आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुष्यात समाधान महत्त्वाचे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मी किती जगलो यापेक्षा मी कसा जगलो याचा ताळेबंद आपण आपल्या प्रत्येक वाढदिवसाला मांडत गेलो तर त्यातून उर्वरित आयुष्याची दिशा आणि दशा ठरवायला निश्चितच मदत होईल आणि उतारवयात पश्चात्ताप करायची वेळ येणार नाही. एक समृद्ध, समाधानी जीवन जगून शेवटचा दिस गोड करायची कला सर्वांनाच साधते असे नाही. माझे इथले कार्य संपले आहे. मी सामान बांधून तयार आहे. निरोप मिळाला की निघालोच. असे जीवन जगणारे अत्यंत दुर्मिळ असतात. कारण माणूस आयुष्यभर बंधनात जगत असतो. ही बंधनं स्वत:च लादून घेतलेली असतात. आशा सोडवत नाही. आशा हे असे बंधन आहे की त्यात अडकलेला धावतच राहतो आणि मुक्त असलेला जागेवरच थांबतो. कधी थांबायचे ते आम्हाला कळले पाहिजे. सोलापूर जिल्ह्यातील बेगमपूरचे आमचे एक नातेवाईक, बाबूराव विभुते. वय वर्षे ९2. निसर्गचक्रात गात्र थकलेली, परंतु वृत्ती टवटवीत. त्यांची जोडीदारीणही त्यांना साजेशीच. त्यांना चार मुली आणि चार मुले. बाबूरावांची आई लहानपणीच देवाघरी गेल्यामुळे त्यांचे बालपण सावत्र आईमुळे त्रासात गेले आणि तारुण्य घाण्याभोवती फिरण्यात गेले. हलकी मुरबाड जमीन त्यांच्या वाट्याला आली. दहाजणांचे कुटुंब पोसण्यासाठी मोलमजुरी करावी लागली. त्याही परिस्थितीत त्यांची नेकी आणि विनोदबुद्धी शाबूत राहिली. यथावकाश बाबूरावांनी संपत्तीची वाटणी केली. पाच एकर जमीन स्वत:साठी ठेवून घेतली. निरक्षर बाबूरावांच्या नियोजनाचे आणि त्यांच्या आनंदी, समाधानी जगण्याचे कौतुक वाटते. मागच्या आठवड्यात त्यांच्या नातीच्या विवाहासाठी बेगमपूरला गेलो होतो. पान-तंबाखू खाता खाता ते म्हणाले,‘बरं झालं पाव्हणं तुम्ही आलात. पुन्हा आपली भेट होणार नाही.’ मी म्हणालो, ‘अण्णा, तुम्ही दोघे शंभरी पार करणार.’ त्यावर ते म्हणाले ‘पाव्हणं, मी आणि आमचं खटलं (त्यांची पत्नी) भरून पावलो. कंडक्टरनं डबल बेल दिली की गाडी सुटणार...’