आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वन्य प्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी साड्यांचे कुंपण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडा शिवारात वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी चक्क साड्यांचे कुंपण करण्याची शक्कल लढवली आहे. या भागातील बहुतांश शिवारामध्ये साड्यांचे कुंपण दिसत आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील काही शिवारात जंगलाचा भाग आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाडी असून वन्य प्राणी आहेत. यामध्ये सर्वात जास्त रोही, रानडूकर, बिबट्या या प्राण्यांचा वावर आहे. बिबट्या हा परिसरात नेहमी फिरत असला तरी रोही व रानडुकरांमुळे पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. वन विभागाने केलेल्या वन्य प्राणी गणनेत सर्वात जास्त प्राणी औंढा परिक्षेत्रात असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये सुमारे ३५० रोही, १९ कोल्हे, दोनशे रानडुक्कर, पंचवीस हरीण, ४६ मोर, एक काळवीट आढळून आले आहे.

दरम्यान, कळपाने राहणारे रोही व रानडुकरे शेतात जाऊन पिकांची नासाडी करू लागले आहेत. परतीच्या पावसामुळे नुकसान झाल्यानंतर शिल्लक असलेल्या पिकांचे संरक्षण करताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येऊ लागले आहे. रात्रीच्या वेळी शेतात जागरणासाठी गेल्यानंतर कळपाने राहणारे प्राणी हे प्राणी शेताबाहेर जात नसल्याचे चित्र आहे. सध्या शेतीत तूर, हरभरा, कापूस आदी पिके आहेत. या पिकांचे संरक्षण करण्यासाठी तारेचे कुंपण करणे अनेकांना शक्य नाही.

त्यामुळे आता शेतकऱ्यांनी यासाठी साड्यांचा पर्याय केला आहे. वसमत, परभणी, नांदेड या भागातून वीस ते पंचवीस रुपयांना एक या प्रमाणे जुनी साडी खरेदी करून या साड्यांचे शेतीला कुंपण केले जात आहे. वाऱ्यामुळे साड्यांचा आवाज होत असल्याने रानडुकरे शेतात प्रवेश करीत नसल्याचे चित्र आहे. त्यातून शेती पिकांचे संरक्षण होऊ लागले आहे. शेतकऱ्यांनी लढवलेली ही शक्कल चर्चेचा विषय बनली आहे. त्यामुळे या भागातील शेती शिवारांना साड्यांची कुंपणे दिसू लागली आहेत.

एका एकरसाठी दीड हजारांचा खर्च : वन्य प्राण्यांपासून शेती पिकांचे नुकसान टाळण्यासाठी साड्यांचे कुंपण केले आहे. एका एकरसाठी पन्नास ते साठ साड्या लागतात. त्यानंतर काठी व इतर साहित्य लक्षात घेता दीड हजारांचा खर्च येतो. या दीड हजारांच्या खर्चात लाखमोलाच्या पिकांचे संरक्षण होते. -विजय काचगुंडे, शेतकरी अंजनवाडा