सौदी अरेबिया / जगातील सर्वात मोठी तेल कंपनी आरामकोचे उत्पादन 50 टक्के बंद! हौती बंडखोरांच्या हल्ल्याचा फटका

हौती बंडखोरांच्या हल्ल्यानंतर 50 टक्के इंधन उत्पादन बंद, जाणून घ्या यामागचे राजकारण

दिव्य मराठी वेब

Sep 15,2019 02:11:00 PM IST

रियाध - जगातील सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या सौदी अरेबियाच्या आरामको कंपनीवर हौती बंडखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर शनिवारापासून आरामको कंपनीचे एकूणच 50 टक्के उत्पादन ठप्प पडले आहे. हे उत्पादन किती दिवस बंद राहील यावर काहीच सांगण्यात आलेले नाही. सौदी अरेबियाच्या ऊर्जा मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे, कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर आरामकोच्या सीईओंनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी लवकरात लवकर उत्पादन पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत आहे. येत्या काही दिवसांत त्यावर अधिक माहिती जारी केली जाईल. सोबतच, आरामको कंपनीचे सर्वच कर्मचारी सुरक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


अमेरिकेने इराणवर केला हल्ल्याचा आरोप
याच दरम्यान अमेरिकेने या हल्ल्यासाठी इराणला जबाबदार धरले आहे. इराणनेच जगभरात इंधन पुरवठा करणाऱ्या तेल कंपनीला लक्ष्य केले असा आरोप अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पियो यांनी केला. यापूर्वी अमेरिकेने इराणवर हौती बंडखोरांना शस्त्रपुरवठा आणि प्रशिक्षण दिल्याचा आरोप केला होता. येमेनमध्ये राहणाऱ्या हौती बंडखोरांनी शनिवारी आरामको कंपनीवर 10 ड्रोन वापरून हल्ला केला.


हौती बंडखोर आणि येमेनचे राजकारण
येमेनमध्ये हौती बंडखोर आणि सरकार यांच्यात 2015 पासून संघर्ष सुरू आहेत. हौती बंडखोरांचा येमेनचे माजी राष्ट्राध्यक्ष अली अब्दुल्ला सालेह यांना पाठिंबा आहे. सालेह यांची सत्ता गेल्यानंतर येमेनच्या राष्ट्रपती पदावर अब्दरब्बुह मंसूर हादी यांची सत्ता आली. हौती बंडखोरांनी त्यांना कडवा विरोध करत राजधानीवर हल्ला केला. तेव्हापासूनच राष्ट्राध्यक्ष हादी यांना राजधानी सना सोडून अदेनला जावे लागले. याच ठिकाणी तात्पुरती राजधानी स्थापित करण्यात आणि येथूनच सरकारचे कामकाज सुरू आहे. राजधानी सनावर ताबा मिळवणाऱ्या येमेनच्या हौती बंडखोरांना शिया बहुल राष्ट्र इराणचा पाठिंबा आहे असे आरोप अमेरिका आणि इतर देशांकडून केले जातात. तर विद्यमान राष्ट्राध्यक्ष हादी यांना सौदी अरेबियाचा पाठिंबा आहे. त्यामुळे, या संघर्षाला शिया आणि सुन्नी असे देखील वळण आहे.

X
COMMENT