आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूबंदीचा एल्गार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महेश पवार गेल्या चार-पाच वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या संघर्षाला मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात सरकार दारूबंदी करत नाही, तोवर आंदोलन थांबणार नाहीच, उलट अधिक तीव्र करणार, असा महेश यांचा निर्धार आहे. शुक्रवारी यवतमाळमध्ये पार पडलेल्या मोर्च्यात याची झलक पाहायला मिळाली.

 

बाईचं दुखणं बाईलाच माहीत, अशी सर्वसाधारण धारणा दिसून येते. महिलांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी, न्याय मिळवून देण्यासाठी स्थापन झालेल्या सामाजिक संस्थादेखील प्रामुख्याने महिलाच चालवताना दिसतात. पण महिलांच्या सामाजिक समस्यांवर काम करणाऱ्या पुरुषांचीही संख्या मोठी आहे. वेगवेगळ्या विषयांवर ही मंडळी काम करताना दिसतात. अगदी मासिक पाळी असू दे किंवा घरगुती हिंसाचार. यवतमाळचे महेश पवार हे याच पंक्तीतील एक नाव. महेश गेल्या चार-पाच वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या संघर्षाला व आंदोलनाला आता मोठे स्वरूप प्राप्त झाले असून मागच्या शुक्रवारी जवळपास एक लाख महिलांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. महेश यांनी यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीसाठी जो लढा उभा केला आहे, तो एका रात्रीत उभा राहिलेला नाही. त्यासाठी महेश व त्यांची दीडशे साथींची टीम अथक परिश्रम घेत आहे. महेश यांच्या या लढ्याला त्यांच्या स्वत:च्या घरातूनच सुरुवात झाली कारण त्यांचे वडील खूप दारू प्यायचे, त्यातूनच आईला मारझोड, घरात भांडणे नित्याचेच होते. या साऱ्याला वैतागून आईने जाळून घेतले, सुदैवाने त्या वाचल्या. परंतु, त्वचा भाजल्यामुळे विदर्भातील रणरणत्या उन्हाळ्यात प्रचंड वेदना व्हायच्या. चादर थंड पाण्याने ओली करून मला गुंडाळा, अशी आर्त विनवणी त्या करीत. एवढं दुखतं का, असं महेश यांनी विचारल्यावर त्या म्हणायच्या, तू मोठा झाल्यावर कळेल तुला दारूचा त्रास. महेश यांच्या काळजाला आईच्या या वेदनांनी घरे पडली.

 

यवतमाळ जिल्ह्यातील घाटनजी तालुक्यात महेश यांचे बालपण गेले. पथनाट्य हा महेश यांचा पिंड होता. पाणलोट क्षेत्र व सेंद्रिय शेती विषयावर त्यांनी आठ हजाराहून अधिक पथनाट्य केली होती. १५ वर्षे फिरून महाराष्ट्र पालथा  घातला होता. त्यामुळे लोकाभिमुख कामालाच भिडायचे त्यांनी ठरवले होते. दरम्यान, २०१५मध्ये वर्तमानपत्रात एक बातमी त्यांनी वाचली, दारूसाठी बायको पैसे देत नाही म्हणून बापाने स्वत:च्या मुलाला चटके दिले. या बातमीने महेश यांना सुन्न केले. आपल्या आईच्या वेदनांची दाहकता त्यांना खऱ्या अर्थाने  कळाली होती. यामुळे दारूबंदीसाठीच काम करण्याचा निर्धार पक्का झाला. या घटनेनंतर महेश यांनी यवतमाळ जिल्ह्यात फिरून अभ्यास केला. गावात, तालुक्यात व जिल्ह्यात दारूमुळे उद्ध्वस्त झालेले संसार त्यांना ठिकठिकाणी दिसू लागले.


महेश सांगतात की, मोतीबाई तुळसा यांचे दोन्ही मुले, नवरा पक्के दारुडे. संध्याकाळ झाली की घरात राडा ठरलेला. मोतीबाई मग संध्याकाळचा स्वयंपाक करून घरातून निघून जात. गावात कोणाच्याही घरी रात्रीपुरता आसरा मागून तेथेच झोपी जात. १० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला होता त्यांना रात्री स्वत:च्या घरात झोपायला. रेखा उदेची कहाणी त्याहीपेक्षा करुण. वडील दारू प्यायचे म्हणून माझे लग्न लवकर लावून द्या, म्हणजे सुटेल मी यातून, अशी तिची धडपड होती. शेवटी लग्न ठरले, पण लग्नमंडपात नवरदेवाला उभे राहण्यासाठी दोन माणसांनी धरून ठेवले होते, एवढा तो प्यालेला होता. रेखाताई साफ कोसळली. पण तरीही रडत रडतच गळ्यात माळ टाकलीच तिने, कारण लग्न केले नाही तर बदनामी होईल व बाकी दोन बहिणींचे लग्न होणार नाही. लग्नानंतर साहजिकच दारूच्या नशेत नवरा प्रचंड मारझोड करायचा. मुलं पण दारूच्या आहारी गेली. दारूने केलेला हा विध्वंस मोठ्या प्रमाणात दिसत होता. अनेक जणी विधवा झाल्या होत्या, काहींना नवऱ्याने टाकले होते, काही घर सोडून गेल्या होत्या तर काही या नरकात अहोरात्र होरपळत होत्या. महेश यांनी अखेरीस दारूबंदीसाठी एल्गार पुकारत २८ एप्रिल २०१५ रोजी पहिला मोर्चा काढला. या मोर्चास प्रचंड प्रतिसाद लाभला. पाचेक हजार महिला यात सहभागी झाल्या. यानंतर महिला स्वत:हून पुढे येऊ लागल्या. न्यायासाठी झगडू लागल्या. महाविद्यालयीन युवकांनाही महेश यांनी या लढ्यात सहभागी करून घेतले. 


स्वामिनी दारूबंदी अभियानाचा जन्म यातूनच झाला होता. या अभियानांतर्गत तालुका व जिल्हा पातळीवर अनेक मोर्चे आत्तापर्यंत काढण्यात आले आहेत. सातशेपेक्षाही जास्त स्वामिनी समिती आज यवतमाळ जिल्ह्यात काम करताहेत. दारूबंदीसाठी प्रबोधन, या संदर्भातील आंदोलनाची दिशा सांगणे, पोलीस तक्रार करणे हे काम ही समिती करते. या समितीचे यश म्हणजे २१ वर्षांची तरुणी असो की ७० वर्षांची म्हातारी, सर्व महिला हिरीरीने मोर्चात सहभागी होतात. त्यासाठी वर्गणी काढून खर्च उभा करतात. महिलांची एकी हे या आंदोलनाचे मोठे यश आहे. माजी आमदाराला घेराव घालून आम्ही तुला मते दिली, तू दारू पण थांबवू शकत नाही आमच्यासाठी, असा सवाल करण्याचे धाडस महिलांना या आंदोलनाने दिले.

 

एका महिलेला दारूमुळे त्रास होत असल्याचे कळाल्यावर गावातील इतर महिला एकत्र आल्या, पोलीसात तक्रार दिली. ती महिला इतर कोणाकडे झोपायला गेली तर बाहेरख्याली म्हणून नवरा तिचा छळ करेल म्हणून त्या महिलेसह सर्व महिला ग्रामपंचायत कार्यालयात झोपल्या. चंद्रपूर जिल्ह्यात सरकार दारूबंदी करू शकते तर यवतमाळमध्ये का नाही, या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी महेश यांनी सरकारी उंबरे झिजवले. हिवाळी अधिवेशनात सरकारपुढे या महिलांचे गाऱ्हाणे मांडले. जोपर्यंत यवतमाळ जिल्ह्यात सरकार दारूबंदी करीत नाही, तोवर आंदोलन थांबणार तर नाहीच उलट अधिक तीव्र करणार, असा महेश यांचा निर्धार आहे. तरीही पदरात काही पडले नाही तर आगामी निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकणार हे शेवटचे पाऊल हे अभियान उचलणार आहे. मी माझ्या गावात दारूबंदीसाठी झगडतोय, तुम्ही तुमच्या गावात लढा, तसेच दारूबंदीसाठी सरकारला वेठीस धरा, हा संदेश महेश यांनी महिला व युवकांना दिलाय. दारूपीडित महिलांसाठी लघुउद्योग निर्मिती हे आंदोलनाचे पुढील ध्येय असणार आहे.
 

बातम्या आणखी आहेत...