आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढत्या आरक्षणाविराेधात साेलापूरसह नागपुरात ‘सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन’ माेर्चा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर/ नागपूर - दिवसेंदिवस आरक्षणाचे प्रमाण वाढत जात असल्यामुळे खुल्या वर्गातील पात्र उमेदवारांचे भवितव्य धाेक्यात आले आहे. खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, देशाच्या भवितव्यासाठी ‘सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन’या मागणीसाठी रविवारी साेलापूर व नागपूर शहरात मूकमाेर्चे काढण्यात आले.

साेलापुरात लहान मुलांच्या हस्ते ‘सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन’ संदेश लिहिलेले फुगे हवेत सोडून रॅलीला सुरवात झाली. या रॅलीत ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला हाेता. त्यांच्यासाठी स्वतंत्र रिक्षाची व्यवस्था करण्यात आली होती. 
 
नागपुरातील माेर्चात विदर्भाच्या कानाकाेपऱ्यातून आलेल्या हजाराे नागरिकांचा सहभाग हाेता. केवळ उमेदवार व विद्यार्थीच नव्हे तर त्यांचे पालकही सहभागी झाले हाेते. यशवंत स्टेडीयम येथून निघालेल्या मूक मोर्चाचा समारोप कस्तुरचंद पार्क येथे झाला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी डाॅ. संजय देशपांडे, डाॅ. अनुप मरार व डाॅ. अनिल लद्दड म्हणाले यांनी मार्गदर्शन केले. या मागणीसाठी गोंदिया ते मुंबई अशी रथयात्रा काढण्यात येणर असून त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती रथयात्रेची आखणी व संपूर्ण तयारी करील. त्या नंतर लवकरच रथयात्रा काढण्यात येईल, असे डाॅ. लद्दड यांनी सांगितले. 

राज्य सरकारचे मराठा आरक्षण आणि केंद्र सरकारचे आर्थिक आरक्षण यामुळे राज्यात आरक्षणाचा टक्का ७४ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून नोकऱ्यांमध्येही खुल्या प्रवर्गातील जागा कमी झाल्या आहेत, असा माेर्चेकऱ्यांचा आक्षेप हाेता. यापूर्वी याच मागणीसाठी नागपुरात साखळी उपाेषणही करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...