आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदर्श स्त्री की बाई माणूस?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


समाजाच्या हिताचं खूप मोठं काम करणाऱ्यांना अनेकदा देवत्व बहाल केलं जातं. मग त्यांच्याकडून अपेक्षाही तशाच ठेवल्या जातात.  मात्र, कोणताही नेता स्त्री असो की पुरुष, माणूस म्हणून स्वीकारणं त्याच्या आणि समाजासाठी हिताचं. देवत्व बहाल केलं की त्या प्रतिमेला तडा जाणारच. 


मार्च उजाडला की, समस्त माध्यमांना एकूण एक स्त्रिया आदर्श असल्याचा एकत्रित साक्षात्कार होतो. स्त्री ही एक मुलगी, बहीण, आई, पत्नी, आत्या, आजी, काकी, मामी, आणि मैत्रीण... हे काय नि ते काय, कशी महान असते, ही नाती निभावते, प्रेम करते, त्याग करते, सहन करते असं यांच्या गुणगानाचं कीर्तन सुरू होतं. जसं काही या नात्यांच्या जोडीची पुल्लिंगी नाती अस्तित्वातच नसतात किंवा ती नाती पुरुष निभावतच नाहीत अशा आविर्भावात स्त्रीमहात्म्याची वर्णनं होत असतात. येताजाता आईबहिणीवरून शिवी घालणारेही मार्चच्या भावनिक लाटेवर स्वार होऊन स्त्रीशिवाय पुरुष कसा अपूर्ण आणि बाई कशी जन्मजात परिपूर्ण असे गोडवे गायला लागतात. असं तात्पुरतं तोंडावर बोलणं पुरुषांच्या सोयीचं असतं आणि बोलले ना, त्यातच सगळं मिळालं, यावर अल्पसंतुष्ट बायका तेवढ्यावरच खुश होतात. त्यामुळे अनेक जणींचा त्यागी, प्रेमळ, सहनशील, कामसू ही बाईची गुणसूत्रं असा ठाम विश्वास असतो. त्यांना असं काही नसतं असं सांगितलं, विशेषतः आई झालेल्या अनेक बायांना तुमच्या पोटातून मूल जन्माला येणं हे फक्त एक जीवशास्त्रीय सत्य आहे असं सांगितलं तर त्यांचे महानतेचे पंख छाटले जाऊन धप्पकन जमिनीवर पडतील. 


जन्मजात मिळालेल्या कोणत्याही शारीर, सामाजिक ओळखीमुळे निखळ माणूसपणाच्या वर नेणारं किंवा खाली खेचणारं काहीही त्रासदायकच. त्यागी, सहनशील, समजूतदार, प्रगल्भ ही विशेषणं मिळवणं आणि मिरवणं या खेळात अनेक स्त्रिया आपलं जगणं, साधे साधे आनंद गमावून बसतात आणि आदर्श होण्याची झूल मिरवत राहतात. ज्या स्त्रियांना त्यांच्या देशाने, जगाने महानतेच्या मखरात बसवले आहे त्यापैकी ज्या आज पृथ्वीतलावरच नाहीत त्या जिजाबाई भोसले, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर आदी यांना आज तरी लोक क्रांतीज्योती म्हणतात की महामाता म्हणतात, त्याने काही फरक पडत नाही, पण ज्या जिवंत आहेत त्यांना त्याचे चटके सहन करावे लागतात.


शांततेसाठी नोबेल पुरस्कार मिळालेल्या आंग सान सु की यांचा असाच काहीसा प्रतिमाभंग झाला आहे. महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांच्यासारख्या दिग्गजांसोबत म्यानमारच्या या भूमिकन्येचं नाव घेतलं जात होतं. निर्दयी, दडपशाहीच्या विरुद्ध धीराने अहिंसक मार्गाने प्रदीर्घ लढा देणारी स्त्री म्हणून संपूर्ण जगात विशेषत: पश्चिमी देशात सु की खूप लोकप्रिय. परंतु त्यांचं नेतृत्व असलेल्या देशात रोहिंग्या स्थलांतरितांविरुद्ध होणाऱ्या कारवायांबद्दल सु की यांनी बाळगलेले मौन त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीच्या आणि त्यांच्याबद्दल असलेल्या आदराच्या विरोधात जात आहे. 

सु की दोन वर्षाच्या असताना त्यांचे वडील ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्याच्या लढाईत शहीद झाले. ते म्यानमारचे राष्ट्रीय नेते आणि आई उच्चपदस्थ अधिकारी. सु की यांचं उच्च शिक्षण ब्रिटनमध्ये झालं तिथेच ब्रिटिश प्रोफेसर मायकेल अॅरिस यांच्याशी लग्न करून दोन मुलांसह सु की सर्वसामान्य संसारी जीवन जगत होत्या. १९८८ साली त्यांच्या वयाच्या ४३व्या वर्षी आजारी आईची शुश्रुषा करण्यासाठी त्यांना मायदेशी परत यावं लागलं. त्यानंतर झालेल्या राजकीय घटनांमुळे त्यांना इंग्लंडला आपल्या कौटुंबिक जीवनात परत जाताच आलं नाही. तेव्हा त्यांची मुलं होती ११ आणि १५ वर्षांची. 

 

आपल्याला कधी तरी देशाच्या राजकारणात सहभागी व्हावं लागेल याची सु की यांना कल्पना होती, परंतु आपल्या वैयक्तिक जीवनाचे दोर कापले जातील असं त्यांना वाटलं नव्हतं. लष्कराला वाटलं होतं नवरा, मुलांबरोबर संवाद, भेट सगळे मार्ग बंद केले की वैतागून त्या इंग्लंडला परत जातील. एकदा इंग्लंडला गेलो तर मायदेशी परत येणं अशक्य आहे हे कळून चुकल्याने सु की यांनी कुटुंबापेक्षा देशाला प्राधान्य दिलं. जवळजवळ दोन दशकं त्यांनी एकटीने नजरकैदेत काढली. बोलणे, फिरणे, लिहिणे सर्वच अभिव्यक्तीवर बंधनं, अगदी त्यांची खाण्याची उपासमार अशा परिस्थितीत एकाकी असूनही त्या डगमगल्या नाहीत. त्यांचं धैर्य आणि चिकाटीचं जगभर कौतुक झालं. १९९९ मध्ये त्यांच्या पतीचं कर्करोगाने निधन झालं. पण सु की यांना त्यांच्याबरोबर राहता आलं नाही. नोबेलसह अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले, पण ते घेण्यासाठी सु की देशाबाहेर जाऊ शकल्या नाहीत. त्यांची चिवट लढाई आणि आंतरराष्ट्रीय दबाव यामुळे लष्करी राजवटीला शेवटी नमतं घ्यावं लागलं. २०१० मध्ये त्यांची कैदेतून सुटका झाली आणि सु की यांना २०१२ मध्ये निवडणूक लढवता आली आणि अपेक्षेप्रमाणे पुढे २०१७ मध्ये त्या प्रचंड बहुमताने निवडून आल्या आणि राष्ट्रप्रमुख झाल्या.

 

अहिंसा आणि मानवी हक्कांच्या खंद्या पुरस्कर्त्या सु की आपल्या नोबेल पुरस्काराच्या भाषणात म्हणाल्या, “मी आपल्या प्रेमाच्या माणसांपासून वेगळं होऊन प्रेम न करणाऱ्या माणसांबरोबर राहण्याचं दु:ख अनुभवलेलं आहे, त्या वेळी मी कैदी, निर्वासित, स्थलांतरित आणि मानवी तस्करीला बळी पडलेल्या आणि आपल्या मातीपासून दुरावलेल्या लोकांचा विचार करायचे. या माणसांना आपले कुटुंबीय, मित्र यांच्यापासून दूर फेकलं जातं आणि त्यांच्याबद्दल आस्था नसलेल्या अपरिचित लोकांबरोबर राहावं लागतं.” ही त्यांची सहअनुभूती रोहिंग्या निर्वासितांचा प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांच्या स्वीकारासाठी कामी आली नाही. राजकीय पेच निर्माण होईल असा निर्णय घेण्यात त्यांनी कुचराई केली याबद्दल आता अनेकांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्या प्रमुखपदी असताना रोहिंग्याविरुद्ध हिंसक कारवाई होते हे अजूनही अनेकांना पचवणं कठीण जातंय. देश की मूल्य, यामध्ये कदाचित त्यांनी देशाला जास्त महत्त्व दिलं. 

 

तसं देवत्व की माणूसपण, अशी निवड करण्याची वेळ आली तेव्हा एका ध्येयासाठी भर तारुण्यातली थोडी थोडकी नाही तर सोळा वर्षं पणाला लावणाऱ्या आपल्या देशातल्या एका महिलेने देवत्व नाकारण्याचं धाडस केलं. मध्यम वर्गातली एक सर्वसाधारण युवती. तिच्या डोळ्यासमोर झालेल्या अन्यायाने पेटून उठली तिने एक निर्णय घेतला अन्नत्याग करण्याचा. त्या निर्णयाचा जागतिक विक्रम झाला. देशात राजकीय उलथापालथ झाली, आजूबाजूच्या लोकांचं जग बदललं पण ती मात्र एकाच जागी थिजून राहिली होती. तिचं जीवन, तिचा अहिंसक लढा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलं पण सरकारने तिच्या मागणीची गंभीर दखल घेतली नाही. राजकीय अनास्थेपुढे आणखी किती वर्ष आपला जीव पणाला लावायचा की सर्वसामान्य स्त्रीचं आयुष्य जगायचं, या दोन्हीपैकी एक निर्णय तिला घ्यावा लागला आणि तिने प्रेम आणि सामान्य जीवन निवडलं. 


ही स्त्री आहे भारतातची लोहमहिला, मणिपूरची इरोम शर्मिला. लष्कराला कायद्याने दिलेले अवाजवी अधिकार काढून घ्यावेत यासाठी तिने उपोषण केलं. तिने तोंडाने अन्न घ्यायला नकार दिला तर १६ वर्षं पोलिसांनी तिला सक्तीने नाकावाटे अन्न दिलं. सु की यांच्याप्रमाणे इरोमही इतकी वर्षं कैदेतच राहिली. आपल्या ध्येयासाठी निकराने लढली. पण कायम त्यागाची मूर्ती होऊन राहण्यास तिने नकार दिला. 


२०१६ मध्ये तिने हा दीर्घ उपवास सोडला. निवडणुकीच्या राजकारणात उतरून पाहिलं, पण तिथे तिला तिच्या त्यागाची पावती मिळाली नाही. मणिपूरच्या प्रतिगामी कार्यकर्त्यांना देवत्व बहाल केलेल्या बाईने सर्वसामान्य बाईप्रमाणे प्रेमात पडणं मान्य नव्हतं. तिच्या प्रियकराला त्यांनी चळवळ फोडायला आलेला हस्तक ठरवलं. हा सगळा अनुभव तिच्यासाठी खूपच क्लेशकारक होता. शेवटी मणिपूरपासून दूर जाण्याचा तिने निर्णय घेतला. पर्यावरण आणि विकास क्षेत्रात कार्यरत डेसमंड यांच्याबरोबर २०१७ मध्ये ती बंगळुरूला स्थायिक झाली. अनेक वर्षांनी ती साधं, शांत, सुखी आयुष्य जगत आहे. इरोम लवकरच आई होणार असून तिला जुळं होणार आहे. कोणताही नेता स्त्री असो की पुरुष, माणूस म्हणून स्वीकारणं त्याच्या आणि समाजासाठी हिताचं. देवत्व बहाल केलं की त्या प्रतिमेला तडा जाणारच.

संयोगिता ढमढेरे, पुणे
mesanyogita@gmail.com

बातम्या आणखी आहेत...