आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिग्गज त्रयींना साहित्यिक अभिवादन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पु.ल. देशपांडे, सुधीर फडके आणि ग.दि . माडगूळकर आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे या तिघांचे २०१९ हे जन्मशताब्दी वर्ष आहे. प्रा. प्रवीण दवणे  यांच्या "जीवश्च कंठश्च'  या पुस्तकामध्ये अशा या तीन थोर व्यक्तींचे कार्य उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तोदेखील  त्यांच्या सहज आणि सोप्या भाषेत, हे महत्त्वाचे.

 

महाराष्ट्राचे तीन दिग्गज... पु.ल. देशपांडे, सुधीर फडके आणि ग.दि . माडगूळकर आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे या तिघांचे २०१९ हे जन्मशताब्दी वर्ष आहे. या शताब्दीच्या निमित्ताने महाराष्ट्रभर अनेक कार्यक्रम होत आहेत, परंतु या तीन व्यक्तींबद्दल नव्या पिढीला काय आणि कितपत माहिती दिली जाते याचा विचार करणे गरजेचे आहे. त्यांच्या साहित्याचे अभिवाचन केले जाते, बाबूजींच्या गाण्याच्या चालीबद्दल, संगीताबद्दल गाण्याचे कार्यक्रम होतात, पण फार क्वचित या तिघांचे कार्य उलगडून दाखवले जाते. प्रा. प्रवीण दवणे  यांच्या "जीवश्च कंठश्च' या  पुस्तकामध्ये अशा या तीन थोर व्यक्तींचे कार्य उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तोदेखील  त्यांच्या सहज आणि सोप्या भाषेत, हे महत्त्वाचे. 


आपल्या "जीवश्च कंठश्च'या पुस्तकात प्रा. दवणे म्हणतात, "शंभरी अनेकांची भरते, परंतु शताब्दी एखाद्याचीच होते. इथे तर या वर्षी तीन मोठ्या व्यक्तींची जन्मशताब्दी साजरी होत आहे हे महत्त्वाचे.  काही दिवसांपूर्वी कॉलेजमध्ये असाच कार्यक्रम होता तेव्हा मुलांनी सहज विचारले, तुम्ही या तिघांना पाहिले का? मी म्हणालो हो , त्यांचे कार्यक्रमही प्रत्यक्ष पाहिले आहेत. असे उत्तर देताच ती मुले वेगळ्या नजरेने माझ्याकडे बघू लागली. 
आज पु.ल. देशपांडे यांच्या कथा सर्व जण ऐकतात त्या अनेक ऑडिओ बुक, व्हिडिओच्या माध्यमातून. परंतु पु. ल. देशपांडे यांच्या लिखाणाबद्दल त्यांच्या वेगवेळ्या पैलूंबद्दल त्यांना माहीत नसते. ते काम प्रवीण दवणे यांनी अत्यंत प्रभावीपणे यांनी केले आहे. त्यामध्ये पु.ल. देशपांडे यांच्या वेगळ्या व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख करताना त्यांनी पु.ल.देशपांडे यांनी ज्या व्यक्तिरेखा निर्माण केल्या उदाहरणार्थ अंतू बर्वा, नारायण याबद्दल अत्यंत साध्या-सोप्या शब्दांत सांगितले आहे. जणू काही ‘तुझे आहे तुजपाशी’मधील काकाजी म्हणजेच पु.ल. देशपांडे आहेत असे जाणवते, असे ते म्हणतात. त्याचबरोबर प्रवासी पुलं, जिव्हाळ्याचा शिक्षक, बोलणारे विद्यापीठ, मिश्किल पुलं , पुलंचा  काव्यात्म दृष्टिकोन, त्यांची प्रवासवर्णने,रसिकराज पुलं ,रवींद्रनाथमय पुलं... हे इतके असताना त्यांनी नवीन येणाऱ्या साहित्याचे स्वागत केले. पण तरीही त्यांच्यावर मध्यम वर्गाचे प्रतिनिधी असा आरोप उगाच होत असे. कारण त्यांनी ज्या व्यक्तिरेखा निर्माण केल्या त्यामध्ये एक वेगळाच संदेश असे. दया पवार यांचे "बलुतं' जेव्हा आले तेव्हा पुलं म्हणाले, "या आत्मचरित्राच्या वाचनाने आपल्या निबर डोळ्यांना चिकटलेले आंधळ्या रूढिजन श्रद्धांचे, सत्यदर्शनाला पारखे करणारे मोतीबिंदू गळून पडतील आणि हे भयानक वास्तव पाहता पाहता डोळ्यात दाटणाऱ्या अश्रूंची नवी किरणे उतरल्याचा साक्षात्कार होईल.


तर दुसरीकडे संगीतकार सुधीर फडके यांच्याबद्दल लिहिताना या पुस्तकात प्रा.  प्रवीण दवणे म्हणतात, सुधीर फडके यांच्या गीतांच्या चालीमुळे प्रेमगीतालाही नायकाच्या बलिष्ठ उमदेपणाचे परिमाण लाभले. बाबूजींनी गायलेल्या प्रेमगीताला आपोआप एक निष्ठा आणि उत्कटचे रूप येते. ते चंचल गीत होत नाही.' प्रा. प्रवीण दवणे यांची सुधीर फडके यांच्याबरोबर झालेली पहिली भेट अत्यंत वेगळी आहे. त्या वेळी प्रवीण दवणे हे विद्यार्थिदशेत होते. त्यांना कुतूहल होते ते बाबूजींचे घर बघण्याचे आणि त्यांना मिळालेली पुरस्कारचिन्हं बघण्याचे.परंतु पुढे ते म्हणतात गीतकार झाल्यावर बाबूजींचे चिरंजीव श्रीधर फडके यांच्याबरोबर त्यांच्या घरी गीतलेखन करताना, मागे बसलेले बाबूजी आणि त्यांनी मंदपणे दिलेली दाद नेहमीच महत्त्वाची होती, सुधीर फडके बाजूला असताना, ऐकत असताना गाणे लिहिणे हे किती अवघड होते त्याचा अनुभव प्रा.दवणे यांनी घेतलेला आहे. ग.दि. माडगूळकर म्हटले की "गीत रामायण' असेच म्हटले जाते, परंतु माडगूळकर यांनी जे काही अफाट लिहून ठेवले आहे त्याचे अत्यंत साध्या शब्दांत प्रा. प्रवीण दवणे यांनी विवेचन केले आहे, भरभरून लिहिले आहे.  प्रवीण दवणे हे मूलतः कवीच आहेत. त्यामुळे माडगूळकर यांच्या अनेक प्रकारच्या गीतांबद्दल त्यांनी  लिहिले आहे, त्यांच्या पैलूंबद्दल लिहिले आहे. "जोगिया' नंतर माडगूळकर खरे तर सर्वच थरांतील रसिकांना, समीक्षकांना माहीत झाले. प्रा. दवणे यांनी माडगूळकर यांच्या पुरिया दरवळे,  जोगिया रंगे, लावण्यरंग आणि लावण्यगर्भ या लेखांमधून अनेक उदाहरणे देऊन अत्यंत प्रभावीपणे लिहिले आहे. त्यामुळे माडगूळकरांची गीते नुसती गाणी नाहीत, तर त्या गाण्यातील शब्दांचे अनेक कंगोरे दाखवून दिले आहेत.  प्रा. दवणे यांनी माडगूळकर यांच्या काव्यावर खूप लिहिले आहे. कदाचित ते दीर्घ लेख वाटतील, पसरट वाटतील, परंतु नवीन पिढीसाठी प्रा. दवणे यांनी माडगूळकरांची करून दिलेली ओळख महत्त्वाची आहे.अ र्थात माडगूळकरांच्या लिखाणाचा आवाका खूप मोठा आहे. जे माडगूळकर यांच्या गाण्यावर, गीतांवर कार्यक्रम करतात त्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. नवीन पिढीला हे पुस्तक निश्चित मार्गदर्शक ठरेल. जे मराठी साहित्य क्षेत्रात येऊ इच्छितात आणि येणाऱ्या पिढीलादेखील  नवचैतन्य प्रकाशनाने हे काढलेले "जीवश्च कंठश्च!' हे पुस्तक जाणकारांनी, रसिकांनी संग्रही ठेवावे असे आहे. असे आहे. कदाचित ते संदर्भासाठी, अभ्यासासाठी एखाद्या विद्यापीठालाही लावले तर मराठी भाषेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक आणि माहितीपूर्ण ठरेल.

जीवश्च कंठश्च

लेखक - प्रा. प्रवीण दवणे {नवचैतन्य प्रकाशन
पृष्ठे २२२ {किंमत - ३५० रु.
लेखकाचा संपर्क - ९८२०६८०७०४