आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौंदर्यनिकष बदलणारी सिमोना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुंदर दिसण्यासाठी शरीराच्या एखाद्या विशिष्ट भागाची प्लास्टिक सर्जरी अथवा इतर शस्त्रक्रिया करणं ही अप्रुपाची गोष्ट राहिली नाही. नट-नट्यांच्या बाबतीत तर हे हमखास घडतं. मात्र, फक्त आणि फक्त  टेनिसमध्ये करिअर घडवण्यासाठी म्हणून यंदाच्या विम्बल्डन विजेत्या सिमोनानं ब्रेस्ट सर्जरी केली होती. सौंदर्यासाठी नव्हे, तर करिअरसाठी अशा प्रकारची सर्जरी करून सिमोनानं एक नवं उदाहरणं घालून दिलंय...

 

सिमोनाच्या वयाच्या चौथ्या वर्षी तिच्या आईने एक स्वप्न पाहिले होतेे, सिमोनाने एक दिवस विम्बल्डनच्या हिरवळीवर अंतिम सामना खेळावा. ते स्वप्न नुसतेच साकार झाले नाही, तर सिमानाने थेट अजिंक्यपद पटकावले. या जेतेपदाचा आनंद सिमोना, तिच्या परिवारासाठी खास होता. वयाच्या चौदाव्या वर्षी सिमोनाने टेनिसलाच आपला ध्यास बनवला. पण सिमोना अति लाजाळू होती. फोनवर बोलायलादेखील घाबरायची. लहान मुलं शाळेत जाताना रडतात, तशी ती टेनिस कोर्टवर रडत असे. तिचे मित्र पार्टीला जायचे, तर सिमोना झोपा काढत असेे. थोडक्यात इंट्रोवर्ड म्हणूनच तिची प्रतिमा होती. पण सिमोनाने जिद्द सोडली नव्हती. ट्रेनिंगसाठी तिने घर, परिवार सोडला. स्वभावाने लाजाळू असलेल्या सिमोनाला हे सर्व हाताळणं नक्कीच सोपं नव्हतं. पण आई-वडिलांचा विश्वास होता की, सिमोना एक दिवस मोठी स्पर्धा जिंकणारच ! सिमोना जिममध्ये घाम गाळू लागली होती. स्वत:ला व्यक्ती म्हणून लोकांमध्ये कसं सादर करायचं हे शिकत होती. कॅमेरा फेस करत होती. सगळं असं छान सुरू होतं आणि वयाच्या १७ व्या वर्षीच सिमोनाला तिच्या छातीच्या मोठ्या आकाराने खूप फ्रस्ट्रेशन आणले. तिच्या छातीचा आकार होता ३८ डीडी. छातीच्या या मोठ्या आकारामुळे सिमोनाला कोर्टवर फटके मारताना, वेगाने धावताना फारच त्रास होऊ लागला होता. दैनंदिन जीवनातही हा आकार तिला खूप तापदायक ठरत होता.  नकोसा वाटू लागला होता. तिच्या लक्षात आले की, तिच्या स्वप्नांच्या मार्गात तिचे स्तन अडथळा ठरताहेत. तिला तिच्या गेमवर लक्ष केंद्रितच करता येत नाहीये. शेवटी तिने शस्त्रक्रिया करून स्तनांचा आकार कमी करण्याचा निर्णय घेतला. सतरा वर्षे वय, ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर पोहोचलेली ती एक षोडश कन्या होती, साहजिकच इतरांप्रमाणे तिच्या तारुण्यसुलभ भावना तिला एकीकडे ठेवाव्या लागणार होत्या. टेनिससाठी मला हे करावेच लागेल, असे म्हणून चक्क सतराव्या वर्षीच तिने स्तनांवर शस्त्रक्रिया करून त्यांचा आकार कमी केला. 
आणि सुरू झाली सिमोनाची नवी इनिंग. २००८ मध्येच वयाच्या सतराव्या वर्षी  तिने फ्रेंच ओपन ज्युनियर अजिंक्यपद पटकावले. आत्मविश्वास वाढला होता. पाठदुखी पळाली होती. शरीराच्या एका भागाचा भार थोडा हलका झाल्यामुळेे चपळाई आली होती. पण तरीही सिमोना मोठ्या स्पर्धांमध्ये सपशेल अपयशी ठरत होती. २०१२-२०१३ दरम्यान तर सलग दोन सामने जिंकणेही तिला जमत नव्हते. पण २०१३ च्या उत्तरार्धात  सहा जेतेपदे पटकावल्यानंतर सिमोनाचा नवा अवतार टेनिस जगताने पाहिला. तिचे तंत्र, तिचा स्टॅमिना, पायांची वेगवान हालचाल, डाऊन द लाइन तसेच फोरहँड हे फटके अफलातून होते. याचे मुख्य कारण होते, ते म्हणजे शरीर तिच्या ताब्यात आले होते. स्वत:विषयी असलेलाएक फोबिया, नकारात्मकता तिने दूर सारली होता. टेनिस ती एन्जॉय करत होती. पण या काळातही मोठ्या जेतेपदापासून वंचित राहत होती. ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या सलग तीन अंतिम फेऱ्यांमध्ये ती पराभूत होत होती. २०१४ मध्ये शारापोवाने तिला फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये हरवले. नंतर २०१७ मध्ये फ्रेंच ओपनमध्ये ओस्टापेन्काकडून ती जिंकता जिंकता पराभूत झाली. सामन्यावर पूर्ण पकड असताना सिमोना हरत होती. २०१८ च्या ऑस्ट्रेलियन स्पर्धेत पूर्ण ताकदीनिशी ती लढली. तीन सेट्समध्ये चाललेल्या या लढतीत तिने २०-२० शॉट्सच्या रॅली खेळली, पण तरीही पराभव पाहावा लागला. अति थकव्यामुळे तिला नंतर हॉॅस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट व्हावे लागले. आईने तर टेनिस थांबवण्याचा सल्ला दिला. २००८ मध्ये ज्युनियर  चॅम्पियन झालेली सिमोना  दहा वर्षांत ग्रँडस्लॅम जिंकू शकत नव्हती. नकारात्मक विचारांच्या जाळ्यात ती पुन्हा अडकू पाहत होती. सिमोनाच्या कोचनेही तिच्या नकात्मकतेमुळे तिची साथ सोडली. शेवटी सिमोनाने मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेतला.  स्वत:ला नव्याने समजून घेतले. आणि पुन्हा नव्याने मैदानात उतरली. २०१८ मध्ये अखेरीस तिने  फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकावलेच. तिचे हे पहिलेच  ग्रँडस्लॅम  होते. पण आपण ग्रँडस्लॅम जिंकू शकतो या भावनेने  तिच्या मनावरचे ओझे उतरले. दरम्यानच्या काळात डब्ल्यूटीएची अनेक विजेतेपदेही तिने पटकावली. जागतिक क्रमवारीत नंबर वनला गवसणीही घातली. आणि यंदा थेट सेरेनाला ६-२, ६-२  अशी धूळ चारत विम्बल्डनही जिंकले. खरं तर क्ले कोर्ट तिचे आवडते आहे. पण हिरवळीवर खेळ उंचावण्यासाठीही सिमोनाने प्रचंड मेहनत घेतली. सिमोना अंतर्बाह्य बदलली. इंट्रोवर्ड  सिमोना हसू लागली, बोलू लागली. विम्बल्डनचे जेतेपद उंचावताना,  स्तनांवरील शस्त्रक्रियेचा मला कधीही पश्चात्ताप झाला नाही, हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय होता, असे सिमोना आज छातीठोकपणे सांगत असल्याचा भास झाला जणू. शरीराचा एखादा भाग तुमची ओळख बनवू शकत नाही, ती निर्माणासाठी अनेक पर्याय आहेत, सिमोनाची कारकीर्द हेच तर सांगतेय.

बातम्या आणखी आहेत...