आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपने आणलेला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरव प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी फेटाळला, विधानसभेत विरोधकांकडून घोषणाबाजी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सावरकरांचे अनेक क्षेत्रातले योगदान नाकारून चालणार नाही- अजित पवार

मुंबई- आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी आहे. यामुळे भाजपकडून विधानभवनात गौरव प्रस्ताव मांडण्यात आला होता. पण, सावरकर गौरव प्रस्ताव हा नियमांत बसत नाही असे सांगत विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंनी प्रस्ताव फेटाळला आहे. अध्यक्षांनी प्रस्ताव फेटाळताच सभागृहात गोंधळ आणि घोषणाबाजी सुरू झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ताधाऱ्यांनी सावरकरांचा गौरव प्रस्ताव मांडावा अशी मागणी लावून धरली. त्यानंतर विधानसभेत प्रचंड गोंधळ झाला.

यावेळी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "काँग्रेसचे मुखपत्र 'शिदोरी' या मासिकातून सावरकरांना बलात्कारी म्हटले,माफीवीर म्हटले, त्या मासिकावर बंदी घालावी. या मासिकातील तपशील वाचताना मला लाज वाटतेय. सावरकरांचे देशासाठी मोठे योगदान आहे. त्यांचा सन्मान झालाच पाहिजे", असे मत फडणवीसांनी मांडले.

भाजपच्या या मागणीनंतर शिवसेनेकडून परिवहन मंत्री अनिल परब यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, "अध्यक्षमहोदय, भाजपने जो प्रस्ताव मांडला आहे, त्याची तपासणी करुन योग्य तो निर्णय घेऊन सभागृहाचे कामकाज सुरू करावे. नितेश राणे यांचेही मत या प्रस्तावाबाबत घ्यावे. त्यांना तसा प्रस्ताव मांडायला सांगा. त्याहून पुढे सांगतो, सावरकरांना भारतरत्न द्यायचा की नाही त्याबाबतचा निर्णय आधी घ्या. त्यांना भारतरत्न जाहीर करा", असे परब म्हणाले.

सावरकरांचे अनेक क्षेत्रातले योगदान नाकारून चालणार नाही- अजित पवार


"सावरकरांचे योगदान विसरुन चालणार नाही. त्यांच्या देशसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आम्ही सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानतो. केंद्रात सत्ता असून त्यांना भारतरत्न का दिला नाही? दोन वेळा देवेंद्र फडवणीसांनी पत्र दिले आहे. पाच वर्षे त्यांचे सरकार होते, मात्र आजच गौरव प्रस्ताव का? सावरकरांचे योगदान आहे, पण त्यांच्याबाबत वेगवेगळी मते आहेत. सावरकर विज्ञानवादी होते, गाय-बैलांबाबत त्यांचे मत काय होतं हे सर्वांना माहित आहे," असे अजित पवार म्हणाले.

बाळासाहेब थोरांताची सावरकरांना आदरांजली

सावरकारांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपने विधिमंडळाच्या परिसरात सावकरांची प्रतिमा लावून त्यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी काँग्रेसचे नेते मंत्री बाळासाहेब थोरात आले होते. भाजपचे नेते आशीष शेलार यांनी त्यांना सावरकरांना अभिवादन करण्याची विनंती केली. त्यानंतर थोरातांनीही सावरकरांना पुष्पांजली अर्पण केली. त्यामुळे राजकीय वातावरणात वेगळी चर्चा सुरू झाली.