आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिद्दीला सलाम!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझ्याकडे घरकामाला एक बाई होत्या. त्यांचे नाव सुरेखा, नावाप्रमाणेच त्या सुंदर होत्या. राहणीमान एकदम टकाटक, त्यांना पाहून कुणाला विश्वासच बसणार नाही की त्या धुणी-भांडी करत असतील. माझ्याकडे कामाला यायच्या, पण आमच्यात बोलणं कधी होत नसे. त्यांना वाटायचे मी शिष्ट, गर्विष्ठ आहे आणि मला वाटायचे त्या रागीट आहेत.कारण रोज पळतच यायच्या, काही न बोलता त्यांचं काम करायच्या आणि खाली मान घालून निघून जायच्या. जाता जाता एकच कटाक्ष टाकायच्या, त्यातच मी घाबरून जायचे. पण हळूहळू थोडं बोलणं होऊ लागलं आमच्यात. मग रोजचा चहा होऊ लागला बरोबरच. एवढी सवय त्यांची लागली की त्या नाही आल्या तर चहा एकटीला घेऊ वाटत नसे.

 

एकदा माझी मुलगी खूप आजारी होती. काही केल्या ताप कमी येईना. त्यांनी एक दिवस पाहिलं, उपाय सांगितला आणि मुलीला गुण आला. तेव्हापासून एक वेगळंच नातं आमच्यात तयार झालं. अगदी बहिणीसारखंच. प्रत्येक वेळी कसलीही अडचण आली की सुरेखाला सांगितल्यावर त्यावर हमखास उपाय त्यांच्याकडे असणारच हे माहीतच झालं होतं. कधी वाईट काही सांगितलं नाही, नेहमी चांगलंच मार्गदर्शन मिळालं.अनुभव त्यांच्या वयापेक्षा जरा जास्तच होते.

 

त्यांच्याकडे  मला वाटायचे १६ घरची कामं करतात रोज, त्यामुळे माणसं जास्तच वाचता येतात त्यांना. एक दिवस त्यांना विचारलं की ‘तुम्ही एवढ्या घरची काम करता, दिवस सगळा जातो. का एवढी वढवढ करता.’ त्यावर त्यांनी सांगायला सुरुवात केली. ‘माझं नशीबच खडतर आहे. माझं माहेर हुबळी (कर्नाटक). माहेरी खूप श्रीमंती, घरकामाला नोकरचाकर. सात भाऊ. घरचा मोठा व्यवसाय. गावात खूप मान आहे वडिलांच्या घराला. सात भाऊ आणि चार बहिणींच्या पाठची मी, लाडकी होते घरी. शिक्षण बारावीपर्यंत पण कन्नडमधून. माझ्या मावशीने स्थळ आणलं तिच्या पाहुण्यांतलं, मुलगा देखणा. बीए झालाय, पण कापड दुकान आहे, स्वतःच ते बघतो. मग भावांनाही वाटलं, लांब का असेना पण चांगलं स्थळ आहे. मावशी जवळ आहे, कमी-जास्त बघेल ती. ‘दुकान पाहिलं जाऊन, सर्वांना सगळं आवडलं आणि लग्न झालं. घरी सगळे कन्नड बोलत होते त्यामुळे भाषेची अडचण आली नाही. पहिले दोन महिने छान गेले. घरचे सगळे चांगले वागायचे. आणि एक दिवस अचानक नवरा दुकानी जायलाच तयार नव्हता. मी खूप मागे लागले जा म्हणून. मग म्हणले, दुकान माझं नाही, आत्याचं आहे. मी पगारी कामाला होतो, पण त्यांची मुलं मला कपडे दाखवायला सांगतात गिऱ्हाईकाला, मला ते आवडत नाही, मी काम सोडलं.’ हे ऐकून पायाखालची जमीनच सरकली. सासू गप्प बसली, दीर पण खाली मान घालून बसला. मग सावरलं कसंबसं स्वतःला. वाटलं जाऊ दे, आपलं नशीब. माहेरी काही सांगितलं नाही, त्यांना काळजी नको वाटलं.’

 

‘वर्तमानपत्रात एक दिवस नोकरीची बातमी वाचली आणि नवऱ्याला वाचायला सांगितली तर वाचता येईना. चक्क अंगठाबहाद्दर निघाला नवरा. आता मात्र मी पूर्ण खचून गेले. आपण फसलो समजलं. पण भाऊ खचून जातील म्हणून गप्प राहिले.’


‘घरातलं सगळं काम करू लागले. नवरा काम करत नाही म्हणल्यावर सगळं सहन केलं. पण एके दिवशी दिलं जावेने-दिराने हाकलून. मोठा मुलगा फक्त सहा महिन्यांचा होता. पडलो बाहेर आणि आलो इथं.’


‘अकलूजसारख्या गावात कोणी ओळखीचे नाही. मराठी बोलता येत नव्हतं आणि समजतही नव्हतं. एका ठिकाणी मारवाड्याच्या घरी काम मिळालं. नवरा मराठी चांगलं बोलायचा. सकाळी सहापासून त्यांच्या घरी काम करायचे. नवरा त्यांच्या दुकानात राबायचा. पगार जास्त नव्हता, पण राहायला एक खोली दिली आणि डोक्यावर छप्पर आलं. भाषा कळत नव्हती, पण खुणावलेलं समजायचं. त्यांच्या सुनेचं ब्यूटी पार्लर होतं, तिच्या हाताखाली काम करून बघून सगळं शिकले होते. चार वर्षं तिथं राहिले. पण बाहेर जाऊ देत नव्हते. मुलाला शाळेत घातलं छोट्या गटात. त्याला सोडायला आणायला जाताना दोन घरची धुणीभांडी करून यायचे. पण मालकाच्या घरी समजलं. नवराही कामचुकार. दिलं हाकलून. पण जिथे काम करत होते त्या बाईंनी समजून घेतलं आणि राहायला शेजारी खोली दिली. अजून चार घरची कामं दिली. मराठी लिहायला-वाचायला शिकवलं. देवाच्या आरत्या शिकवल्या. मी काम मनापासून आणि जिद्दीने करू लागले. नवरा काम करत नव्हता. मी जिद्द सोडली नाही. भावांना फोन करून सांगायचे, नवरा नोकरी करू लागलाय, काळजी करू नका.’

 

‘मी माहेरी गेली की अगदी थाटात राहायचे. त्यामुळे त्यांना कधी समजलं नाही मी काय काम करते. मुलानेही कधी सांगितलं नाही. आज सोळा घरची काम इमानाने करते. मुलाला इंजिनिअर केलं. चार गुंठे जागा घेतली. छोटं घर बांधलं. वास्तुशांत केली. भावांना बोलावलं, ते खुश झाले.’
हे ऐकून मी भान हरपून गेले. आज त्यांचा मुलगा नोकरी करतो, चांगला पगार घेतो. काम सोडायला लावलं आईला. ज्या आईने ताजं अन्न कधी खाल्लं नाही, तिला सुखात ठेवलंय.
सलाम त्या माउलीला आणि तिच्या मुलाला.

बातम्या आणखी आहेत...