Home | Magazine | Rasik | Satish Waghmare Write Article About Gangster Arun Gavli

ड्याडींची गांधीगिरी

सतीश वाघमारे | Update - Aug 26, 2018, 07:24 AM IST

गांधी विचारांचा ड्याडींवर भलता प्रभाव पडला. त्यांचे धडाक्यात सत्याचे प्रयोग सुरू झाले. त्याचाच हा खुसखुशीत तर्जुमा.

 • Satish Waghmare Write Article About Gangster Arun Gavli

  माजी ग्यांगस्टर, आजी समाजसेवक-लोकप्रतिनिधी, दगडी चाळीचे पालनकर्ता, तुरुंगनिवासी अरुणभाई गवळी उर्फ ड्याडी यांनी गांधी विचार परीक्षेत पैला नंबर घेतला. या चमत्कारापुढे दुनिया झुकली, दगडी चाळ नतमस्तक झाली. गांधी विचारांचा ड्याडींवर भलता प्रभाव पडला. त्यांचे धडाक्यात सत्याचे प्रयोग सुरु झाले. त्याचाच हा खुसखुशीत तर्जुमा...

  ड्याडीची गाडी बुंग बुंग करत दगडी चाळीच्या गेटावर थांबली आणि कार्यकर्त्या (आता ड्याडीचे सर्वे भायलोक "कार्यकर्त्या'त कन्व्हर्ट झालेत.) लोकांत झुंबड उडाली. आशा वैनी लगबगीने निरांजनाचे ताट घेऊन तयार राहिल्या. गीता-महेश पपांच्या गाडीकडे कौतुकाने पाहू लागले. पांढरा शुभ्र कडक सदरा, पायजमा आणि डोक्यावर गांधीटोपी घातलेले ड्याडी गाडीतून उतरले. त्यांनी औक्षण वगैरे स्वीकारले. मग कार्यकर्ते कार्यकर्ते ड्याडींच्या गळ्यात हार घालायला लागले. तसा ड्याडींनी, ‘ए भायलोग, इथून पुढं आता हार बीर नाय घालायचा कधी आपल्याला. समजला?’ असा प्रेमळ दम भरला.तसा ड्याडींचा राईट ह्यांड असलेला बाबू जलेला ड्याडींच्या कानाजवळ जाऊन काहीतरी पुटपुटला. ड्याडींनी गांधीजींसारखी मान हलवत नकार दिला.मग कय्युम शाना आणि अय्युब हतोडा ड्याडींची मनधरणी करू लागले. ड्याडींनी मग गांधीजी नेहरूंचा हट्ट पुरवताना जसा त्रासिक चेहरा करत आणि मग होकार देत, तसा चेहरा करायचा आटोकाट प्रयत्न करत, बाबू जलेलाकडे पाहिले आणि होकार दिला. बाबुला रिप्लायमदी आपण कसा चेहरा करायचा हे कळलेच नाही. मग ड्याडींनी त्याला पिशवीत हात घालून ‘सत्याचे प्रयोग’ हे पुस्तक दिले. कय्युम शाना आणि अय्युब हतोडा यांना बाबूविषयी जेलसी फील झाली. ड्याडींनी परत गांधीजीसारखे हसत पिशवीत हात घातला आणि दोघांनाही ‘सत्याचे प्रयोग’ हे पुस्तक देऊन टाकले. दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून ड्याडी गांधीजींसारखे पुन्हा निरागस निखळ हसले. येडा याकुब आणि मगन टुंडा यांनी एकमेकांकडे बघितले आणि अंदाज बांधला, का लवकरच ड्याडी कुणाचा तरी गेम वाजवणार!

  ...आता अय्युब हतोडा पुढे व ड्याडी मागे अशी सगळी ग्यांग आयमिन फौज पुढे वाटचाल करू लागली. गर्दीतून वाट काढत लोकांचे नमस्कार-चमत्कार-रामराम-श्याम श्याम-असल्लाम वगैरे स्वीकारत ड्याडी तमाम गर्दीचे अभिवादन स्वीकारत डायरेक्ट एका स्टेजवर पोचले. तिथे छोटू लंगडा स्टेजवर माईकवरून ‘ड्याडीं’चे आगमन झालेले आहे, ‘कृपया शांतता राखा’ असे आवाहन करत होता. ही ‘ड्याडीं’ची वेलकम सभा होती. त्यात ड्याडींच्या जवळच्या लोकांची भाषणं सुरु होती . त्वेषामधी येवून भाषण करताना एका कार्यकर्त्याने ड्याडीला नवी पदवी बहाल केली,ती मात्र ड्याडीला विलक्षण आवडली. पिता! दगडीचाळीचा पिता... मग ड्याडींनी त्या कार्यकर्त्याला महत्वाचे पद द्याचे ठरवून त्याची बदली वसुली विभागातून मर्डर सेक्शनला करायचे ठरवले आणि स्वतःला पिता म्हणून सिद्ध करण्यास सज्ज झाले.

  शेवटी,अध्यक्ष महोदय बाबू जलेलाने उत्सवमूर्ती ड्याडींना दोन शब्द बोलाच असा आग्रेव धरला. दोन्ही हात पायजम्याच्या खिशात ठेऊनच ड्याडींनी भाषणाला सुरुवात केली, ‘भाईलोग,आपल्याला भाषण करता येत नाय, आपुन नामदार नाय.आपल्याला काम करता येतं. आपुन आमदार झालो. आपुन काम केलं. पोलिसांनी आपलं काम केलं. आत टाकलं. आपण आतपण आपलं काम केलं. त्याचा फळ म्हणून आपल्याला बाहेर काढलं. आता यापुढं पण आपुन काम करणार. आपुन आत मदी इग्जामपुरते बापूजी वाचले. आता टोटल बापूजी वाचणार. गेल्या टायमाला, ते पंधरा ऑगस्टला जेलमदी आमच्यासमोर भाषण द्यायला सफेद बाल आणि सफेद दाढीवाला एक म्हातारा बावा आला होता. म्हातारा होता,तरीपण त्याने जीनची प्यांट आणि पांढरा झब्बा घातलेला होता. त्यावरून मी वळखले हा कोणतर समाजवादी बामन आसणार. तो भाषणात बोल्ला, का आपली बाजू एकदम चोख आसली पायजे. मंग विरोधक लोकला बोट ठेवायलापण जागा भेटत नाय. सर्व्या लोकांला आपली बाजू पटते. मंग ते नैतिक का काय, त्या दृष्ट्या एकट्या पडलेल्या विरोधक लोकला आत्मपरीक्षण करायला लागते. ही लढायची स्टैल म्हणजे, आपल्या बापूचा म्हंजे गांधीजींचा विच्यार! हा विच्यार मला भावला. पोग्रॅम झाल्यावर मी त्या समाजवादी म्हाताऱ्याला भाषण भावला, म्हणून सांगायला गेलो, तर जेलर त्याला बोल्ला, ‘बर्वे साहेब, हा ड्याडी तुम्हाला भेटायचे म्हणतो, तर समाजवादी बावा पैश्यांचा पाकिट न घेता, चहा न पेता लगेच पसार झाला, तरीपण मी त्याला आडवून थोडा बोललो का, आपुन भायेर आलो कि तुमाला भेटणार, तुमी लै भारी हे. भाईलोक आज दुपारीच त्याचा अतापता काढला. काय पण नाटक हय, म्हातारा बावा त्या दिवशीच अामेरिकेला पोरीकडे राहायला गेला. हे समाजवादी लोक पोरी आमेरिकेला देतात, ही चांगली बात नाय. इंडयातल्या पोरांना कोण विचारणार मग? हा सामाजिक इश्यू हाहे. आपण पक्षामार्फत त्यावर काम करणार. आपण यासाठी अण्णा हाजारे केजरीवाल यांना भेटणार.

  भाईलोग, समाजवादी म्हाताऱ्यामुळे मला गांधीविचारची वोळख झाली. मी गांधीविचार परीक्षेला बसायचे ठरवले आणि पैला आलो. मंग मी ड्युटीवरच्या मामू लोकांना रोज गांधीविचार सांगू लागलो, तर ते लोक रोजच पळून जावू लागले, मग एक दिवस ते सगळे लोक जेलरला जाऊन म्हणले, एकतर आमाला आत टाका, नायतर ड्याडीला बाहेर पाठवा. बोले तो, गांधी विचार आयकून ते लोक बदलले. मला चांगले वर्तन म्हणून भायेर काढले. हेवडे बोलून मी माजे भाषण संपवतो, बोला महात्मा गांधी की जय...’


  गांधीजींच्या जयजयकारात सभा संपली. ड्याडी घरी आले. ‘वैष्णव जन तो तेणे कहिये’ लाव डेकवर असे त्यांनी आशावैनींना विनम्रपणे सांगितले. तर त्या म्हटल्या,घरात नाहीये, ते बाजारातून आणावे लागेल. मग ड्याडिंनी मगन टुंडाला फोन घुमवला. म्हंजे, टच स्क्रीनवर टकटकटक टिचकी मारून बाजारातून "वैष्णव जन तो तेणे कहिये'पैदा करून आणायला पिटाळले. मगन टुंडा बाहेर पडला तर दगडी चाळीबाहेर सन्नाटा पसरलेला. बाजार बंद झालेला. टुंडा वैतागला. एवढ्यात त्याला एका देवळात एक रिटायर्ड शाळा मास्तर ‘वैष्णव जन तो तेणे कहिये’ भजन गाताना दिसला. मगन टुंडाने पेटीसकट त्याचं बखोटं उचलून ड्याडीच्या घरी नेले. पिताजी बाजारात ‘वैष्णव जन तो तेणे’ भेटले नाही, त्यामुळे हे लाइव्ह आणले आहे. याला पुरे भजन येते . शाळा मास्तर रात्रभर लटलट कापत भजन म्हणत राहिला आणि गांधी विचार आठवत ड्याडी आयमिन दगडीचाळीचे पिता कपभर दूध पिऊन झोपी गेले. आपल्याच तंद्रीत घोरू लागले.

  ड्याडी उर्फ पिताजी सत्यवचनी महापुरुषाप्रमाणे पुढील जीवनाची दीक्षा घ्यायला राळेगणसिद्धीला जायला निघाले. चाळीत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. सगळ्यांनी ड्याडींना प्रेम आणि अश्रूंनी निरोप दिला. तेवढ्यात येडा याकुब ड्याडी शेजारी बसताना हळूच बोलला, पिताजी घोडा बरोबर घेतला का? याकुबच्या वाक्यासरशी सन्नाटा पसरला. आता काय खरं नाय. राडा होणार असं वाटत असतानाच ड्याडी मात्र गांधीजींसारखे निर्मळ हसले आणि मागच्या गाडीत मागच्या सीटवर असलेली बकरी आणि तिच्या शेजारच्या प्लास्टिक ब्यागेत काजू- बदाम- मनुके नि दूध प्यायचा कप हा सरंजाम दाखवला. यापुढे सोबत घोडा नाही तर बकरी असणार आहे, हा मेसेज कार्यकर्त्याला मिळाला.


  सुसाट गाड्या राळेगणसिद्धीत पोचल्या. ड्याडी सरळ यादवबाबा मंदिरात गेले. मंदिराच्या कळसावरील करण्यावरून अण्णा अण्णांच्या खास आवाजात, ‘मय ये कैना चाहता हुं, इस सरकारकी करणी और कथनीमे फरक हय, केजरीवाल अच्छा आदमी नही, मैने घरपे तुळशीपत्र रखा, चार जन आउट किये.’ वगैरे असबद्ध काही तरी बोलत होते. ड्याडीने उर्फ पिताजींनी ते ऐकले. यादवबाबा मंदिरात प्रवेश करतच अण्णाला साष्टांग नमस्कार केला. म्हणाले, तुमच्या सोबत राहून समजशेवा करायची आहे, मला तुळशीपत्र द्या. पैशांची फिकीर नको, लागल तर पैसा डबल घ्या, कॅश घ्या, पण मला आजच्या आज तुळशीपत्र द्या. अण्णा तुम्ही फक्त चार जणांना औट केलेत. आता आपण दोघे मिळून लोकं औट करू.’

  हे सर्व ऐकून अण्णांना घेरी आली. अण्णा गाभाऱ्यात गार झोपले . दुसऱ्या दिवशी सकाळी ड्याडी उर्फ पिताजी पुन्हा अण्णांच्या भेटीला गेले. तर तिथे पारावर बसलेल्या एका म्हाताऱ्याने ड्याडीच्या हातात पेपर दिला .पेपरमध्ये ठळक बातमी छापून आलेली , यादवबाबा मंदिरात ड्याडीने घालवली दुपार आणि अण्णा झाले पसार ! इकडे वृत्त वाहिनीवर निवेदिका पोरगी कर्कश ओरडून सांगत होती , जेलरला आला दाऊदचा फोन, ऐका त्यांचे संभाषण खास आमच्या च्यॅनलच्या प्रेक्षकांसाठी...काय म्हणतोय दाऊद... पहा ऐका, ‘जेलरसाब मै सरेंडर करना चाहता हूं...सिर्फ एक कंडिशन है...कोईबी देशभक्त नेता पर एक्जाम रखो, और उसमे मेरे को फर्स्ट नंबर दो, और फिर फोरन रिहा करो...’


  इकडे बिना तुळशीपत्र परत यावे लागल्याने ड्याडींचा मूड एकदमच ऑफ झाला होता. तेव्हा काळजीने आशावैनी म्हणाल्या, जाऊ द्या, टेन्शन घेऊ नका. तुळशीपत्राचे पेटंट काही अण्णाच्या नावावर नाय. आपण कुठूनही मागवू ते तुम्ही रिल्याक्स व्हा. संजय दत्तवर नवा सिनेमा आलाय तो बघून या.

  चाळीचे पिताजी आपल्या कार्यकर्त्यांसोबत सिनेमा पाहायला गेले. त्यांना सिनेमा आवडला. पण सिनेमात सुनील दत्त, राजेंद्र कुमार यांच्याबरोबर असलेला फटेला संजू ‘मातोश्री’वर जाऊन बाळासाहेब ठाकरेंच्या पाया पडतो हा सीनच नाय. तर चिटिंग झाल्यामुळे ड्याडी अचंबित झाले. त्यांनी डायरेक्ट राजकुमार हिरानीला फोन लावला. का बोवा हा सीन तू कसं काय टाकला नाय? असे बापूंच्या प्रेमळ भाषेत विचारले, तिकडे हिरानीला पोटात कळा चालू झाल्या. संजय दत्तवर आपले काय म्हणणे नाही, पण आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचे मोठेपण सिनेमातून दाखवायला पायजे होते, संजय दत्तच्या आविष्यात मोठ्या साहेबांचे स्थान लय मोठे आहे, माझ्यापण आविष्यात आहे. त्यांनी माझ्या पडत्या काळात ‘तुमचा दाऊद तर आमचा गवली’ ही गर्जना करून खाकीवाल्यांची अडचण करून मला सन्मान दिला होता. त्यामुळे बाळासाहेब, संजय दत्तने त्यांच्या पाया पडणे, बाळासाहेबांनी आशीर्वाद देणे, व मग जेलमधून रिहा होणे हा सीन शूट करून परत टाक. गांधीजी सांगतात, वाइट टायमाला मदत केलेल्या लोकांबाबत आपुन लोकांनी अयसान मानले पायजे... असे म्हणून पिताजींनी फोन ठेवला आणि कृतार्थ भावनेनं कुटुंबाकडे पाहिले. आशा वैनी हसतमुख चेहऱ्याने कौतुकाने पाहत होत्या. ड्याडी त्यांच्याकडे पाहून गांधीजींसारखे निखळ हसले. वैनी कपभर दूध आणायला किचनमध्ये गेल्या. डेकवर "वैष्णव जन तो तेणे कहिये, जे पीड परायी जाणे रे...' मंद आवाजात सुरु झाले...

  sbwaghmare03@gmail.com

Trending