आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिग्गज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्रकारितेच्या पेशाचं अनेकांना खूप अप्रूप असतं. विशेषत: सामान्य माणूस ज्याला या क्षेत्रातल्या कामकाजाच्या पद्धतीची, या क्षेत्रात आवश्यक असणाऱ्या किमान अभ्यासाची माहिती नसते. खरंतर ‌हे क्षेत्रं म्हणजे कडू-गोड अनुभवांचा खजिना. असेच काही अनुभव सदराच्या आजच्या भागात.

 

पत्रकार असण्याचे अनेक फायदे असतात. त्यात सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे अनेक क्षेत्रातल्या दिग्गज माणसांना ओळखदेख नसताना तुम्हाला सहज जवळून भेटता येतं. कोणी फॅन, भक्त, पाठीराखे त्यांना भेटत असतात. पण त्यांच्या नात्यात फरक असतो. पत्रकारांना सहसा महत्त्वपूर्ण व्यक्ती म्हणून आदराने आणि बरोबरीने वागवलं जातं. आपापल्या बीटमध्ये तर पत्रकारांच्या लिखाणाचा दर्जा, सचोटी आणि हातोटी यामुळे पोलिस, कोर्ट, मंत्रालय, महानगरपालिका, नाटक – सिनेमा – साहित्य, आरोग्य आदी क्षेत्रांत तज्ज्ञ मानलं जातं. आपल्याबद्दल काही विपरीत लिहिलं जाऊ नये किंवा चांगली प्रसिद्धी मिळावी या आशेनेही अशी वागणूक मिळते. अशा अनेक भेटींच्या खूपशा गोड, मजेदार, अविस्मरणीय आठवणीचा खजिनाच प्रत्येक पत्रकाराकडे असतो. या व्यक्तींचे आयुष्यातल्या महत्त्वाच्या प्रसंगी विशेषत: मृत्यूनंतर अशा आठवणी आवर्जून लिहिल्या जातात. त्या व्यक्तींचं जीवन वादग्रस्त, विरोधाभास असेल तर अनेक किस्से पोतडीतून बाहेर येतात. ते गेल्यावरही त्यांनी वेळोवेळी घेतलेली भूमिका, निर्णय आणि वागणं यावर अनेक वाद-चर्चा घडत राहतात.
नामदेव ढसाळ हे असंच एक ठळक नाव. त्यांच्या मृत्यूला या १५ जानेवारीला चार वर्षं झाली. आजही त्यांच्या अनेक आठवणी, कविता, त्यांचे विचार आणि राजकारण यामुळे निर्माण झालेले वाद यावर भरपूर चर्चा चालू असते. त्यांचा एक कवडसा माझ्याही वाट्याला आला. साल १९९१. नुकतीच पत्रकारितेची पदवी घेऊन मी मुंबईत आले होते. सुरुवातीचीच मुलाखत होती नामदेव ढसाळ यांची. ठरल्या वेळेला महालक्ष्मी, धोबीघाट परिसरात त्यांचं घर शोधून काढलं. दार उघडताच दोन मोठे कुत्रे आणि त्यांच्या समोर ठेवलेले ताटभर मटण हे मी रोजच पाहते अशा सहजतेने दोन्ही कुत्र्यांकडे दुर्लक्ष करून मी घरात गेले. मुंबईबाहेर असलेल्या मला नामदेव ढसाळ दिसतात कसे हे माहीत नव्हते आणि त्या वयात गोलपिठाही वाचायला मिळालं नव्हतं. मला माहीत होते ते ढसाळ मल्लिका अमर शेख यांचे पती म्हणून. ‘मला उद्ध्वस्त व्हायचंय’ मी नुकतंच वाचलं होतं. आणि त्या उद्ध्वस्त झाल्या असाच माझा समाज झाला होता. त्या सावळ्या, सुंदर ठसकेबाज मल्लिका (त्यांचा फोटो पहिला होता) घराच्या नूतनीकरणाबद्दल नवऱ्याशी चर्चा करत होत्या. ते घरगुती दृश्य पाहून मात्र मला माझं आश्चर्य लपवण्याचा अभिनय करणं शक्य नव्हतं. पण त्यांचंही माझ्याकडे लक्ष नसल्याने काही फरक पडला नाही. 
त्यानंतर माझी ठरलेल्या विषयावरची मुलाखत व्यवस्थित झाली. त्यानंतर ढसाळ यांनी मला प्रश्न विचारला, ‘भारतात भाजप सत्तेवर येऊ शकतं? तुम्हाला काय वाटतं?’ ‘तुमच्या मनातलं घर’ वगैरे टाइपच्या सहजसोप्या चर्चेनंतर हा राजकीय प्रश्न मला पूर्णपणे अनपेक्षित होता. विद्यार्थिदशेत सोशलिझमचा मनातल्या मनात मराठीत अनुवाद करताना समाजवादीऐवजी साम्यवादी बोलल्याने ते ज्येष्ठ प्रेमळ समाजवादी नेते/संपादक असे भडकले की, मला वाटलं हे जन्मतःच सगळे वाद शिकून आले असणार. माझ्यासारख्या नवशिक्या पत्रकाराला ढसाळांसारख्या मुरब्बी राजकारण्याने हा प्रश्न का विचारावा? केवळ निवडणुका तोंडावर आल्या होत्या म्हणून? की पत्रकारांना खरोखर राजकीय नस कळते म्हणून? मुलाखत संपल्यावरही १५-२० मिनिटं आम्ही देशाच्या राजकारणावर चर्चा केली! ही चुणूक होती पत्रकारिता आणि निवडणुकीचं समीकरण आणि महत्त्व समजून घेण्याची.
इतक्या वर्षांत तर कळलंच आहे, निवडणूक हा प्रसिद्धीमाध्यमं आणि पत्रकारांचा पंचवार्षिक कुंभ असतो. आजच्या डिजिटल युगात प्रत्येक राजकीय पक्षाचा स्वत:चा माध्यम विभाग आणि त्यात तैनाती फौज असूनही पक्ष आणि नेते प्रणित छापील, डिजिटल भूछत्र्यांचं पेव फुटतं. या काळाचं बातमीमूल्य किंवा महिमाच असा आहे. नुकतंच मराठी ‘वायर’ सुरू झालं. ‘चला एकत्र येऊया’ या २९ जानेवारीच्या कार्यक्रमात सिद्धार्थ वरदराजन यांनी हे जाहीर केलं. ‘थिंक बँक’ हे दुसरे मराठी डिजिटल चॅनेल लवकरच सुरू होणार अशी घोषणा नुकतीच फेसबुकवर करण्यात आली. नव्या-जुन्या सर्वच पत्रकारांना कामं मिळण्याची ही सुगी आहे. करण थापर आणि बरखा दत्त ‘हार्वेस्ट टीव्ही’च्या माध्यमातून अनेक वर्षांनंतर पुन्हा आपल्या भेटीला येणार आहेत. ‘कोणत्याही वाहिनीवर आता रुजू व्हायचं असं ठरत आलं की, बरखा दत्तला घेऊ नका, असा निरोप पोहोचत असे,’ असं बरखाने मुलाखतीत सांगितलं होतं. हार्वेस्ट टीव्हीला काँग्रेसच्या कपिल सिब्बल यांचा पाठिंबा असल्याचं बोललं जातंय, त्यामुळे आता काही बिनसणार नाही अशी आशा करूया. ‘पूछता है भारत’ हे अभियान अर्थातच अर्णब गोस्वामी त्यांच्या रिपब्लिक भारत या हिंदी वाहिनीमधून चालवणार आहेत. २६ जानेवारीला ही वाहिनी सुरू झाली आहे. याच वेळी फर्स्टपोस्टचे छापील साप्ताहिक ‘मतपत्र’ही प्रकाशित होणार आहे. फर्स्टपोस्ट या डिजिटल माध्यमावरच्या बातम्यांचीच ही छापील आवृत्ती आहे.
एकाच माध्यमाची वेगवेगळ्या स्वरूपाची, भाषेची नवनवीन रूपं अवतरत असताना राजकीय पक्षांची युती, महायुती, गठबंधन याचं वातावरण तापत आहे. तिकडे अमेरिकेतही अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत आणि रोज नवनवीन व्यक्ती राष्ट्राध्यक्षपदासाठी आपली उमेदवारी जाहीर करत आहे. त्याच वेळी फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग याने फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप या तिन्हीचं एकत्रीकरण करणार असल्याचा ऐलान केला आहे. याचा भारतावर खूप मोठा परिणाम होणार. आता कोणता फोटो कुणाला पाठवायचा, कोणता मेसेज कुणाला दिसू द्यायचा नाही याचं ‘निवड आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ यामुळे काय भजं होणार हे लवकरच कळेल. 
पत्रकार असल्याचे काही विशेषाधिकार जसे मिळतात तसे लष्करी अधिकाऱ्याची पत्नी म्हणूनही काही विशेष घटनांची साक्षीदार होण्याचा लाभ मला मिळतो. मुंबईमध्ये पत्रकारिता करत असताना ज्या राजकीय नेत्यांचे किस्से रंगवून सांगितले जात त्यात जॉर्ज फर्नांडिस हे नाव खूप आस्थेने घेतलं जात असे. नेता खूप मोठा हे मान्य करूनही जे त्यांच्याबरोबर होते, त्यांना ओळखत होते-नव्हते तेही त्यांना जॉर्जच म्हणत. 
मुंबईबाहेरच्या आम्हाला जॉर्जचा बाणा हा कोकाकोला बंद करण्यापुरता माहीत होता. मी मुंबईत आले तेव्हा ते दिल्लीत गेले होते. त्यामुळे त्यांना भेटण्याची शक्यता दुर्मिळ होती. ऑक्टोबर २०००मध्ये संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीत संचलनाची मानवंदना स्वीकारायला ते येणार होते. लष्कराचं सगळंच काम शिस्तीचं आणि परीटघडीचं. त्यात संचलन म्हणजे पोशाखी शिस्तीचा परमोच्च बिंदू. चकचकीत बूट, तलवारी, कडक पट्टे, विशिष्ट कोनात बसलेल्या टोप्या आणि आपापल्या विशिष्ट स्थानावर विशिष्ट क्रमाने लावली जाणारी पदकं याबाबत काटेकोर शिस्त पाळली जाते. असा तामझाम असलेल्या हजारो शिस्तबद्ध शिपाई आणि अधिकाऱ्यांची मानवंदना 
स्वीकारण्यासाठी खादीचा कुर्ता पायजमा आणि चप्पल घालून संरक्षणमंत्री आले. प्रेक्षागारात माझ्या आजूबाजूची प्रचंड अस्वस्थता, कुजबुज मला जाणवत होती. लष्कराच्या सर्वात अनौपचारिक ‘ओपन  कॉलर’ या ड्रेसकोडमध्येही न बसणारी ही वेशभूषा होती. त्यांनी आपल्या खणखणीत आवाजात भाषण केलं आणि वातावरणात जोश भरला, जो त्यांचा हातखंडा होता. वेश साधा होता, पण माणूस गबाळा नाही, हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचला. आपल्या गावचा आणि जातकुळीचा माणूस दिल्लीत भेटला याचा आनंद झाला.{{{

बातम्या आणखी आहेत...