लग्नासाठी एक पैचं कर्ज काढलं नाही. त्या ‘निकयांका’ला पाहा ना, काय तिने ७५ फुटाचा शेला (वेल) घेऊन भारतीय आणि ख्रिश्चन शालीनतेचा सुवर्णमेळ घातला. कोणत्याही ऐऱ्यागेऱ्या माध्यमाला त्यांच्या खाजगी सोहळ्यात शिरकाव करू दिला नाही. आणि विशिष वृत्त वाहिन्यांबरोबर आणि कंपन्यांबरोबर करार करून लग्नाचे फोटो आणि दृश्य चित्रीकरण विकले. अशा प्रकारे लग्नाचा खर्च भरून काढला. या जोडप्याने आपले कपडे घालावेत म्हणून वेशभूषाकार त्यांना कपडे फुकट देतात, आणि ज्वेलर्स दागिने. असेही त्यांचे पैसे वाचले. आपण मात्र आता त्यांचे हे फोटो असलेल्या जाहिराती पाहून उत्पादनं विकत घेणार आणि आपली किंवा आपल्या मुलाबाळांची लग्नं अशी लागली पाहिजेत अशी स्वप्न पाहणार.

 

लग्न ही एक अपरिहार्य घटना गृहीत धरलेल्या भारतात मूल जन्माला येण्याअगोदरच त्याच्या लग्नाच्या गोष्टी सुरू होतात. मुलाचे शिक्षण यापेक्षाही त्याचे कधी, कोणाबरोबर, कसे, कधी लग्न होणार याबद्दल आईवडिलांपेक्षाही शेजारी, नातेवाईक चर्चा करत असतात. नकट्या, काळ्या, उंच, जाड्या, तिरळ्या, अंध, अपंग, आजारी मुलांचं लग्न कसं होणार, जोडीदार कसा मिळणार अशी चिंता अशीच शरीरवैशिष्ट्यं असूनही लग्न झालेल्यांना सतावत असतात. हल्ली हल्ली समलिंगी लग्नाबद्दल पण थोडी चर्चा होऊ लागली आहे. आजही शिकलीसवरलेली, सज्ञान मुलं आईवडील, नातेवाईक यांच्यावर जोडीदार शोधण्यासाठी विसंबून असल्याने होतकरू किंवा आदर्श स्थळ नसलेल्या बहुतांश मुलामुलींची लक्ष्मी-नारायणाचा जोडा नसतानाही लग्न ठरतात. 

 

एरवी साखरपुडा, लग्न असे दीड दिवस राजा-राणी असणारे वधू-वर आज करण जोहर कृपेने पंजाबी आणि बाजारसंस्कृतीमय वातावरणात प्रीवेडिंग शूट, मेहंदी, संगीत, एंगेजमेंट, लग्न, स्वागत समारंभ, हनिमून अशा प्रकारे साधारण एक ते दीड महिना ‘अतिशय खास’ स्टेटसचे मानकरी होतात. एखादा २५-३० हजाराचा घागरा, तितक्याच किमतीची शेरवानी इंडोवेस्टर्न पोशाखात औट घटकेचे सेलिब्रिटी होतात.

 

लग्न ही अत्यंत खाजगी बाब नाही का? आता त्यातही सर्वोच्च न्यायालयाने ढवळाढवळ करायचं ठरवलं आहे. लग्नात होणारी खाण्याची नासाडी आणि लग्नामुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ते लग्नाला किती पाहुण्यांना निमंत्रण द्यायचं यावर दिल्लीत तरी निर्बंध आणणार असं घाटतंय. आपले शेजारी चीन तसं शत्रू राष्ट्र असलं तरी संस्कृतीरक्षणाबाबत त्यांचं आणि आपलं एकमत आहे. एक मूल धोरणामुळे तिथे मुलींची संख्या लक्षणीय घटली आहे. त्यामुळे मुलींना हुंडा देऊन लग्न करावी लागत आहेत. लग्नखर्च हाच बरेचदा हुंडा असल्याने झगमगीत लग्नसोहळे होत आहेत. हे चीनच्या साम्यवादी विचार आणि चिनी संस्कृतीशी प्रतारणा करणारे आहे असे सरकारचे मत आहे म्हणून आता तिथेही लग्नविधिंचे नियमन करण्याचे प्रयत्न होत आहेत लवकरच त्याची तिथे अंमलबजावणी होत आहे. हे गंडांतर यायचं तेव्हा येईल, तोवर आपण एकच गाणं गायचं. 

‘एक बार बेबी सेल्फिश हो के अपने लिये जियो ना!’

 

लेखिकेचा परिचय : गेली पंचवीसहून अधिक वर्षं माध्यमं आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेली लेखिका काम, अभ्यास आणि आवड म्हणून अनेक क्षेत्रात भटकंती, वाचन आणि अनुभवातून आलेल्या काही वेचक आणि वेधक गोष्टी या सदराच्या माध्यमातनं सांगणार आहे.