आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काव्यप्रेमातून जन्मलेला उत्कट भावानुवाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शास्त्रीय संगीतातल्या एखाद्या रागाची गुरुमुखातून तालीम घेतल्यानंतर गायकाची सौंदर्यतत्त्वे, रागनियमांशी बांधिलकी जपतानाही दमदार गाण्याने मैफिलीवर स्वतंत्र ठसा उमटवावा अशा तोडीचा अनुभव म्हणजे डॉ. हेमा क्षीरसागर यांचा इंग्रजी कवितांचा भावानुवाद होय.  

डॉ. हेमा क्षीरसागर यांचं ‘बिंब-प्रतिबिंब’ हे पुस्तक अनेक कारणांमुळे केवळ एक उत्तम कारागिरीचा नमुना राहिला नसून तो अस्सल कलाकृतीच्या दर्जाला पोचला आहे. लेखिकेची संस्कृतमधील उज्ज्वल कारकीर्द व तिचे मराठी तसेच इंग्रजीवरील प्रभुत्व हे त्यातील कवितांच्या निवडीवरून, त्यांच्या आशयगर्भ, रसाळ, गेय, सुगम अनुवादावरून आपल्या सहज लक्षात येते. कलानिर्मितीच्या पहिल्या काही पडावांमधे तंत्रसाधना व त्यातून विकसित होणारी काव्यविषयक जाण यांचा अंतर्भाव होऊन हळूहळू अनुकरणातून स्वतंत्र प्रतिभेपर्यंतचा टप्पा गाठला जातो. मनोगत व्यक्त करताना हेमाताई म्हणतात, ’काव्य करण्याची शक्ती सर्वांमधे नसते. ही शक्ती माझ्यात नाही याची मला जाणीव आहे. पण मी कवितांवर प्रेम करते. त्यांतील सौंदर्याचा आनंद अनुभवते. कविता गुणगुणते, पाठ करते. माझ्या स्मृतिमंजूषेत कितीतरी कवितांचा खजिना भरलेला आहे. त्यामुळे माझ्या मनातील कविता-प्रेमाला भावानुवादाचं हे एक वेगळं वळण मिळालंय.” 

मुळात कवितेचा अनुभव समुदायात असतानाही आपल्याला वैयक्तिक पातळीवर स्पर्शून व त्याच वेळी वैश्विक स्पंदनांशीही त्याची संगती दाखवतो. कविता गद्यापेक्षा अधिक गूढ असते. मला तर काव्यानुभव हा रासलीलेसारखा वाटतो. एकच कृष्ण एकाच वेळी अनेक गोपींशी रास खेळतो. कृष्ण केवळ आपल्याशीच रास खेळतोय या परमानंदात समस्त गोपी भान हरपतात. अशा या गूढ, अज्ञात प्रदेशात वावरताना ‘भावानुवादरूपी’ वाटाड्या किती महत्त्वाचा ते सुज्ञांना सांगायला नकोच. काव्यविश्वात रममाण होणाऱ्या आस्वादकांची अवस्था, ’हम दिल्ली भी हो आये हंै, लाहोर भी घूमे, ए यार मगर तेरी गली, तेरी गली है।” अशीच असते.

“The love of poetry goes hand in hand with love of life” या रस्किन बाँड यांच्या विधानातील तथ्य, खरं तर बालपणापासून कवितेशी आस्तेकदम दृढ होत गेलेला बंध आपल्याला जाणवतोच. तर एडवर्ड यंग म्हणतात, “There is something about poetry beyond prose logic, there is mystery in it, not to be explained, but admired.” अर्थात कवितेच्या रसग्रहणाआधीही भावानुवाद अपरिचित भाषेतल्या कवितांशी सलगी करायला पोषक वातावरण निर्माण करतो हे नक्की!

लीला अर्जुनवाडकर यांनी प्रस्तावनेत म्हटलंय, “मूळ कविता आणि भावानुवाद म्हणजेच बिंब आणि प्रतिबिंब ही काही जुळी भावंडं नव्हेत. प्रतिबिंबदेखील अंतर, वेळ, प्रकाश, तरंग यामुळे वेगवेगळी रूपं घेत असतं.” तर याच संदर्भात ब्लर्बमधे डॉ. अरुणा ढेरे नमूद करतात, “साहित्यावर संस्कृती, प्रदेश, भाषा आणि साहित्यिकाचे व्यक्तिमत्त्व यांचा ठसा असतो. त्यामुळे कोणत्याही काव्यप्रकाराचा अनुवाद ही सोपी गोष्ट नाही. तरीही आपल्या मनातील अंत:प्रेरणेतून उत्तम अनुवाद करता येतो. रचनेची ओढाताण नसणाऱ्या, प्रवाही साध्या आणि सोप्या अनुवादासाठी भाषेवर प्रभुत्व, भाषेची लकब, शब्दसंग्रह आणि संस्कृती या गोष्टींचे सखोल ज्ञान अत्यावश्यक असते.”
संग्रहातील पहिलीच कविता ही विल्यम वर्ड्सवर्थच्या ‘Daffodils’चा अनुवाद आहे.
For oft, when on my couch I lie
In vacant or in pensive mood,
They flash upon that inward eye
Which is the bliss of solitude ;
And then my heart with pleasure fills,
And dances with the daffodils.
यावर हेमाताई म्हणतात
चिंतनात वा शून्यमनस्कही बसतो जेव्हा एकांती
डॅफोडिलची फुले प्रकटती मानसचक्षूंच्या पुढती,
एकांताचे वरदानच ते स्वप्न सुखद जणु पडे मला
तुडुंबते मन आनंदाने, तुला नसे त्या सौख्याला,
आनंदाच्या डोहामध्ये मोद तरंगे सभोवती
फुले नाचती, मनही नाचे हर्षाच्या लहरींवरती...

विलक्षण नादमधुर, गेय, केवळ मूळ शब्दांना मराठी प्रतिशब्द योजणारा नव्हे तर वर्डस्वर्थच्या डोळ्यापुढे तरळणाऱ्या स्मृतींना जिवंत करणारा हा अनुवाद आहे.

‘Leisure’ या डब्ल्यू. एच. डेव्हिस यांच्या कवितेचा ‘उसंत’ हा अनुवाद त्याच्या शेजारच्या जुन्या काळातील खुर्चीमुळे इतका प्रत्ययकारी होतो, अशात ’चिंतेने काजळलेले हे जीवन व्यर्थचि आहे, क्षण टिपण्या आनंदाचे, पळभरही उसंत नाही,’ची व्यथा अधिकच गहिरी करतात. मन भूतकाळात वावरतं, खुर्चीवरच्या एकाकी आजोबांचा घरातला भकास वावर जीवनाची अपरिहार्यता बोलकी करतो.

पुस्तकाचं मुखपृष्ठ तसेच आतील छायाचित्रे कवितांना रंग, रूप, गंध, स्पर्श सर्व पातळ्यांवर अपूर्व चैतन्य प्रदान करतात. ही छायाचित्रे कवितांतील व्यक्तिमत्त्वांचा हिस्सा होण्याइतकी वातावरणनिर्मिती साधून त्यांचा सहजोद्गार वाटावा अशी कविता अवतरते.

मूळ कवितांची शीर्षके व त्यांचे शब्दांपलीकडचे भाव टिपणारे अनुवाद हा हेमाताईंच्या कलात्मक जाणिवेचा उत्कट आविष्कारही पुस्तकात अनुभवता येतो. ‘The Psalm of life’, ‘जीवनसूक्त’ होऊन, ‘Under the Green wood tree’, त्या तरुतळी, ‘Tree’,‘देवाजीची कविता’ होऊन, ‘Home they Brought her warrior Dead’, ‘उमाळा’ होऊन’Clouds’, ‘सांध्यमेघ’ होऊन, ‘The Beech Tree’s petition, ‘वृक्षाचे आर्त’ होऊन मूळ कवितेच्या सौंदर्यात भर घालतात. कवितेच्या आशयाचा हा परिपाक केवळ मूळ शीर्षकांसाठी योजलेल्या प्रतिशब्दांचे साचे म्हणून उरत नाहीत.एच. डब्ल्यू. लाँगफेलो यांच्या ‘Poem’ कवितेतील
“Read from some humbler poet,
Whose songs gushed from his heart
As showers from the clouds of summer,
Or tears from the eyelids start”,
याचं
‘साध्या भोळ्या कविची कविता
स्फुरली जी हृदयातून
जसे वर्षती मेघ वादळी
किंवा अश्रू डोळ्यांतून”
हे रूपांतर किंवा अज्ञात कवीची ‘Why the pine tree is evergreen’ या कवितेचा
’एक चिमणं पाखरू,
पंख त्याचे जायबंदी
म्हणून गेलं मदतीसाठी,
सफरचंदापाशी”
हे आणि बरेच अनुवाद नकळत दाद घेऊन जातात.
इंग्रजी कवितेचा मूळचा घाट, ओळींची संख्या, क्रम बदलूनही त्यातला भाव, आशय अबाधित ठेवणाऱ्या पुढील काही अनुवादित ओळी बघू या. टागोरांच्या ‘Secret of Heart’ मधल्या
“Speak to me, through hesitating tears
Through sweet shame and pain
The secret of heart”
या ओळी
’गोड लाजरा भाव नि व्यथा,
उलगड त्यातून तुझी कथा
मित्रापासून नकोस लपवू
गुज मनीचे वृथा”
असं अस्सल एतद्देशीय आर्जव व्यक्त करतात.
ख्रिस्टिना रोजेट्टी या कवयित्रीच्या
“But the bow that bridges heaven
And overtops the trees,
And builds a road from earth to sky”,
इतक्या शब्दांना स्वर्गधरेचा पूल म्हणत मोजक्या शब्दांत त्यातला गाभा सहज कवेत घेतात.
‘बिंब-प्रतिबिंब’ यातल्या मूळ इंग्रजी कविता तात्पुरत्या बाजूला ठेवून केवळ मराठी कविता मी पुन्हा पुन्हा वाचल्या तेव्हा हेमाताईंच्या शब्दांतून प्रकट होणाऱ्या ऋतुक्रीडा, निसर्गाची बदलती रूपं, मानवी संवेदना, भावनिक आंदोलनं कुठल्याही आधाराशिवाय परिपूर्ण वाटला. हे या भावानुवादाचं निखळ यश आहे. शास्त्रीय संगीतातल्या एखाद्या रागाची गुरुमुखातून तालीम घेतल्यानंतर गायकाची सौंदर्यतत्त्वे, रागनियमांशी बांधिलकी जपतानाही दमदार गाण्याने मैफिलीवर स्वतंत्र ठसा उमटवावा या तोडीचा अनुभव आहे.


‘प्रिये’ या मूळ ‘The Indian Serenade’ या पी. बी. शेली यांच्या कवितेतल्या ओळींचा
धुळीत पडलेला मी भोवंडतो, मरतो
उचल मला अन् कर चुंबनांचा वर्षाव
माझ्या निस्तेज ओठांवर आणि पापण्यांवर
थंडगार पांढुरके गाल, धडधडणारे हृदय
तुझ्या हृदयाशी धर, घट्ट दाबून धर,
तिथेच ते होऊ दे अनंतात विलीन.
हा अनुवाद मूळच्या बीजासह कोंदणात झळाळून निघतो.
पुस्तकाच्या नवीन आवृत्तीचं प्रकाशन अलीकडेच दादर येथील एका सभागृहात लेखक-प्रकाशक डॉ. रामदास भटकळ यांच्या हस्ते झालं. हे सुंदर पुस्तक फक्त खाजगी वितरणासाठी आहे. डॉ. हेमा क्षीरसागरांनी परप्रांतातल्या आपल्या प्रियेच्या झोपडीत सर्व काव्यरसिक, आस्वादकांना उदार आश्रय द्यावा. अर्थात केवळ खासगी वितरणाकरीता पुस्तक न राहता जास्तीत जास्त वाचकांपर्यंत हे पोचवावं, अशी मी त्यांना नम्र विनंती करते.


सारंगी आंबेकर, मुंबई
saarangee2976@yahoo.co.in

बातम्या आणखी आहेत...