आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मातृत्वाचा झरा : गिरिजा कीर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सतीश जैन, नाशिक आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकासाठी आईचे महत्त्व वेगळे असते. माझ्यासाठी ते विशेष होते कारण प्रख्यात साहित्यिक गिरिजा कीर यांनी मला मुलगा मानले होते. सन २००२ मध्ये यूथ फोरम मंचतर्फे आम्ही राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित केले होते. त्यावेळी माझी व त्यांची पहिली भेट झाली. त्या भेटीनंतर मी त्यांचा मुलगा झालो.         गिरिजा कीरांनी माझ्यावर खूप प्रेम केले. चुकलो तेथे माझे कान पकडून रागवल्यासुद्धा. माझ्या प्रत्येक सुखदुःखात त्या सहभागी झाल्या.  मुरुडच्या शाळेने आणि निसर्गाने त्यांच्यात लेखनाचे संस्कार रूजवले असे त्या सांगतात.  किर्लोस्कर, प्रपंच, ललना या मासिकांतून त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या. गिरिजाबाईंनी विविध वाङ‌्मय  प्रकारात आपले लेखन केले आहे. त्यांची एकूण आजमितीस १११ ग्रंथसंपदा  प्रकाशित आहेत. कथा, कादंबरी, मुलाखती, प्रवासवर्णने, बालसाहित्य इत्यादी विविधता आहे. १९६८ ते १९७८ या काळात अनुराधा मासिकाची सहायक संपादिका म्हणूनही त्यांनी काम केले. हे काम करीत असताना सामाजिक प्रश्नांसंबंधीच्या प्रेमापोटी कामगार वस्ती, कुष्ठरोग्यांची वस्ती आणि आदिवासी भागात जाऊन त्यांनी त्यांच्या जीवनाचा जवळून अभ्यास केला. त्यांनी त्यांचे पुष्कळसे लिखाण या अनुभवातूनच लिहिले आहे.  गिरिजाघर, देवकुमार, चांदण्याचं झाड, चंद्रलिपी, चक्रवेद, स्वप्नात चंद्र ज्याच्या, आभाळमाया, आत्मभाग, झपाटलेला या कादंबऱ्याही लोकप्रिय आहेत.       गाभाऱ्यातील माणसं, यात्रिक, आभाळमाया, आत्मभान, माझ्या आयुष्याची गोष्ट ही पुस्तके एवढी दर्जेदार आहेत की यातील एका तरी पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळायला हवा होता. पण तो का मिळाला नाही याचे उत्तर नाही. गाभाऱ्यातील माणसं, जगावेगळी माणसं, कलावंत, साहित्य सहवास ही त्यांची व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके आहेत. त्यांनी बालसाहित्यावरही बरेच लेखन केले. अखिल भारतीय बालकुमार मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.  यासोबत अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. त्यांच्यातील लेखिका ही शंृगारिक तशीच गंभीर आणि अंतर्मुखही दिसते. "जन्मठेप’ हे पुस्तक त्यांनी ६ वर्षे येरवडा तुरुंगातील कैद्यांवर संशोधन करून लिहिले. त्या तर त्यांच्याही आई झाल्या. अशी आई मला लाभली हे माझे भाग्य!  संपर्क : ९६०४२४४५४७