आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदीच्या प्रिन्सने व्हॉट्सअ‍ॅपद्वारे अ‍ॅमेझाॅनचे मालक बेजोसचा फोन हॅक केला, डेटाही चोरला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२०१८ मध्ये बेजोस यांच्यासोबत युवराज. - Divya Marathi
२०१८ मध्ये बेजोस यांच्यासोबत युवराज.
  • दिव्य मराठी विशेष बेजोसना व्हायरसच्या फायली पाठवल्या : द गार्डियन
  • सौदीचे उत्तर : दावा बिनबुडाचा, योग्य पद्धतीने तर्क सादर करा

​​​​​​​लंडन/रियाध : अमेरिकी उद्योगपती व अ‍ॅमेझॉनचे मालक जेफ बेजोस यांचा मोबाइल सौदी अरेबियाचे शासक युवराज मोहंमद बिन सलमान यांचा मेसेज रिसीव्ह केल्यानंतर तत्काळ हॅक झाला होता. 'द गार्डियन' या ब्रिटिश वृत्तपत्राने सूत्रांच्या आधारे दावा केला आहे की, मे २०१८ मध्ये बेजोस यांच्या फोनवर सौदीच्या युवराजांनी खासगी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावरून मेसेज पाठवला होता. त्यात अनेक व्हिडिओ फायलींत व्हायरस होता, त्यामुळे बेजोस यांचा फोन हॅक झाला होता. डिजिटल फॉरेन्सिक अ‍ॅनालिसिसच्या अहवालात याचा खुलासा झाला आहे. एका व्हिडिओमुळे बेजोस यांच्या फोनची सुरक्षितता भेदली गेली होती. त्यांच्या फोनमधून डेटा चोरला जात असल्याचे त्यातून निष्पन्न झाले होते. दुसरीकडे, सौदी अरेबियाने द गार्डियनचा हा दावा बिनबुडाचा असल्याचे म्हटले आहे. आम्ही या दाव्यांविरुद्ध चौकशीची मागणी करतो, जेणेकरून सर्व तर्क व युक्तिवाद योग्य रीतीने मांडले जाऊ शकतील, असे सौदीने स्पष्ट केले आहे.

वृत्तपत्राच्या दाव्यानुसार, १ मे २०१८ ला जेफ बेजोस आणि प्रिन्स सलमान यांच्यात बरीच चर्चा झाली होती. याचदरम्यान सलमान यांच्या व्हॉट्सअॅपवरून बेजोस यांना व्हायरस असलेल्या फायली पाठवण्यात आल्या. दोघांतील चर्चेच्या काही तासांनंतर बेजोस यांच्या फोनमधील अत्यंत महत्त्वाचा डेटा गुप्तरीत्या काढून घेण्यात आला होता. या गौप्यस्फोटानंतर सौदीचे युवराज सलमान हेच वैयक्तिकरीत्या बेजोस यांचा डाटा चोरण्यात सहभागी होते, असा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे, या हॅकिंगच्या पाच महिन्यांनंतर अमेरिकी पत्रकार जमाल खगोशी यांची हत्या करण्यात आली होती.

सौदी अरेबियाचे सरकार आणि अ‍ॅमेझॉन यांच्यातील नात्यांत २०१८ मध्ये वितुष्ट येण्यास सुरुवात झाली होती. बेजोस हे अमेरिकेचे वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टचेही मालक आहेत. प्रिन्स सलमान यांच्यावर आरोप आहे की, त्यांच्याच आदेशावरून सौदीने वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकार खगोशी यांची हत्या घडवून आली होती. दरम्यान, अ‍ॅमेझॉनने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

खगोशीवरील वृत्तांकनामुळे तिळपापड, म्हणूनच सूड घेतला

बेजोस यांचे सुरक्षा प्रमुख गेव्हिन डी. बेकर यांनी दावा केला की, 'वॉशिंग्टन पोस्ट'ने सौदीत जमाल खगोशी यांच्या हत्येचे प्रकरण चांगलेच लावून धरले होते. खगोशी हे वॉशिंग्टन पोस्टचे स्तंभलेखक होते. त्यांची हत्या झाल्याची कबुली नंतर सौदी अरेबियाने दिली होती. यामुळे सौदीच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. बहुधा म्हणूनच सौदीचे शासक युवराज सलमान हे बेजोस यांचा सूड घेऊ पाहत असावेत.'

बातम्या आणखी आहेत...