आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फाळणी आणि कापलेले परतीचे दोर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फाळणी प्रत्यक्ष अनुभवलेले आणि आज हयात असलेले लोक आज नगण्य आहेत. फाळणीचे अनुभव वाचलेले /पडद्यावर पाहिलेले आज काही सळसळते तरुण राहिले नाहीत. त्यामुळे आजचा बहुतांश युवक असं काही झालं होतं हे ‘ऐकून’ आहे. त्यांच्या आई, वडील, शिक्षकांची पिढी ज्या विचारांची आहे त्यानुसार त्यांना फाळणीच्या कहाण्या कळल्या असतील. महाराष्ट्रासारख्या देशाच्या सीमेपासून दूर असलेल्या राज्यात फाळणी गंभीरतेने न  घेणारे किंवा याविषयी फारशी कल्पना नसलेलेच जास्त.


आमच्या अगोदरच्या पिढीने युद्ध आणि फाळणीचं हलाहल पचवलं असल्याने त्याचे दुष्परिणाम आणि भयानकता त्यांनी दुसरं महायुद्ध न पाहिलेल्या, फाळणी न अनुभवलेल्या अशा माझ्या पिढीसमोर मांडली. नाझी छळछावण्या, हिरोशिमा – नागासाकी अणु बॉम्बस्फोट याच्या कहाण्या पुस्तकं, सिनेमे, लघुपटातून आम्हाला वाचायला/पाहायला मिळाल्या. मंटो, भीष्म सहानी, अमृता प्रीतम, खुशवंत सिग, गुलजार आदींनी फाळणीचे अनुभव असे सांगितले की ते वाचताना, पाहतानाही त्याचे चटके बसले. बाबरी, गोध्रा यांनी या अनुभवांची प्रत्यक्षात पुनरावृत्ती झाली तेव्हा खूप दु:ख झालं, परंतु आपल्या देशात, आपल्या शहरात, आपल्या घरातच फाळणी अनुभवावी लागेल हा विचार शिवला नव्हता. 


१४ फेब्रुवारी २०१९ या प्रेमाचा महान संदेश देणाऱ्या दिवसाने देशात ही फाळणी केली. पुलवामामध्ये ४० जवान जिवानिशी गेले आणि देशात आणि सीमेवर दोन समांतर युद्धं सुरू झाली. एक युद्ध प्रत्यक्ष सीमारेषेवर लढलं जात आहे. दुसरं अर्थातच माध्यमांवर! विशेषतः समाजमाध्यमांवर. काश्मीरमध्ये वर्षानुवर्षं जवान धारातीर्थी पडत आहेत तो आकडा गेल्या तीन-चार वर्षांत दर वर्षाला हजारोंच्या संख्येत आहे. ४० सीआरपीएफ जवानांच्या हौतात्म्याने अख्खा देश पेटून उठला आहे, पण आपल्याच देशात १० मे २०१७ रोजी छत्तीसगडमध्ये सुकमा येथे एकाच वेळी २५ जवान मारले गेले, तेव्हा जनतेचा हा क्षोभ दिसला नाही. काश्मीरमध्ये वर्षभर दहशतवाद्यांशी सामना करताना दर आठवड्याला काही जवान–अधिकारी मृत्युमुखी पडतात, त्याच्या वर्तमानपत्रात एक कॉलमच्या बातम्या होतात किंवा वारंवार वापर केल्याने ‘सीमेवर जवान लढत आहे’ हा या देशात जुमला होतो. 


लष्कराच्या तळावर नाही तर निवासी संकुलात दहशतवादी घुसो, नाहीतर शत्रूच्या हद्दीत घुसायचे असो, सैनिक त्यांचं कर्तव्य पार पाडतात. जे शहीद होतात त्यांचा आदर करत त्यांची लढाई चालू ठेवतात. समाजमाध्यमांत एरवी फुले, सुभाषिते, देवांचे फोटो, पांचट विनोद यांच्या फैरी झाडत होणारी सुप्रभात आपल्याला दु:ख झालं आहे त्यामुळे आपण ‘आता विनोद पाठवायचे नाहीत’ असं म्हणत गंभीर झाली, शोकसंदेश आणि दु:खाने माहोल भरून गेला. अत्यंत उत्कट सहानुभव व्यक्त करत ४० अंत्ययात्रा पाहून देश हेलावून गेला.
एकेक नागरिक एकेक सैनिक झाला. आपापले मोबाइल सरसावून देशरक्षणासाठी तयार झाला. शत्रूच्या शोधात असलेल्यांना आपल्या घरात, आपल्या भिंतीवरच, आपल्या आसपासच शत्रू सापडले. ते अशा संवेदनशील प्रसंगी प्रश्न विचारत होते. असं का? कसं झालं? असं विचारत होते. दु:ख करायचं किंवा पाकिस्तानविरुद्ध युद्धाची भाषा करायची सोडून प्रश्न कसले विचारता? असं वातावरण तापू लागलं आणि भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमधल्या दहशतवाद्यांच्या तळावर बॉम्बहल्ला केला. सेलिब्रेशनला सरावलेल्या समाजमाध्यमी सेनेने क्रिकेटचा विश्वकप जिंकल्याप्रमाणे मिठाया वाटल्या, पार्ट्या केल्या. आपण क्रिकेट युद्धासारखं पाहत असलो तरी युद्ध क्रिकेटच्या स्पर्धेसारखं संपत नाही. सीमेवर असलेले जवान, नागरिक यांचं आयुष्य आधीच खडतर आहे ते आता आणखी तणावाचं होणार. प्रतिहल्ला होणार याची कल्पना नसलेले निरागस लोकच असा आनंद साजरा करू शकतात. आपणच हे युद्ध लढलो आणि जिंकलो या आवेशात त्यांनी स्वत: युद्ध लढलेले, कधी सैन्यात असलेले सैनिक, त्यांच्या पत्नी, मुली, इतर कोणी युद्ध नको म्हटले की त्यांना भेकड, मुस्लिम/ दहशतवाद/ पाकिस्तान धार्जिणे म्हणजेच राष्ट्रद्रोही घोषित केलं. अपेक्षित असा युद्ध सामन्याचा निकाल न लागल्याने वाचावीर आणि त्यांच्या वाग्युद्धाला धार चढू लागली. युद्ध झालंच पाहिजे, आम्ही म्हणू तेच पुरावे आणि आम्ही ठरवू तेच राष्ट्रभक्त हा आवाज वाढू लागला. गेली चारपाच वर्षं असे अनेक अटीतटीचे प्रसंग समाजमाध्यमात आले. परंतु आता आक्रमकता अशी वाढली की फाळणीची रेषा स्पष्ट आणि गहिरी झाली. परिस्थितीचे वेगळे पैलू, चारी अंगं, चौकसपणा, असं एकाहून जास्त काही असण्याची गरजच नाही असं ठसवलं जात आहे. जो एक आहे तोच एकमेवद्वितीय आहे असे असताना इतर संख्या असण्याचं औचित्य काय? गपगुमान आमच्यात एकरूप व्हा. होत नसाल तर आम्ही दिवसरात्र तुमच्या कानात किंचाळत राहू. तुम्ही बधला नाहीत तर तुम्हाला गुडघे टेकायला लावू, माफी मागायला लावू. तुम्हाला हवं असो की नसो, जळी स्थळी काष्ठी म्हणजेच रेडिअो, टीव्ही, वर्तमानपत्र, समाज माध्यमावर हाच मारा चालू राहणार आणि जोवर तुम्ही आमच्यात सामील होणार नाही तोवर आम्ही आमचं श्रेष्ठत्व तुम्हाला पटवत राहणार किंवा तद्दन खोट्या वल्गना करून भुलवत राहणार. 


यालाच जगाच्या पाठीवर प्रोपोगंडा असं म्हणतात. इस्लामिक स्टेट (आयएस) हा एक असाच भुलावा आहे हे त्याच्या जाळ्यात अडकलेल्या अनेकांना कळून चुकलं आहे. इंटरनेटवरून खोटा प्रचार करत अनेक कोवळ्या मुस्लिम मुलामुलींना या संकल्पनेने भुलवलं. एका आदर्श इस्लामिक राज्याचं स्वप्न दाखवलं. इस्लामसाठी लढा आणि मरा सांगणाऱ्या, मरणानंतर ७२ हूर मिळण्याची हमी देणाऱ्या जिहादबरोबर इस्लामला अपेक्षित असलेल्या  ‘स्वच्छ पारदर्शक’, भ्रष्टाचार नसलेल्या सरकारमध्ये तुम्हाला स्थान मिळेल असं सांगितलं गेलं. या उच्च ध्येयाने भारले जाऊन विकसित देशांमधलेही अनेक मुस्लिम युवक सिरियात पोहोचले तिथे त्यांचा स्वप्नभंग झाला. जे सोनेरी चित्र त्यांच्यासमोर रंगवण्यात आलं होतं त्याऐवजी अन्याय, अनन्वित अत्याचार, टोकाचा भ्रष्टाचार सहन करत त्यांना राहावं लागलं. आता निर्वासित छावण्यांमध्ये राहणाऱ्या या युवकांना आपल्या मूळ देशात परत जायचे आहे. त्यापैकी १९ वर्षांच्या शमीमा बेगमला आपल्या देशात इंग्लंडला परत जायचं आहे. भ्रष्टाचार आणि अत्याचार यामुळे तिचा भ्रमनिरास झालेला असला तरी अद्याप संघटनेच्या विचारांचा पगडा पुसला गेला नाही, आयएसने केलेल्या हिंसेचा ती निषेध करत नाही.  वयाच्या पंधराव्या वर्षी शमीमा आयएसमध्ये सामील होण्यासाठी तिच्या दोन मैत्रिणींसोबत सिरियाला गेली. तिथे गेल्यावर १० दिवसांतच तिचं एक डच मुलाबरोबर लग्न झालं, तिला तीन मुलं झाली. त्यापैकी पहिली दोन वारली आणि तिसरं या फेब्रुवारीत जन्मलं आहे. तिला इंग्लंडमध्ये परत यायला मनाई केली जात आहे. तिला तिच्या देशात परत येण्याचा हक्क आहे या विषयावर सध्या घमासान चर्चा चालू आहेत. अशा चर्चा घडणं हेच माणूसपणाचं लक्षण आहे.  प्रश्न विचारा, विचार करा, प्रेम आणि संवाद हाच सर्व प्रश्नांवर उपाय आहे असं मानणारे अल्पमतात असलेले, अल्पसंख्य आता संघटित होत आहेत. ‘युद्ध नको शांतता हवी’ हा आवाज बुलंद होऊ लागला आहे. त्याचं प्रतीक म्हणून ‘२०२० भविष्याकडे चला’ या माध्यमातून कविता, साहित्य, कलेतून व्यक्त होत कुणालाही शिव्याशाप न देता, कमी न लेखता, खिल्ली न उडवता नाचत-गात शांतता आणि स्वातंत्र्याचा मुंबई आणि इतर शहरांतल्या रस्त्यांवर जयघोष केला जातोय. आशेचा दिवा तेवतोय. छळछावण्या, बॉम्बहल्ले, फाळणी इतिहासातच राहू दे, त्याची पुनरावृत्ती नकोय, हे तळमळीने सांगतोय.


संयोगिता ढमढेरे, पुणे
mesanyogita@gmail.com 

बातम्या आणखी आहेत...