Home | Bollywood | Marathi Cinekatta | sarva line vyast aahet marathi movie Promotion

अफलातून कॉमेडी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, सिध्दार्थ म्हणतो, जे सिनेमे हिट झाले त्यामध्ये मी होतो

मोहिनी वैष्णव | Update - Jan 22, 2019, 11:37 AM IST

चित्रपट 1 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

 • sarva line vyast aahet marathi movie Promotion

  एन्टटेन्मेंट डेस्क. एक नवा कोरा कॉमेडी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. वर्षांच्या सुरुवातीस प्रेक्षकांना खळखळून हसायला मिळणार आहे. 'सर्व लाईन व्यस्त आहेत' हे वाक्य खरंतर सर्वांच्याच ओळखीचे आहे. हे वाक्य आपल्याला रटाळवाणे वाटते. पण आता याच नावाचा कॉमेडी सिनेमा प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. कॉमेडीचे हुकुमी एक्के असलेली मंडळी नव्या वर्षात नवा धमाका घेऊन येत आहेत. सिनेमामध्ये महेश मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, संस्कृती बालगुडे, कमलाकर सातपुते, नीथा शेट्टी, गौरव मोरे आणि राणी अगरवाल यांच्या भूमिका आहेत. सध्या चित्रपटाचे प्रमोशन सुरु आहे.

  सिनेमाच्या प्रमोशनसाठी टीम 'दिव्य मराठी'त
  - सध्या 'सर्व लाइन व्यस्त आहेत' सिनेमची टीम सध्या प्रमोशनच्या कामात व्यस्त आहे. या टीमने नुकतीच 'दिव्य मराठी' कार्यालयात भेट दिली. टीमने सिनेमाच्या शूटिंगदरम्यान खूप धम्माल केली आहे आणि एक अफलातून कॉमेडी सिनेमा ते आपल्यासाठी घेऊन येणार आहेत. सिध्दार्थ जाधव आणि सौरभ गोखलेची जोडी यामध्ये विशेष लक्ष वेधून घेणारी आहे. या दोघांनी यापूर्वीही 'सिम्बा' या हिंदी सिनेमामध्ये एकत्र काम केले आहे. या सिनेमात एकत्र काम करताना दोघांनीही फुल एनर्जीने काम केल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच संपूर्ण टीमने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रचंड धम्माल केली आहे. एक खूप सुंदर कथा घेऊन आम्ही येत असल्याचे त्यांनी सांगितले.

  - सिध्दार्थ जाधवला त्याच्या या 10 वर्षांत आयुष्यात झालेल्या बदलाविषयी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने सांगितले की, मी बदललेलो नाही, मी तोच आहे, फक्त आता मी वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसतोय. सुदैवाने मला चांगले सिनेमे मिळाले. जे सिनेमे हिट झाले त्यामध्ये मी होतो. मी कधीही कुणाशीही स्पर्धा करत नाही. माझी स्पर्धाही स्वतःशी असते. मी फक्त 40 टक्के लोकांना आवडतो. उर्वरित 60 टक्के लोकांना मी आवडत नसेल. पण त्यांना पूर्णपणे आवडावे हे आवश्यक नाही. कारण आपण 100 टक्के प्रेक्षकांना आवडतो असे होत नसते. मी जे करतोय ते माझ्या परीने बेस्ट करतो. मी हे सर्व आपल्या मराठी इंडस्ट्रीकडून शिकलो आहे. मी मराठीमध्ये खूप कलाकरांसोबत काम केले आहे. मला प्रत्येकांकडून काही तरी शिकायला मिळाले. मी ते सोबत घेऊन काम करतो.

  - सिध्दार्थ म्हणाला की, 'मराठी इंडस्ट्रीमध्ये आपुलकी आहे. तस हिंदीमध्ये प्रोफेशनलिजम आहे. तिथे सर्व नियोजनबध्द पध्दतीने कामं चालतात. आपल्या मराठीमध्ये आपल्याला घरच्यासारखं वाटतं. पण हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याचा अनुभव खुप छान होता. मी यापुर्वी गोलमालमध्येही रोहित शेट्टींसोबत काम केलं आहे. आता 'सिम्बा'मध्ये काम केलं. खुप छान अनुभव होता.'

  - यासोबतच सौरभ गोखलेने आपला चित्रपटांचा अनुभव शेअर केला. सौरभ म्हणाला, मी आतापर्यंत ज्या ज्या भूमिका केल्या त्या सर्व वेगळ्या होत्या. माझी आजपर्यंत एकही भूमिका सारखी नव्हती. 'सिम्बा'मध्ये मला व्हिलेनची भूमिका करायला मिळाली. हा अनुभवही खुप छान होता. आता हा सिनेमा कॉमेडी आहे. यामध्ये काम करतानाही खुप धम्माल केली. मी एका वेगळ्या भूमिकेत तुम्हाला दिसणार आहे.

  अशी आहे चित्रपटाची कथा
  ‘समीर’...एकुलता एक मुलगा, तो ही मनाने आणि राहणीमानाने एकदम साधा पण त्याचं लव्ह मॅरीज होणार असे गडबडे बाबांनी केलेले भाकीत. एक से बढकर एक, नटखट, प्रेमळ, ग्लॅमरस तरुणी आणि जिगरी दोस्त ‘बाब्या’चे लव्ह टीप्स... या सर्व गोष्टींमुळे एंटरटेनमेंट पॅकेज असलेल्या ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चित्रपटात खूप सारे मनोरंजक किस्से आणि धमाल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

  अमोल उतेकर प्रस्तुत, स्टेलारीया स्टुडीयो निर्मित आणि प्रदिप रघुनाथ मेस्त्री दिग्दर्शित ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरमधून प्रेक्षकांना याचा अंदाज आलाच असेल की मैत्री, फ्लर्टिंग, प्रेम, लग्न हे जर आयुष्यात असेल तर आयुष्य एक रोलर कोस्टर राईड होऊन जाते.

  या चित्रपटात सिध्दार्थ जाधवने बाब्याची आणि सौरभ गोखलेने समीरची भूमिका साकारली आहे. आणि समीरच्या आयुष्यात येणा-या मुलींची भूमिका संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, नीथा शेट्टी-साळवी आणि राणी अग्रवाल या अभिनेत्रींनी साकारली आहे. ट्रेलर तर अफलातून आणि मनोरंजक तर आहेच पण गडबडे बाबा या व्यक्तीने धमाल डायलॉगबाजी करुन प्रेक्षकांची चित्रपटाप्रती उत्सुकता नक्कीच वाढवली असणार. सर्वांचे लाडके महेश मांजरेकर यांनी साकारलेले गडबडे बाबा पात्रं लोकप्रिय होणार यात शंका नाही. तसेच कमलाकर सातपुते, माधवी सोमण, प्रियंका मुणगेकर, संध्या कुटे, सतीश आगाशे, शिवाजी रेडकर, हितेश संपत आणि गौरव मोरे या कलाकारांनी देखील ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ची रंगत वाढवली आहे. आयुष्यात प्रेम नाही ना केलं तर ते आयुष्य व्यर्थ आहे असं सांगणारा ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चित्रपट 1 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

 • sarva line vyast aahet marathi movie Promotion
 • sarva line vyast aahet marathi movie Promotion
 • sarva line vyast aahet marathi movie Promotion

Trending