independence day / सातारा जिल्ह्यातील गाव- मिलिट्री आपशिंगे; येथे प्रत्येक घरात एक सैनिक, गावात 1650 पेक्षा जास्त जवान लष्करी सेवेत

महायुद्धात 46 शहीद, म्हणून इंग्रजांनी जोडला मिलिट्री शब्द

दिव्य मराठी

Aug 15,2019 07:46:00 AM IST

सातारा - महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गाव आहे - मिलिट्री आपशिंगे. नावातच देशसेवेचे व्रत आहे. प्रत्येक घरातील एक जण सैन्यात किंवा सीमा सुरक्षा दलात कार्यरत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरू झालेली ही परंपरा आजही कायम आहे. या गावात १६५० पेक्षा अधिक जवानांनी सैन्यात आणि इतर सुरक्षा दलात सेवा बजावली आहे. इंग्रजांच्या काळात पहिल्या महायुद्धात या गावातील ४६ जवान शहीद झाले होते. यामुळे इंग्रजांनी या गावाचे नाव मिलिट्री आपशिंगे असे ठेवले.


दुसऱ्या महायुद्धातही गावातील चार जण शहीद झाले. १९६२ मध्ये युद्धातही चार आणि १९६५ आणि १९७१ मध्ये पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धातही एक-एक जवान शहीद झाला होता. सातारा जिल्ह्यातील अनेक गावांतील अनेक जण सैन्यात आणि सुरक्षा दलात आहेत. हे जवान मराठा रेजिमंेट, महार रेजिमेंट, इंजिनिअर रेजिमंेट, मद्रास रेजिमेंटमध्ये कार्यरत आहेत. तसेच नाैदल, हवाईदल, बीएसएफ, सीआरपीएफ आणि इतर सुरक्षा दलांत मोठ्या संख्येने जिल्ह्यातील जवान सेवा बजावत आहेत. सैन्यातून कॅप्टन पदावरून निवृत्त झालेले शंकरराव देशमुख यांनी सांगितले की, ज्या पद्धतीने शिक्षकाचा मुलगा शिक्षक आणि इंजिनिअरचा मुलगा इंजिनिअर बनतो, तसेच आपशिंगे गावात सैनिकी परंपरा आहे.


ब्रीदवाक्य - इथे घडती वीर जवान, एका कुटुंबाचे २३ जण सैन्यात
गावात श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात मुलांना परेड, ड्रिल शिकवले जाते. नववीच्या सौरभ निकमचे म्हणणे आहे की, गावाचे ब्रीदवाक्य आहे - “इथे घडती वीर जवान.’ ८१ वर्षांचे निवृत्त कॅप्टन लक्ष्मण कारंडेंची चौथी पिढी सैन्यात आहे. पुतण्या विश्वास मेजर जनरल पदापर्यंत पोहोचला. कुटुंबातील २३ जणांनी सैन्यात सेवा दिली.

X